भातुकलीच्या खेळामधली.. अंतिम भाग

कथा त्यांच्या अधुर्या प्रेमाची


भातुकलीच्या खेळामधली.. भाग ४


स्थळ.. इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई.


" हे.. अभिजीत.. अभिजीत.." सोनियाने एका पाठमोर्‍या व्यक्तीला हाक मारली.

" मॅम, तुम्ही मला काही बोललात का?" त्या व्यक्तीने वळून विचारले. सोनियाची निराशा झाली. ती वळली. समोर खरंच अभिजीत उभा होता. हा ही आपल्याला भास होतो आहे असं समजून ती पुढे चालायला लागली.

" एवढी अभिजीत, अभिजीत हाक मारलीस. आणि आता समोर आलो आहे तर निघून चाललीस?" चेहर्‍यावर तेच मिस्किल हास्य होते.

" अभिजीत.. तू खरंच आहेस का?" सोनिया त्याला मिठी मारायला पुढे झाली. पण थांबली. तिच्या डोळ्यात पाणी होते. अभिजीतने रुमाल काढला. डोळ्यानेच तिची परवानगी विचारली. तिने नजरेनेच परवानगी दिली. अभिजीतने रुमालाने तिचे डोळे पुसले. तिच्या गालाला त्याच्या बोटांचा पुसटसा स्पर्श झाला. दोघांनीही क्षणभर डोळे मिटून तो स्पर्श अनुभवला.

" वेळ आहे बोलायला?" त्याने विचारले. ती हसली.

" सगळ्यांसमोर की एकांतात?" त्याने चमकून तिच्याकडे बघितले.

" नको तो अर्थ घेऊ नकोस.. परत प्रपोज नाही करणार तुला. पण एकांतात बसूया." तिच्या डोळ्यात वेदना होती.

" चल कॉफी शॉपमध्ये बसू." यावेळेस त्याने तिचा हात हक्काने धरला. तीही खेचल्यासारखी त्याच्यामागे गेली. त्याने एक कोपर्‍यातले टेबल निवडले. नाईलाजाने त्याने तिचा हात सोडला. दोघे तिथे बसले.

" कुठे आहेस? काय करतो आहेस? इतके दिवस कुठे होतास? आज अचानक इथे कसा?" सोनियाच्या प्रश्नांचा भडिमार झाला.


" हो.. एकेक प्रश्न विचार.. अग माझी आई ट्रॅव्हल्स कंपनीतून परदेशी गेली. तिला सोडायला आलो होतो."

" एकटाच?" तिने शोधक नजरेने विचारले.

" हो.. अग माझा मुलगा आजारी आहे म्हणून बायको त्याच्यासोबत थांबली. तू?"

" मी माझ्या नवर्‍याला घ्यायला आले आहे. आल्यावर कळले फ्लाईट लेट आहे.. सो." दोघेही बोलायचे थांबले. कोणी कोणाशीच बोलत नव्हते. दोघेही एकमेकांच्या नकळत एकमेकांकडे बघत होते.

" खुश आहेस?" दोघांनी एकदम विचारले.

" आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे." सोनिया म्हणाली.

" अजून तशीच आहेस.. अधिकार गाजवणारी.." अभिजीत म्हणाला.

" नाही.. मी अधिकार गाजवणं सोडून दिले आहे. आता माझा नवरा अधिकार गाजवतो माझ्यावर.. माझ्या कंपनीवर."

" कंपनीवर म्हणजे?" अभिजीतने आश्चर्याने विचारले.

" बाबा त्यांच्या बिझनेसमधून रिटायर्ड झाले. त्यांनी कंपनी माझ्या नावावर केली आहे. नाव माझे निर्णय नवर्‍याचे." ती खिन्नपणे हसत म्हणाली.

" ओह्ह सॉरी.."

" तू कशाला सॉरी. तू सांग.. खुश आहेस?"

" हो आहे ना.. आईच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. आता दिवसभर दोघी सासूसुना माझा जीव खात असतात." म्हटलं तर मस्करीत म्हटलं तर गंभीरपणे अभिजीत बोलला.

" तुला पश्चाताप नाही होत तुझ्या निर्णयाचा?" कधीचा टोचत असलेला प्रश्न सोनियाने विचारून टाकला.

" अजिबात नाही.." ठामपणे अभिजीत बोलला. " बघ ना आताही तुझ्या वस्तूंची जेवढी किंमत आहे तेवढा माझा महिन्याचा पगार असेल. मी अजूनही तुझ्या तुलनेत जिथे होतो तिथेच आहे. आणि आता माझेच एक वाक्य मला नेहमी पटते. प्रेमाने पोट भरत नाही. माझी बायको माझ्यासारखीच सामान्य घरातली. तरिही तिच्या गरजा पूर्ण करता करता नाकी नऊ येतात माझ्या. तुझ्या इच्छा आकांक्षा मारून ना तू सुखी झाली असतीस ना मी.." अभिजीत बोलून गेला.

" अजूनही तसाच आहेस रे तू.. तुला खरं सांगू प्रत्येकाला पैशाचे अप्रूप नसते. तू कॉलेजमध्ये जेव्हा आलास ना तेव्हापासून मी तुला पहात होते. स्वतःची इमेज जपायच्या नादात तुझ्याशी थेट बोलायची हिंमत झाली नाही.तुला मी आवडते हे मात्र मला समजले होते. त्या दिवशी तुझे गाणे ऐकले तेव्हा तुझ्यावरच्या प्रेमाचा नव्याने साक्षात्कार झाला. तू मला कधीच विचारणार नाहीस याची खात्री होती म्हणून मीच तुला विचारले. उत्तर अपेक्षितच होते.. तरिही.."

" म्हणून तू तो हट्ट धरलास?" आश्चर्याने अभिजीतने विचारले.

" हो. मला एका दिवसासाठी तरी तुझी बायको व्हायचे होते. मी लहानपणी कधी भातुकली खेळले नाही. पण तुझ्यासोबत एक दिवस भातुकलीच्या खेळातली तुझी बायको होऊन जे वाटले ते नाही सांगता येणार. तू मात्र त्याही वेळेस जमिनीवर होतास. तुला माहिती आहे, त्यावेळेस तू इच्छा जरी दाखवली असतील तरी सर्वस्व उधळले असते तुझ्यावर.. पण.. जाऊ दे.. आता ते भातुकलीचे खोटे लग्न, तो एका दिवसाचा खोटा संसार सगळा मी माझ्या मनाच्या कप्प्यात दडवून ठेवला आहे. जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा मनातल्यामनात तेच क्षण मी परत जगते." सोनियाला अजून बोलायचे होते. तेवढ्यात फ्लाईटची घोषणा झाली..

" चला.. निघायची वेळ झाली.. भेटूयात असेच कधीतरी अवचित.."

" तू तुझा फोननंबर देणारच नाहीस का?" अभिजीतने विचारले.

" नाही.. कारण तू जर परत माझ्या आयुष्यात परत आलास तर या भातुकलीच्या खेळाचा मला कंटाळा येईल आणि तो मोडताही येणार नाही. मग उगाच कशाला विषाची परिक्षा.. पण तुला भेटून खरंच बरं वाटलं. नशीबात असेल तर भेटू पुन्हा.." निरोप घेत सोनिया उठली आणि निघून गेली. अभिजीत तिथेच तिच्या शब्दांचा अर्थ लावत बसला.


कथा कशी वाटली नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all