भातुकलीच्या खेळामधली.. भाग ३

कथा त्या दोघांची


भातुकलीच्या खेळामधली.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की सोनिया अभिजीतवर प्रेम करू लागली आहे. ती त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडते. बघू आता पुढे काय होते ते.

" बोल ना.. करशील माझ्याशी लग्न?" डोळ्यात प्राण आणून सोनिया अभिजीतला विचारत होती.

" कसं शक्य आहे ते. तू एवढी श्रीमंत आणि मी हा असा.. माझ्या बाबांचा जेवढा पगार आहे तेवढा पैसा तू दर महिन्याला पार्टीमध्ये उडवताना मी पाहिले आहे. सोनिया हा अविचार सोडून दे. हे लग्न करून आपण कोणीच सुखी नाही होणार. मी निघतो." अभिजीत जायला निघाला.

" जायच्या आधी फक्त एवढेच सांग, तुला मी आवडते का? जर ही पैशांची दरी नसती तर तू माझ्याशी लग्न केले असतेस का?" सोनिया अभिजीतकडे न बघता बोलत होती. जणू त्याचा नकार ती सहन करू शकली नसती.

" कदाचित केलेही असते.." अभिजीत बोलून गेला.

" म्हणजे तुझे माझ्यावर प्रेम आहे.. मग काय हरकत आहे लग्नाला? माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही.."


" लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही. हवा तेव्हा मांडला, नको तेव्हा मोडला. आता जरी पैसा महत्त्वाचा नाही म्हणालीस तरी त्याच्याशिवाय नाही जगता येत."

" मला एक संधी तर देऊन बघ.." काकुळतीने सोनिया बोलली.



" काय करते आहेस इथे?" अभिजीतने सोनियाला विचारले.


" काय म्हणजे? तुझ्यासाठी स्वयंपाक.."

" येतो का करता?" अभिजीतने मिस्किल हसत विचारले.

" प्रयत्न करते आहे ना?" सोनियाच्या नाकाचा शेंडा लाल झाला.

" हो.. माझी आई.. मी काही मदत करू का?"

" मला आई नको म्हणूस.. किती विचित्र वाटते बायकोला आई म्हणणे.." सोनिया शहारत म्हणाली.

" अग, ती पद्धत आहे बोलायची. आणि तू या पिठात एवढे पाणी का ओतले आहेस?" अभिजीतचे आता लक्ष परातीकडे गेले.

" जास्त झाले का? मी पहिल्यांदाच करते आहे ना.. मला माहित नव्हते. आमच्याकडे महाराज करतात ना स्वयंपाक." डोळ्यावर आलेले केस पाठी करत सोनिया बोलली. ते करताना तिच्या कपाळाला पिठ लागले. अभिजीतला ते बघून हसू आवरेना.

" का हसतो आहेस?"

" ते.. ते.. पिठ लागले आहे तुझ्या चेहर्‍याला?"

" कुठे?" असं विचारताना ते पिठ अजून पसरले. न राहवून अभिजीत ते पिठ पुसायला पुढे झाला. त्याने अलवार हाताने तिच्या कपाळाला स्पर्श केला. त्या स्पर्शाने ती मोहरली. तिने डोळे गच्च मिटून घेतले. तो हलकेच पुढे झाला. त्याने आपले ओठ तिच्या कानाजवळ नेले. तिच्या अंगावर रोमांच फुलले. तो हळूच तिच्या कानात बोलला..

" ही अशी कणिक भिजवू लागलीस तर दोन दिवसांनी जेवायला मिळेल मला." सोनियाने डोळे उघडले.. झालेल्या अपेक्षाभंगाने तिला राग आला होता..
तिने त्याच हाताने अभिजीतला मारायला सुरुवात केली..

" दुष्ट आहेस एक नंबरचा.. खूप खूप वाईट आहेस." अभिजीतने तिचा हात पकडला, तिला घट्ट मिठीत घेतले. ती ही नदी सागराला मिळते तशी त्याच्या मिठीत हरवून गेली.


हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all