Jun 15, 2021
कथामालिका

भातुकली (भाग तेरा)

Read Later
भातुकली (भाग तेरा)

भातुकली (भाग तेरावा)

(चैत्राली भिकादादाच्या पाया पडायला वाकली तसा परागही वाकला. भिक्याने त्यांना तोंड भरुन आशिर्वाद दिला. भिक्याच्या लालतांबूस पाड्याशी यश खेळत बसला होता. आता पुढे..)

 भिक्याचा निरोप घेऊन ती तिघं गाडीत बसली व घराकडे येऊन उतरली.

चैत्राली व पराग मागील बाजुला गाडी पार्क करुन अंगणात आले. घरातून मोठमोठ्याने सुजातावहिनीचे आवाज ऐकू येत होते.

 "या म्हाताऱ्याने वीट आणलाय अगदी. उगीचंच हातवारे काय करतो..काहीतरी असबंद्ध बडबडतो,नीट जेवणाकडेही लक्ष नाही.

 बाकीची माणसं काय म्हातारी होत नाहीत! हेच एक झालेत का? डोक्याला ताप नुसता. यांच्या वयाचे माझे अप्पा रोज प्राणायाम करतात,मंडईत जाऊन भाजी आणतात,जोत धरतात नाहीतर हे. 

शिकवण्याशिवाय आयुष्यभर काही केलं नाही आणि आता आमच्या गळ्यात लोढणं झालेत नुसतं."

यावर तिचा भाऊ चिन्मय काय बोलतो हे ऐकायला ती तिथेच थांबली.
"अगं चैतू येणारेय म्हणाली होती. आली तर पाठवायचं यांना तिच्यासोबत. या बहिणींच एक बरं असतं बुवा आईवडिलांना सांभाळायला नको पण माहेराच्या इस्टेटीत कायद्याने हिस्सा घ्यायला पुढे."

यश अंगणात कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळण्यात रमला. भावाचे बोल चैतूच्या काळजात विषारी बाणासारखे रुतले. परागने तिच्या खांद्मावर हात ठेवून तिला धीर दिला. दोघंही दारात उभी राहिली तसा चिन्मय पुढे आला.

"अगं ऐकलस का सुजाता, पराग भावोजी व चैतू आलैत. पाणी घेऊन ये बघू. या या भावोजी बसा. आणि यश कुठे आहे आमचा?" तितक्यात यश उड्या मारत कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन आत आला.

"ई..ते कुत्र्याचं पिल्लू आधी बाहेर ठेव यश. असं घरात आणू नये राजा. कुठे कुठे फिरतात नं ती." इति सुजाता.

"नाही..माझंय ते. मी नाही सोडणार तेला."

"यश बाळा,त्याला त्याची आई शोधेल की नाही. मग ठेव बरं त्याला होता तिथे." अशी चैत्रालीने यशची समजूत घालताच थोड्याशा नाराजीने यशने ते पिल्लू नेऊन अंगणात ठेवलं व परागसोबत हातपाय धुवायला गेला. 

चैत्राली तात्यांच्या पाया पडली व त्यांना बिलगली तेव्हा सुजाताने तिचं नकटं नाक जमेल तेवढं मुरडलं. बऱ्याच वर्षांनी लेकीला पाहून तात्यांच्या डोळ्यातून आनंदाची आसवं गळू लागली. परागने त्यांना नमस्कार केला. यश आजोबांच्या मांडीवर जाऊन बसला.

"सुजाता वहिनी,मुली कुठे दिसत नाहीत त्या?"

"चिंगी आणि बबली आजकाल बाजूच्या बंगल्यात खेळायला जातात. येतील संध्याकाळपर्यंत."

"आणि त्यांचा अभ्यास गं?"

"कसलं मुलींच्या अभ्यासाचं घेऊन बसलाय. उद्या दुसऱ्याच्याच घरी जाणारैत. आम्हाला थोडीच मुलगा आहे तुमच्यासारखा!"

चैतू यावर काहीच बोलली नाही. तिने सुजाताला स्वैंपाकात मदत केली व पानं वाढली. यश आजोबांच्या हातूनच जेवणार म्हणून हट्ट करुन बसला तसं आजोबांनी त्याला गोष्ट सांगत सांगत भरवलं.

"बघा तरी लेक आलेय तर किती आनंदी झालैत तात्या! रोज कुठेतरी ध्यान लावून बसतात."

"सुजाता वहिनी,पराग आम्ही निघतो लगेच. तात्यांना सोबत घेऊन जातो. तिथे डॉक्टर उपचार करुन बघतो जरा."चैत्राली म्हणाली.

"आम्हीही करतो हो डॉक्टर उपचार इथे. दर आठवड्याला डॉक्टर आणावा लागतो. एक का दोन दुखणी आहेत त्यांना. बरं आणि नेताय ते त्यांना हवं तितके दिवस ठेवा हो. लवकर पाठवण्याची घाई करु नका मुळीच."

चैत्रालीने माजघरात जाऊन देवाला व आईच्या फोटोला नमस्कार केला.

"आई,आज तू असतीस तर माझे तात्या इतके दीनवाणे,लाचार झाले नसते गं. पुरुषाचं बायकोशिवाय बरंच अडंत आई.बायकोशिवाय म्हातारपण म्हणजे मरणप्राय वेदना ज्या माझे तात्या भोगताहेत." 

तितक्यात सुजाता आत आली व तिने चैत्रालीला हळदीकुंकू लावून तिची ओटी भरली.

तात्या परागसोबत पुढे बसले व यश तात्यांच्या मांडीवर बसला. चैत्राली मागच्या सीटवर बसली. पुढे कसं काय करायचं याचे आराखडे मनात मांडू लागली. 

घरी पोहोचेस्तोवर रात्र झाली. वरणभाताची खिचडी सर्वांनी मिळून खाल्ली. यशला तर हक्काचा दोस्त मिळाला होता खेळायला. तो तात्यांसोबत खेळण्यात रमला व त्यांच्या कुशीतच झोपी गेला. सकाळी पराग व चैत्राली त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तात्यांच्या काही टेस्ट केल्या व म्हणाले,"तात्या,काही घाबरायची गरज नाही. तुम्ही अगदीच तंदुरुस्त आहात."

"तुम्ही माझी बाग बघा समोरची तोवर मी तुमची औषधं लिहून देतो." डॉक्टरांनी बेल वाजवताच नर्स तात्यांना बागेत घेऊन गेली. डॉक्टरांनी चैत्रालीकडे मोर्चा वळवला.

"चेत्राली,पराग तुम्ही दोघेही समजदार अहात तात्यांच हे दुखणं वयानुरुप आहे. 

जसजसं वय वाढतं तसा मेंदुतील काही पेशी म्रुत होतात. मेंदू आक्रसत जातो. यात व्रुद्धांची स्मरणशक्ती कमी होते.

 त्याच त्याच गोष्टी परत परत बोलत रहातात,भ्रमिष्टपणा वाढीस लागतो. वाक्यरचना तुटक होते. शेवटी अशी व्यक्ती कायमची मुकीही होते. खाण्यापिण्याचं,अगदी कपड्यांचही भान रहात नाही.

 आपल्याकडे व्रुद्धांच्या या समस्येला म्हाताऱ्याला म्हातारचळ लागलाय म्हणतात. सून,जावई,अगदी पोटची मुलंही आपापल्या व्यापात असतात. त्यांच्यासाठी अशी ज्येष्ठ मंडळी घरात असणे म्हणजे डोकेदुखी होऊन बसते. 

ऑफिसचं टेंशन,मुलांचा वाढता अभ्यास,त्यांच खाणंपिणं या साऱ्यात दमलेली मुलं आईवडिलांना एकतर गावी जाऊन रहा म्हणून सांगतात..अगदी सांगतात असं नाहीत पण त्यांची इथली गरज संपली याची त्यांना वेळोवेळी जाणीव करुन देतात.

 गावी घर नसेल तर मग व्रुद्धाश्रमात नेऊन सोडतात. तोही एक प्रकारचा अनाथाश्रमच असतो. ज्या मुलांना रक्ताचं पाणी करुन वाढवलं त्यांना व्रुद्धाश्रमात सोडून येतात, नंतर बघायलाही जात नाहीत.

 तुमच्या या केसमधे तात्या खरंच भाग्यवान. तुम्ही त्यांना लवकरात लवकर घेऊन आलात. 

मी लिहून देतो ती औषधं त्यांना वेळेवर द्या. पण खरं सांगायचं तर त्यांना तुमच्या सहवासाची,मायेची गरज आहे. रोज त्यांच्याशी ठराविक वेळ गप्पा मारा. प्राणायाम करुन घ्या. जेवणात फळं,भाज्यायुक्त चौरस आहार द्या. महिनाभरात गुटगुटीत होतील तात्या. 

तात्यांच्या तब्येतीत चैतूकडे आल्यापासून सुधारणा होत होती. चैतू घरीच असल्यामुळे त्यांना वेळेवर नाश्ता,जेवण,औषधगोळ्या द्यायची. त्यांच्याशी गप्पा मारायची. जुन्या आठवणींची पानं दोघं मिळून चाळायची. 

तात्या खिडकीतून खाली बघत होते. तितक्यात तिथे चैत्राली आली.

"तात्या,काय पहाताय एवढं!"

"अगं या पोरी ऑफिसला चालल्यात धावतपळत ते पहातोय. तो..तो बाळ बघ..आईला फ्लाईंग किस देतोय. गुलाम खाऊ आणायला सांगतोय. ती चिंटी बघ..फ्रॉक बघ कसा फुलाफुलांचा घातलाय नि मम्मीपप्पा ऑफिसला गेले म्हणून आजीच्या कडेवर बसून मुळूमुळू रडतेय.

चैत्रा,तूही किती हुशार,मेहनती होतीस! पदवीधर झालीस न् मी लगेच लग्न लावून दिलं तुझं. तुला अजून शिकवलं असतं तर नक्कीच आज तू मोठ्या पदावर असली असतीस. चैत्रा,मी अपराधी आहे तुझा."

चैत्राली म्हणाली,"तात्या,काहीतरी मनात नका हो आणू. सगळ्यांनीच नोकऱ्या केल्या पाहिजे असं काही नाही आणि माझं शिक्षण काही वाया नाही गेलं. आपल्या यशला शिकवतेच नं मी."

तात्या मग कुंडीत फुललेल्या आबोलीकडे बघत बसले. चैत्रालीला म्हणाले,"चैत्रा,तुझ्या आईला किती आवड होती  न् आबोलीच्या फुलांची. 

परसवात आबोलीच्या फुलांचा ताटवा फुलला की ही कामधाम टाकून आधी त्या फुलांचा गजरा ओवायची. वेणीत माळायची.. तिच्या आठवणी पांघरुन घ्याव्याशा वाटतात गं. एकटाच बसतो तिच्याशी बोलत,हसत..मग सुजाता,चिन्मय,नाती वेडा समजतात मला. 

मी वेडा आहे का गं चैतू..मुलांना अवघड प्रमेयं सहजसोपी करुन सांगणारा एक हाडाचा शिक्षक म्हातारपणी मुलाच्या, सुनेच्या राज्यात ठार वेडा ठरावा!

 अगं दुनियेने वेडं म्हंटलं तर मला त्याचं फारसं काही वाटत नाही पण माझ्या घरातल्यांनी माझी अशी निर्भस्तना केली की काळीज तुटतं बघ. हा देव बघ ना जोडी तोडतो..किती वाईट आहे ना हा!"

चैतूला काही बोलावं सुचत नव्हतं. ती तात्यांच्या हातावर हात ठेवून बसून राहिली. तिलाही अगदी भरुन आलं होतं. 

आठवडा बरा गेला. आजोबा आल्याने यशही खूष होता.
दुपारचं जेवण त्याला आजोबांच्या हातून लागायचं. जेवण झालं की दोघंजणं खिडकीत बसून कविता म्हणायचे..

थरथरत्या फांदीवरती
एक चिमणी बसली आहे
इकडेतिकडे मान वळवूनी
काय बरे ती पाहत आहे

इवली चोच न् इवले डोळे
पावसात न्हालेले अंग ओले
इवल्या पायांवरती उभी ती
हिरव्यागार फांदीवर आहे

इकडूनतिकडे तिकडूनइकडे
खेळ तिचा हा चालू आहे
पंख फडफडवूनी एकसारखे
अंग आपुले वाळवीत आहे

पोट पांढरे पाठ करडुवी
छोट्यांची ती चिऊताई आहे
चिव चिव चिव चिव चिव चिव
किलबिलाट हा चालू आहे

भुर्रकन गेली उडून बरे ती
पुन्हा आली सखयांना घेऊन
चार सख्या त्या एकत्र जमुनी
काय बरे गुज बोलत आहेत

अशा पिटुकल्या ठुमकताना
झाड आनंदे डोलत आहे
वाऱ्यासवे मिळवूनी सूर
ते निसर्गगाणे गात आहे

यशला आजोबांच्या कविता फार आवडायच्या तसंच इसापनितीतल्या गोष्टीही खूप आवडायच्या. आजोबा गोष्ट सांगू लागले की तो इटुकल्या हनुवटीवर मुठ ठेवून गोष्टीत हरवून जायचा.

 यश त्यादिवशी दुपारी शाळेतून आला तो अगदी मलूलसा. चैत्रालीने त्याच्या अंगाला हात लावला. यशला सणकून ताप भरला होता. तात्याही घाबरले. तात्यांनी त्याला बिरबलाच्या खिचडीची गोष्ट सांगत मुगडाळभाताची,मेतकुट पेरलेली खिचडी भरवली. 

चार घासच खाल्ले असतील तो पेंगू लागला. चैत्रालीने त्याला चूळ भरायला लावली, औषध दिलं व बेडरुममधे झोपायला घेऊन गेली. त्याच्यासोबत तिचाही डोळा लागला. 

पाचेक वाजता चैत्राली उठली. तिने यशच्या कपाळाला हात लावला. यशचा ताप आता निवळला होता. त्याला घाम आला होता. सुती कपड्याने तिने त्याला पुसलं व परत पांघरुण घातलं.

 तिने तोंड धुतलं व तात्यांसाठी चहा ठेवला. हॉलमधे आली.बघते तर हॉलमधे तात्या नाहीत. बाहेरचं लोखंडी दार बंद होतं पण त्याला कडी नव्हती. चैत्राली घाबरली..एकतर सकाळीच तात्या हळवे झाले होते..तात्या आपल्या जीवाचं काही बरंवाईट..तिच्या मनात अनेक अगोचर शंका येऊ लागल्या. 

चैत्रालीने परागला फोन लावला व सगळी हकीगत सांगितली. 

पराग म्हणाला,"अगं तिथेच आसपास असतील. तू यशला सोडून खाली येऊ नकोस. मी बघतो त्यांना."

(क्रमशः)