Aug 18, 2022
कथामालिका

भातुकली (भाग दहावा)

Read Later
भातुकली (भाग दहावा)

भातुकली (भाग दहावा)

मयंकने मीनूची हनुवटी त्याच्या तर्जनीने उचलली तशी मीनू लाजून गोरीमोरी झाली.

 तिच्या बटांवर विसावलेले पाण्याचे थेंब मोत्यांसारखे चमकत होते. मयंकने पावसातच तिच्या ओलेत्या ओठांच दीर्घ चुंबन घेतलं. 

मीनाने तिचे डोळे मिटून घेतले आणि आणि झिम्माड पाऊस पडू लागला. 

मयंक तिला बिलगला. तिच्या कंबरेभोवती आपल्या बाहुंचा पाश घालत तिच्यासोबत पदन्यास करत गाऊ लागला..

साज साज साज तुझा
नित्य नवा ढंग तुझा
नभातल्या चंद्रालाही
वाटे हवा संग तुझा

छंद छंद छंद तुझा
लागे मज नाद तुझा
हास्यातून पेरीतेस
मोत्यांचा चांदणचुरा

ताल ताल ताल तुझा
थिरकता बाज तुझा
रासलीला खेळायाला
अधीर गोविंद तुझा

गोल गोल गोल तुझी
नाभी मदमस्त जशी
कमनीय बांधा तुझा
वळणाची सिंहकटी

स्पर्श स्पर्श स्पर्श तुझा
मोरपिसी तरलसा
डोहातूनी उमटला
अलवार तरंग सा

मोह मोह मोह तुझा
आवरेना सखे मला
पावसात भिजताना
नादावतेस तू मला

दोघंही पाऊसधारांत चिंब भिजली. पावसाचा जोर ओसरुन ओलेतं ऊन सगळीकडे पसरलं तेव्हा ती जोडी भानावर आली. 

आत बेडरुममधे येऊन दोघांनी टॉवेलने अंग कोरडं केलं व रजईत एकमेकांना लपेटून घेतलं. परस्परांची हवीहवीशी उब घेऊ लागले. 

प्रेमाचा उत्कट आवेग ओसरल्यावर मीनू  मयंकला म्हणाली,"मयंक,बघ न्युक्लिअर फेमिली असली की असं कधीही एकमेकांच्या कुशीत शिरता येतं."

"ए वेडाबाई, मुलं नसतात का घरात? 

आपल्याला वाटतं तसं नसतं गं मीनू. जे आपल्याजवळ नाही ते आपल्याला हवंहवंस वाटतं. 

आपल्या दोघांना असा एकांत फार कमी मिळतो म्हणून तर ओढ कायम टिकून आहे आपल्यातली. 

मीनू मी बरीच जोडपी पाहिली आहेत जी आईवडलांपासून वेगळी रहातात तरी अतिजवळिकीमुळे त्यांच्यात सतत भांडणं होतात,अबोला वाढत जातो.

 एकाच घरात राहूनही ती परक्यासारखी रहातात गं.

 माझ्या एका साहेबाचं असंच काहीसं आहे. दहा वर्ष झाली लग्नाला..मुलीला होस्टेलला ठेवलय.

 दोघांच्या इगोमुळे दोघंही एकाच घरात राहून एकमेकांची तोंडं बघत नाहीत. 

बायको तिचा स्वयंपाक करते. नवरा त्याचा स्वयंपाक करतो. आणि आपण आपल्या आईबाबांना बघणार नाही तर कोण बघणार गं. 

तुमची हमरीतुमरी ही होतच रहाणार पण मला माहितीय माझी मीनू मनाने किती प्रेमळ आहे ती. ते जाऊदे ये अशी जवळ यार."

आणि मग दोघंही रजईत गाढ झोपून गेले. 

मीनूने उठल्यावर थोडा वरणभात लावला,बटाट्याच्या काचऱ्या केल्या. दोघजणं एकाच ताटात जेवली. 

सगळं आवरुन तिथून बाहेर पडली. 

आशना खाली आलीच होती. तिच्या स्वाधीन तिच्या चाव्या करत मयंक म्हणाला,"आशनाताई, दरवर्षी दोनेक दिवस अशी लॉजिंग दे बरं आम्हांला. तुझे थँक्स कसे मानायचे काही कळत नाही बघ."

आशना म्हणाली,"थँक्स वगैरे मानू नका यार.

 तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण? तुम्हा लोकांच नं एकच चुकतं,तुम्ही बायकोलाही सेक्स हवा असतो याचा विचार करत नाही. 

तुमच्या मुडनुसार वापरता बायकोला. सॉरी,माझं हे बोलणं आवडणार नाही तुम्हाला पण आपुन ऐसाच है बंस. 

आगे एक पीठपिछे एक आपुनको नहीं जमता.

 कंदीबी वाटलं दोनचार दिस बायकोसंग गुटरगु करावं तर येत जावा हक्काने." 

आशनाला निरोप देऊन मयंक व मीना घरी आले. जाईला  तिच्या मामाने घरी आणून सोडले होते. ती तिच्या अंबूसोबत भातुकली खेळण्यात रमली होती. 

"कुठे होता दिवसभर? जाईने मला सांगितलं की मम्मापप्पा    काल रात्रीच आजीकडून निघून गेले." इति कुमुदताई.

"अगं आई, माझ्या मीनूला बऱ्याच दिवसांनी घेऊन बाहेर गेलो होतो."

"अरे कशाला रे पैशाची उधळपट्टी करता? पैसे का झाडाला लटकतात?" 

पण कुमुदताईंच्या तिरकस बोलण्यावर आज मयंक व मीनू दोघांनीही लक्ष दिलं नाही. 

मीनूने तर ठरवलं,"आता उगाच घरातल्या कुरबुरींवरुन मयंकशी भांडायचं नाही. त्याच्यासोबत मिळालेला प्रत्येक क्षण हा पहाटेच्या दवासारखा अलगद टिपून घ्यायचा." 

एका हाताने टाळी वाजत नाही तसं कुमुदताई काही तिरकस बोलल्यातरी मीना दुर्लक्ष करु लागल्यामुळे आपोआपच घरातली भांडणं कमी झाली.

 जरा अर्धा तास लवकर उठून ती कणिक मळणे,भाजी चिरुन ठेवणं ही कामं करुन ठेवू लागली. कुमुदताईंनाही मग जरा आराम पडू लागला.

चैत्रालीला तिच्या माहेरुन फोन आला. फोनवर तिची वहिनी बोलत होती,"किती दिवस पोसायचं आम्ही या म्हाताऱ्यांना? अहो म्हणजे तुमच्या वडिलांना. लेक म्हणून तुमचं काहीच कर्तव्य नाही का?"

"अगं वहिनी,काय केलं तात्यांनी?"

"अगं भ्रमिष्टासारखे झालैत नुसते. नसता डोक्याला ताप झालाय माझ्या हा म्हातारा म्हणजे."

"ती सासू राहिली असती न् हा म्हातारा वर गेला असता तरी चाललं असतं. ती दोन कामं तरी करायची."

"या वयात कसल्या कामाची अपेक्षा करतेस गं वहिनी त्यांच्याकडून? आयुष्यभर झिजलेत आमच्यासाठी. ऐंशी पार केली आता."

"दुरुन डोंगर साजरे गं बाई. तुला काय कळणार माझं दु:ख! अगं एकटेच मोठ्याने देवाची गाणी काय म्हणतात न् पाढे काय म्हणतात.. उठतात नि चालू लागतात.

 कधीकधी अंगावरल्या कपड्यांचही भान नसतं त्यांना. तसेच जाऊन पारावर बसतात. लोक दहा तोंडांनी आम्हालाच बोलतात की सून,मुलगा नीट बघत नाही,काळजी घैत नाही. 

आता आम्ही आमचा संसार सांभाळायचा का ह्या म्हाताऱ्याची सेवा करत बसायचं? तू बरोबर वाट्याला येशील हो मग पण महिनाभर म्हाताऱ्याला स्वतःजवळ नेऊन ठेवशील तर ते नाही व्हायचं तुझ्याच्याने." असं म्हणत चैत्रालीच्या वहिनीने फोन कट केला. 

चैत्राली तिथेच बसली मटकन. 

तिच्या डोळ्यांसमोर धारदार नाकवाले तिचे तात्या उभे राहिले. काय रुबाब होता तात्यांचा! 

कोळशाची इस्त्री फिरवलेले पांढरेशुभ्र कपडे घालून शाळेत जायचे. शाळेत गणिताचे शिक्षक होते तिचे तात्या.

 त्यामुळे तिला व तिच्या मोठ्या भावाला,चिन्मयलाही अगदी स्पेशल ट्रिटमेंट मिळायची शाळेत.

 तिच्या आईला केवढा अभिमान होता तात्यांचा! त्या दोघांना भांडताना असं सहसा तिने पाहिलं नव्हतं कधी.

 तात्यांच्या आवडीचे पदार्थ तिची आई अगदी निगुतीने करायची. आदर्श शिक्षक हा पुरस्कारही मिळाला होता त्यांना. 

सेवानिवृत्त झाले तरी गावातल्या मुलांची ओट्यावर शिकवणी घ्यायचे ते. गावात मान होता त्यांना. 

दोन वर्षापूर्वी तिची आई गेली न् सगळंच बिनसलं. तेव्हापासून तात्या असे बिथरल्यासारखे वागू लागले.

 या वनबीएचकेच्या घरात त्यांना करमणार थोडीच म्हणून तिने मनात असुनही कधी त्यांना रहायला बोलावलं नव्हतं. 

पण वहिनीच्या बोलण्याने तिला फारच वाईट वाटलं. तिने सरलाताई व परागसमोर हा विषय काढला.

सरलाताई म्हणाल्या,"चेतू अगं खुळी की काय तू! काहीही झालौ तरी ते पाहुणेमाणूस ते. लेकीच्या घरी कसे रहातील? बरं आपलं घर किती लहान आहे!"

चैतू यावर काहीच बोलली नाही. 

तिला सासूबाईंचही म्हणणं पटत होतं,तिला तात्यांची सेवा करावीशीही वाटत होतं व तिला वहिनीचे तप्त शिशासारखे बोलही आठवत होते. 

तिचं मन सैरभैर झालं होतं.

 परागला तिच्या मनातली उलथापालथ कळत होती. 

रात्री त्याच्या हातांवर तिचे कढत अश्रु पडायचे तेव्हा त्यालाही आतून गलबलून यायचं. वाटायचं..'टुबीएचकेचा फ्लेट हवा होता यार. तात्यांना सेपरेट बेडरुममधे ठेवलं असतं. 

आज माझे वडील नाहीत पण तात्यांना काही कमी पडू दिलं नसतं पण पैसा..पैशाचं सोंग आणता येत नाही. पैसा साध्य नाही साधन आहे तरी साध्य प्राप्त करण्यासाठी तो अत्यावश्यक आहे. त्याचं सोंग कसं आणता येईल! 

पहाटे पहाटे कधी चैतूचा डोळा लागायचा. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. ती उदास राहू लागली,चिडचिड करु लागली. कधी नव्हे ती चैतू व सरलाताईंत भांडणं होऊ लागली व आजुबाजूची माणसं त्यांची भांडणं कान लावून ऐकू लागली,येताजाता चघळू लागली. 

काहींनी तर सरलाताईंच्या मनात चैतालीबद्दल गैरसमज पसरवण्यास सुरुवात केली. 

परागने मीनाला फोन लावला,""मीना,काही दिवस मम्मीला तुझ्याजवळ नेतेस का?"

"का रे? चैतूला आपल्या मम्मीची अडचण होऊ लागली का?"

(क्रमशः)

वाचकहो तुमच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत. कथा आवडल्यास ते खालचं लाईक बटन दाबा.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now