Jan 19, 2022
कथामालिका

भातुकली (भाग सहावा)

Read Later
भातुकली (भाग सहावा)

भातुकली (भाग सहावा)

मीना बिल्डींगच्या खाली आली. तिथल्या बिरजूच्या दुकानात गेली.

'कहो दिदी सब खैरियत तो है!'

'हां भैया। सब कुशल मंगल है। आप कैसे हो?' 

'अच्छे है जी।'

'भाभी किधर है?'

'वो सोनू के इस्कूल गई है।'

'अच्छा भैया दो किंडरजॉय और दो नारियल दो मुझे।'

'हां दिदी ये लो। जाई को बहोत पसंद है न।'

'चलो भैया आती हूँ।'

सगळीजणं मुव्ही बघण्यात गुंग होती. मीनाला वाटलं मुलं लगेच खाऊसाठी येतील पण छे! तिने घरात जाऊन हातपाय धुतले. देवाच्या पाया पडली. नुकतच जेवल्याने तिला फारशी भुकही नव्हती.

मीनाने नारळ खवायला घेतले. तेवढ्याच प्रमाणत साखर घालून ते भांड्यात शिजायला ठेवले. एकीकडे जायफळ,वेलचीची पूड करु लागली. मिश्रणाचा गोळा होत आला तसं तिने ते तुप लावलेल्या ट्रेमधे थापलं व सुरीने रेषा पाडून हॉलमधे डायनिंग टेबलवर नेऊन ठेवलं. 

तितक्यात चैत्राली किचनमधे आली. 

'मीनूताई कधी आलात? मला कळलच नाही. कसला रोमँटिक पिक्चर होता. हा पराग पण नं त्याला मीच लागते बाजूला मुव्ही बघताना. 

'ते ठीकय गं पण मुलांसमोर..'

'ते तसलं काय नव्हतं ओ ताई. छान सगळ्यांनी एकत्र बसून बघण्यासारखी मुव्ही होती. तुम्हीही बघा. हा आता मयंक भाओजींना बाजुला घेऊन बसता येणार नाही!'

कधी नव्हे ते चैत्राली मीनूताईला एवढं स्पष्ट बोलत होती. मीनाला एकलेपणाची जाणीव करून देत होती.

इकडे मीनाच्या सासरी..

'मयंक दहा दिवस होत आले मीनाला माहेरी जाऊन. सोसायटीतल्या बायका विचारताहेत मला, सून परत भांडून माहेरी गेली का? जरा काही झालं की नाकाला मिरची झोंबते बाईसाहेबांच्या. मोठी आली साहेबीण.'

'अगं आई,मी फोन केला होता तिला पण..'

'पण ..पण काय तू पण भेकड आहेत नुसता तुझ्या बाबांसारखा. तुझ्या बायकोवर तुझा कंट्रोल नको?'

'आई, मी जातो गं बाहेर जरा.'

'हो हो जा जा. आईशी दोन शब्द बोलायला नको तुला. बायकोशी,सासूशी बरा बोलशील.'

'अगं अगं कशाला त्या बिचाऱ्याचा जीव खातेस?'

'हो हो मीच सगळ्यांचा जीव खाते. तुम्हा दोघांना अडचण होतीच माझी आता सुनबाईलाही होते.'

'कुमुद अगं सकाळी उठून अजुनही पोळीभाजी करतेस सगळ्यांसाठी. डबा भरतेस जाईचा. तिला शाळेत पाठवतेस. शिवाय दुपारचं जेवण,संध्याकाळचा कुकर सगळं करतेस पण एक सांगू, बोलून सगळं घालवतेस.'

'तिला काही आहे का त्याचं? ती साळींची सून बघा पहाटे चारला उठून पोळीभाजी, सासूसासऱ्यांसाठी दुपारचा स्वैंपाक करून  कामाला जाते. नाहीतर हे ध्यान आमच्याच राशीला आलं! बरं पोळ्या एवढ्या पातळ करुन ठेवते न् भाजीत जिथेतिथे दाण्याचं कूट टाकून ठेवते. मला पित्त होतं त्याने म्हणून झक मारत पहाटे उठून किचनमधे जावं लागतं.'

'मग राहूदे ना तिला आईकडेच माहेरी.'

'म्हणजे तिने सुधरायचं नाही.'

'तू तरी कुठे सुधरतैस?'

'आता माझी अर्धी लाकडं गेली मसणात. मला नै त्या साळीणीसारखं उगाचच गोड गोड बोलता येणार. तो माझा पिंड नव्हे.'

'बरं मग गावी जाऊया का रहायला आपण थोडे दिवस?' 

'का तिला मी आवडत नाही म्हणून मी माझं घर सोडून गावी का जाऊ? गावी तर अजुन ताप डोक्याला. चार दिवस तुमचे आईबाबा चांगल वागतील मग गाठीचे पैसे संपले की ढुंगणावर लाथ मारून हाकलून देतात की नाही ते बघा.'

'अगं पण तुझे दिवस जरा आठवून बघ. तुला तरी कुठे सासुसासरे हवे होते घरात?'

'हे तुम्ही बोलताय. मेलं सगळ्यांची उस्तवार केली मी. सेव्हींग म्हणून काही ठेवली नव्हती. जे पैसे साठवले होते त्यात आणिक कर्जाची भर घालून तुमच्या भाऊबहिणींची लग्न लावून दिली. 

तुमची मिल बंद झाली. चार वर्ष घरात बसून होता तेंव्हा अगदी भणंग झालो होतो आपण. तुम्हाला नोकरी होती तेंव्हा तुमचे आईवडील रहायचे आपल्याकडे पण ब्रेक मिळाला तसे खायला चावीढवीचं मिळेना त्यांना.

 तुमच्या आईवडलांनी आम्हाला शीळपाकं करुन घालते म्हणून भांडण उकरुन काढलं नि धाकट्या लेकाकडे रहायला गेली दोघं. 

कसेबसे मी दिवस काढत होते. त्यात यांना कुठून चवीचं खायला घालणार होते? तुम्ही ढीम्म जाग्यावर बसून. म्हंटल कुठेतरी तात्पुरती नोकरी शोधा तर नाही.

शेवटी टेलरिंगचा कोर्स केला नि ब्लाऊज शिवू लागले. चूल पेटणं आवश्यक होतं. पदरात दोन पोरं होती. तिकडे धाकट्याकडेही तुमच्या आईवडलांची डाळ शिजेना तेव्हा पळाले गावी.'

 गणरायाच्या आशिर्वादाने तुम्ही वोलटासमधे चिटकलात म्हणून हे घर तरी घ्यायला मिळालं. घामाचा एकेक पैसा जोडून हे घर घेतलय आपण नि आता या महामायेमुळे आपणच आपल्या घरातून जायचं? 

'कधीकधीचं लक्षात रहातं तुझ्या न् कसं वेळ आल्यावर बरोबर उकरुन काढतेस. मी चुकलो, बस्स.'

'तुम्ही कसले मीच चुकले तुमच्याशी लग्न करायला होकार देऊन. चांगला स्टेट बँकेत असलेला मुलगा आलेला माझ्यासाठी. उंचीने कमी म्हणून नाकारला मी. त्याचं त्या वसू शिरकेचं लग्न झालं. काल देवळात जोडीने आली होती. कसे ठसठशीत दागिने घातले होते. हातात बिलवर,तोडे,पाटल्या गळ्यात चार पेडाचं मंगळसूत्र, राणीहार.'

'अगं कुमुद तू देवळात भजन करायला जातेस की दागिने बघायला?'

'कितीही झालं तरी माणूस आहे हो मी. वासना ही असणारच.'

'एवढाच मी आवडत नाही तुला तर वटसावित्रीचा,हरतालिकेचा उपवास तरी का करतेस?'

'त्यापाठीही लॉजिक आहे माझं. मी देवाला सांगते,सात जन्म हाच पार्टनर मिळूदे पण रोल चेंज म्हणजे मी नवरा न् तुम्ही माझी बायको.' 

'अगागागा म्हणजे मेलोच मी.'

'बरं आपली लेक यायची होती ना.'

'हो मेघा यायची आहे खरी. मला वाटतं उद्या येईल.'

'काय रहायला येणार आहे म्हणे.'

'हो,असं म्हणत होती खरं. बघू, तिचा बंड्या तर उच्छाद मांडतो नुसता. पोरगा बापाच्या वळणावर गेलाय अगदी. तो एक नुसता दारु ढोसतो म्हणे.'

'अगं पैसा आहे भरपूर.'

'पैसा आहे तर भ्रमंती करावी. देशाटन करावं. चांगलंचुंगलं खावं की. तरी मेघाला सांगत होते,नको लग्न करु त्या दिव्येशशी तर ऐकली नाही पोर.'

मयंक घरी आल्यावर कुमुदने पानं वाढली. ती पोळ्या आणायला वळली इतक्यात दरवाजाची बेल वाजली.

(क्रमशः)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now