Login

भातुकली (भाग सोळावा)

Clashes in family

भातुकली (भाग सोळावा)

(आशनाने घरी येऊन चैत्राला ही बातमी दिली. तात्यांनी आशनाचे हात जोडून आभार मानले. म्हणाले,'कोण कोणाची तू माझ्या लेकीच्या मदतीला धावून आलीस बाय. आशनाने त्यांना नमस्कार केला. चैतूने आशनासाठी तिच्या आवडीची मिरची भजी व शिरा बनवला. 

इकडे, मीनाच्या घरी मीनाच्या आजीसासूंची तब्येत बिघडल्याचा फोन आला. धाकट्याने सांगितलं,"दादा,तू पुढे हो. मला रजा मिळाली की मी येतोच." आता पुढे..)

मीनाचे सासूसासरे रेल्वेत बसले. रेल्वे सुरु झाली. कुमुदताई सगळं आवरुनसावरुन खिडकीजवळ बसल्या. 

"काय गं बाई त्या म्हातारीची कटकट?"

'तरी बरं दोघी खुसुफुसु बोलत बसता.'

'मग काय पाहुण्यामाणसासोबत भांडू की काय? अहो,इकडची काडी तिकडे करत नाहीत सरलाताई. पण मीनू तिच्या आयशीला कशी सांभाळून घेते. मी इतकं करते त्याचं काही नाही तिला.'

'तू चहा घेतेस का? बरं वाटेल बघ तुला.'

'नानांनी दोन चहा व एक गुडडे बिस्कीटचा पुडा घेतला. कुमुदताईंनी चहाचा पहिला घोट घेतला,'काय हे हा काय चहा आहे..किती पाणचट..ना धड बुकी ना साखर..नुसतं पाणी उकळवून विकतात नि वरती चाय चाय ओरडत फिरतात.'

'घरी गेल्यावर पी गं मनासारखा चहा.'

'हो करुन ठेवलाच असेल नं माझ्यासाठी खास! आधी ही म्हातारी पडायला गेलीच कशाला. नीट धड उठताबसता येत नाही.'

'अगं,म्हातारं खोड..कुठेतरी पाय निसटून पडली असेल. तरी या वयातही सगळं आपलंआपण करतात दोघं. कमाल आहे,नाना,आईची.'

'हो तर. ते एक बरंच आहे म्हणा.'

'ए कुसुम ती नदी बघ,किती निर्मळ पाणी दिसतंय ना,नि डोंगर बघ कसे हिरवा शालू पांघरल्यासारखे दिसताहेत,त्यातून वहाणारे फेसाळ धबधबे..अहाहा हे सौंदर्य पहाण्यासाठी खास या ऋतूत प्रवास करावा.'

'काही दाखवू नका. म्हणे सौंदर्य बघ..दाखवायचं ,फिरायचं वय होतं तेव्हा तुमच्या बहिणींची,भावाची उस्तवार करत राहिले न् आता साठी जवळ आली नि म्हणे कुमुद..हिरवे डोंगर बघ..कुमुद फेसाळ धबधबे बघ..हुं.'

'बरं रत्नागिरी आलं बघ. वडे छान मिळतात इथे गरमागरम घेऊ ना.. घ्या. 

"डबापण काढतो गं. मीनाने मस्त इडलीचटणी दिलेय बांधून."

'इडलीला डाळतांदूळ भिजत मी ठेवलेले काल,रात्री वाटूनही मीच ठेवलेलं न् मीनाने सकाळी स्टँडला लावल्या फक्त तर मीनाचं कौतुक..माझं कौतुक करावसं कधी वाटतच नाही.' 

'तसं नाही गं बाई. घे, पाणी पी ठसका लागला नं किती रागावतेस!'

कुमुदताई मग डोळे मिटून राहिल्या व नाना खिडकीबाहेरचं निरभ्र आकाश,चरणारी गुरंढोरं,लाल कौलारू घरं..डोळ्यांत साठवत बसले.

थोड्यावेळाने स्टेशन आलं तसे दोघं सावकाश उतरले. रिक्षावाला सामान घेण्यासाठी लगबगीने आला. त्याने पाचशे रुपये भाडं सांगितलं. कुमुदताईंनी त्याला घासाघीस करुन चारशेवर आणलं. शंभर रुपयै वाचवल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं. 

नाना मात्र ती लालतांबडी वाट,आजुबाजूचा परिसर बघत होते....नुसते बघत नव्हते तर त्या परिसराशी,हवेशी,आकाशाशी,झाडांशी हितगुज करत होते. त्यांच्या बालपणीच्या कित्येक आठवणी या पाऊलवाटेच्या अंगाखांद्यावर फेर धरून नाचत होत्या,ठुमकत होत्या,थिरकत होत्या.

घर आलं तसं नानांनी सामान बाहेर काढलं. वयवर त्यांचे आबा वाट बघत बसले होते. नानांना जाणवलं आबा फारच थकले आहेत. 

दोघांनी न्हाणीघरात जाऊन हातपाय धुतले. आन्हिकं आवरली व म्हातारीस भेटावयास गेले. बघतात तर काय म्हातारी मस्त गादीवर बसून पानाला चुना लावत होती व गालातल्या गालात हसत होती.

कुमुदताई समजली..म्हातारीने आपल्याला चांगलाच चुना लावला. 

दोघं म्हातारीच्या,आबांच्या पाया पडले तसं म्हातारी म्हणाली,'नुसतं ये म्हणून सांगून येत नाही तुम्ही मग असं बोलवावं लागतं निमित्त करुन. चला जेवायला वाढते.'

म्हातारीने वांग्याची भाजी करुन ठेवली होती. तिघांनाही गरमागरम भाकऱ्या व भाजी वाढली. सोबत सायीचं दही वाढलं.

जेवण आवरल्यावर कुमुदताई भांडी घासायला घेऊन गेली. तिने उष्टं माडाच्या मुळात टाकलं व चुलीतली रखा घेऊन नारळाच्या किशीने सारी भांडी लख्ख घासली.

म्हातारी नाना व आबांसोबत जाऊन बसली. नानांना म्हणाली,'नाना,घराला वाळवी धरतेय रे. मी जीवंत असेपर्यंत चिरेबंदी घर बांध बाबा.'

नाना म्हणाले,'बघू,बंधूला विचारतो व ठरवतो.'

'बंधूला यात घेऊ नकोस हो. त्याने दोन बेडरुमचा ब्लाक घेतला आहे..मधे आला होता तेव्हा सांगून गेला आहे की पाच वर्षे तरी माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका.'

कुमुदताई टोपलीत भरुन धुतलेली भांडी आणत होती तेव्हा तिने हा मायलेकाचा संवाद ऐकला. तिला जाम संताप आला..

ती संध्याकाळ मग धुसफुसतच गेली. रात्री गोधडीवर अंग टाकलं तेव्हा नानांना म्हणाली,
"बघितलात नं डाव तुमच्या आईचा. अशी कशी हो म्हातारी ही. थोरला थोरला म्हणून पिळून काढायचा क् काय! अरे तुझ्या पोरींची लग्न लावून दिली रीतसर. धाकट्याचं,शिक्षण,लग्न लावून दिलं. 

आता म्हातारे झालो. आमचा पण प्रपंच आहे आम्हाला. आतातरी सोड म्हणावं तर नाही. कैकयी कुठची. आजारीपणाचं नाटक करुन बोलवून घेतलंन इथं नि आता घर बांधा म्हणतेय.

 थोरला लेक रिटायर्ड झाला म्हंटल्यावर त्याच्याकडे पैशाची पुडकी आली असणार असा समज झालाय म्हातारीचा बाकी काय. 

पैसे काय झाडाला नाही लागत म्हणावं शेकटाच्या पाल्यासारखे. बरं हिच्या मुलाची एकटीची का ती सेविंग? माझाही तेवढाच हक्क आहे तीवर बायको म्हणून. संसारासाठी राब राब राबलेय मी. 

घर बांधायला ना नाही माझी पण मग धाकट्याकडूनही पैसे मागावेत तर नाही. आम्ही काय देणेकरी आहोत हिचे. काय असेल ते प्रेम,माया,वात्सल्य पोरींना नी धाकट्याला नि थोरल्याकडून मात्र पैसे वसूल करणं. अजिबात देणार नाही छदामसुद्धा."

"अगं कुसुम छदाम आता राहिलाय कुठे. जुन्या काळात होता कधीकाळी. हाहाहा."

"विनोद सुचतोय विनोद. मंदबुद्धी कुठचे! कसल्या अडाणी माणसाशी देवाने गाठ बांधली माझी."

"ए कुसुम पावसाचा आवाज ऐक गं. आश्लेषा नक्षत्र आहे हे. मेंढ्याचं वाहन आहे हो यावेळी."

"झालं बदललात विषय. तुम्हीपण मेंढा अहात अगदी बिनबुद्धीचे."

"बरं मी मेंढा मग तू कोण गं. तू माझी गरीब शेळी. तुला लग्न करुन चाळीतल्या घरात घेऊन आलो न् तेव्हापासून माझ्या कुटुंबासाठी झिजलीस. 

माझ्या बहिणींना आपलं मानलंस. दिराचं सारं काही केलंस पण त्याचं यथायोग्य कौतुक म्हातारीने कधीच केलं नाही. मलाही जाणवतय ते पण जाऊदे आता किती वर्ष राहिली त्यांची. थोडक्यासाठी वाद नको."

दुसऱ्या दिवशी कुमुदताई व नाना तिच्या माहेरी जायला निघाले. लाल डब्याची एसटी पकडली. जुनीजाणती माणसं,शाळेतली मुलं गाडीत भरलेली. ठराविक तर्हेच्या पिशव्या लोकांच्या हातात होत्या. जवळजवळ अर्ध्या तासाने गाडी नाक्यावर उतरली. तिथे कुसुमताईंनी भावासाठी त्याच्या आवडीच्या रेवड्या व चिवडा घेतला. 

कुसुमताईंचे आईवडील हयात नव्हते पण भाऊभावजयीमुळे माहेराशी सुत अजुनही जोडलेले होते.  माहेराची वाट चालताना कुसुम तिच्या बालपणात हरवली. 

पारंब्यांना घेतलेले झोके,.तिखटमीठ लावून खाल्लेली चिंचा,बोरं,कैऱ्या, दोन वेण्या घालून पाठीला दप्तर लावून नदीचा साकव ओलांडून शाळेत जाणं,आजीच्या गोधडीत गुडुप होणं..सारं सारं कुसुमताईंना आठवू लागलं. भूतकाळाचा संथ तळ ढवळून निघाला तशा तिचे डोळे पाण्याने डबडबले.

भाऊही आता नोकरीतून सेवानिवृत्त झाला होता व बायकोला घेऊन गावी रहायला आला होता. त्याचे दोन्ही मुलगे परदेशात स्थायिक झाले होते.

 एकुणच बरी परिस्थिती होती. शांतावहिनीने पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. मसालेभात,दहीभात,कटाची आमटी असं रुचकर जेवण सगळी पोटभरून जेवली. शांता वहिनीही आगत्याने वाढत होती. 

कुसुमताईंच मन सुखावलं.
 माजघरात,न्हाणीघरात तिला आईच्या प्रेमळ सहवासाची आठव आली. वाटलं,पुन्हा ते दिवस यावेत. पुन्हा आईच्या कुशीत निजावं,तिच्यासोबत जातं धरावं,तिच्यासोबत सडासारवण करावं,तिच्या मधुर ओव्यांनी कान त्रुप्त व्हावे. 

दादाने पडवीत बोलावलं व म्हणाला,"कुमे,तुझं सगळं आलबेल आहे. तुला काही माहेरच्या पैशाअडक्याची गरज नाही. काही लागलं तर मी आहेच पाठीशी. जरा तलाठ्याकडे येऊन जा शनिवारी नि हक्कसोड पत्रावर सही कर."

भावाचे हे बोलणं ऐकून कुमुदताई थरथरली. खरंतर तिचा कायद्याने हक्क होता माहेरच्या प्रॉपर्टीत. बरं तिनंही आईवडलांच बरंच केलं होतं. आई शेवटचं वर्षभर तरी तिच्याचकडे होती. त्याआधी तिची ती स्वतंत्र राबली होती. मुलांच्या आशेवर नव्हती. 

दादाने लग्न झाल्यापासून आईला त्याने दिडकी दिली नव्हती. आपली मुलं,आपली बायको नि आपण यातच रमला होता न् आता म्हातारपणात आई गेल्यावर गावी येऊन इथली सर्व मालमत्ता उपभोगू पहात होता. बरं त्यात पाठीमागची बहीण,कुसुमताई ही त्याला वाटेकरी म्हणून अजिबातच नको होती.

कुसुमताईंची जीभच उचलेना दादासमोर. तरी त्यांना अंतरमन म्हणालं कुसुम काय ते स्पष्ट बोल.

 तिने दादाला स्पष्ट शब्दात सही नाही करणार व माझाही माहेरच्या संपत्तीत तुझ्याइतकाच वाटा आहे म्हणून सांगितलं. 

निघताना शांतावहिनीने ना कुसुमताईंची ओटी भरली ना त्यांना हळदकुंकू लावलं. कुसुमताईच मग देवघरात गेली. तिथल्या देवांना आईवडलांच्या फोटोला नमस्कार केला व कोयरीतलं हळदीकुंकू तिने भाळी लावलं.

 अंगणात तुळशीला हळदीकुंकू वाहिलं,नमस्कार केला व दादावहिनीचा निरोप घेऊन कुसुमवहिनी नानांच्या पाठोपाठ निघाली. 

परतीच्या प्रवासात कुणी कुणाशी बोललं नाही. म्हातारीने आल्याबरोबर कुमुदताईला माहेराची खुशाली विचारली.

कुमुदताईंनी सर्व खुशाल आहेत असे मोघम उत्तर दिले.

"आमच्याकडे यायला तुझ्या भाऊभावजयीला वेळ मिळत नाही हो. नाही म्हंटलं एक माणुसकी म्हणून हो. म्हाताराम्हातारी एकटीच घरात आहेत तर कधी फोन लावावा. सतरांदा या पाणंदीच्या वाटेने जोडीने बाजाराला जातात हो पण कधी आमच्या अंगणात पायधुळ झाडाविसी नाही वाटत. राहूदे मस काय त्याचे,"असं म्हणत म्हातारी सुपारी कातरु लागली. 

तिन्हीसांज होत आली तसा कुमुदताईचा जीव अगदी कातर झाला. का कोण जाणे तिला अगदी पोरकं असल्यासारखं वाटलं. कोणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवून रड रड रडावंस वाटत होतं. बाहेर गच्च दाटलेलं आभाळ कोसळत होतं. तसाच तिचा कंठ दाटून आला होता पण सासूशी मनातली सल बोलून दाखवण्याइतका आपलेपणाचा ऋणानुबंध म्हातारीने कधी होऊच दिला नव्हता. 

कुसुमताई लग्न होऊन सासरी आली तेव्हा म्हातारी सदा तिची  तुलना तिच्या लेकी नली आणि ललीशी करी व कुसुम किती वेंधळी आहे हे चारचौघांत बोलून दाखवे. सासूच्या अशा तिरकस वागण्याने कुसुमताई नेहमीच तिच्यापासून दोन हात लांबच राहिल्या. दोघींच नातं मुळी रुजलच नाही.

म्हातारीने सकाळीच फणसाच्या आठळ्या घालून अळूचं फतफतं करुन ठेवलं होतं. कुसुमताईंनी बैठा भात रांधला सोबत पोह्याचे पापड व सांडग्या मिरच्या तळल्या. पावसाळी वातावरणात तळणाचा खमंग वास दरवळू लागला. नाना आबांशी गप्पा मारत जेवले. या दोघींनीही आपली जेवणं उरकली. जेवण झाल्यावर म्हातारी पानतंबाखूचा डबा घेऊन टिव्हीवरची मालिका बघत बसली. 

नानाही तिच्या बाजूस बसले होते.

म्हातारी म्हणाली,"नाना,या टिव्हीतल्या वहिनीबाईंच्या हातात आहेच तशा पाटल्या होत्या हो माझ्या. आपल्या चाळीतल्या घराचं भाडं थकलं होतं म्हणून मोडाव्या लागल्या. प्रत्येक प्रसंगावेळी अंगावरच किडुकमुडुक मोडून लंकेची पार्वती झाले पण तूस काही वाटले नाही हो कधी मस म्हातारीस दोन पेडाचं मंगळसूत्र, दोन पाटल्या करुन घालाव्याशा. मुलाकडूनही अपेक्षा ठेवू नये का रे आईने! नानांनी उगाचच मान हलवली.

कुमुदताईंनी सगळी भांडी मागीलदारास न्हेली. उष्टखरकटं जमा करुन माडाच्या मुळात टाकलं व चुलीतली राखुंडी घेऊन भांडी घसघसीत घासून काढली.  भांड्यांची टोपली आणून स्वैंपाकघरात ठेवली व आपल्या खोलीत झोपायला गेल्या. नानांनी अंथरुण घालूनच ठेवलं.होतं. 

कुसुमताईंनी माहेराहून येताना आईच्या साडीची गोधडी आणली होती. ती तिने पांघरायला घेतली. आईची उब तिला प्रकर्षाने जाणवली. बारीक फुलाफुलांच्या साडीचं पाल घातलं होतं गोधडीला. 

कोणी बरं दिली होती ही साडी आईला..ती आठवू लागली..हां मावशीने तिच्या घरभरणीला दिली होती खरी..आईचं असंच..ट्रंकेत साड्या घडी करुन ठेवायची. कुठे बाहेर फारसं जाणं व्हायचं नाही. दोनचारदा वापरल्या की गोधडीला घालायची. 

साड्याही चिक्कार मिळायच्या तेंव्हा. आईचे सात भाऊ होते. सात भावांची लाडकी बहीण. प्रत्येजण वर्षाला साड्या घ्यायचा शिवाय घरच्या वेगळ्या. नऊवारी नेसणारी,तब्येतीने बारीक, उंचशी आई तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. 

आईने कधी तिच्यात व दादात भेदभाव केला नव्हता पण आज दादाने हक्कसोड पत्रावर सही कर म्हणून सांगून तिच्या जिव्हारी घाव घातला होता.

(क्रमश:)

🎭 Series Post

View all