भातुकली (भाग सातवा)

Clashes in families

भातुकली (भाग सातवा)

मयंक घरी आल्यावर कुमुदताईंनी पानं वाढली. त्या पोळ्या आणायला वळल्या इतक्यात दरवाजाची बेल वाजली.

दारात त्यांची लेक मेघा उभी होती. 

'काय गं,एवढ्या दुपारी!'

'जा हातपाय धुवून घ्या. अरेरे बंड्या तसाच मामाकडे जाऊ नकोस. आधी वॉशरुम. चला फ्रेश व्हा.'

'बंड्या मम्मासोबत फ्रेश व्हायला गेला.'

'बंड्या व मेघाचं पान वाढलं. जेवणं आटोपल्यावर भांडीकुंडी आवरून कुमुदताई मेघाजवळ जाऊन बसल्या.'

'काय म्हणतेस?'

'काय म्हणू आई. रोज रोज माझ्या आयुष्याची गढूळ कहाणी तुम्हाला वाचून दाखवू! माझ्या पायावर मीच धोंडा मारून घेतला. माझ्याच कर्माची फळं भोगतेय मी.

 हल्ली नोकरीलाही जात नाही तो. सदानकदा घेऊन पडलेला असतो. तोंडात अर्वाच्य शिव्या. सगळ्यांच्या नावाने..छे! आई माझंच चुकलं. 

'आधी असा नव्हता गं दिव्येश. त्याच्या आईच्या दारुच्या दुकानात जायला लागल्यापासून त्याची ही अधोगती झाली.'

'अगं बंद करा ते दुकान. दुसरं कायतरी ठेवा म्हणावं विकायला.'

'यात बक्कळ नफा मिळतो आई.  शिवाय दुकान आता चांगल एस्ट्याब्लीश झालंय.'

'कसलं कर्माच एस्ट्याब्लीश. काय करायचाय तो पैसा ज्याने लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात व तिच्या मुलाचाही  संसार उद्ध्वस्त होतोय हे कळत नाही तिला? का डोळ्यांवर पट्टी बांधलेय गांधारीसारखी?'

'आई,सोसायटीत दिव्येश झिंगत येतो ना तेव्हा आजुबाजूची फिदीफिदी हसतात त्याला. मला मेल्याहून मेल्यासारखं वाटतं तेव्हा. शिवाय तो पिऊन आला की त्याची आई मला शिव्या घालते म्हणते. माझा पोरगा गुणाचा होता. तुझ्या नादाला लागला न् वाया गेला' 

'तुला बोलता येत नाही का? तू विचारायसच ना मी काय बाटलीतून दारु भरवते का म्हणून?'

'तुझं खरंय गं आई पण सध्या घरखर्च त्यांच्या जीवावर चालतोय.त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात असतात त्यामुळे मला घरातच राहावं लागतं. सगळ्यांच जेवणखावण,चहापाणी,बंड्याची शाळा..इच्छा खूप आहे गं स्वतःच्या पायावर उभं रहाण्याची पण वेळेचं गणित आढवं येतं बघ. शिवाय हा बंड्या काहीतरी उपद्व्याप करुन ठेवतच असतो. कालच आजीच्या पाठीत बॉल मारलान. कळवळली बिचारी.'

' ते बंडोपंतांच नेहमीचच आहे. या दारुच्या व्यसनावर  काही इलाज असतील ना?'

'आहेत गं. व्यसनमुक्ती केंद्रात घालतात अशा लोकांना. काही महिन्यांत सुधारतात अशी माणसं.'

'मग घालं की दिव्येशला तिथे. वाटल्यास परागला घेऊन जा सोबत.'

'त्याची आई नको म्हणते. ती नाही सोडायला तयार त्याला. तिथे म्हणे हाल करतील तिच्या मुलाचे.'

'हे बरंय. तिच्या मुलाची तिला काळजी आणि माझ्या लेकीचे हाल होताहेत त्याचं काही नाही. काय एकेक माणसं आलेत राशीला आमच्या.'

'बरं ते जाऊदे. जाई नि तिची आई कुठे गेली?'

'तिला बाई राग आलाय माझा. मी कजाग सासू आहे, तिच्या मते. सासुगिरी करते मी तिच्यावर.'

मयंक बंड्याला बेडरुममध्ये घेऊन गेला.

'सासुगिरी म्हणजे?'

'अगं सगळं नीटनेटकं,जागचेजागी ठेवावं हीच अपेक्षा माझी. ओटा आवरलेला असला,डबे मांडलीवर जागच्याजागी असले की किचन कसं हसरं दिसतं सांग बघू पण एवढंच सांगितलं तर पराचा कावळा करते बया.

 काही बोलायची खोटी घर डोक्यावर घेते. तिला राजाराणीचा संसार हवाय म्हणून नखरे चाललैत बाकी काही नाही.'

'मयंक काय म्हणतो?'

'तो काय म्हणणार. बाईलवेडा कुठचा. आता ती माहेरी गेलीय तर हा तिच्यापुढे बुगुबुगु करतो. तिला फोन करुन ये ना गं राणी म्हणतो. शेळपट कुठचा! कसल्या ढुसक्या स्कीममधे पैसे गुंतवायला सांगत होती म्हणे तिच्या मैत्रिणीने गुंतवलेत.'

'तुला विचारत होती का?'

'छे गं मला कसली विचारतेय! नवऱ्याच्या गळ्यात उतरवत होती पण माझा मयंक अजुनही आईबापाच्या मर्जीत आहे. तो मला विचारायला आला. 

मी नाही म्हंटलं. मधे तो कोण तो पुण्याचा बिल्डर लोकांकडून पैसे घेऊन फ्रॉड निघाला तसं झालं तर काय घ्या.

तर बाईसाहेबांना राग आला. गेली लेकीला घेऊन माहेरी. आता तिथे आयशीला करील माझ्या कागाळ्या. करुदेत. मी नाही घाबरत वाघाच्या बापालासुद्धा.'

'अगं आई, दोन्ही बाजूने ताणलं तर रबरही तुटतो गं. एकाने विसकटलं तर दुसऱ्याने आवरायला हवं. माझं घर नीट होईल तेव्हा होईल पण परागचं तरी नीट राहूदे. भले आपण दोन पावलं मागे येऊ.'

'असं म्हणतेस तर बघा तुमच्या इच्छेनुसार करा काय ते. मला का आवडत नाही माझी सून..स्वभावाने तशी बरी आहे गं बया पण भलतीच तापट.'

मेघाने मीनाला फोन लावला.

'हेलो'

'हेलो मी मेघा बोलतेय. अगं मीना आम्ही आलोय इकडे परागमामाकडे,रक्षाबंधनसाठी. हा बंड्या हट्टाला उठलाय नुसता. त्याला तुझ्याच हातच्या नारळाच्या वड्या आवडतात माहितीय नं तुला. 
मी एका नारळाच्या केल्या पण गधडा म्हणतो ब्राऊन झाल्यात. मामीच्याच छान छान लागतात. 
नुसता जाईची आठवण काढतोय बघ. आम्ही दोन दिवसात जाऊ परत. तू येतेस ना.'

मेघाचं हे बोलणं ऐकून मीनाचा राग कुठच्या कुठे पळाला. तिने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येते म्हणून सांगितलही.

मीनाने मग सरलाताईंना उद्या संध्याकाळी घरी जाते असं सांगितल यावर सरलाताई म्हणाल्या,'बघ बाई, तुला जसं जमेल तसं कर.' 

दुसऱ्या दिवशी सकाळीच मीना राख्या घेऊन आली. चैत्रालीने सगळ्यांच्या आवडीची पावभाजी बनवली. सरलाताईंनी गुलाबजाम बनवले. जाईने यशला ओवाळलं व राखी बांधली. 

मीनाने परागला राखी बांधली तसं परागने तिला एक छानसा पिंक कलरचा लाँग ड्रेस भेट दिला.

 जाई म्हणाली,'यश,माझं गीफ्ट कुठाय?'यशने तिला तिच्या आवडीची चुलबोळकी भेट दिली.  पितळेची चुलबोळकी..त्यात किसणी होती,ताट,वाट्या,फुलपात्र,टोप,कढई,हंडे,टाकी,मांडली ..सगळं सगळं होतं. 

जाई अनिमिष नेत्रांनी त्या चुलबोळकीकडे पहातच राहिली व म्हणाली चल यश आपण भातुकली खेळुया. आज तुला अगदी सुंदर स्वैंपाक करुन वाढते बघ पण मग मामीनेच तिला थांबवल व म्हणाली आधी मी केलेला स्वैंपाक खा हो जाईताई मग तुमच्या हातचा स्वैंपाक चाखायला येतोच आम्ही.'

सगळे हसतखेळत पोटभर जेवले. संध्याकाळी मीना जाईला घेऊन घराकडे निघाली. नाही म्हंटलं तरी सरलाताईंचे डोळे भरून आले.

घरी आल्यावर  जाईने बंड्याला राखी बांधली. बंड्याने तिला डॉक्टर डॉक्टर खेळायचा सेट दिला. जाई जाम खूष झाली.

मयंक कामावरुन येताना सगळ्यांसाठी आईसक्रीम घेऊन आला. मीनासाठी तिच्या आवडीचं स्ट्रॉबेरी आईसक्रीम आणलं. मयंकला दारात बघितल्याबरोबर जाईने त्याला गच्च मिठी मारली. मयंकनेही तिच्या भरपूर पाप्या घेतल्या. 

त्याची भिरभिरती नजर मीनाला शोधत होती. मीना घरात बटाटेवडे तळत होती.

 जेवताना सासऱ्यांनी तिच्या बटाटेवड्यांच कौतुक केलं.
 रात्री जाई आत्यासोबत हॉलमधे झोपली. 

मीना बेडरुमधे गेली. तिने नाईट गाऊन घातला व बेडवर पडली. दिवसभराच्या दगदगीने शिवाय तेलाजवळ उभं राहिल्याने तिचा डोळा लागला. 

हॉलमधे सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. मयंक मात्र तिथून हळूच निसटला व बेडरुमधे गेला. 

पंधराएक दिवसांनी तो मीनाला पहात होता. तो तिच्याजवळ झोपला. त्याने तिच्यावर आपला हात ठेवला तसे मीनाच्या डोळ्यांतून ऊन आसवं वाहू लागली.

मयंकने मीनाचे अश्रु पुसले. तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले व म्हणाला,'परत नको मला अशी सोडून जाऊस मीनू. तुम्ही दोघी प्राण अहात माझा.' 

यावर मीना त्याच्या कुशीत शिरली. बराच वेळ मग तो तिला थोपटत राहिला.

(क्रमश:)

------सौ.गीता गजानन गरुड.

🎭 Series Post

View all