भातुकली (भाग सतरावा)

Clashes in family

#भातुकली (भाग सतरावा)

(कोणी बरं दिली होती ही साडी आईला..ती आठवू लागली..हां मावशीने तिच्या घरभरणीला दिली होती खरी..आईचं असंच..ट्रंकेत साड्या घडी करुन ठेवायची. कुठे बाहेर फारसं जाणं व्हायचं नाही. दोनचारदा वापरल्या की गोधडीला घालायची.

साड्याही चिक्कार मिळायच्या तेंव्हा. आईचे सात भाऊ होते. सात भावांची लाडकी बहीण. प्रत्येजण वर्षाला साड्या घ्यायचा शिवाय घरच्या वेगळ्या. नऊवारी नेसणारी,तब्येतीने बारीक, उंचशी आई तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली.

आईने कधी तिच्यात व दादात भेदभाव केला नव्हता पण आज दादाने हक्कसोड पत्रावर सही कर म्हणून सांगून तिच्या जिव्हारी घाव घातला होता....)

नाना आत येऊन तिच्या कडेला झोपले. कुमुदच्या गालांवर वहाणारी आसवं त्यांनी पुसली.

"कुमुद, किती विचार करतेस? जाऊदे नं जे झालं ते झालं. तुला काय कमी आहे सांग मला? हां सोनंनाणं मनासारखं नाही घालू शकलो पण दोन वेळ समाधानाने जेवतोना आपण. त्या कर्ता करविताचे आभार मानायचे."

"ते झालच हो पण तरीही लागलंच मनाला."

"कुमु,आज नं मला मी तुला बघायला आलो होतो तो प्रसंग आठवला बघ. तू अशी आबोलीची फुलं घेऊन भलामोठा वळेसर गुंफत बसली होतीस. अजुनही तेवढीच गोड दिसतेस बघ."

मध्यरात्रीपर्यंत दोघं मग गतआयुष्यातल्या आठवणींत रमून गेले, त्यांची मनं अगदी रुईसारखी हलकी झाली.

*********

आशना आज घराजवळच्या लायब्ररीत गेली. कितीतरी दिवस ती एका इंग्लिश स्टोरीबुकच्या शोधात होती पण नेमकं ते कुणीतरी घेतलेलं असायचं. आज मात्र नेमकी आशना काऊंटरवर जायला व आशिष तेच बुक रिन्यू करायला यायला एकच गाठ पडली.

आशिषच्या हातात ते पुस्तक पाहून तिने मनात म्हंटल,"आशना यार आज लकी डे है तेरा. खुदा ने तेरी सुन ली." आशनाने तिच्या बॉयकटमधून स्टाईलमधे बोटं फिरवली व शर्टाची कॉलर सारखी करत ग्रंथपालाला आधीचं पुस्तक दिलं व आशिषच्या हातातल्या पुस्तकाकडे बोट दाखवत म्हणाली. आज शोधायची गरज नाही. यांच्या हातातलं 'ओ माय लव्ह' बुक मला हवंय. आशिषने फक्त 'ओ माय लव्ह'एवढंच ऐकलं व तो गांगरला. त्याने मागे वळून पाहिलं.

मला काही म्हणालात?

नं नाही..हां ते तुमच्या हातातलं बुक मला हवंय असं लायब्ररियनला सांगत होते.

अहो पण माझं वाचायचं राहिलंय अजून ते. एक्चुली आय वॉज क्वाईट बिझी दिस वीक सो राहून गेलं वाचायचं

भेंडी वाचायचं नै तर पुस्तक न्हेता कशाला! उशाला घ्यायला..दुसरं कोण वाचेल तेपण नाही करतात..गवार कुठचे.

ओ मिस सांभाळून बोला..भेंडी काय गवार काय..हां..ही काय भाषा झाली काय बोलायची????

ए डोळे काय वटारतो रे. भेंडीगवारच बोलले ना रे फुकणीच्या. शिवी तर नाही दिली ना. आईशपथ कुठून एकेक सँपल येतात. अलिबागचाय वाटतं.

हो हो अलिबागचाच आहे मी आणि मला अभिमान आहे अलिबागकर असल्याचा. बाय द वे हे पुस्तक माझं वाचायचं आहे सो मी रिन्यू करतोय. माझं वाचून झालं की  वाचा'ओ माय लव्ह'.

असं म्हणत आशिष तिथून तरातरा आला तसा निघून जातो. आशना जाम चिडली.असंच पुस्तक बदलायचं म्हणून बदललं व तिथून निघाली.

रविवारी आशनाला मीनाचा फोन आला.

"हेलो,मीनू आज माझी कशी आठवण आली तुला? सगळं ठिकै ना!"

"तुझ्यासारख्या जीवश्च मैत्रिणीची आठवण काढावी लागत नाही आशू. तू तो मेरे दिल के करीब है."

"अरे यार काय बोलतेस ती तर जागा मयंकची आहे नं."

तुझ्यासाठीही एक स्पेशल कोपरा आहे तिथे आशुडी.

"सो स्वीट. अभी लाईन पे आ चल. काम बता."

"अगं आशू प्रमोशन झालंय माझं. सो ईट्स पार्टी टाईम डिअर."

"ओ काँग्रेट्स,यू डिझर्व इट डिअर. युवर हार्ड वर्क हेज पेड यू."

"थँक्यू आशू."

"बरं घरी येऊ न संध्याकाळी?"

"हो अगं आठपर्यंत ये नक्की. माझे काही कलिग्जही येणार आहेत."

संध्याकाळी आशू बुके घ्यायला थांबली. निशिगंधाच्या फुलांचा बुके तिच्या मनात भरला ती तो उचलणार तितक्यात एका हँडसम माणसाने तो उचलून आपल्या गाडीत ठेवला व पैसे देऊ लागला तसं आशूने त्या माणसाकडे बघितलं.

अरे हा तर सकाळचाच सहाफुट्या.

'ओ माय लव्ह'..वाला

ओ माय स्वीटहार्ट तो मिश्कील हसत बोलला तशी आशूची डावी भुवई रागाने ताडताड उडू लागली.

काम डाऊन मिस. मी हा बुके आधीच ऑर्डर करुन ठेवला होता. आशू आता काही बोलूच शकत नव्हती. तिने त्याच फुलांचा दुसरा बुके मागवला व बाईक स्टार्ट केली. तिने गाडी पार्क केली व लिफ्टमधे शिरली तर लिफ्टमधेही तोच 'ओ माय लव्ह'वाला. त्याने हसत विचारलं,"आर यू चेसिंग मी मिस?"

आशू जाम चिडली. तिला कळेना हे असं का होतंय हा माणूस सारखासारखा का द्रष्टीपथात येतोय. तिने पुन्हा तिच्या केसांतून बोटं फिरवली व पँटीच्या खिशात एक हात घालून सिलिंगकडे पहात उभी राहिली. दोघंही एकाच फ्लोअरवर उतरले.

आशू डावीकडे मीनाच्या ब्लॉकच्या दिशेने वळली व तिच्या दरवाजाची बेल वाजवत म्हणाली. गेला वाटतं फुकणीचा. मागून तोच मिश्कील आवाज तिच्या कानाजवळ आला..
मला काही म्हणालात मिस..'ओ माय लव्ह'.

रागाने आशूचे ओठ थरथरू लागले. ती जेवढे डोळे वटारुन आशिषकडे बघत होती तेवढंच गोड तो तिच्याकडे हसून बघत होता.

अखेर मीनाने दरवाजा उघडला.

''अगं आशूडी किती घाई, बेल जळली असती ना.''

"अरे आशू, ये ये वेलकम."

"अगं ए दोनदा काय वेलकम करतेस मल''..आशना म्हणाली.

"अगं दुसऱ्यांदाच वेलकम आशिषसाठी. मीट माय कलिग आशिष शिलेदार अँड आशिष मीट माय बेस्ट फ्रैंड कम प्रोफेसर कम सोशल वर्कर दि ग्रेट लेडी..मिस आशना."

आशिषने आशनाच्या हातात हात मिळवला. हळूहळू एकेकजण पार्टीसाठी येऊ लागले. चैत्राली व परागही तात्यांना घेऊन आले. ते हल्ली शक्य होईल तिथे तात्यांना फिरवायचे. तेवढाच त्यांना चेंज व्हायचा. बरं वाटायचं त्यांना माणसांत मिसळल्यावर.

मीनाने पावभाजी व गुलाबजाम सर्व्ह केलं. नॉनवेजवाल्यांसाठी खास बटर चिकन,प्रॉन्स बिरयानी बाहेरुन मागवली.होती. सगळी यथेच्छ जेवली. प्रेझेंट देऊन झालं. सेल्फीज काढून झाल्या.

मीनाने आशनाला डान्स करायचा आग्रह केला.
तिने मग जास्त आढेवेढे न घेता माधुरीच्या एकदोतीनवर डान्स केला.

आशिषला गाण्याचा आग्रह करताच आशिष गाणं गाऊ लागला..
एक अजनबी हसीना से
यूँ मुलाकात हो गई
फिर क्या हुआ ये ना पुछो
कुछ ऐसी बात हो गई

वो अचानक आ गई
यूँ नजर के सामने
जैसे निकल आया
घटा से चाँद

चेहरे पे जुल्फें बिखरी हुई थी
दिन में रात हो गई
एक अजनबी हसीना से
यूँ मुलाकात हो गई

जान-ए-मन जान-ए-जिगर
होता मैं शायर अगर
कहेता गजल तेरी अदाओंपर

मैने ये कहा तो, मुझसे खफा वो
जान-ए-हयात हो गई

एक अजनबी हसीना से
यूँ मुलाकात हो गई

आशिषच्या या गाण्यावर साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. आशिष मात्र अर्थपूर्ण नजरेने आशनाकडे पहात होता.

सगळ्यांना निरोप दिल्यावर मीना मयंकला म्हणाली,"मयंक,तू नोटीस केलंस का काही."

'काय गं?'

'अरे आशिषला आपली आशना आवडली बहुतेक. तो एकटक तिच्याचकडे बघत होता.'

'अरे बापरे. आशनाला कळलं असतं तर तिने तिथेच लोळवला असता त्याला.'

'तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतेय मी. एरवी कोणाची हिंमत लागलेय आशनाच्या नजरेला नजर देण्याची पण आशिष तर सरळसरळ तिच्याकडे बघून एक अजनबी हसीना से.. तरीही बाईसाहेब गप्पच राहिल्या. पाणी कुठेतरी मुरतय रे.'

'या आशिषची नीट माहिती काढ. तसं असलं तर आपल्यालाही लक्ष घालावं लागेल या प्रकरणात.'

'अरे आशिषची नुकतीच आमच्या ऑफिसला ट्रान्सफर झाली आहे. असिस्टंट इंजिनिअर आहे तो. एकदम जॉली पर्सन. सगळ्यांना मदत करतो.सगळ्यांशी हसूनखेळून वागतो.

त्याच्या कुटुंबाविषयी विशेष माहिती नाही पण बेचलर वाटतो. तरी पस्तीसच्या वरचा आहे व आशनाही तशीच. दोघांचीही लग्न वेळेत झाली नाहीत.'

मयंक म्हणाला,'अशा उंटावरून शेळ्या नको हाकूस. नीट बोल दोघांशीही.'

'बरं बाबा बोलते.'

'अगं ए गधडे झोपू नकोस. मला कोण देणार प्रमोशनची पार्टी?'

'आठ पाव नि अर्धा डझन गुलाबजाम खाल्लेस नि आला मोठा..मला कोण देणार पार्टी म्हणणारा.'

'उँ हू..ती वेगळी गं. ती सामाजिक. मला वैयक्तिक पार्टी हवी. मला हे तुझ्या गालावंरचे गुलाबजाम हवेत असं म्हणत मयंकने तिच्या गालांच चुंबन घेतलं.'

*******

'ए मम्मा आपली कुमुआजी कधी येणार गं,'जाई म्हणाली.

'अगं चार दिवस झाले नाही त्यांना जाऊन तर लागलीस आजी आजी करायला. इथे सरु आजी आली आहे. तिच्याशी खेळ की.'

'ती सरु आजी नुसती टिव्ही बघत बसते. कुमु आजी मला  मँगो शिरा करुन दयायची,शाळेतून आले की खमंग थालिपीठ करुन द्यायची. रवाकेक बनवायची. ही आजी तू करुन ठेवलेलं नुसतं गरम करुन देते. माझ्यासोबत माझ्या अंबुशी खेळतही नाही.'

'बाबावर गेलैस हो. तुला त्याच्याकडचीच मणसं आवडतात.'

'असं पण असतं आई..इकडची माणसं..तिकडची माणसं!'

'गप्प बस जरा देवासारखी आता. नाहीतर चौदाचा पाढा पाठ कर जा.'

'तो तर कुमु आजीने कधीच करुन घेतला चौदा एके चौदा, चौदा दुणे अठ्ठावीस, चौदा त्रिक बेचाळीस,चौदा चोक छप्पन.....'अगं सोळापर्यंत झालेत पाठ. पाढा पाठ झाला की कुमुआजी गुळपापडी देते मला.'

'बरं,मग जा जरा तुझा खण आवर जा.'

'माझ्या अंबुचापण खण आवरायला हवा. कशी बाई शिस्त लावायची हिला! नुसता पसारा करुन ठेवते!'जाई कपाळाला हात लावून म्हणाली. जाईच्या ह्या म्हणण्यावर सरलाताई व मीना खळखळून हसल्या.

सरलाताई टेरेसमधे रोपं बघत उभ्या होत्या. तिन्हीसांज होत आली होती. त्यांच्या मनात अनामिकशी हुरहुर दाटली होती.

'आई गं,काय करतेस टेरेसमधे एकटी.'

'काही नाही गं. असंच जरा मन रमवतेय.'

'आई,तू दादाच्या म्हणण्याप्रमाणे सवाष्णीचा साज घालू लागलीस खरं पण तरीही अलिप्तच रहातेस. पुर्वी किती हौस होती तुला गोडाधोडाचा स्वैंपाक करायची! तुझ्या हातचे मासे तर अप्रतिम. .पण कित्येक दिवस झाले तू चहासुद्धा करत नाहीस. तिकडे घरी मला वाटलं चैत्रालीच्या स्वैंपाकात ढवळाढवळ नको म्हणून करत नसावीस पण इथेही तसंच.'

'मीनू,खरंच तुझे वडील गेल्यापासून मला स्वैंपाकघराकडे जावसंच वाटत नाही. साधा चहा करायला गेलं तरी आठवांच आभाळ भरुन येतं बघ. कडक चहा लागायचा त्यांना नि माझ्याच हातचा. घडीच्या पोळ्या किती आवडायच्या!'

'आई,असं करुन तू तुझ्या मनाला त्रास देतेस गं. चैत्राली बिचारी कधी बोलून दाखवत नाही पण तिलाही वाटत असेल नं तिच्या सासूने स्वैंपाकघरात मदत करावी.'

'हो तर पोर बोलत नाही कधीच उलट. सगळं मनात ठेवते. माझं काय गं पिकलं पान. पानं पिकली की ती आपोआप गळून पडतात किंवा त्यांना कात्रीने छाटून तरी टाकतात कारण त्यांची गरज संपलेली असते. माझंही तसंच काहीसं झालंय बघ. आता जो ठेवेल त्याच्या दारावर रहायचं. आता तर काय ही इवलीशी जाईही बोलू लागली मला. मघा ऐकलं मी,काय म्हणत होती ते. तिला कुमुआजी आवडते माझ्यापेक्षा. माझं टिव्ही पहाणं आवडत नाही तिला.

पण कुमुआजीत नि माझ्यात फरक आहे गं मीना. कुमुआजीसोबत तिचा जोडीदार आहे,तिचे रागरुसवे काढायला..या म्हातारपणात हक्काचं माणूस जवळ असणं खूप निकडीचं असतं गं.

काल देवळात गेले होते. तिथे एक बाई हळदीकुंकू लावत होती,वाण वाटत होती. तुझ्याएवढीच असेल वयाने. खरं सांगू मीनू , मलाही वाण हवं झालं. तो माझा अधिकार वाटला. तिनेही मला टिकलीखाली हळदकुंकू लावलं,वाण दिलं,माझ्या पाया पडली. अगदी भरुन पावले बघ. तिला तोंड भरुन आशिर्वाद दिला पण मग वर मान करुन पाहिलं तर बऱ्याचजणी माझ्याकडे मी काहीतरी विपरीत,चुकीचं असं करुन घेतलं या नजरेने पाहू लागल्या. त्यांच्या त्या नजरांनी उभ्या अंगाची लाही झाली . बरं चांगल्या सुशिक्षित बायका होत्या. काल रात्रभर डोळ्यातलं पाणी खळलं नाही माझ्या.'

'अगं आई,नुसतं उच्चविद्याविभूषित झालं की सुशिक्षितपणा येतो असं नाही गं. अशांकडे दुर्लक्ष करायचं. लहानपणी कोणी मला मुद्दाम चिडवलं नि मी रडत आले घरी की तुच मला सांगायचीस नं की हत्तीने नेहमी आपल्या चालीत चालायचं तसंच करत जा.

आणि तुला रद्दी वगैरे मुळीच समजू नकोस गं. तू कितीही म्हातारी झालीस नं तरी हवीस आम्हाला. तुझे आशिर्वाद हवेत गं आम्हाला. तू आहेस म्हणून आम्हाला आमच्या लहानपणाची जाण आहे. मोठं नाही व्हायचं मला. तुझ्या कुशीतच बरं वाटतं बघ मला. आता पहिले वचन दे की परत अशी मरणाच्या वाटेची भाषा बोलणार नाहीस.'

'हो गं राजा. नाही बोलणार. आज तुझ्या आवडीच्या सांजोऱ्या करते चल. सगळं सामान काढ बघू.'

🎭 Series Post

View all