भातुकली (भाग नववा)

Clashes in families

भातुकली (भाग नववा)

मीनाच्या सासूसासऱ्यांनाही आमंत्रण होतं पण मीनाच्या सासऱ्यांना असं कोणत्या समारंभात वगैरे जायचं जीवावर येई म्हणून त्यांनी पोटात दुखतय असा बहाणा केला मग कुमुदताई अर्थात यजमानांसोबत थांबल्या.
(आता पुढे..)

सरलाताईंच्या वाढदिवसाचं साऱ्या नातेवाईकांना,बिल्डींगमधल्या शेजाऱ्यांना आमंत्रण दिलं होतं. 

चैत्रालीने त्यांच्यासाठी खास गुलबक्षी रंगाची साडी घेतली होती. त्यावर मेचिंग अशी साजेशी ज्वेलरीही आणली होती तिने. सरलाताई जेव्हा नेहमीच्यातली त्यातल्या त्यात नवी साडी नेसायला गेल्या तेव्हा चैत्रालीने त्यांच्या पुढ्यात ही साडी ठेवली.

"चैत्राली काय हे! तुला माहिती आहे ना आता सहा वर्ष होतील हे जाऊन. तू नेहमी हट्ट करतेस आणि मी नेहमी तुला असंच सांगतेना की मला साधे फिकटसे रंग आणत जा बाई. हा रंग आवडतो मला पण लोकं काय म्हणतील अगं,या बाईला म्हातारचळ लागलाय का या वयात असं वाटेल त्यांना.'

तितक्यात पराग तिथे आला व म्हणाला,"आई,तुझा हा साध्वीप्रमाणे रहाण्याचा हट्ट पप्पा गेल्यापासून गेली सहा वर्ष मानला गं आम्ही. तुला कळत नाही का गं तुझ्या मुलांना तुला असं कुंकू, मंगळसूत्र न घालता पहाताना किती यातना होतात त्या?"

"अरे पराग,खुळा क काय तू. सगळे नातेवाईक जमलैत बाहेर. काय म्हणतील,वेड्यात काढतील मला. मी बसते इथेच. मला नै करायची साठीबिठी."

मीना हे सारं बोलणं ऐकत दारात उभी होती. सोबत तिची जिगरी दोस्त आशनाही होती.

आशना म्हणाली,"काकू,आता तुम्ही एकही शब्द बोलायचा नाही. मी सजवणार तुम्हाला. अगदी शहाण्या बाळासारखं वागायचं. अगर सीधे उंगली से घी नहीं निकला तो आपुन पुरी बरनीही गेस के उपर रखता है।"

"कर गं बाई तुला हवं ते तू थोडीच ऐकणार आहेस!"

आशनाने सरलाताईंना साडी नेसवली,पदर छान पिनअप केला. मीनाने त्यांच्या केसांचा फ्रेंच बन घातला. डाळींबी खड्यांची कुडी,डाळींबी खड्यांचा हार घातल्यावर किती सुरेख दिसू लागल्या सरलाताई! 

हातात मोत्यांचे डाळींबी खड्यांची नक्षी असणारे तोडे घातले. बनच्या एका बाजूला मोगऱ्याच्या नुकत्याच उमलत असलेल्या फुलांचा  गजरा पिनअप केला.

 चैत्रालीने त्यांचा अगदी सौम्य असा मेकअप केला. ओठांना बेबीपिंक कलरची लिपस्टीक लावली व त्या पुर्वी लावायचं तसंच ठसठशीत कुंकु भाळावर लावलं.

 स्वतःचं हे असं सजलेलं रुप कितीतरी वर्षानंतर सरलाताई आरशात पहात होत्या. 

त्यांचे डोळे पाण्याने तुंडुंब भरले. 

ओघळू पहाणारी आसवं आशनाने हातरुमालाने टिपली व म्हणाली,"आता रडायचं नाही अजिबात. यापुढे असंच जॉली रहायचं. दुनिया को डरने का नही. कोणी काय बोललं तर मला सांगायचं."

सरलाताई बाहेर हॉलमधे गेल्या तशा काही मुंड्या आपापसात कुजबुजण्यासाठी खाली वळल्या तर बऱ्याच जणांनी त्यांच टाळ्या वाजवून कौतुक केलं.

 लेक,सून,आयेशा व अजून दोघीजणींनी त्यांच औक्षण केलं. 

सरलाताईंनी केक कट केला. मुलांनी वाढदिवसाचं गाणं म्हंटलं. 

सगळं जेवण परागने बाहेरुन मागवलं होतं. सरलाताईंच्या आवडीची पुरणपोळी,वालाचं बिरडं,मसालेभात,दहीभात,वरणभात,बटाट्याची सुकी भाजी,बासुंदी असा छान मेन्यू होता. 

रात्री मात्र परागने सरलाताईंच्या मांडीवर डोकं ठेवत म्हंटलं,"आई गं,सहा वर्षांनी तुला असं सालंकृत पहातोय मी. आता एक वचन देशील मला..नेहमी असंच रहाशील तुझ्या मुलांसाठी तरी."

सरलाताई त्याच्या केसांत हात फिरवत म्हणाल्या,"हो रे सोन्या. या समाजाची भिती बाळगत मी कधी तुमच्या मनाला, आईला साध्वीसारखं पाहून काय वाटत असेल याची चिंताच केली नव्हती पण आता नाही. आता मी पुन्हा पहिल्यासारखी जगेन बघ."

इतक्यात मीनाचं आशनाकडे लक्ष गेलं.

"अगं आशू,वाजले किती? घरी नाही का जायचं तुला?"

"ये ले चाबी मीनू. दोन दिवस मी तुझ्या घरी तळ ठोकणार."

"म्हणजे..आज रात्रीपासून तुमची ड्युटी माझ्या रुमवर लावलेय मी. तू नि मयंक बसा तिकडे गुटरगू करत."

 आशनाच्या या म्हणण्यावर सगळेच हसायला लागले.

"काय मग जिजू,सेकण्ड हनिमून!"असं म्हणत परागने मयंकला डोळा मारला. मीनाने तिचे आरक्त गाल दोन्ही तळव्यांत लपवले."

"ए आता जाता का इथंच स्टार्ट करताय" असं आशना म्हणताच मयंक मीनाला घेऊन निघाला. 

जाई यशसोबत झोपायला गेली. 

काही वेळातच दोघे आशनाच्या फ्लेटवर पोहोचले.. खरंतर लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांना एवढा ऐसपैस एकांत मिळत होता. दोघेही बावरले होते.

खरंतर दोघंही नेहमीचे भीडू पण नवीनच लग्न झाल्यासारखे लाजत होते. 

मीनाने साडी बदलली व आशनाने तिच्यासाठी स्पेशल आणलेला झिरमिरित पिंकीश कलरचा गाऊन घातला. त्यातली अंतर्वस्त्रही सिल्की पिंक होती. 

मयंकने त्याचे कपडे बदलले व त्याने येताना आणलेला सुती सदरा व बॉक्सर घातली. 

मीना साडी वगैरे नीट ठेऊन मयंकच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. 

मयंकचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना इतकी मीना क्युट दिसत होती. त्याने तिला चेष्टेने विचारलं,"ओ मिस माझ्या बायकोला पाहिलत का?" यावर लटक्या रागाने ती त्याला पिलोने बदडू लागली.

 मयंकने तिला आपल्या कुशीत घेतलं. तिच्या आरक्त चेहऱ्याकडे पाहू लागला तशी मीनू अजुनच लाजली.

 मयंकने गालांवर रुळलेल्या तिच्या रेशमी बटा कानामागे सारल्या व तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले तशी मीना नखशिखांत शहारली. 

दोघही प्रणयसुखाच्या सागरात डुंबू लागली. उष्ण श्वास परस्परांत मिसळले. बोटांत बोटं गुंफली. दोन प्रेमीजीव एक झाले.

प्रेमाचा आवेग ओसरल्यावर दोघंही बराच वेळ गुजगोष्टी करत राहिली. मयंक म्हणाला,"मानलं गं तुझ्या आशनाला. कसलं भारी गीफ्ट दिलं तिने आपल्याला!" असं म्हणत पुन्हा त्याने मीनूला घट्ट कुशीत घेतलं. दोघं अगदी एक दुजे के लिए झाले होते. 

दुसऱ्या दिवशी दोघांनी टबबाथ घेतला. मयंक मीनाला सोडतच नव्हता. शेवटी ती कशीतरी बाथटॉवेल गुंडाळून बाहेर आली. 

आज तिने पर्पल कलरचा वनपीस घातला.

 मयंकचं आवरुन होईस्तोवर मीनाने चहा व आमलेटब्रेड तयार केलं. 

दोघांनी मिळून नाश्ता केला. 

टेरेसच्या झोपाळ्यात दोचंजणं बसले. 

बाहेरचा हिरवागार व्रुक्षराजींनी नटलेला निसर्ग त्यांच्या व्रुत्ती अजुनच प्रफुल्लित करत होता आणि अचानक पावसाच्या रिमझिम धारा बरसू लागल्या. 

मयंक काही बोलायच्या आत मीनू एखाद्या अल्लड मुलीसारखी झोपाळ्याचा गज सोडून टेरेसच्या छत नसलेल्या भागात गेली.

 दोन्ही ओंजळी पुढे करुन ती श्रावणधारा ओंजळीत झेलू लागली. 

पावसाच्या सरींत थुईथुई नाचू लागली. 

साचलेल्या पाण्यात पावलं थबकवू लागली.

 मयंक अनिमिष नेत्रांनी त्याच्या अभिसारिकेचं ते अवखळ,अल्लड रुप पहात होता. तिची ओलेती पावलं,त्यांतले नुपुर..सगळंच सुंदर..सुंदर..केवळ सुंदर होतं.

तिला असं ओलेतं पाहून त्याला कविता सुचली..

ओल्याचिंब बटांतूनी
थेंबमोती ओघळले
तुझ्या मादक अदांनी
मन माझे मोहरले

चिंब ओलेत्या केसांना
जेंव्हा देतेस झटका
अंगोपांगावर माझ्या
बहरे म्रुग अवघा

मत्त गंध कुंतलांचा
येता मन होते धुंद
डोकावून पाहे मला
सखे तुझा मुखचंद्र

तुझे लाडीक हासणे
माझ्यासाठी श्रुंगारणे
करतेस सये मला
तू ग पुरते दिवाणे

तुझ्या टपोऱ्या डोळ्यांत
कितीक बोलके भाव
अधरांच्या पाकळ्यांची
अनामिक थरथर

सज्जामध्ये थिरकत
राहू नकोस गं पिया
मीच तुझा कृष्णसखा
अन् तुच माझी राधा

कविता गुणगुणत त्याच्याही नकळत तो मीनाच्या जवळ पावसात गेला. 

मयंकने मीनूची हनुवटी त्याच्या तर्जनीने उचलली तशी मीनू लाजून गोरीमोरी झाली.

(क्रमश:)

------सौ.गीता गजानन गरुड.

🎭 Series Post

View all