Aug 09, 2022
कथामालिका

भातुकली (भाग चौदावा)

Read Later
भातुकली (भाग चौदावा)

भातुकली (भाग चौदावा)

(पाचेक वाजता चैत्राली उठली. तिने यशच्या कपाळाला हात लावला. यशचा ताप आता निवळला होता. त्याला घाम आला होता. सुती कपड्याने तिने त्याला पुसलं व परत पांघरुण घातलं.

 तिने तोंड धुतलं व तात्यांसाठी चहा ठेवला. हॉलमधे आली.बघते तर हॉलमधे तात्या नाहीत. बाहेरचं लोखंडी दार बंद होतं पण त्याला कडी नव्हती. चैत्राली घाबरली..एकतर सकाळीच तात्या हळवे झाले होते..तात्या आपल्या जीवाचं काही बरंवाईट..तिच्या मनात अनेक अगोचर शंका येऊ लागल्या.  आता पुढे..)

चैत्रालीने परागला फोन लावला व सगळी हकीगत सांगितली. 

पराग म्हणाला,"अगं तिथेच आसपास असतील. तू यशला सोडून खाली येऊ नकोस. मी बघतो त्यांना."

परागने त्यांना बिल्डींगभोवती शोधलं. आजुबाजूच्या रस्त्यांवर शोधलं. त्याला तात्या कुठेच दिसेनात. तो हैराण झाला. शेवटी सातेक वाजता घरी आला.

"हे काय एकटाच..तात्या..माझे तात्या नाही सापडले!"

चैत्राली उभ्या घाईने रडू लागली. परागने तिला कसंबसं गप्प केलं. तेवढ्यात यश रडत उठला..दोघंही यशकडे गेले. यशला परत सणकून ताप भरला होता. आता मात्र पराग वैतागला,"चैत्रा, काय तुझे तात्या..असे कसे कुठेही जातात तोंड वर करुन. ती सुजाता वहिनी बरोबरच सांगत होती. काय मति फिरली नि त्यांना घेऊन आलो. आता आपल्या पोराला बघू की तुझ्या तात्यांना शोधत फिरु. डोकं फिरायची वेळ आलेय अक्षरश:."

परागने यशला उठवलं. यश उठेना.

"यश,बेटा ताप आलाय नं तुला. चल पटकन डॉक्टरकाकांकडे जाऊया."  यश बळेबळेच उठला. परागने त्याला तसंच उचलून हॉलमधे आणलं व त्याला सँडल्स घालू लागला.

यशने इकडेतिकडे पाहिलं. त्याला तात्या दिसले नाहीत.
"अरे आजोबा कुठ्ठे गेले मम्मा?"

"यशु,ते जरा बाहेर गेले आहेत. तू लवकर जाऊन ये बरं पप्पासोबत." चैत्रालीने यशची समजूत काढली. पराग रागातच होता.

डॉक्टरकडेही बरीच रांग होती. तो नंबर लावून यशला मांडीवर घेऊन बसला पण त्याचं सगळं चित्त तात्यांकडे होतं. यश कोपऱ्यातला एक्विरियम बघायला गेला तसं त्याने आईला फोन लावून तात्यांबद्दल सांगितलं.

 सरलाताई म्हणाल्या,"तरी तुला सांगत होते,त्यांना आणू नको म्हणून. अरे म्हातारं माणूस नि लहान मूल सारखंच. आता कुठे शोधणारेस त्यांना. बरं भेटले की सांग फोन करुन. नेमके जावईबापूही लेट यायचेत नाहीतर त्यांनाच पाठवलं असतं तुझ्या सोबतीला."

यश जवळ येताच परागने फोन बंद केला. 
"पप्पा कोणाशी बोलत होतास?"
"काही नाही रे असंच."
"तुझ्या मम्मीशी? तुला पण आठवण येते मम्मीची?"
परागने यशची एक गोड पापी घेतली.

डॉक्टरांनी यशचं वजन केलं मग त्याला तपासलं. काही काळजी करण्यासारखं नाही. वायरल आहे म्हणाले व औषधगोळ्या लिहून दिल्या.  

नेहमीसारखंच औषध घेऊन झाल्यावर बापबेटे समोरच्या मॉन्जिनीजच्या दुकानात गेले व यशच्या आवडत्या पेस्ट्रीज पेक करुन घेतल्या.

इकडे चैत्राली घरी रडत बसलेली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. दारात गोपी उभा होता व त्याच्यासोबत तात्या होते. तात्या दिसताच चैत्रालीने त्यांना मिठी मारली व रडू लागली. मग तिच्या लक्षात आलं अरे गोपी आहे पाठीमागे. तिने त्याला आत बोलावलं. दोघांनाही पाणी आणून दिलं. 

काही वेळ असाच गेला. मग गोपी म्हणाला,"अगं इथे एका मित्राच्या घरी वास्तुशांतीसाठी आलो होतो तर तात्या तिथे एकटेच उभे होते. जरा घाबरल्यासारखे दिसले. मी गाडीतून उतरलो. त्यांना ओळख करुन दिली तसं म्हणाले,"अरे गोपी काय सांगू तुला इथे चैत्राकडे आलोय. नातवाला ताप आलाय सणकून म्हणून म्हंटल सफरचंद,मोसंबी आणावीत. 

चैत्राला सांगायला गेलो तर पोर निजलेली. उठवावसं नाही वाटलं. फळवाला कुठे दिसेना म्हणून फिरत फिरत इथवर आलो. फळं मिळाली पण आता घर सापडत नाहीए रे बाबा. पण बिल्डींगचं नाव आम्रपाली त्यांच्या लक्षात होतं म्हणून बरं झालं. तिथेच थोडा नाश्ता केला मग आलो इथे."

तितक्यात यश व पराग आले. परागची तात्यांनी गोपीशी ओळख करुन दिली. पराग व चैत्रालीने गोपीचे आभार मानले. गोपीने यशला छोटी कार भेट म्हणून दिली तसा यश उड्या मारु लागला व गोपीला म्हणाला गोपी अंकल तुम्ही परत या माझ्याशी खेळायला नक्की. गोपीने त्याला परत येण्याचं प्रॉमिस दिलं. गोपी सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघाला.

चैत्रालीने मोसंब सोलून यशला व तात्यांना दिलं. तात्या मग परागशी गप्पा मारत बसले. दुसऱ्या दिवशी परागने तात्यांना मोबाईल आणून दिला. त्यात त्यांना आप्तस्वकीयांचे मोबाईल नंबर सेव्ह करुन दिले व कुठेही बाहेर जाताना मोबाईल आवर्जुन खिशात ठेवायला सांगितलं. 

चैत्राली मनात म्हणाली,"कसा आहे हा पराग..काल तात्यांवरुन किती बडबडला मला नं आता त्यांना नवाकोरा हँडसेट गीफ्ट दिला." चैतूने तो किचनमधे येताच त्याच्या गळ्यात आपले नाजूक हात गुंफवले व त्याला किस केलं. पराग म्हणाला,"अरे वाटलं नव्हतं हा, एवढं गोड गीफ्ट भेटतं सासरेबुवांसाठी मोबाईल आणल्यावर. आता अजुन काहीतरी मोठं आणतो मग मोठ्ठं गीफ्ट देशील ना!" तसं चैत्रालीने त्याला लाडाने चापटी मारली. 

यशची परीक्षा जवळ आली होती. तात्या त्याचा अभ्यास घेण्यात दंग झाले. तात्यांसोबत हसतखेळत अभ्यास करायला यशला खूप आवडू लागलं. त्याचा योग्य तो रिझल्ट मिळाला. यश युनिट टेस्टमधे वर्गात हाययेस्ट आला. चैत्रालीने व तात्यांनी त्याचं कोतुक केलं. परागनेही यशला प्रुथ्वीची प्रतिक्रुती गीफ्ट दिली. 

 दुसऱ्या दिवशी यश अगदी रडवेला होऊन घरी आला. चैत्रालीलाही काही सांगेना. शेवटी तात्यांनी त्याला जवळ घेतलं व त्याला थोपटू लागले,म्हणाले,"तुला बरं वाटत नाही का यश? कुणी काही बोललं का?"

यावर यशला अजुनच रडू आलं. तात्यांनी धोतऱ्याच्या सोग्याने त्याचे अश्रु पुसले व म्हणाले चल आपण गाड्यांची रेस लावुया. दोघांच्या पुश बेक गाड्यांची रेस लागली. कधी तात्यांची गाडी जिंकायची तर कधी यशची. 

यशची गाडी जिंकली की तो हुर्रे करायचा. मग गाडीच्या नादात असतानाच म्हणाला,"तात्या, परीक्षेत पण असंच असतनं. कधी कोण पहिलं येतं,कधी कोण दुसरं,तिसरं,चौथं.."

तात्या म्हणाले,"हो रे बाळा. स्पर्धा ही सगळीकडेच असते. हरलो म्हणून नाराज व्हायचं नसतं किंवा जिंकलो म्हणून फुशारुन जायचं नसतं."

यश म्हणाला," हे त्या ढमीच्या मम्माला कोण समजावणार? यावेळी मी हाययेस्ट आलो. ढमी दुसरी आली म्हणून ढमीची मम्मा तिला खूपच ओरडली. पुढच्यावेळी पहिली नाही आलीस तर याद राख असंही म्हणाली. ढमीने माझ्याशी कट्टी घेतली तात्या.????"

"ही ढमी रहाते कुठे बाळा?" तात्यांनी यशला विचारलं. 

"ती ती रिक्षास्टँडच्याजवळ बंगला आहे तेंचा."

"संध्याकाळी जाऊ आपण ढमीकडे."

"बरं तात्या."

संध्याकाळी तात्या व यश ढमीकडे गेले. ढमीची मम्मा नुकतीच ऑफिसवरून आली होती. तिलाही कळलं होतं की ढमीने यशशी कट्टी घेतलीय.

ढमीच्या मम्मीने यशला व आजोबांना मसाला दूध दिलं व म्हणाली,"ऑफिसमधे खूप कामं असतं हल्ली. मला ढमीचा हवा तेवढा अभ्यास घेता येत नाही. ती गधडीही स्वतःहून अभ्यास करत नाही. आता नंबर घसरला तिचा. हिचं एक टेंशन डोक्याला. बघते आता ट्युशन लावते हिला."  

"मी नाही ट्युशनला जाणार,"ढमी उत्तरली.

"कशी नाही जात ते बघते. माझ्याशी गाठ आहे."ढमीची मम्मा बोलली.

(क्रमशः)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now