Jan 22, 2021
कथामालिका

भातुकली (भाग पंधरावा)

Read Later
भातुकली (भाग पंधरावा)

भातुकली (भाग पंधरावा)

(संध्याकाळी तात्या व यश ढमीकडे गेले. ढमीची मम्मा नुकतीच ऑफिसवरून आली होती. तिलाही कळलं होतं की ढमीने यशशी कट्टी घेतलीय.

ढमीच्या मम्मीने यशला व आजोबांना मसाला दूध दिलं व म्हणाली,"ऑफिसमधे खूप कामं असतं हल्ली. मला ढमीचा हवा तेवढा अभ्यास घेता येत नाही. ती गधडीही स्वतःहून अभ्यास करत नाही. आता नंबर घसरला तिचा. हिचं एक टेंशन डोक्याला. बघते आता ट्युशन लावते हिला."  

"मी नाही ट्युशनला जाणार,"ढमी उत्तरली.

"कशी नाही जात ते बघते. माझ्याशी गाठ आहे."ढमीची मम्मा बोलली. आता पुढे..)

तसं तात्या म्हणाले,"मी गणिताचा शिक्षक होतो. तुम्ही मी इथे असेस्तोवर माझ्याकडे पाठवा ढमीला. मी घेईन तिचं गणित. इतर विषयांची तयारीही करुन घेईन. यश व ढमी दोघं मिळून आवडीने अभ्यास करतील." हे ऐकताच ढमीची कळी खुलली. ढमीची मम्माही हो म्हणाली. 

 यश व तात्या पाणीपुरी खाऊन घरी गेले. दुसऱ्या दिवशीपासून ढमी व यशचा तात्यांकडे क्लास सुरु झाला. 

 वीसेक दिवसांनी चैत्राली व पराग तात्यांना पुन्हा डॉक्टरकडे घेऊन गेले. तात्यांच्या तब्येतीत फार सुधारणा झाली होती. विनाकारण हातवारे करणं,असंबंध बोलणं बंद झालं होतं. 

डॉक्टर तात्यांची प्रगती पाहून खूष झाले व म्हणाले,"पराग,चैत्राली औषधं नाममात्र. तात्यांना खरी गरज मायेची होती. ती माया,ते प्रेम तुमच्याकडून मिळतय त्यांना. ते लवकरच खडखडीत बरे होतील बघा. 

यशच्या शाळेत पावसाळी सम्मेलन होतं. त्यात जोडीने गाणं म्हणायचं होतं. पावसाची थीम दिलेली.. यश व ढमीने गाणं एकत्र गायचं ठरवलं पण कोणतं गाणं गायचं.. हा विचार दोघं करत असताना यश जोरात ओरडला.."ए आपण असं करुया..आजोबांना सांगुया आपल्यासाठी गाणं लिहायला?"

स्वरदा उर्फ ढमी म्हणाली,"अरे पण टिचरची परवानगी घ्यावी लागेल नं."

मग ती दोघं मिळून मधल्या सुट्टीत टिचर रुममधे गेली व स्वरदाने टिचरला विचारलं,"टिचर,आम्ही आजोबांनी लिहिलेलं गाणं किंवा कविता सादर केली तर .."

टिचर म्हणाली,"अरे वा का नाही चालणार ते तर धावेल."

टिचरना थँक्यू म्हणत दोघं वर्गात आली.

ट्युशन संपल्यावर दोघांनी आजोबांकडून गाणं लिहून घेतलं. चैत्रालीने त्यांना साभिनय कसं सादर करायचं ते शिकवलं.

स्वरदाचे मम्मीपप्पा,तात्या,यशचे मम्मीपप्पा सारे सम्मेलनाला उपस्थित होते. चारेक जोड्यांनंतर यश व स्वरदाची जोडी स्टेजवर आली. दोघं मिळून सुरात गाणं गाऊ लागले.

तुझा पाऊस माझा पाऊस
तडतडताशा उनाड पाऊस
अंगणातल्या तळ्यात ताई
बघ कसा नाचतोय पाऊस

नको क्षणात मोहरुन जाऊस
नकोच माझी भजी चोरुस
नको इतका चहा ढोसूस
माझा पाऊस तुझा पाऊस
नको पाण्यात होड्या सोडूस

चल पागोळीला उभे राहू
ओली गाणी सुरात गाऊ
चुलीतल्या धगीभोवती
चल मुरी मारुन बसू

चल आजीच्या गोधडीत शिरु
भुताटकीच्या गोष्टी ऐकू
ऐकता ऐकता क्षणात दोघे
चल स्वप्नांच्या दरीत जाऊ

तेथे असेल दाट धुके
थोडे तुझे थोडे माझे
चल वाटून वाटून घेऊ
धबधब्याच्या पाण्यात रे
इंद्रधनुची रंगपंचमी खेळू

हिरव्या गवतावरती निजू
चल पुन्हा हाती हात घेऊ
मोरासवे करुन दोस्ती
चल थिरकत पदन्यास करु.

दोघांनी फार छान गाणं म्हंटलं. त्यांच्या गाण्याला दुसरं बक्षिस मिळालं तेव्हा ते घेण्यासाठी टिचरने तात्यांनाही स्टेजवर बोलावलं व गाणं तात्यांनी लिहिलंय तसंच ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत हे आवर्जून सांगितलं. मुख्याध्यापकांनी तात्यांना पुष्पगुच्छ भेट दिला. उपस्थितांनी उभं राहून टाळ्या वाजवत तात्यांना सदिच्छा दिल्या.

ढमीच्या आईने तात्यांचे दोन्ही हात धरले व म्हणाली,"तात्या,तुम्ही माझे डोळे उघडलात. आजपर्यंत पहिल्या नंबरसाठी मी माझ्या ढमीला गुरासारखं राबवलं पण तुमच्यामुळे माझी ढमी  खुलली. ती मुलांत मिसळू लागली. आजपर्यंत तिने असा स्टेजवर परफॉर्मन्स केला नव्हता. आज यशच्या जोडीने तीही छान गाणं म्हणाली. तुमचे आभार नाही मानणार तात्या. तुमच्या ऋणातच रहायला आवडेल मला असं म्हणत त्या उभयतांनी.तात्यांचे पाय धरले. तात्यांनीही त्यांना तोंड भरुन आशिर्वाद दिला.

रात्री पराग झोपताना चैत्रालीला म्हणाला,"चैतू,त्यादिवशी तात्या हरवले तेव्हा मी म्हणालो होतो आठवतंय तुला..कुठून मति फिरली न् या तात्यांना घेऊन आलो पण आज कळतय मी किती चुकीचा होतो. घरातली जुनी खोडं फळं,फुलं देत नसतील पण सावली जरुर देतात. तात्या आपल्यासाठी सावली देणारं झाड आहेत चैतू."

*******

 एकदा गोपी आला, दुपारचा. यशसाठी त्याने महागातली गाडी आणली होती. थोडावेळ तात्यांशी गप्पा मारत बसला न् गेला. चारेक दिवसांनी परत यशसाठी खेळण्यातली महागडी बंदूक घेऊन आला. चैत्रालीला त्याचं असं महागडी गीफ्ट्स यशसाठी आणणं पटत नव्हतं. परागलाही ते आवडत नव्हतं.

चैत्रालीने शेवटी तात्यांजवळ तिचं मन मोकळं केलं,"तात्या, मला खूप भिती वाटते हो गोपीची. हा गोपी कधीही येतो काय,यशला महागडी खेळणी आणतो काय. परागलाही असं परक्याकडून घेणं आवडत नाही. तेही काही कारण नसताना आणतोय. अशाने परागच्या मनात संशय येईल माझ्याबद्दल."

"तुझं मन पवित्र आहे नं,"तात्या म्हणाले.

"तात्या,खरंच माझ्या मनात आता फक्त पराग आहे."

"मग घाबरतेस कशाला?"

"त्याने परागला काही सांगितलं तर.."

"चैत्रा,बाळा आता कळतय नं तुला,मी का माझ्या ह्रदयावर दगड ठेवून तुला लांब ठेवलं ते. ते प्रेम नव्हतंच. निव्वळ आकर्षण होतं पोरी, निसरड्या वयातलं.

 नववीदहावीत समज ती किती असते मुलांना.. भावनेच्या भरात वहावत जातात..आयुष्याची राखरांगोळी करुन घेतात. मी परागला सारं सांगितलय..जेव्हा गोपी पहिल्यांदा आपल्या घरी आला त्याचदिवशी रात्री. चैत्रा,पराग समजदार आहे. तू मुळीच घाबरू नकोस.

 गोपीलाही त्यादिवशी समज दिलेय मी. आता नाही यायचा तो. गोपी परत आला तर मात्र त्याला खडसावून सांग की परत येऊ नकोस."

आठेक दिवस बरे गेले. तात्यांची बिल्डींगीतल्या ज्येष्ठ मंडळींशीही ओळख झाली. कट्ट्यावरच्या गप्पांत,हास्यक्लबमधे सामील होऊ लागले. तात्यांच्या चेहऱ्यावरचा तोच पुर्वीचा उत्साह पाहून चैत्राला भरुन पावल्यासारखं झालं. 

पराग त्यादिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. चैत्राचा वाढदिवस होता पण त्याने साधं विशही केलं नाही. 

चैत्राला खूप राग आला त्याचा. तसा पराग सहसा तिचा वाढदिवस विसरत नसे. चैत्राने अंघोळ करुन देवपूजा केली व तात्यांना नमस्कार केला. तात्यांनी कालच तिचा आवडता माहिमचा हलवा आणून ठेवला होता. पुड्यातला एक पीस काढून त्यांनी देवासमोर ठेवला व दुसरा लेकीला भरवला.  चैत्राने तात्यांना बोन्साय मिठी मारली. 

तेवढ्यात मीनाचा फोन आला. मीनाने,सरलाताईंनी,जाईने तिला बर्थडे विश केलं. मीना लाडात म्हणाली,"अगं परागने काल रात्री बारा वाजताच गोड शुभेच्छा दिल्या असतील आमच्या वहिनीला."

'छे हो, कसचं काय. पराग आज विसरला माझा वाढदिवस.'

'अगं काहीतरी सरप्राईज द्यायचं असेल बरं त्याच्या मनात.'

'बरं,तसंच होवो.' असं म्हणत चैत्रा दाराची बेल वाजत होती म्हणून दार उघडायला गेली आणि दारात तिला गीफ्ट पेक दिसलं व सोबत लालबुंद गुलाबांचा बुके. ' मीनाताई, तुमच्या भावाने,आय मीन माझ्या अहोंनी सरप्राईज दिलंय मला.' असं म्हणत चैत्राने गीफ्टचा फोटो काढून मीनूला शेअर केला.

'अहा,वहिनीच्या गालांवर गुलाब फुलला वाटतं.'

'मीनाताई,चेष्टा पुरे हं फोन ठेवते असं म्हणत चैत्राने फोन ठेवला व त्या नाजूक,मनमोहक,लाल गुलाबांचा सुगंध रंध्रांत भरुन घेतला व स्वतःभोवतीच एक गिरकी घेतली.  मग तिने गीफ्ट पेक खोललं त्यात लाल रंगाचा सिल्कचा लाँगड्रेस होता. चैत्राने आरशासमोर तो स्वतःला लावून बघितला. तिच्या या प्रतिबिंबावर ती खूष झाली व म्हणाली थँक्यू पराग लव्ह यू. तेच शब्द तिने त्याच्या मेसेंजरवर टाईप केले. 

पराग आज मिटींगमधे बिझी होता. त्यामुळे त्याने मेसेज वाचलाच नाही पण लंचब्रेकमधे मेसेज द्रुष्टीस पडताच परागने डोक्याला हात लावला. तसा मित्र म्हणाला,'काय झालं?'

'छट यार, माती खाल्ली. बायकोचा बर्थडे विसरलो.'
'मग काय मेसेंजरवर वहिनी तुझी पूजा करतायत वाटतं.'
'नाही रे. ती तर थँक्यू यू,लव्ह यू म्हणतेय.'
'पऱ्या ए भावा उपरोधिक आहे ते. जाताना गजरे,ड्रेस काहीतरी घेऊन जा बॉ नि जरा लवकर निघ.'

परागने मॉन्जिनीजमधे जाऊन तिच्या आवडता ब्लेक फॉरेस्ट केक,वेफर्स,कँडल घेतले. लेमन यल्लो कलरचा लाँग ड्रेस व जुईचा गजरा घेतला. घरी आला तर चैत्रा लाल सिल्की ड्रेसमधे तयार होती. डोळ्यांत काजळ भरलेलं,ओठांवर लाल रंगाची लिपस्टीक, खांद्यापर्यंत रुळणारा यु कट खरंच फार छान दिसत होती.  पराग तिच्याकडे पहातच राहिला. 

इतक्यात यश,स्वरदा,नाना जे बाहेर फिरायला गेलेले तेही आत आले. साऱ्यांनी चैत्राला शुभेच्छा दिल्या. चैत्राने केक कट केला व सगळ्यांना भरवला. तात्यांनी आईसक्रीम आणलेलं तेही सर्वांनी खाल्लं.

 चैत्राने मग मसालेभात,श्रीखंडपुरीची पानं वाढली. स्वरदाला चैत्राच्या हातचं जेवण फार आवडलं. चैत्राने तिला घरी नेण्यासाठी डब्यात केक व मिठाई दिली.

रात्री  बेडरुममधे परागने चैत्राचे डोळे मिटले व तिच्या हातात लेमन यल्लो कलरचा ड्रेस,जुईचा गजरा ठेवला. चैत्राने डोळे उघडताच जुईचा सुगंध रंध्रांत भरुन घेतला. ड्रेस पाहून म्हणाली,'अय्या,किती छान ड्रेस आहे पण आज जास्तच प्रेम उतू चाललय. सकाळी लाल गुलाब,तो लाल ड्रेस काय आणि आता ही माझी लाडकी जुई व तितकाच सुंदर लिंबुकलरचा ड्रेस!'

'तो लाल ड्रेस,लाल फुलं..मी नाही पाठवलेली गं.. मला तर तू मेसेज पाठवलास तेव्हा वाढदिवसाचं लक्षात आलं बघ.'

'मग तो ड्रेस..ती फुलं..असं म्हणत चैत्रा डस्टबीनकडे धावली.  त्यातली रेपर्स काढून तिने नाव वाचलं बारीक अक्षरात लिहिलं होतं..तुझा फक्त तुझाच गोपी.'

चैत्राला खूप राग आला. तिने तो बुके घेतला व त्यातली फुलं कुस्करून टाकली. तो लाल ड्रेस बाहेर आणला व कैचीने त्याच्या झिरमिळ्या होईस्तोवर कापत,रडतभेकत राहिली. तिचा आवाज ऐकून झोपलेले तात्याही उठले. तात्या व परागने तिला सावरलं. 

आता मात्र तात्यांना गोपीची खरंच भिती वाटू लागली. परागला तर त्याच्या छातीत गोळ्या घालाव्या इतका राग आला होता. त्याने मीनाला फोन करुन सगळी हकीगत सांगितली. मीनाने आशनाचा सल्ला घेतला. आशना म्हणाली,'त्याने गीफ्ट दिले म्हणून तो गुन्हेगार नाही ठरु शकत तरी बघते काय करायचं ते.'

दोन दिवस व्यवस्थित गेले. चैत्राली संध्याकाळी बाजारात गेली होती. तिने वाणसामान,फळं,भाजी घेतली. तिला जाणवलं की कुणीतरी आपला पाठलाग करत आहे. तिने लगेच मीनाच्या सुचनेनुसार आशनाला फोन लावला. चैत्राली समोरच्या उपहारग्रुहात जाऊन बसली. तिने कॉफी मागवली तसं थोड्याच वेळात गोपी तिथे आला व तिच्या समोरच्या चेअरवर बसला.

'काय आवडलं का बर्थडे गीफ्ट,' गोपी तिला म्हणाला.

तिने गोपीला समजावून सांगितलं,"गोपी तुझे नि माझे संबंध हे निव्वळ तरुणपणातलं शारिरीक आकर्षण होतं. माझं लग्न होऊन सात वर्ष झालीत व मला माझा संसार आहे. 

त्यादिवशी माझ्या तात्यांची मदत केलीस याबद्दल धन्यवाद पण यापुढे प्लीज माझ्या संसारात डोकावू नकोस. तू एखादी चांगली मुलगी बघ नि लग्न कर."

यावर गोपीने तिचा हात धरला व म्हणाला,'मी तुला विसरु शकत नाही. अजुनपर्यंत तुझा पत्ता शोधत होतो. इतक्या वर्षांनी तुझा ठावठिकाणा भेटला आणि आता म्हणतेस विसरुन जा. ते शक्य नाही' म्हणत गोपीने चैत्राचे दोन्ही हात गच्च धरले.

चैत्राली जोरात ओरडली त्याबरोबर पाठीमागे बसलेल्या आशना व पोलिस हवालदाराने गोपीची बोकांडी धरली. आशनाने चैत्राला घरी जायला सांगितलं. पोलिसांनी गोपीची चामडी लोळवली. 

आशनाने घरी येऊन चैत्राला ही बातमी दिली. तात्यांनी आशनाचे हात जोडून आभार मानले. म्हणाले,'कोण कोणाची तू माझ्या लेकीच्या मदतीला धावून आलीस बाय. आशनाने त्यांना नमस्कार केला. चैतूने आशनासाठी तिच्या आवडीची मिरची भजी व शिरा बनवला.

********
इकडे, मीनाच्या घरी मीनाच्या आजीसासूंची तब्येत बिघडल्याचा फोन आला. धाकट्याने सांगितलं,"दादा,तू पुढे हो. मला रजा मिळाली की मी येतोच."

मीनाचे सासूसासरे रेल्वेत बसले. रेल्वे सुरु झाली. कुमुदताई सगळं आवरुनसावरुन खिडकीजवळ बसल्या. 

"काय गं बाई त्या म्हातारीची कटकट?"

(क्रमशः)