भातुकली (भाग अकरा)

Clashes in families

भातुकली (भाग अकरावा)

परागने मीनाला फोन लावला,""मीना,काही दिवस मम्मीला तुझ्याजवळ नेतेस का?"

"का रे? चैतूला आपल्या मम्मीची अडचण होऊ लागली का?"

"काहीतरीच काय बोलतेस? अगं मीना तात्यांना बरं नाहीए त्यामुळे त्यांना एखाद्या स्पेशालिस्टला दाखवणं गरजेचं आहे म्हणून त्यांना इकडे आणायचं आहे. किमान महिनाभर तरी रहातील तोवर प्लीज मम्मीला जरा तुझ्याकडे नेशील का? 

अगं तुमचे दोन बेडरुम आहेत म्हणून..झालंच तर मम्मीला हॉलमधे झोपवा. तात्यांना बरं नाही म्हणून. त्यांना बरं वाटलं नि त्यांना गावी सोडलं की ताबडतोब मम्मीला मी इकडे घेऊन येईन.

"अरे पण पराग मम्मी ऐकेल का?"

"ते तर आहेच. असं कर ना,तुच जरा हट्ट कर नि बोलावून घे तिला तुझ्याकडे."

"बरं बघते."

मीना मम्मीला तिच्या घरी घेऊन आली.

बऱ्याच दिवसांनी जागापालट झाल्याने नाही म्हंटल तरी सरलाताईंना जरा बरंच वाटलं. कुमुदताईंना माणसाची नसाई नव्हती. त्यांना बोलायला कोणतरी हवंच होतं. त्याही खूष झाल्या. 

दोघींच्या मिळून गप्पा सुरु झाल्या. दोघीही संध्याकाळी सात वाजल्यापासून सिरियल्स लावून बसायच्या. सिरियल एकीकडे नि यांच्या त्यावर चर्चाच जास्त रंगायच्या. 

कधी दोघीही खो खो हसायच्या तर कधी डोळ्यांना पदर लावून आसवं टिपायच्या.

मीनाचे सासरे त्यांची गंमत बघत बसायचे. दोनदोन आजींमुळे जाईही खूष होती.

मीनाला वाटलं तितकं हे अवघड नव्हतं. एकदा रात्री मीनाला आशनाचा फोन आला..

"मीनू,प्लीज येतेस का माझ्याकडे?"

"अगं आशु तू बरी ऐस ना. तुला काय होतय? असा का आवाज येतोय तुझा?"

"ये,तू ना तू ये गं मीनू मग बो..लू..आ..पण"

नुकतीच जेवणं आवरली होती. सिंकमधे भांडी तशीच होती. मीनाने मम्मीला व सासूला आशनाबद्दल सांगितलं.

 मीनाची मम्मी म्हणाली,"जा पण जावईबापूंना सोबत घेऊन जा बाई. ती पोरपण आपल्या अडल्यानडल्याला उपयोगी पडते."

मीना व मयंक आशुच्या घरी जायला निघाले. बाईकवरुन जाताना मीनाच्या मनात असंख्य प्रश्न येत होते,काय झालं असेल आशुला? आशुने आत्महत्या..वगैरे..छे!माझी आशु भेकड मुळीच नाही. 

तिने तो विचार धुडकावून लावला. रात्रीचं लाँग ड्राइव्हवर जायला मीनाला फार आवडायचं पण आज तिचा जीव नुसता चुटमुटत होता. कधी एकदा आशुला बघतेय असं झालं होतं तिला.

मयंकने बेल वाजवताच आशुने दार उघडलं.

"आशु..आशु हे काय झालं तुला. अगं तुझ्या डोक्याला बँडेज कसं..कुठे पडलीस आशु? आणि हे काय! नीट चालता पण येत नाहीए तुला." मीनाने आशुला हाताला धरून सोफ्यावर बसवलं. 

"सांगते सगळं सांगते. बस मयंक.. तुला तर मीनाने माझ्याबद्दल सांगितलच असेल. काल रात्री जरा लेट सुटले काँलेजातून, पुलावरून येत होते. तुम्हाला तर माहित आहेच किती शुकशुकाट असतो तिथे. मी नेहमीप्रमाणे ड्राईव्ह करत होते. 

अचानक मला झाडीतून हेल्प हेल्प असा आवाज ऐकू आला. तिथे बाजूला दोन बाईक उभ्या होत्या. मी माझी गाडी साईडला लावली व झाळीला धरुन खाली उतरु लागले. 

पाऊस धोधो कोसळत होता. खालून वहाणाऱ्या नदीच्या पाण्याचा आवाज भयंकर वाटत होता.

उतरताना मी भेलकांडले,तोल गेला नि घरंगळत खाली गेले. तरी मी जोर लावून उठले. सगळीकडे खरचटलं होतं. डोक्याला दगड लागला होता.

आता मला तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी मोबाईलची बेटरी ऑन केली व त्या झाळीतून पुढे जाऊ लागले. मी पाहिलं ते द्रुश्य विदारक होतं. 

दोन लांडगे त्यांच्या पँट्स काढून एका कोवळ्या मुलीवर तुटून पडले होते. मी मागचापुढचा काही विचार न करता बाजूचे  मोठाले दगड उचलून त्यांच्यावर फेकू लागले. अकस्मात झालेल्या त्या हल्ल्याने ते पुरते भांबावले.

 असल्या शिव्या हासडल्या साल्यांना! त्या पोरीला धीर आला. ती त्यांच्या तावडीतून निसटली. मी लागलीच पोलिसांना फोन लावला. त्या पोरीनेही दोन लाथा हाणल्या त्या गिधाडांना,थुंकली त्यांच्यावर.

 ते जागचे उठू नयेत म्हणून आम्ही मिळतील ते मोठाले दगड उचकटून त्यांच्या अंगावर टाकले व तिथून निघावो. तिला मागे बसवली व तिच्या घराकडे गाडी वळवली. बंगला बघून लक्षात आलं, श्रीमंत घराण्यातली पोरगी आहे. 

तिने बेल दाबताच एका इसमाने दार उघडले. ती पोरगी त्याला जाऊन बिलगली व पप्पा पप्पा म्हणत रडू लागली. माझी पावलं मात्र तिथल्या तिथेच जड झाली कारण तो इसम दुसरा तिसरा कोणी नसून प्रोफेसर नरेश आहुजा होता. 

हो तोच आहुजा,ज्याच्या देखणेपणाला मी भुलली होती,ज्याला माझं सर्वस्व देऊन बसली होती, ज्याचा अंकुर माझ्या उदरात उमलू पहात होता व माझ्या वडलांच्या व त्याच्या संगनमताने माझं एबोर्शन केलं गेलं होतं..इतकंच नव्हे तर गर्भाशयही काढावं लागल्यामुळे मी कधीही आई बनणार नव्हते आणि अशा सापाच्या पोरीला मी वाचवलं होतं..माझा जीव धोक्यात घालून..का..कशासाठी? 

मी जायला निघणार इतक्यात त्याची पोरगी, सारा फर्स्ट एड बॉक्स घेऊन आली. माझ्या डोक्याला खोप पडली होती. ती डेटॉलने स्वच्छ करुन तिनेच बँडेज केलं. तिच्या बापाने ओळखलं मला नि माझ्या पायावर लोळण घातली. 

त्याचे अश्रु बरंच काही सांगत होते. समोर त्याच्या दिवंगत पत्नीचा फोटो होता. 

सारा झऱ्यासारखी बोलत होती..मला तिला थांबवताही येत नव्हतं. तिच्या मित्रांनी तिला फसवणं,तिच्या आईला झालेला कर्करोग,तिचं त्यांच्यामधे नसणं,एका मोटर अपघातात भावाचं अकाली जाणं आणि तिचं एमबीबीएसचं शिक्षण सारं काही मला सांगत होती. 

मी नि:शब्द होते. काय सांगणार होते त्या कोवळ्या पोरीला की एकेकाळी तुझ्याएवढी असताना तुझ्या बापाच्या नादी लागून मी माझं कौमार्य हरवून बसले होते!"

हे सारं बोलून आशू मीनाच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. एवढी डेशिंग आशु पण आज तिची शेळी झाली होती. ती त्या साराला तिच्या बापाचा इतिहास सांगू शकली असती पण अशाने एक बाप त्याच्या मुलीच्या नजरेतून कायमचा उतरला असता आणि ते आशुला नको होतं. 

मान्य..कोवळ्या वयात आशुला नको ते बघावं लागलं होतं. तिला आईवडिलांचा हवा तसा मजबूत भावनिक आधार जो तारुण्याच्या उंबरठ्यावर हवा असतो तो न मिळाल्याने ती वहावत गेली होती पण म्हणून ती वाईट नव्हती. त्यामुळेच तिने सारासमोर तिच्या बापाचे भिंग उघड केले नव्हते.

 रात्रभर मीना व मयंक तिच्या सोबतच राहिले. सकाळी मीनाने तिला समजावलं की ती काहीच चुकीचं वागली नाहीए. उलटपक्षी तिने एका कोवळ्या मुलीला वाचवलंय. आशुला बळेबळेच नाश्ता करायला लावून ती दोघं घरी आली.

मीना व मयंक घरी गेल्यावर काही वेळात आशनाला पोलीस स्टेशनवरुन फोन आला. कालच्या केससंबंधी तिला चौकीवर बोलावलं होतं. आशना चौकीवर पोहोचली. तिथे कालचे ते दोन गुंड जखमी होते. आशनाचा जवाब नोंदवण्यात आला. तिला त्या दोन्ही चेहऱ्यांची ओळख पटली. 

बाजुलाच सारा व प्रोफेसर आहुजा बसले होते. चौकीतून बाहेर पडल्यावर सारा तिच्या कॉलेजला गेली. ... म्हणाला,"आशना,मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे."

आशना म्हणाली,"काय राहिलंय बोलायचं सर..लेट मी गो ऑन माय वे. आय विल नॉट अटर अ सिंगल वर्ड विच विल कॉज कंन्फ्लिक्ट्स बिट्विन यु अँड युवर डॉटर."

"आशना प्लीज मला थोड बोलू देशील? प्लीज आशना."

(क्रमश:)

-----सौ.गीता गजानन गरुड.

🎭 Series Post

View all