Login

भातुकली (भाग21)

Clashes in family

भातुकली (भाग एकवीस)

"माझ्या प्रॉपर्टीतली दमडीही मिळणार नाही तुला सांगून ठेवतो."आशिषचे वडील म्हणाले. आशिषने दोघांनाही उभ्याने नमस्कार केला व तिथून चालू पडला.

आशना लायब्ररीत आली होती. आज पब्लिक हॉलिडे होता त्यामुळे तिला जरा निवांत होता. तिने आज चेक्सचा शर्ट व जीन्स घातली होती,मनगटात घड्याळ,गळयात बारीकसी चेन..ती दिसायला अगदी सिंपल असली तरी ती जिथे जाईल ती जागा भरल्यासारखी वाटायची. एक वेगळच चैतन्य होतं तिच्या वागण्याबोलण्यात. माणसांना जीवापाड जपायची ती. खिशात हात घालून ती भिंतीवर लटकवलेली नवीन मासिकांची मुखप्रुष्ठे बघण्यात दंग होती. एवढ्यात आशिष तिथे आला. "तू या साऱ्यांहून सुंदर दिसतेस आशना" आशनाने मागे वळून पाहिलं. तिच्यासमोर मिश्किल हसत बोलक्या डोळ्यांचा आशिष उभा होता. "हे बघ आशिष मी शेवटचं सांगते तुला माझा नाद सोड. लायब्ररीत मोठ्या आवाजात बोलण्यास बंदी असल्याने आशू त्याच्याजवळ जावून कुजबुजली." 

"मला काहीच ऐकू आलं नाही,पार्ट टर्न मिस." तसं आशू त्याच्या कानाजवळ जाऊन तेच वाक्य परत म्हणाली. तिच्या उष्ण श्वासांनी आशिष अजुनच जोमात आला.
"बरं चल ठिकाय. आज मला थोडी शॉपिंग करायची आहे. प्लीज नाही म्हणू नकोस. मदत कर मला. माझ्या एका मैत्रिणीचा बर्थडे आहे. तिच्यासाठी ड्रेस,एक्सेसरीज घ्यायच्या आहेत. प्लीज आशना.."

आशिषने एवढा बालिश चेहरा केला की आशना त्याचा हट्ट मोडू नाही शकली. आशिष आशनाला घेऊन एका बुटीकमधे गेला. तिथे आशनाने आशिषच्या मैत्रिणीसाठी मोती कलरचा सोनेरी बुट्टी असणारा ऑफ शोल्डर लाँग गाऊन चुज केला. छान बारीक मोत्याचे स्टड्स,मोत्यांचा नाजूक नेकलेस व बांगड्या घेतल्या. ती मोत्यांचे वेलही घेऊ पहात होती पण आशिष म्हणाला," नको अगं माझ्या मैत्रिणीचा बॉयकट आहे. तिला सुट नाही होणार." 

खरेदी झाल्यावर दोघं रेस्टॉरंटमधे गेले. दोघांनी वेज थाली मागवली. जेवताना आशिषचं अधुनमधून आशनाकडे लक्ष होतं. वेटर एक्स्ट्रा कढी द्यायला आला. पाठीमागनं जाणाऱ्या माणसाचा धक्का त्याला बसला व कढी आशनाच्या शर्टवर सांडली. वेटर घाबरला. आशना वॉश बेसिनकडे जायला वळली तसा आशिषही तिच्या मागून गेला व त्याने तिच्या शर्टावरचे डाग रुमाल ओला करून पुसून काढले. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने आशू मोहरली. तो स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. दोघांनीही मग जेवण आवरलं व आशिषने तिला तिच्या बिल्डींगखाली आणून सोडलं तसं आशना त्याला बाय म्हणाली. 

आशू म्हणाला,"क्या लडकी है यार तुभी. घरपे नहीं बुलाती. खडूस."

यावर आशना हसली व त्याला ये म्हणाली. तो बेग घेऊन आशनाच्यासोबत आला. 

"अरे पिशवी राहूदे होती डिकीत. वर कशाला आणलीस!"

"ते असंच."

आशनाने कॉफी बनवली. कॉफीचे सिप घेत असताना आशिष म्हणाला,"आशू,यू लव्ह मी. आणि हे तू मला त्यादिवशी रात्री मला हाकलवलस तेव्हाच कबूल केलंयस. तूच माझी एकमेव मैत्रीण आहेस. मी मम्मीपप्पांना तुझ्याबद्दल सांगितलं. त्यांना आपलं प्रेम मान्य होणार नाही हे माहितच होतं मला पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आणि राहता राहिली तुझी हिस्ट्री..तिच्याशी माझं काही देणंघेणं नाही. 

मला तू माझी साथीदार म्हणून हवीस बास. आता मला परत हाकलवून दिलस तरी मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन. यावर आशू खूप जोरात हसली..इतकी हसली की तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू निघाले. आशिषने त्याच्या रुमालाने तिचे अश्रु टिपले व तिला जवळ घेतलं.

"आशना,प्लीज जरा तो ड्रेस घालून दाखव मला."

"अरे पण तुझी मैत्रीण.."

"आशू प्लीज.."

"आशनाने तो गाऊन घातला व एक्सेसरीज घालणार इतक्यात आशिष म्हणाला..अहं.. ते मी घालणार. त्याने तिच्या कानात मोती स्टड्स घातले. त्याचा असा जवळचा स्पर्श तिलाही हवाहवासा वाटत होता. 

आशिषने तिच्या गळ्यात नेकलेस घातला. आशनाच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफून त्याने तिच्या मानेला अलवार किस केलं. आशना त्याच्या स्पर्शाने पुरती शहारली. तो पुढे झाला. आशनाचे हात हातांत घेऊन त्याने त्यांत बांगड्या घातल्या व तशीच तिला जवळ ओढली..किती सुंदर दिसत होती ती कोणत्याही मेकअपविना. आशिषने तिच्या खोलवर खळीत त्याचं जीभेचं टोक रुतवलं व तिथलं अम्रुत पिऊ लागला. दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठीत विसावली..पिसासारखी हलकी झाली. 

*******

आशना दुसऱ्या दिवशी मीनाच्या घरी गेली. तिने तिच्या व आशिषबद्दल मीनाला सांगितलं. मीना खूप खूष झाली. सरलाताईंनाही आशूला जोडीदार मिळाला हे ऐकून खूप बरं वाटलं. त्यांनी तिच्यासाठी तिच्या आवडीची मिरचीभजी व शेवयांची खीर बनवली. आशूने सरलाताईंना नमस्कार करुन त्यांचे आशीर्वाद घेतले.

मीनाला आता चौथा महिना लागला होता. घरी नवीन बाळ येणार हे कळल्यापासून जाईही खूप आनंदात होती. ती आता मम्मीला जास्त त्रास देत नव्हती. मम्मीच्या मांडीवर बसणं,हट्ट करणं वगैरे टाळत होती..आता ती मोठी होणार होती..ताई होणार होती. मीनाच्या पोटाचा आकारही आता थोडा जाणवत होता. मयंकही घरात जमेल तेवढी मदत करत होता. 

म्हातारी आता हिंडूफिरु लागली होती. ती कुमुदताईला म्हणाली,"सुनबाई,तुम्ही आता मुंबईला गेलात तरी चालेल.  तिकडे माझी नातसून गरोदर आहे. तिला तुमची खरी गरज आहे हो."

नानांनी मग मुंबईला परत येण्याची तिकीटं काढली. म्हातारीने नातसुनेसाठी मुगाचे लाडू करुन दिले. तिच्या आईसाठीही वेगळी भेट बांधून दिली. कुसुमताई व नानांनी आईवडिलांचा सजल नयनांनी निरोप घेतला व गाडीत बसले. 

"का गं कुसुम गप्प का अशी?"

"छे,काही नाही."

"सांग गं. तुझे डोळे बोलतात बघ."

"यावेळी घरातून निघताना मन कातर झालं हो. आबा,म्हातारी दोघं थकली आता. त्यांना मुंबईस घेऊन यावं तर त्यांना गाव सोडवत नाही. डोळ्यासमोर येतोय, माझ्या सारखा म्हातारीचा चेहरा. आधी चेष्टेने म्हातारी म्हणायचे तिला पण म्हातारीत जीव गुंतलाय हो माझा. तशी फार हळवी आहे ती. आता पहिल्यासारखी फटकळही नाही राहिली. कालच माझ्या गालावरुन,पाठीवरुन मायेने हात फिरवला. मला म्हणाली,"मस नको गं पाटल्या वगैरे. मी आपली चेष्टेने बोलते. तुझ्यासाठी मात्र कर चार दागिने. हेच दिवस हो नटण्याथटण्याचे."

"हो गं यावेळी म्हातारी हळवी वाटली खूप. नेहमीचा ताठा नाही जाणवला. आमचे आबा तर पहिल्यापासूनच मवाळ."

"दोघं सुखात राहो म्हणजे झालं,"कुसुमताई म्हणाल्या.

दोघं घरी पोहोचल्याबरोबर जाई त्यांना जाऊन बिलगली.  दोघांनी आपली आन्हिकं आवरुन घेतली. सरलाताईंनी त्यांना गरमागरम लुसलुशीत आंबोळ्या व चहा दिला. कुसुमताईंनी सुनेच्या पाठीवरुन हात फिरवला. मीनाच्या चेहऱ्यावरही आता गर्भारपणाचं तेज आलं होतं. फारच छान दिसत होती ती. 

सरलाताई मात्र आता निघायची तयारी करु लागल्या तसं कुमुदताईंनी त्यांना अडवलं व निदान सातव्या महिन्यातली ओटी भरेपर्यंत तरी रहा असं आर्जव केलं. सरलाताईही त्यांची विनंती डावलू शकल्या नाहीत व तसंही लेकीत जीव गुंतलेला त्यांचा. ती गर्भार राहिल्यापासून त्याही भावूक झाल्या होत्या.

मीना कुसुमताईंना म्हणाली,"मम्मी त्यादिवशी मी तुमच्यावर रागावलेली,तुम्ही मला एका स्कीममधे पैसे गुंतवण्यास नकार दिलात म्हणून. दोन दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता ती स्कीम फ्रॉड निघाली म्हणून. तुमच्यामुळे मी खूप मोठ्या फसवणुकीपासून वाचले मम्मी."

कुमुदताई म्हणाल्या,"मीना,हे सारे धक्के पचवलेत बरं आम्ही. तुम्हाला त्यांची झळ लागू नये म्हणून अडवत असतो. एकेक पैसा कमवताना घाम गाळावा लागतो. तू आता त्या गोष्टीचा विचार करु नकोस. निवांत रहा. मन प्रफुल्लित ठेव म्हणजे आतल्या जीवालाही बरं वाटेल."
दिवसामागून दिवस जात होते. सरलाताई व कुमुदताई दोघी विहिणी विहिणी अगदी सख्ख्या बहिणींप्रमाणे वावरत होत्या.

सातवा महिना सुरु झाला तसं मेघा,चैत्राली सर्वांनी मिळून मीनाचं ओटी भरणं करायचं ठरवलं.

(क्रमश:)

******

नमस्कार, खरं तर लघुकथा लिहिणारी मी. कथामालिका लिहिण्याची सवय नाही मला. ईराने ही संधी दिली ,म्हंटलं बघुया प्रयत्न करुन. या कथेतली सारी पात्रं आपल्याला आपल्या नेहमीच्या जीवनात दिसणारी आहेत. कथेत थ्रीलिंग,सस्पेन्स असं काहीच नव्हतं कारण ही एक तुमच्याआमच्या माणसांची कौटुंबिक कथा आहे. काहींना यात फाफटपसारा वाटला. खरंच आहे,या न्युक्लियर फेमिलीत राहून नात्यांचे बंध बऱ्याचजणांना फापटपसारा वाटला तर त्यात नवल ते काय. मला जमेल तशी ही नात्यांची वीण विणण्याचा प्रयत्न केला. ज्यांना आवडले नाही त्यांचा आदर कारण त्यांच्याकडून आपण कुठे वहावत तर जात नाहीना हे कळले. वाचकहो,तुम्ही.ही कथा आवर्जुन वाचत अहात त्याबद्दल धन्यवाद. कथेचा शेवटचा भाग दोन दिवसांत पोस्ट करेन. लोभ असावा.????

🎭 Series Post

View all