Login

भातुकली (भाग 20)

Clashes in family

भातुकली (भाग वीस)

तिसरा महिना चालू होता. मीनाने नेहमीप्रमाणे तयारी करुन आठ दहाची लोकल पकडली पण क्षणार्धात तिच्या डोळ्यांपुढे काळोख आला. तिला काहीच सुधरेना. इतर महिलांना तर गाडीत शिरायचं होतं. त्या भसाभसा गाडीत शिरल्या. मीना मधल्यामधे चिरडली गेली. 

(क्रमश:)

साईडला उभं रहाणाऱ्या एकदोघींनी बराच प्रयत्न करुन तिला आतमधे घेतलं. तिच्या ओळखीच्या बऱ्याच होत्या डब्यात. त्यांनी तिला जागा करुन दिली. मीना घामाने चिंब ओली झाली होती. तिला बोलायलाही सुधरत नव्हतं.

 सुदैवाने मयंक बाजूच्याच डब्यात होता. तो मीनाला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी मीनाला तपासलं व एडमिट करुन घेतलं. तिला सलाईन लावलं. मयंकने मेघाला फोन करुन घरी सरलाताईंना कळव व त्यांच्या सोबतीला जा म्हणून सांगितलं.
संध्याकाळी डॉक्टरांनी मीनाला डिस्चार्ज दिला व आता यापुढे थोडं सावधगिरीने वागण्यास सांगितलं. सुदैवाने पोटातलं बाळ व्यवस्थित होतं. 

मीना व मयंक घरी आले तशी सरलाताईंनी तिची दुष्ट काढली. आठवडाभर तरी घरी आराम करायचा..कुठे जायचे नाही म्हणून निक्षून सांगितले. मयंकने आईला यातलं काही कळवलं नाही कारण ती उगाच चिंता करत बसली असती.

सुट्टीनंतर मात्र मीनाच्या मैत्रिणीही तिला फार सांभाळू लागल्या. ऑफिसमधले तिचे साहेबही तिची आस्थेने चौकशी करायचे कारण मीना अगदी त्यांच्या मुलीच्या वयाची होती. हल्ली आशनाची काही खबरबात नव्हती म्हणून मीनाने तिला फोन लावला तर समजलं की ती आईवडिलांकडे गेली आहे. 

******

आशनाच्या वडिलांचा अचानक म्रुत्यू झाला होता म्हणून तिच्या आईने तिला बोलवून घेतलं होतं. तिथली सारी निरवानिरव करुन आशना परत आपल्या घरी यायला निघाली. येताना मात्र तिने आईला सांगितल,"काही गरज पडली तर लगेच फोन कर मला. शेवटी बाकी काही असो पण तू आई आहेस माझी." 

यावर तिच्या आईने तिच्यासमोर हात जोडले पण आशना म्हणाली,"तू त्या माणसाचा अत्याचार आयुष्यभर सहन करीत राहिलीस. तुझ्यामुळे माझं बालपणही नासलं. असो झाल्या त्या गोष्टी झाल्या. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच पण आतातरी स्वतःसाठी जग. पैसा तुझ्याकडे आहेच. माझा बाप फक्त आणि फक्त पैसा कमवत राहिला. त्याला पैशाची नशा चढलेली. पैशाचा उपभोग घेण्यासाठी तो जीवंत राहिला नाही. तू त्याच्या अतिरेकाला बळी पडलीस. तू एक प्यादं होतीस त्याचं पण आता एक व्यक्ती म्हणून जग."

यावर आशनाची आई फक्त तिच्याकडे बघत राहिली. आशनाला म्हणाली,"खरंच माझं चुकलं पोरी. त्या   राक्षसाच्या तावडीतून तुला घेऊन पळून जायला हवं होतं खरं पण आता या जर तर ला काहीच अर्थ नाही. मी
 एका  व्रुद्धाश्रमात रहायचं ठरवलय."

आशना म्हणाली,"अगं एवढा पैसा त्या राक्षसाचा आहे. हे एवढं मोठं घर आहे. इथेच काही पेईंग गेस्ट मुली ठेव. तुला सोबत होईल व त्यांना निवारा मिळेल. मी अधुनमधून येत जाईन." आशनाच्या आईने होकारार्थी मान डोलावली. उशिरा का होईना ती आता माणूस म्हणून जगणार होती. 

********

इकडे आशिष हजार प्रयत्न करत होता आशनाला विसरायचे पण आशना भिनली होती त्याच्या मनात. तिचा कैफच चढला होता त्याला. तिची हटके अदा,तिचा आत्मविश्वास, तिच्या गालावरची खोल खळी सगळं त्याच्या नजरेसमोर येत होतं. 

आशिषने मग धीर करुन मीनालाच विचारलं आशनाबद्दल तेव्हा मीनाने त्याला आशनाचे वडील गेल्याचं सांगितलं मग तर त्याला तिला भेटावसंच वाटू लागलं. एक मन म्हणत होतं,"काय यार इन्सल्ट करुन घेतोस तिच्याकडून!" तर दुसरं म्हणत होतं,"काय होईल ते होऊदे पण तिला भेटून तरी घे." त्याने आशनाच्या दाराची बेल दाबली. आशना दारुच्या नशेत होती. ती म्हणाली,"वेलकम आशिष वेल..कम."

आशिष आत येऊन बसला तसं तिने त्याच्यासाठी पेग भरला व स्वतःसाठी एक घेऊन त्याच्यासमोर येऊन बसली.

"बोल काय बोलतोस आशिष..माझं सांत..वन करायला आलाएस का? मीराचा कलिग ना तू. मीरा बोललीच असेल तुला. आशिष तू नको वाईट वाटून घेऊस.अरे माझा बाप नव्हता सांत..वनाच्या लायकीचा. नशीब किडे पडून मेला नाय..च्यामारी त्याच्या.. तुमी शरीफ लोक..तुम्हाला नाय कळणार रे आमची व्यथा नि काय रे ए भेंडी लव्ह करतोस माझ्यावर तू? तू..माझ्यावर..लव्ह. एक सांगू आशिष्ष्ष्ष  मी पण मरते तुझ्यावर पण टाळते रे तुला. तुमी मोठी माणसं..तुझे आईबाप मोठी माणसं..उगाच राडा होईल नि लग्न कशाला करतात रे आशिष्ष्ष्ष..मुल व्हायला ना. साला..मुल नाय होऊ शकत मला..त्या भ**ने वापरली मला नि बापाने सौदा केला माझा..माझं मुल गेलं..नो गर्भाशय..गर्र्रभाशय आऊट..सो यू ऑल्सो गे..ट आ..ऊट. डोण्ट लव्ह मी आ..शिष. 

*****

आशिष तिथून निघाला. तो सैरभैर झाला होता. त्याला आशनाच्या शब्दांतला दर्द जाणवत होता. केवढी संकटं पेललीत आशनाने,केवढं दु:ख सहन केलय..मला जमेल का तिचा साथीदार व्हायला,तिच्या आयुष्यात फुलं फुलवायला??व हा उत्साह,हे प्रेम शेवटपर्यंत टिकवायला खरंच जमेल मला?? तो स्वतःच्या अंतरमनाला हे प्रश्न विचारु लागला. दोनतीन रात्री तळमळत घालवल्यावर तो या निर्णयाप्रत पोहोचला की आशूला जीवनभर साथ द्यायची. तिचं जीणं सुसह्य करायचं. तो आज जवळजवळ वर्षभराने घरी गेला. मम्मी किटीपार्टीला गेली होती. पप्पा अजून आले नव्हते. मेडने ज्युश आणून दिला. मम्मी पप्पा तासाभरानंतर आले. 

त्याला पाहून पप्पा म्हणाले,"स्वतःच्या पायावर उभं रहायचंय नं तुला म्हणून घर सोडून गेला होतास. झालं उभं राहून. आलात परत." मम्मीने पप्पांकडे कटाक्ष टाकताच पप्पा चेंज करायला निघून गेले. डिनर टेबलवर सगळेच शांत जेवत होते. जेवण होताच आशिषने त्यांना सांगितलं,"मी प्रेमात पडलोय,मम्मीपप्पा."

मम्मी म्हणाली,"कोण आहे ती? तिचं प्रोफेशन,तिची पाश्वर्भुमी..हे सगळं पहावं लागतं बेटा. शिलेदारांच्या कुटुंबाला शोभणारी सून हवी, आशिष शिलेदार."

"मम्मा,आय हेव फॉलन इन लव्ह आणि मला नाही वाटत की प्रेम हे असं स्टेटस वगैरे पाहून होतं."

"मी तुझ्यासाठी सरनोबतांची मुलगी पाहिलीय आशिष. ती अमेरिकेत एमबीए करतेय. उद्या सकाळी हा बिजनेस तुम्ही दोघं सार्थपणे सांभाळू शकाल. तुला तुझ्या मतांनी वागायला दिलं. आता बास. मलाही दगदग सोसवत नाही. यु बेटर कम अँड जॉइन अवर बिझनेस." आशिषचे पप्पा म्हणाले.

"तुमच्या हो ला हो म्हणायला मी तुमच्या हातातलं खेळणं नाही पप्पा जे तुम्ही चावी दिलं की डुगुडुगु नाचेल.  तुम्ही असेच काहीसे आडाखे बांधले असणार माझ्याविषयी याची जाण होतीच मला पण तुम्ही तुमच्या बिझनेससाठी माझा प्यादा नाही बनवू शकत. तुम्हाला वाटलं होतं..नव्हे तुमची खात्री होती की मी थोड्याच दिवसात नाक घासत परत येणार तुमच्याकडे म्हणून तुम्ही मला हातपाय हलवायला मोकळीक दिली होती. थोड्याच वर्षात मी माझी फर्म उभी करेन. 

"अरे आशिष असा राग नको बरं डोक्यात घालून घेऊ. अरे ते बोलतात पण मनात काही नसतं त्यांच्या. बरं मला सांग मुलीबद्दल नीट."

"मम्मी,आशना नाव तिचं. अकाऊंट्सची प्रोफेसर आहे. वडील सरकारी नोकर होते. ते आता हयात नाहीत,आई ग्रुहिणी..आशनाला पुर्वी एका प्रोफेसरने फसवलं होतं..त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचं एबोर्शन करुन घेतलं..त्यावेळी झालेल्या गुंतागुंतीत तिचं युटेरस काढावं लागलं. तिच्या वडिलांनी प्रोफेसरकडून बरेच पैसे खाल्ले त्याबद्दल."

"अरे आशिष,काय बोलतोयस तू. तू शुद्धीवर आहेस का? ही असलीच मुलगी भेटली तुला प्रेम करण्यासाठी! लोकं फिदीफिदी हसतील आम्हाला. तिला गर्भाशयच नाही म्हणतोस. उद्या मुल कसं व्हायचं तुम्हाला! "

"आई,तू मला माहिती विचारलीस मी सांगितली. मी तुझा निर्णय विचारला नाही. मी खरं,निस्वार्थी प्रेम केलय तिच्यावर. तुम्ही नकार देणार हे माहितीच होतं तरी आपली एक रीत म्हणून सांगितल तुम्हाला. आणि लग्न हे फक्त मुलं जन्माला घालण्यासाठीच करायचं नसतं तर त्याहीपलिकडे जाऊन एकमेकांच्या सोबतीने आयुष्य जगायचं असतं,मम्मा. तुमच्यासारखं आयुष्य नाही जगायचं मला. तू सदैव कुठल्या न् कुठल्या समारंभात बिझी नि पप्पा त्यांच्या बिझनेसमधे. माझ्यासाठी फक्त तुम्ही नोकरचाकर ठेवलात. जेव्हा गरज होती मायेची तेव्हा कधीच मायेने पाठीवरुन हात फिरवला नाहीत. तुम्ही दोघं एकमेकांचे तरी कुठे झाले अहात. असो. निघतो मी. काळजी घ्या."

"माझ्या प्रॉपर्टीतली दमडीही मिळणार नाही तुला सांगून ठेवतो."आशिषचे वडील म्हणाले. आशिषने दोघांनाही उभ्याने नमस्कार केला व तिथून चालू पडला.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all