भातुकली(भाग दुसरा)
मीना माहेरी निघून आली. आता पुढे..
सकाळी सकाळी मीनाला मयंकचा फोन आला.," मीनू अगं ये आता घरी. राग गेला नं तुझा. नुसती रुसतेस. मला करमत नाहीए इथे तुझ्याशिवाय.'
'का रे आता का आता का. जा ना आईच्या कुशीत. आईवेडा कुठचा. बायकोचं कौतुक नाही जरापण. तुझी आई बघावं तेव्हा मला शिस्तीचे धडे देत बसते. गेल्या आठवड्यात भाजीत तेल जरा जास्त घातलं तर म्हणे माझं कोलेस्ट्रॉल वाढेल अशाने. इस्त्रीला कपडे टाकायला गेले तर म्हणते जमेल तेवढे स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करुन वापरावे.
ऑफिसमधून आल्यावर जरा लोळत एखादी सिरियल बघावी तर लगेच असं तिन्हीसांजेला निजू नये. अरे काय रिंग मास्टर होती काय रे तुझी आई गेल्या जन्मी. हॉलमधे एखादं ग्लास,प्लेट दिसायला नको की एखादा कपडा घडी न करता ठेवलेला दिसायला नको,लगेच लेक्चर सुरु.
प्रत्येक वस्तू तिने ठरवलेल्या जागेवरच दिसली पाहिजे तिला. साखरेचा डबा या सेल्फवरचा त्या सेल्फवर दिसला किंवा बेसनाच्या डब्याला ओल्या पीठाचे डाग दिसले तरी लगेच बडबड सुरु. स्वच्छतेचं भूत शिरलंय काय रे तुझ्या आईच्या अंगात?'
'हे बघ मीना, मी स्वतःहून फोन केला जरी तू तुझ्या मर्जीने घरातून निघालीस तरीही. याचा अर्थ असा नव्हे की तू माझ्या आईवर वाट्टेल ते आरोप करशील नि मी ते ऐकून घेईन.
गरीब परिस्थितीही तिने आम्हा भावंडांना कधी गरीबीची झळ जाणवू दिली नाही. बाबांची मिल बंद पडल्यावर बायकांचे ब्लाऊज शिवून तिने घर चालवलय,आम्हाला आमच्या पायावर उभं केलंय. हा परिस्थितीच्या चटक्यांनी झालेय थोडीसी शिष्ट ती. म्हणून काय मी तिला या उतारवयात उलटून बोलू?तेही तुझ्या स्त्रीहट्टापायी?'
'नक्कोच बोलूस. मी कुठ्ठे बोलतेय तुला काही बोल म्हणून. आईच्या पदराखाली रहा बसून आणि तुझे बाबा रे.'
'आता त्यांनी काय केलं तुझं?'
'काय करायला हवंय? सकाळीच उठून भक्तीगीतं लावून बसतात. जरा झोपू देत नाहीत. ती तांब्यापितळेची भांडी दर महिन्याला घासून ठेवतात म्हणून म्हंटलं विकून छान क्रोकरी आणुया तर नाही म्हणे आमची वाडवडिलांची इष्टक आहे. त्यात आमच्या भावना गुंतल्याहेत. कायचेकाय नुसते आणि ती तुझी बहीण मेघा तीही आता माहेरी निघून यायचं म्हणतेय.'
'अगं बाई,मेघाचा नवरा जास्तच दारु प्यायला लागलाय. शिवाय तिच्या मुलाच्या मनावर विपरित परिणाम होतो त्याच्या अशा वागण्याचा म्हणून येतेय ती.'
'आणि मग तिचा,तिच्या मुलाच्या शाळेचा खर्च कोण करणार? तुच नं. नुसते या लोकांना पैसे देत बस. आपलं घर घेऊया म्हंटल तर पैसे नाहीत तुझ्याकडे. ते काही नाही. आपलं सेपरेट घर घेणार असशील तर मी येते तुझ्याकडे नाहीतर मी काही जड नाही झालेय माझ्या आईला. शिवाय कमवते मी.'
'ठीके तर. जास्तच एटीट्युड आहे मीनू तुला. नकोच येऊस आता. मीही तुला फोन नाही करणार.'
असं म्हणत मयंकने फोन कट केला.
मिनू लगेच मम्मीच्या कुशीत शिरली. 'मम्मी बघना मयंक मला वाट्टेल ते बोलतो. येऊच नकोस म्हणतो. त्याची बहीण मेघा तिच्या लेकाला घेऊन रहायला येणारे म्हणे आता तिथे.'
'तू रडू नको मीनू,उगी रहा. अजुन तुझी मम्मी खंबीर आहे तुला पोसायला. बघुया तरी किती दिवस आयशीच्या जीवावर उड्या मारतोय तो!"
इतक्यात बाजूच्या भामरेवहिनी आल्या.
'परागच्या आई जरा चार हिरव्या मिरच्या दया हो. मी काल बाजारात गेलेले खरी पण आणायच्या लक्षातच राहिलं नाही. आता उपमा करायला घेतला. रवा भाजताना लक्षात आलं. ह्यांच्या हातात काविलता दिला न् आले तुमच्याकडे.'
'हो हो देते बसा जरा.'
'अगं बाई! मीनू तू कधी आलीस? हाक सुद्धा मारली नाहीस ते! एवढी का काकू परकी झाली आता! बरं किती दिवस मुक्काम?
आलीच आहेस तर रहा आठवडाभर. रक्षाबंधन करुनच जा हो. तुला आवडतात नं माझ्या हातच्या खोबऱ्याच्या वड्या. जरा जास्तच बनवेन यावेळी आणि आमची सुनबाई कुठं दिसत नाही ती! नाही म्हंटलं परागशी गुलुगुलु बोलून झालं असेल तर जरा शेजारीपाजारीही माणसं रहातात. अधनमधनं साद घाला आम्हाला.'
' हे हो काय काकू. हा घ्या चहा. माझ्या हातचा आवडतो नं तुम्हाला तोच गाळत होते. तुम्ही बसा बोलत तोवर मी काकांच्या उपम्याचं बघून येते.'
'किती गुणाची पोर ती. जीभेवर साखर पोरीच्या. कुठच्या जन्मीचं पुण्य केलं होतत सरलाताई ते एवढी गोड सून लाभली हो तुम्हाला. नाहीतर आजकालच्या सुना..जरा काही बोललं की चालल्या माहेराला.
सासू म्हणजे शत्रूच वाटतो त्यांना. प्रामाणिक मुलांना आईवेडा म्हणतात. त्यांना वेगळं घर थाटायचं असतं. सासूसासऱ्यांना म्हणे डस्टबीन म्हणतात आजकाल. त्यांची लुडबूड चालत नाही हो राजाराणीच्या संसारात.
आपली मीनूपण बघा कशी भरल्या घरात नांदतेय. खरंच हं सरलाताई,तुमचे संस्कार आहेत मुलांवर.' सरलाताई एवढं गोड ऐकून खूष झाल्या व डिश भरून शिरा त्यांनी भामरेवहिनींना दिला.
मीना आता आईच्या घराकडून ऑफिसला जाऊ लागली. जाईच्या ड्रायव्हर काकांनाही तिने जाईला या स्टॉपवर घेण्यास सांगितलं. जाईच्या बसस्टॉपनंतर दोन बसस्टॉप गेले की जाईच्या घराचा बसस्टॉप होता.
जाईच्या आजीआजोबांना जाईची आठवण यायची म्हणून दोघेही जाईची बस येण्याआधी तिथे जाऊन एका बाकावर बसून रहायचे. ड्रायव्हर काकांनाही हे लक्षात आल्याने ते रोज पाचेक मिनटं बस या स्टॉपवर थांबवायचे.
जाई खाली उतरुन आजीआजोबांना गोड पप्पी द्यायची व आजीने दिलेली सोनटक्क्याची पांढरीशुभ्र फुलं शाळेतल्या सरस्वतीदेवीला वहाण्यासाठी न्यायची.
एकदा पेरेंट्स मिटींगला मिना जाईला घेऊन शाळेत गेली तेव्हा प्रिन्सिपलन सरांनी जाईचं कौतुक केलं व म्हणाले,' तुमची जाई रोज सरस्वती देवीसाठी सुवासिक सोनटक्क्याची फुलं आणते.
ती फुलं बघून फार प्रसन्न वाटतं.'
मिना तेव्हा गप्प राहिली. धन्यवाद सर म्हणाली. शाळेतही जाईचा प्रोग्रेस छान होता. आता तर जाईला मॉनिटर केलं होतं. मॉनिटरचा बेचही टीचरने तिला दिला.
घरी येताना मिनाने सगळ्यांसाठी आईसक्रीम घेतलं. तिथे तिला मयंकची आठवण आली. मयंक तिच्यासाठी तिच्या आवडीचं स्ट्रॉबेरी आईसक्रीम आवर्जुन आणायचा. कितीही फ्लेव्हर दुकानात असोत मीनाला फक्त स्ट्रॉबेरी फ्लेवरच आवडायचा.
घरी आल्यावर सगळ्यांनी जाईचं कौतुक केलं. मीनाला सोनटक्क्याविषयी जाईला विचारावसं वाटलं पण तिने तो विषय टाळला.
रात्री चैतुमामीने जाईसाठी श्रीखंडपुरीचा बेत केला होता. जाईला चैतुमामीने भरवलेलं फार आवडायचं. तिनेच अभ्यास घ्यायला हवा असायचा. यश व जाईचा अभ्यास,भांडीकुंडी होईस्तोवर चैत्रालीला निजायला वेळ व्हायचा. मिनाही ओटा पुसून भांडी लावायची.
आज मात्र पराग चैत्रालीची वाट बघत बसला होता. त्याच्या वाट्याला चैत्राली हवी तेवढी येतच नव्हती.
चैत्राली बेडरुममधे येताच परागने दाराची कडी लावून घेतली.
(क्रमश:)
------सौ.गीता गजानन गरुड.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा