Aug 18, 2022
कथामालिका

भातुकली (भाग 19)

Read Later
भातुकली (भाग 19)

भातुकली (भाग एकोणीसावा)

(कुमुदताईंच्या भावाचे एकदोनदा हक्कसोडपत्रावर सही करण्यासाठी फोन आले पण कुमुमुदताईने आपला नकार कायम ठेवला. भावाला कळलं, कुमुदताईची सासू आजारी आहे पण तो तिला बघायला,तिच्या तब्येतीची विचारपूस करायला आला नाही. एवढच काय जवळच्या गावात राहूनही साधं रक्षाबंधनलाही आला नाही.

 रक्षाबंधनाच्या दिवशी कुमुदताईने त्याची दुपारपर्यंत वाट पाहिली मग वहिनीला फोन लावून सांगितलं की ती येईल राखी बांधायला.
वहिनीने फोनवरच उत्तर दिलं,"आम्ही सर्वजणं माझ्या माहेरी आलो आहोत. चारेक दिवस इथेच रहाणार आहोत तेव्हा उगा येण्याची तसदी घेऊ नका.")

वहिनीचं हे म्हणणं ऐकून कुमुदताईंना आतल्या आत तुटल्यासारखं झालं. लहानपणीची त्यांची भावाबहिणीची जोडी आठवली..लहानपणी कोणताही खाऊ असो दोघं वाटून वाटून खायचे. पण भावाचं लग्न झालं त्यानंतर एकदोन वर्षात कुमुदताईंचे वडील गेले,त्यांची आई एकाकी पडली. 

एकटीच रहायची गावातल्या घरात..पण भावाने,वहिनीने तिला कधी त्यांच्या शहरातल्या घरी बोलावलं नाही,की कधी तिला सणासुदीला साडीचोळी,आजारपणासाठी पैसे पाठवले नाहीत. कुमुदताई तिला आमच्यासोबत चल म्हणून विनवायची पण तिला जावयाच्या घरात रहाणं फारसं रुचत नव्हतं.

तिच्याच्याने अगदीच काही होईना तेव्हा कुमुदसोबत तिच्या घरी वर्षभर राहिली होती तेव्हा दोनतीनदा भाऊ व वहिनी तिला पहायला म्हणून आले होते पण तिला घरी घेऊन जातो म्हणाले नाहीत.

 कुमुदताईनेही त्यांना त्याबद्दल विचारलं नाही. थोडी बरी झाली तशी कुमुदताईंची आई गावी गेली व त्यानंतर एक महिनाच गेला असेल न् कुमुदताईंना शेजाऱ्यांचा फोन आला होता. तिची आई या जगात नव्हती पण त्यानंतर मात्र भाऊ गावीच स्थायिक झाला न् आता मालमत्तेवर एकट्याचा हक्क सांगत होता. भावाच्या एकुलत्या एका मुलीचं नुकतच लग्न झालं होतं. तिला मुंबईत घर घ्यायचं होतं त्यासाठी गावातली जमीन विकून तो पैसा कुमुदताईंचा भाऊ आपल्या मुलीला,जावयाला देणार होता. कुमुदताईंच्या मनात आलं,"ह्याच्या लेकीने वडलांच्या इस्टेटीचा लाभ घ्यायचा पण तसाच तो मी घेतला तर हा माझ्याशी अबोला धरणार. हा कुठचा न्याय!"

*******

त्यादिवशी आशनाने आशिषला पिंपळपानावर तिचा नकार कळवला खरा पण आशिषला कळत नव्हतं तिने असं का करावं. तिचं त्याच्यावरील प्रेम तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं मग ती का बरं अशी वागत असावी!

आशिषने मीनाकडून आशनाचा मोबाईल नंबर घेतला. तिला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला,"आशना,प्लीज माझ्यात काही कमी असेल तर सांग नं मला. मी तुला का आवडत नाही याचं कारण तरी कळूदे,आशू."

आशूने त्याला ब्लॉक केलं. आशिष तिच्या घरी जायच्या कॉर्नरवर जाऊन थांबला व तिच्या गाडीच्या समोर उभा राहिला. तिचा रस्ता सोडेना तेव्हा तिथे उभ्या असलेल्या पोलिसमामाला तो लोफर वाटला. पोलिसमामाने त्याला जवळ घेतलं व आशनाला जाऊ दिलं. ती गेल्यानंतर पोलिसमामाने आशिषच्या पार्शवभागावर तीनचार काठ्या मारल्या. संध्याकाळ झाली तशी त्याला त्या माराने उठताबसताही येईना. आशिषला आशनाचा जाम राग आला. ती पोलिसमामांना समजावून सांगू शकली असती पण ती तिच्या वाटेने गेली होती. 

चार दिवस आशिष ऑफिसला गेला नाही. मीनाने फोन केला तेव्हा त्याने तिला घडलेला सारा प्रसंग सांगितला व डॉक्टरकडेही जाता आलं नाही म्हणून सांगितल. मीनाने आशनाला ते सारं फोन करुन सांगितल. तिला खूपच वाईट वाटलं . तिला वाटलं,त्याचा पत्ता मीनाकडून घेऊन त्याच्याकडे जावं,त्याला सॉरी म्हणावं पण मग परत ती त्याच्याकडे ओढली गेली तर म्हणून तिने तो विचार बाजूला सारला पण काही करायला गेली तरी आशिषचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता..हसरा,बोलका,सिल्की केसांचा आशिष..तिचा आशिष.

********

मीनाच्या लक्षात आलं की तिची पाळी चुकलेय. तिने ही गोष्ट परागला सांगितली. पराग खूश झाला पण मीनू टेंशनमधे आली. त्याला म्हणाली,"अरे,जाई आता आठ वर्षाची झाली. एवढ्यख गेपनंतर पुन्हा चान्स,लोकं हसतील रे. आणि हे सगळं कठीण जाईल मला. जाईच्या वेळी सिझर झालेलं म्हणून अजून भिती वाटतेय. शिवाय शिक्षणाचा खर्च..फिया किती वाढल्यात हल्ली. झेपेल का सारं आपल्याला? 

मयंकने तिचे दोन्ही हात त्याच्या हाती घेतले व म्हणाला,"त्याची सगळी काळजी करायला आपण दोघं समर्थ आहोत. आता फक्त स्वतःला जपायचं." 

दुसऱ्या दिवशी मीना व पराग दोघंही मेटर्निटी हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी मीनाची प्रेग्नंसी टेस्ट केली जी पॉझिटिव्ह आली. मीनाने तिच्या मनातल्या शंका डॉक्टरांना विचारुन घेतल्या. 

घरी येताच दोघांनी सरलाताईंना ही गोड बातमी सांगितली. सरलाताईंनी मीठमोहरी घेऊन लेकीची द्रुष्ट काढली. 'जाईस एखादं भावंड हवंच होतं गं मीनू. आता काळजी घ्यायची तब्येतीची,सरलाताई मँहणाल्या व पदर खोचून स्वैंपाकाला लागल्या. 

मीनाने तिच्या मेधा वन्संला फोन करुन ही गोड बातमी सांगितली तशी ती धावतच आली येताना मीनाच्या आवडीचे कंदीपेढे घेऊन आली व घरी पोहोचताच तिने दोन पेढे मीनाच्या तोंडात कोंबून तिला गच्च मिठी मारली.   'वहिनी मी परत एकदा आत्या होणार. कसलं भारी वाटतय मला,' मेधा म्हणाली. सरलाताईंनी मेधासाठी तिच्या आवडीची जायफळ घातलेली कॉफी करुन दिली. 

'मेधा,अमेय कसा आहे गं?'

'अगं वहिनी तू नको आता माझी चिंता करुस. अमेय खूप सुधारलाय आता. हल्ली तर तो स्वामींच्या मठातही जातो. तो सुधारल्यामुळे सासुबाईही छान वागतात माझ्याशी. आमचं पोळीभाजी केंद्रही जोमात चालू आहे. मुगाचे लाडू पाठवलेत माझ्या सासूबाईंनी खास तुझ्यासाठी.'

मीनाने मग मेधाशी खूप गप्पागोष्टी केल्या. त्या दोघींनी मिळून गावी कुमुदताईंना फोन लावला. कुमुदताई गणरायाच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त होत्या. म्हातारीची तब्येत बरी नसल्याने सगळी तयारी म्हातारीस व आबांस विचारुन करत होत्या. मेधाने आईला सांगितलं,"मम्मी,एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी..छानसं."
कुमुदताई म्हणाली,"अगं ए ताटकळत ठेवू नको. सांग नीट काय ते."

"नाही मम्मी,तीन चान्स देते गेस कर तू."

"नवीन.घर बघितलस."

"नाही गं मम्मी,अवकाश आहे त्याला. आताशी कुठे माझं बस्तान बसतय. आणि हो बातमी तुझ्या सुनेबाबत आहे."

"अगं बाई,मेधा काय सांगतेस काय! गणपतीच आला म्हणायचा माझ्या सुनेच्या उदरी. मोरया. खूप गोड बातमी दिलीस बाळा."

कुमुदताई मग सुनेशी बोलल्या,सरलाताईंशी बोलल्या. सगळाच आनंदी आनंद झाला होता पण अजुन दोनतीन महिने तरी म्हातारीला सोडून कुमुदताईंना सुनेकडे येता येणार नव्हतं. ही खंत त्यांनी सरलाताईंना बोलून दाखवताच सरलाताईंनी त्यांना,"आम्ही सगळे आहोत इथे मीनाची काळजी घ्यायला. तुम्ही तुमची तब्येत सांभाळा असं सांगितल."

सरलाताईंनी चार महिने झाल्याशिवाय आजुबाजूस वाच्यता करायची नाही असं मीनेला दरडावलं तशा मीना व मेघा खुखु करुन हसू लागल्या. 'अगं मम्मी,पहिलटकरीण आहे का मी आता!" असं मीना सरलाताईंना म्हणताच सरलाताईंनी तिला त्या सांगतील ते निमुटपणे ऐकायचं असा दम भरला.

आशनाला फोन करताच आशना म्हणाली,"म्हणजे माझी रुम लकी ठरली बघ तुमच्यासाठी. लव यू मीनू."

मीना म्हणाली,"हो गं बाई,अगदी खरंय तुझं."

सरलाताई मीनाची विशेष काळजी घेऊ लागल्या..तिचा डबा,चौरस आहार..सगळी व्यवस्था जातीने करु लागल्या. काही दिवस बरे गेले मग मात्र मीनाला काहीच खायची इच्छा होईना. साधा वरणभातही तिच्या घशाखाली जात नव्हता. ऑफिसमधल्या मैत्रिणीही तिची खूप काळजी घ्यायच्या. कोणी मीनेला मोरावळा आणून द्यायचं तर कोणी विलायती चिंच. मीनाला साहेबांनी आता कामंही झेपेल तेव्हढंच करायला सांगितल होतं कारण तिची दिवसेंदिवस खालावत जाणारी प्रक्रुती ते पहात होते. 

तिसरा महिना चालू होता. मीनाने नेहमीप्रमाणे तयारी करुन आठ दहाची लोकल पकडली पण क्षणार्धात तिच्या डोळ्यांपुढे काळोख आला. तिला काहीच सुधरेना. इतर महिलांना तर गाडीत शिरायचं होतं. त्या भसाभसा गाडीत शिरल्या. मीना मधल्यामधे चिरडली गेली. 

(क्रमशः)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now