Aug 09, 2022
कथामालिका

भातुकली (भाग पहिला)

Read Later
भातुकली (भाग पहिला)

भातुकली (भाग पहिला)

'अगं मीना असं तडकाफडकी आलीस ती? आणि तीही अटेची घेऊन आणि मयंक कुठे आहे?' 

मीनासोबत आलेली तिची लेक सरलाताईंना म्हणाली,"मम्मापप्पांच परत भांडण झालं आजी. यावेळी जरा जास्तच मोठ्ठं झालं. मम्मा पप्पाला म्हणली,मी चालले हे घर सोडून तर पप्पा म्हणला जा. मी कोण तुला अडवणारा!"

सरलाताईंचा अगदी भडका उडाला.."समजतो काय हा मयंक स्वतःला. लग्न म्हणजे पोरखेळ वाटला का? खुशाल जा म्हणून सांगतो. माझी पोर काय वाटेवर पडलीय का! आम्ही खंबीर आहोत तिला सांभाळायला. फुकट रहात नव्हती त्यांच्या घरात. तिही कमवते शिवाय घरी येऊन चारीठाव स्वैंपाक करते."

आई असं बोलताच मीना आईला बिलगून अधिकच जोरात रडू लागली.

'माझी त्या घरात काडीची किंमत नाही मम्मी. मयंक माझं काही ऐकतच नाही. अगदी साध्या साध्या गोष्टी त्याच्या आईला विचारुन करतो. बाहेर जायचं झालं,कुठे पैसे गुंतवायचे झाले तरी आईची परवानगी घेतो. आई नाही म्हणाली तर नाही. आई होय म्हणाली तर होय. माझी किंमत नाही गं त्या घरात. जिथे माझ्या शब्दाला किंमत नाही तिथे मी कशी राहू?'

'उगी उगी बेटा कोण तुला सासरी पाठवत नाहीए. एवढा आईचा भक्त होता तर रहायचं होतं नं बिनलग्नाचं. लग्न तरी कशाला केलन. पुर्वी बरा माझ्या लेकीपाठून फिरत होता!'

इतक्यात मीनाची वहिनी व पराग दादा ऑफिसातून आले.

"अय्या,मिनू ताई,आज काही न कळवता एकदम प्लेझंट सरप्राईज हं! बारीक झालात हो. डाएट वगैरे करता वाटतं! फिगर छानच झालेय."

"अगं चैत्राली,सासरच्या जाचाने माझ्या लेकीची अशी दशा झालेय गं. तुला नाही कळायचं ते. तू इथे अगदी राणीसारखी रहातेस नं. ज्याचं दु:ख त्यालाच ठाऊक." इति सरलाताई

चैत्रालीला सरलाताईंच बोलणं आवडलं नाही पण त्याकडे दुर्लक्ष करत ती हातपाय धुवायला निघून गेली. इतक्यात चैत्रालीचा लेक यश ट्युशनमधून आला.

"अरे व्वा जाई तू कधी आलीस! चल मी तुला माझा टेंट दाखवतो." जाई व यश टेंट बघण्यासाठी टेरेसमधे गेले. वनबीएचकेचं घर त्यात सरलाताई त्यांचा लेक पराग,सून चैत्राली व दुसऱ्या इयत्तेतला त्यांचा नातू यश रहात होते. एखादं जरी पाहुणंमाणूस आलं तरी नाही म्हंटलं तरी निजायची वगैरे अडचण व्हायची.

चैत्रालीने भेंडीची भाजी करायला घेतली. सरलाताई व मीना तिच्या सासरच्यांविषयी बोलत बसल्या होत्या.

 आज खरंतर ऑफिसातही चैत्रालीला फार काम पडलेलं. तिची कलिग न आल्याने तेही काम तिलाच बघावं लागलं होतं. 

घरी आल्यावर एक कपभर गरम चहा मिळावा अशी माफक अपेक्षा होती तिची पण कसचं काय इथे निगुतीने तिच्यासाठी चहा मांडणारी तिची आई थोडीच होती.

 सरलाताई होत्या. चैतू त्यांना आई म्हणायची खरी पण ते केवळ बोलण्यासाठी. त्या फक्त मीना व परागच्या मम्मी होत्या. त्यांनी तिला कधी प्रेमाने जवळ घेतलच नव्हतं.

 चैतू लग्न होऊन आली तेव्हा सरलाताईंना तिने ए आई अशी साद घातली होती पण सरलाताईंनी तिला तेव्हाच सुनावलं होतं की मला अहो मम्मी म्हणायचं. मोठ्यांचा मान ठेवायची रीतच आहे आमच्याकडे.

 त्या एका वाक्यात ती सरलाताईंपासून दूर गेली होती तरी त्यांच्या औषधगोळ्या, त्यांच्यासाठी ज्वारीची,नाचणीची भाकरी,आवर्जुन करायची. त्यांची मधुमेहाची पथ्य सांभाळत होती पण सरलाताईंचं म्हणणं होतं की केलंच पाहिजे. करते म्हणजे उपकार नाही करत. उलट जरा कधी भाकरी तव्याला लागली,जळली तर तिला रागे भरायच्या. 

तासनतास मीनाशी फोनवर बोलत बसायच्या. आता तर मीना माहेरीच रहायला आल्यामुळे त्यांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. मीना सासूची उणीधुणी मम्मीला सांगत होती.

"अगं मम्मी,या दिवसभर घरात असतात. कसले भजनीमंडळाचे क्लास घेत बसतात. नाहीतर वाचनालयात जातात. नको ती लक्षणं. आता पुस्तकं वाचून का बेरिस्टर व्हायचंय यांना. काहीतरी मेगी,पास्ता वगैरे बनवून खायचं झालं तर यांच टुमणं ठरलेलं भाजीपोळीच खाल्ली पाहिजे. 

हा तरी बरं सकाळची पोळीभाजी त्याच करतात. या जाईचा डबा भरुन तिलाही  बसस्टॉपवर घेऊन जातात. कालच  माझ्या मेत्रिणीने एक स्कीम सांगितली. त्यात म्हणे पैसे गुंतवले तर तीन वर्षात डबल होतात. मी मयंकच्या पाठी लागले.. एफडी मोडून
ती रक्कम त्या स्कीममधे गुंतवूया म्हणून तर गेला मात्रुभक्त मातेला विचारायला. मातेने सांगितलं की तिचा ह्या भुक्कड स्कीम्सवर विश्वास नाही तसा खाली मान घालून आला परत म्हणजे बघ नं मम्मी माझ्या शब्दाला काही मानच नाही तिथे." असं म्हणून मीना परत रडू लागली. 

तेवढ्यात चैत्रालीने सगळ्यांची पानं वाढली. जाईला मामीच्या हातूनच भरवून हवं होतं. चैतू आपलं पान बाजूला ठेवून तिला गोष्ट सांगत भरवू लागली. दोघी टेरेसमधे जाऊन बसल्या. 

"ए मामी,ही मोठ्ठी माणसं का गं भांडतात सारखी सारखी? बरं भांडली तर लगेच बट्टी का नाही घेत. मला खूप आठवण येतेय आजीची आणि बाबाची पण ही आई मला इथं घेऊन आली बघ. अगं तिथं फ्रेंड्स आहेत माझ्या. माझ्या बाहुलीचं लग्नपण ठरलय तळमजल्यावरच्या परांजपेंच्या बाहुल्याशी. पत्रिका वाटणं, भटजी बघणं..कित्ती कामं आहेत मला आणि या आईची लुडबूड मधेच. आता या अंबुच्या सासरच्या मंडळींना मी काय उत्तर द्यायचं बरं?" इति जाई

'अगं जाई आपण ऑनलाईन पत्रिका पाठवू की तू काही काळजी करु नकोस. तुझ्या अंबूचं लग्न होईल झोकात.' इति चैतू मामी

'ते खरंय गं पण माझ्या अंबूला सासुरवास नाही झाला म्हणजे मिळवली. तशा परांजपे काकू स्वभावाने तरी बऱ्या वाटतात. तशी माझी आजीपण स्वभावाने खूप गोड आहे गं पण या आईचं काही भलतच असतं. हा आहे ती जरा स्ट्रीक्ट पण तेवढं चालतं नं." इति जाई

चैतू तिच्या भाचीकडे कौतुकाने बघत राहिली.

(क्रमशः)

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now