Jan 27, 2022
कथामालिका

भातुकली (अंतिम भाग)

Read Later
भातुकली (अंतिम भाग)

भातुकली 

(भाग बावीस..अंतिम भाग)

(कुमुदताई म्हणाल्या,"मीना,हे सारे धक्के पचवलेत बरं आम्ही. तुम्हाला त्यांची झळ लागू नये म्हणून अडवत असतो. एकेक पैसा कमवताना घाम गाळावा लागतो. तू आता त्या गोष्टीचा विचार करु नकोस. निवांत रहा. मन प्रफुल्लित ठेव म्हणजे आतल्या जीवालाही बरं वाटेल."
दिवसामागून दिवस जात होते. सरलाताई व कुमुदताई दोघी विहिणी विहिणी अगदी सख्ख्या बहिणींप्रमाणे वावरत होत्या.

सातवा महिना सुरु झाला तसं मेघा,चैत्राली सर्वांनी मिळून मीनाचं डोहाळजेवण करायचं ठरवलं.)

ओटीभरण्याच्या दिवशी मेघाने फुलांची वाडी बनवून आणली. चैत्रालीने करंज्या,लाडू,चकल्या,बर्फी..असे मिठाईचे पदार्थ बनवून आणले. फोटोग्राफीचं,सजावटीचं काम आशनाने व आशिषने सांभाळल. हिरव्या पैठणीत मीना फारच गोड दिसत होती. कपाळावर फुलांचा मुकुट,गळ्यात फुलांचा हार,कंबरपट्टा,बाजूबंद व हातात फुलांची परडी घेतलेली मीना अगदी फुलराणीच भासत होती. जाईनेही कुमुआजीने शिवलेला हिरव्या खणाचा फ्रॉक घातला होता. ती तर इकडून तिकडे मुरडतच होती.

खरं तर दुसऱ्यावेळी डोहाळजेवण कशाला असं मीनाचं मत होतं पण आता हे सुख अनुभवताना मात्र तिला फार मजा येत होती.चंद्रकोरीवर बसून फोटो,धनुष्यबाण हाती घेतलेला फोटा,फुलांच्या झोक्यावर बसून घेतलेला फोटो,सासूसासऱ्यांसोबत,आईसोबत फोटो..आशनाने अगदी सुंदर फोटो काढले. . जोडीला आशिष होताच. दोन वाट्यांत बर्फी,पेढा ठेवून त्यावर झाकण ठेवून मीनाला उघडावयास दिलं तर नेमका पेढा आला. कुमुदताई म्हणाल्या,"अरे वा,जाईच्या पाठीवर भाऊ येतोय. छान आहे."

रात्री कुमुदताईंनी झोपताना सरलाताईंना त्यांच्या भावाविषयी सांगितल तेव्हा सरलाताई म्हणाल्या,"ताई,घरोघरी मातीच्या चुली म्हणतात पण ते तितकसं खरं नव्हे. आता माझंच बघा. माझ्या यजमानांनी,सासुबाईंनी माझ्या माहेरच्यांना कधी जवळ केलच नाही ना त्यांच्यासाठी मला कधी काही घेऊ दिलं. आईवडिलांची सेवा माझ्या भाऊभावजयींनेच केली. मी गेले तरी एखाद दिवस. दुसऱ्या दिवशी तिथे रहाण्याची परवानगी घरातून देत नसत. मग काय,जेव्हा या वाटाघाटीचा प्रश्न आला तेव्हा मी यांना न विचारता हक्कसोड पत्रावर सही देऊन टाकली. मला ते इष्ट वाटलं कारण शेवटपर्यंत माझ्या दादाने,वहिनीने आईवडिलांना सांभाळल पण जे यात कुचराई करतात त्यांना मुळीच सही देऊ नये. तुम्ही बरी अद्दल घडवलीत."

*******

आशिषच्या मम्मीचा रात्री आशिषला फोन आला,"आशिष  बाळा,आम्ही आशनाला सून म्हणून स्विकारायला ययार आहोत. तू तिला घरी घेऊन ये." आशिषने आशनाला फोन करुन आईचा निरोप कळवला. आशनाही आशिषसोबत चुडीदार घालून आशिषच्या आईवडलांना भेटायला गेली.

दोघांचही छान स्वागत झालं. आशनाला त्या डामडौलात जरा अनइझी फिल झालं. विशेष करुन आम्ही किती मोठे आहोत हे आशिषच्या आईवडिलांच सारखं सारखं जाणवून देणं..तिला तिथून निघावसं वाटत होतं . आशिष त्याच्या डॉगीत रमला.

आशिषच्या मम्मीने आशनाला घर दाखवण्यासाठी म्हणून नेलं. तिथेच आशिषचे पप्पाही आले व म्हणू लागले,"पोरी तुला किती पैसे पाहिजे असतील ते सांग पण माझ्या मुलाचा नाद सोड. तुझी योग्यता नाही आमच्या घराची सून होण्याची. लवकर काय तो आकडा सांग. आशिषच्या आयुष्यातून कायमचं निघून जा,दूर कुठेतरी. इथे तोंड दिसता नये तुझं समजलं."

आशनाच्या तोंडातून शिव्या येणार होत्या ज्या तिने प्रयत्नपुर्वक आवरल्या. तिने त्यांना हात जोडून नमस्कार केला व तिथून चालू पडली. खाली आशिषजवळ आली. आशिषच्या मम्मीपप्पांच तिने टेप केलेलं संभाषण आशिषला दाखवलं. आशिष मम्मीपप्पांना म्हणाला,"तुमची संपत्ती तुम्हाला लखलाभ. मला तिचा मोह नव्हताच कधी. जर असता तर घरचाच बिझनेस करत राहिलो असतो पण लग्न तर मी आशनाशीच करणार. आशना व आशिष दोघं हातात हात घालून त्या टोलेजंग घरातून बाहेर पडली.

********

सरलाताईं व कुमुदताईंसाठी मीनाने छान इरकली साड्या घेतल्या. सरलाताई लेकासोबत घरी आली. यश आजीला पाहून खूष झाला. तात्या आता बरे झाले म्हणून जायची तयारी करु लागले पण सरलाताई म्हणाल्या,"आठ दिवस रहा नाना. आपल्या गप्पा झाल्याच नाहीत. थोडं मनमोकळं बोलता येईल. नाना मग थांबले." सरलाताई आता चैत्रालीला घरकामात मदत करु लागली.

आधी किचनमधे अजिबात न जाणारी सरलाताई आता किचनमधे रमू लागली. तिलाही मनापासून वाटू लागलं की चैत्रानेही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं म्हणून तिने चैत्राला तिच्या आवडीच्या कोर्सला एडमिशन घेण्यास सांगितलं . चैत्राच्याही मनात बरेच दिवस होतं की ब्युटीपार्लरचा कोर्स करावा. तिने चौकशी करुन कोर्सला एडमिशन घेतली. तिच्या अनुपस्थितीत घरातलं सगळं सरलाताई पाहू लागल्या.

तात्या जाणार म्हणून आदल्या रात्री सरलाताईंनी त्यांना देण्यासाठी बेसनाचे लाडू केले,चकल्या केल्या. चैत्राने त्यांची बेग भरली. सकाळी पराग त्यांना गावी घेऊन जाणार होता. सरलाताई पहाटे पाचला बाथरुमला जाण्यासाठी म्हणून उठल्या. त्या बाथरुममधे गेल्या पण बाहेर आल्या नाहीत. सहा वाजता तात्या उठले. त्यांना बाथरुमचं दार आतून बंद असल्याचं जाणवलं.

त्यांनाही वाटलं कोणतरी गेलं असेल. सरलाताई हल्ली चैत्रासोबत निजायच्या. पराग तात्यांसोबत बाहेर निजायचा. थोड्याच वेळात चैत्रा उठली. तिने तोंडावर पाण्याचे हबके मारले. ब्रश केलं व बाथरुमकडे वळली. तिलाही उघडेना. तिलाही वाटलं तात्या गेलेअसतील.

तिने चहा मांडला व बराच वेळ बाथरुममधून कोण बाहेर येईना म्हणून तिने हॉलमधे पाहिलं तर तात्या बाहेरच होते.  तिच्या लक्षात आलं की सरलाताईच आत आहेत. तिने दोनतीनदा आवाज दिला तरी आतून आवाज येईना. आता मात्र तिचा धीर सुटला. तात्या,परागही दरवाजाजवळ आले. त्यांनी दरवाजा जोर लावून तोडला. सरलाताईंच मुटकूळं एका कोनात पडलं होतं. परागने त्यांना उचलून बेडवर आणलं. पाण्याचे शिंतोडे मारले पण मग नानांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. परागची आई,सरलाताई सगळ्यांना सोडून गेली होती.

तात्यांनी मग साऱ्या पाहुण्यांना फोन करुन कळवलं. मीनाच्या घरी ही दु:खद बातमी कळवली. अचानक कळलेल्या या बातमीने मीनाचा बीपी शुट झाला. तिला हॉस्पिटलमधे एडमिट करावं लागलं. पराग एखाद्या लहान मुलासारखा रडत होता. यशला थोडं थोडं कळत होतं. तिकडे हॉस्पिटलमध्ये मीनासोबत मयंक थांबला. कुसुमताई व नाना चैत्राकडे आले.

पाचेक दिवसांत मीनाला हॉस्पिटलमधून घरी आणलं पण ती फारच डिप्रेशनमधे गेली होती. मयंक,कुसुमताई, नाना सगळे आपापल्या परीने तिला खुलवायचा प्रयत्न करत होते. तिची परिस्थिती फारच नाजूक झाली होती. खाणंपीणं..साऱ्यावरचं लक्ष उडालं होतं. तिची ती अवस्था पाहून कुसुमताई व नानांचेही डोळे भरुन यायचे. कुसुमताई तिला बळेबळेच भरवायच्या. त्यांना स्वतःलाही सरलाताईंची फार आठवण यायची.

मधे तात्या घरी जायला निघाले पण चैत्राली,पराग व यश त्यांना सोडेनात. त्यांना आता तात्यांचा आधार निकडीचा होता.

कसेबसे दिवस पुढे जात होते. मीनाचे दिवस आता भरत आले होते. संध्याकाळपासून तिला बारीक बारीक कळा येत होत्या. कुमुदताई तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. डॉक्टरांनी तपासलं व एडमिट करुन घेतलं. रात्रभर मीनाला कळा येत होत्या. मीना कुमुदताईंच्या हाताला धरुन  वॉर्डमधे दोन फेऱ्या मारायची परत बसायची परत फेऱ्या मारायची. अगदीच जास्त कळा येऊ लागल्या तसं डॉक्टरांनी तिला लेबर रुममधे घेतली.

कुमुदताईताई बाहेर स्वामींचा जप करत बसल्या होत्या. नर्सची धावपण चालू होती. तितक्यात कुमुदताईंना कोणतरी दिव्य असं लेबररुममधे प्रवेश करतय असं जाणवलं. त्यानंतर सेकंदभरात लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. नर्सने कपड्यात गुंडाळलेल्या गुलाबी नाजूक बाळाला आणून मयंकच्या हातात ठेवले व मुलगी झाली असं सांगितलं. कुमुदताईंच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लगल्या. त्यांनी बाळाला हातात घेतलं. त्यांना असं वाटलं जणू सरलाताईचं वामनरुपडं घेऊन आल्याहेत.

त्या बाळाला घेऊन मीनाकडे गेल्या. मीना म्हणाली,"आई,तुम्हाला मुलगा हवा होता ना. वाटीत पेढा आला तेव्हा तुम्ही म्हणालेलात की गणपती येणार."

कुमुदताईंनी तिच्या केसांतून हात फिरवला व बाळ तिच्या हातात ठेवत म्हणाल्या,"अगं वेडाबाई,खेळ असतो तो. तेच घेऊन बसलीस तू! या चिमुकल्या बाळीकडे बघ. तुझी आईचं आली आहे गं तुझ्या पोटी. डोळे बघ तिचे."

मीनाने बाळाकडे बघताच लबाड खुदकन हसू लागली. मीनाने तिला छातीशी धरलं तसं ती परी अम्रुतधारा चोखू लागली.

त्या मायलेकींच्या प्रथम भेटीला पाहून सरलाताईंच्या ओठी गाणं आलं..
सांगा माझ्या लेकीला की येणार मी
तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार मी

समाप्त

नमस्कार,
भातुकली ह्या कथामालिकेतून मी नातेसंबंध उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. कथामालिका लिहिताना वाचकांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल  वाचकांचे मनापासून आभार. लोभ असावा.????

----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now