भातुकली (भाग चौथा)

Clashes in families

भातुकली (भाग चौथा)

सरलाताई आज त्यांच्या मैत्रिणीच्या फार्महाऊसवर जाणार होत्या. घरी येऊन स्नानादी कर्म उरकून सुनेच्या हातचा इडलीसांबार मनसोक्त खाऊन त्या जायला निघाल्या. 

त्यांनी मीनालाही येतेस का विचारलं पण मीना नको म्हणाली. रविवार तिला अंगावर आल्यासारखा वाटत होता.

 जाई व यश अंथरुणात लोळत पडले होते. तिला आठवलं,सुट्टीच्या आदल्या रात्री मयंक तिच्या डोक्याला छान मालीश करुन द्यायचा. मयंकची प्रेमळ बोटं तिच्या कुरळ्या केसांत फिरु लागली की तिचे डोळे आपसूक मिटायचे. 

मीनाला आज माहेर काहीसं परकं वाटत होतं. तिने मेसेज बॉक्स चेक केला. मयंकचा एकही मेसेज आला नव्हता. तिने पार्लरची अपॉइंटमेंट घेतली. चैत्रालीला सांगून तयारी करुन जायला निघाली. यश व जाईने तिला येताना किंडर जॉय आणायला सांगितलं.

पार्लरमधे तिने फेशियल,वेक्सिंग..वगैरे करुन घेतलं. बाहेर पडली तर तिला कोणतरी हाकारत असल्याचं वाटलं.

'मिनू ए मनीमाऊ'

मीनाने वळून पाहिलं. तिची क्लासमेट आशना तिला हाकारत होती. ती आशनाच्या बाईकजवळ गेली. 

' हाय आशू'

'अगं मिनू, किती दिवसांनी भेटतैस यार! लग्न मानवलय हं तुला आणि आता लेकही झालेय असं ऐकलय मी. बरं आज माहेरवाशीण वाटतं.कधीतरी आमच्या सदनाला भेट द्यावी माते!'

'चल की मग. नेकी और पुछ पुछ!'

'ए खरंच येतैस..पण तुझ्या घरी काळजी करतील गं. माझं काय सडाफटींग आयुष्य. तुझं तसं नाही नं तू सुशील,सोज्वळ..'

'लाडात आली का. गप गुमान गाडी घरला घे तुझ्या.' असं म्हणत मीना आशूच्या मागच्या सीटवर बसली.

काही वेळातच त्या आशनाच्या बोरीवलीतील विसावा टॉवरच्या दहाव्या मजल्यावरील फ्लेटवर गेल्या. घरात अर्थात तिची तीच होती.

'ए आशू यार,तुझे कपडे दे नं घालायला. आशूने एक स्लीव्हजलेस टॉप व शॉर्ट्स तिच्या पुढ्यात ठेवले. 'बघ बाई तुला परवडले तर. ते गाऊन वगरै नसतं भेंडी आपल्याकडे.' 

'जमेगा यार' असं म्हणत आशुच्या गालावर नाजूक टिचकी मारत ती वॉश घ्यायला गेली. गर्द निळा चिकनचा स्लीव्हजलेस टॉप व व्हाइट शॉर्ट्स..ती स्वतः चं प्रतिबिंब आरशात पहात राहिली. 

आशूने तिला या वेषात पहाताच एक शिट्टी वाजवली.

'खरंच गं आशू रिलेक्स वाटतंय. बरं झालं तू भेटलीस. थांब हं चैत्रालीला फोन करून सांगते मी संध्याकाळी येईन म्हणून.'

'हं.हेलो चैत्राली. मला माझी क्लासमेट भेटली गं वाटेत. बऱ्याच वर्षांनी भेटलो अगं. सोडेचना ती. तिच्या घरी गेलेय मी बोरीवलीला. मला यायला लेट होईल. चालेल नं!'

'चलेगा नहीं दौडेगा भाभी। ऐश करो! आरामात या तुम्ही.'

आशनाने तिच्यासाठी स्कॉचचा पेग भरला व मीनासाठी पेप्सीचा.

'जरा वेगळी लागतेय गं पेप्सी आज.'

'हो का. असेल किंवा तुझ्या तोंडाची चव गेली असेल.'

'ए आशू अजून थोडी दे गं प्लीज.' 

आशूने किचनमधे जाऊन पुर्वीसारखाच पेप्सीचा ग्लास भरुन तिला दिला. 

'आशू च्याआयला तुला माहितीए माझं लाईफ म्हणजे फुल टू राडा झालाय यार. यू नो टिपिकल बहू झालेय मी. काय थ्रील नै यार लाईफमधे. 

सासूसासरे, नणंद अँड ऑल देट. आशू मला नं तुझ्यासारखं लाईफ आवडतं यार. एखाद्या भिरभिरत्या फुलपाखरासारखं. 

असं साचेबद्ध आयुष्य नको वाटतं मला. कधी मुव्हीला जायचं म्हंटलं तर मयंकचे चॉइस वेगळे माझे चॉइस वेगळे. त्यात लवकर प्रेग्नन्सी राहिली. आई झाले. 

 सगळी नाती आहेत गं माझ्याजवळ पण त्यांचा धाक,त्यांचा वचक कधीकधी नकोसं वाटतं बघ.

त्या मयंकला फुसक्याला म्हटलं वेगळं रहावं तर पादरट साला नको म्हणतो त्याच्याआयला. आशू यु आर डेम लकी. मीच फसले लग्न करून.'

'मीनू डार्लिंग तुझ्या आरशातून तुला असं दिसतय पण खरंच दिसतं तसं नसतं गं मीने. 

लहानपणापासून मी फटकळ,अडेलतट्टू का वागत गेले माहितीय. 

माझे पपा अशा खुर्चीवर विराजमान होते जिथे टेबलाखालून बराच माल मिळायचा. 

पपा घरात कमी आणि माल गोळा करण्यात जास्त गर्क असायचे. ममाकडे लक्षच नसायचं त्यांच. 

पपा कधीकधी चार चार दिवस बाहेर असायचे मीनू त्यावेळी दुपारचे मेहता अंकल यायचे आमच्या घरी.
 माझ्या पपांचे जानी दोस्त. 

ममा मला दामटून झोपवायची आतल्या बेडरूममधे पण भिंत छतापर्यंत नव्हती. मी टेबल घेऊन एकदा चढले नि पाहिलं त्या दोघांना विवस्त्रअवस्थेत. च्याआयला माझी मलाच लाज वाटली. ममाचा पुष्कळ राग आला होता.

 पपा घरी आल्यावर एकदा ते एकटेच असताना मी त्यांना हे सगळं सांगू पहात होते पण त्यांनी माझ्याच थोबाडीत मारली.

 हातातला पेग रिचवत ते म्हणाले,'बिझनेस डील असतं ते तुला नाही कळायचं.' 

त्यादिवसापासून मी तो मेहता यायच्या टायमाला बेसमेंटमधे जाऊन खालच्या कुत्रीच्या पिलांशी खेळत बसायची. 

तो निघाला कि मगच घरी जायची. 

(क्रमशः)

सौ.गीता गजानन गरुड.

🎭 Series Post

View all