Aug 18, 2022
कथामालिका

भातुकली (भाग आठवा)

Read Later
भातुकली (भाग आठवा)

भातुकली (भाग आठवा)

मयंकने मीनाचे अश्रु पुसले. तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले व म्हणाला,'परत नको मला अशी सोडून जाऊस मीनू. तुम्ही दोघी प्राण अहात माझा.' 

यावर मीना त्याच्या कुशीत शिरली. बराच वेळ मग तो तिला थोपटत राहिला. आता पुढे..

सकाळी मीनाला लवकर जाग आली. कुमुदताई पोळीभाजी करत होत्या. काही घडलच नाहीए अशा रितीने कालपासूनच दोघी एकमेकींशी वागत होत्या. 

मीनाने चहा ठेवला व पोळीभाजी डब्यांत भरली. जाईला उठवून तिला अंघोळ घातली. युनिफॉर्म घातला. आजी जाईला सोडायला गेली. मीनाच्या लक्षात आलं बाबा कुठे दिसत नाहीत. तिने मेघाला विचारलं. मेघा म्हणाली,'अगं फिरायला जातात ते हल्ली सकाळी. आम्हीही जाऊ थोड्या वेळात. बंड्याची शाळा आहे दुपारी. 
तेवढ्यात मयंक म्हणाला,'मेघा,मी सोडतो गं तुम्हाला.'

'अरे खरंच नको. जाईन मी.'

'रहायला येणार होतीस ना?'

'अरे अगदीच हरले की येईन रहायला. तोवर प्रयत्न करीत राहीन. अंधारात एखादा तरी आशेचा किरण असतोच ना त्याला शोधेन आणि अडखळलेच तर तुम्ही अहातच मला  सावरायला.'

मीनाने मेघाच्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाली,'थँक्स मेघा मला फोन करुन बोलवल्याबद्दल.'

'मीना,तुझ्यामुळे मला सासरी इथली काळजी नसते गं. हां आता आमची आई आहे थोडी कडक पण सांभाळून घे गं जरा. तुम्ही दोघं गोडीगुलाबीने रहा. बाकी काही नको मला.'

इतक्यात मयंकचे बाबा आले. मीनाने त्यांना चहा पोहे आणून दिले. मेघा व बंड्या आपल्या घरी जायला निघाले. कुमुदताई त्यांना येताना भेटल्या. मेघाने त्यांना जरा शांत चित्ताने घ्यायला सांगितलं.

सगळ्यांच रुटीन सुरु झालं.

जाईने घरी आल्यावर आजीआजोबांना सांगितलं की या रविवारी अंबूचं लग्न करायचंय.

आजी म्हणाली,'अगं एवढी काय घाई लागून गेली? जरा दमानं घे.'

'नाही आजी,परांजप्यांचा राजू म्हणत होता की त्याच्या बाहुल्यासाठी त्या समोरच्या ठकीच्या बाहुलीचं स्थळ आलंय. तेव्हा मला घाई करायला हवी. 
हातचा सुंदर,देखणा बाहुला निसटून जायचा नाहीतर. 

तू मला अंबुसाठी आणि बाहुल्यासाठी कपडे शिवून दे. माझ्या अंबुसाठी टिकल्याटिकल्यांची साडी शीव आणि वरासाठी ..तो सोनेरी ब्लाऊजपीस दिलेला नं तुला खालच्या काकूंनी..हं.. त्याचा झब्बा लेंगा शीव. छोटीसी टोपी,उपरणं,शाल सगळं शिवावं लागेल. मी तुला डिझायनर कापडाचे तुकडे काढून देते तुझ्या बोचक्यातले.'

'बरं बाई कामाला लावलंस.'

'आजोबा,तुम्ही आणि मी दोघं मिळून पत्रिका बनवुया. सई,गायत्री, प्रज्ञापण येणारेत मदतीला. जरा पताका वगैरे लावून डेकोरेशन करावं लागेल.'

'बरं आणि ते गुलाबदाणी,अत्तरदाणीही काढूया जाई. मला वाटतं आपण खाली बेसमेंटमधेच करुया लग्नसोहळा. सगळ्यांनाच बोलवू.'

'मम्मी तू मुरमुऱ्याचा चिवडा बनव. राजूची मम्मी लाडू स्पॉन्सर करणार आहे. प्रज्ञाची मम्मी मेंदी काढून देणार आहे. खूप मज्जा ना.'

सगळीजणं तयारीला लागली. टिकल्याटिकल्यांच एक शेंदरी नेटचं कापड होतं. त्याची साडी शिवली,ब्लाऊज शिवला. सोनेरा कापडाचा झब्बालेंगा शिवला.

 उपरणं,फुलाफुलांची शाल,छोटीसी टोपी हे सगळं बनवताना कुमुदताई नातीच्या जोडीने अगदी लहान होऊन गेली. तिच्या बालपणात हरवून गेली. तिने जाईला वडाच्या पारंब्यांना बांधून त्या कशा गाणी घात झोके घ्यायच्या,फुगडी घालायच्या ते सारं सांगितलं. मीनाही त्यांच्या गप्पांत सामील झाली. 

होता होता लग्नाचा दिवस उजाडला. मेघाआत्याला खास आमंत्रण होतं. मेघाआत्या,तिचा नवरा दिव्येश व बंड्याला घेऊन आली. जाई व राजूने दोन दिवस आधी पत्रिका देऊन सर्व रहिवाशांना आमंत्रण दिलं होतं. 

मेघाआत्याने बाहुलीसाठी खास रुखवत बनवून आणलं होतं. त्यात छोटासा बेड,डायनिंग टेबल,खुर्च्या होत्या. शिवाय सुपारीचे भटजीकाका होते. खूप सारी चॉकलेट्स व श्रीखंडवड्या होत्या. 

जाईची मेहंदी छान रंगली होती. तिने तिच्या बाहुलीची,अंबुची हेअरस्टाईल केली. तिला नवीन साडी नेसवली. बिल्डींगीतल्या सगळ्या बायका लग्नाला हजर होत्या. सईच्या दादाने फोटोग्राफीचं काम हाती घेतलं.

पाहुण्यांना बसण्यासाठी नेनेकाकांच्या सतरंज्या अंथरण्यात आल्या होत्या. नेनेकाकांनी स्वतः पन्हं बनवून आणलं होतं व सर्वांना वाटत होते. प्रत्येकीला चाफ्याचं फुल वाटून हळदीकुंकू लावण्याचं कामं गायत्री करत होती. बंड्याने लाडूचिवडयाच्या डीश भरल्या व  पाहुणेमंडळींना वाटल्या. 

 सगळ्या मुलींनी खणाचा परकर पोलका घातला होता. परकराचे बोंगे घेऊन नटूनथटून मिरवत होत्या. मंडपात बाहुलाबाहुलीला आणण्यात आलं. बकुळीचं बाशिंग लावलेली जोडी फार देखणी दिसत होती.  

सदूदादा भटजीबुवा बनला होता. नवरानवरीमधे अंतरपाट धरण्यात आला व शुभमंगल सावधान म्हणताच सगळ्यांनी अक्षता वाहिल्या. बाहुलाबाहुलीला जुईच्या नाजूक फुलांचे हार घालण्यात आले. 

विहिणबाईंनी सुपारीने एकमेकींच्या ओट्या भरल्या. बंड्याने डब्याचं झाकण व लाटणं आणलं. अंबुला निरोप द्यायची वेळ येताच जाई,गायत्री,प्रज्ञा साऱ्या मुसमुसू लागल्या.

 मधल्या रोडवरुन देवळापर्यंत वरात निघाली. बंड्या पुढे लाटण्याने झाकणीचा ढोल वाजवत होता. काही मुलं वरातीत नाचत होती. आठवडाभर तरी अंबु परांजप्यांच्या सर्जेरावाकडेच रहाणार असं ठरलं. 

लग्नाच्या बोवाळाने जाई व बंड्या खूप दमले. जाई तर बेडवर पडताच क्षणी झोपली.

जेवणं झाल्यावर मयंक दिव्येशला घेऊन शतपावली करायला गेला. दोघांनी टपरीवर गोड पान घेतलं. मयंक म्हणाला,'दिव्येश यार लहानपणापासून ओळखतो तुला. किती हुशार होतास तू. तुझ्या तुकडीत नेहमी अव्वल यायचास. इंजिनिअरिंग केलंस. चांगल्या कंपनीत जॉब मिळाला तुला. सोन्यासारखा लेक आहे मग हे सारं दारुत का घालवतोस? 

'काय सांगू तुला. वडील गेले तेव्हा भयंकर दु:खी झालो होतो. काही दिवसांत आईने आमचं दारुचं दुकान पुन्हा चालवायला सुरुवात केली. तिला मदत म्हणून संध्याकाळी दुकानावर बसू लागलो. इतकीजणं पितात म्हंटल्यावर मलाही पिण्याचा मोह आवरला नाही. 

सुरवातीला थोडं थोडं करत चट लागत गेली. आता नेहमी सोडायची म्हणून विचार करतो पण ऑफिसातही एवढे प्रॉब्लेम्स असतात ना की बस्स. त्या कटकटी विसरण्यासाठी घेतो मग. आता मी पुरता फसलोय यात. नाही सोडवत यार.'

'दिव्येश,तू स्वतः व्यसनमुक्ती केंद्रात जा. तिथे काही थेरपीज असतात. शिवाय प्राणायाम करायला लावतात. काही दारुच्या आहारी गेलेले यातून कसे सुटले तेही त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करतात.'

'आई नको म्हणते रे. तिला मी डोळ्यासमोर हवा असतो.'

'तिचं मन तुच वळवू शकतोस. ऐकेल ती तुझं.'

मयंकच्या बोलण्याचा दिव्येशच्या मनावर चांगला परिणाम झाला व तो परागच्या मदतीने एका व्यसनमुक्ती केंद्रात सामिल झाला.  तिथे त्यांचा दिनक्रम हा ठरलेला होता.

 पहिलंपहिलं दिव्येशला ते पेलणं कठीण गेलं. बऱ्याचदा त्याला तिथून पळून जावसं वाटे पण तिथल्या मार्गदर्शकांच्या प्रेरणादायी विचारांनी तो तेथे सरावला.

 कधी त्याची आई केंद्रात फोन करुन माझ्या मुलाला परत पाठवा म्हणून गयावया करायची पण तिथल्या विश्वस्थांनी तिचं ऐकलं नाही. चारेक महिन्यात दिव्येश दारुपासून लांब जाण्यात यशस्वी झाला. 

घरी आल्यावर दिव्येशने आईला दारुचं दुकान बंद करुन त्याजागी दुसरं एखादं दुकान घालुया म्हणून सांगितलं पण त्याची आई तयार होईना. तेव्हा त्याने आईला सरळ मी मेघाला घेऊन वेगळा संसार थाटतो असं सांगितलं. तेव्हा कुठे त्याच्या आईने त्याचं म्हणणं मान्य केलं.

मेघाचा संसार सुरळीत चालू झाला. तिने परागचे खूप खूप आभार मानले. तिची सासूही तिला त्रास द्यायची बंद झाली. आधीच्या दुकानाजागी मेघा व तिची सासू दोघींनी मिळून खानावळ सुरु केली. 

त्यांच्या घरापासून दहा मिनिटांवर कॉलेज होतं. तिथल्या हॉस्टेलची मुलं तिथे चहा,नाश्ता व जेवणाला येऊ लागली. दिव्येशही तिथूनच नाश्ता घेऊन ऑफिसला जाऊ लागला. तो आता सुधारला होता खरा पण तरीही स्वप्नात त्याला दारुची बाटली दिसायची व प्यायचा मोह व्हायचा मग तो केंद्रातल्या सरांना फोन करे. 

ते त्याला समजावून सांगत की हे असं दिसणं नैसर्गिक आहे. कुठेतरी अजुनही तुझ्यात दारु पिण्याची सुप्त इच्छा जाग्रुत आहे पण त्याबद्दल स्वतःला दोष मात्र देऊ नकोस. प्रत्येक दारु सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला या परीक्षेतून जावंच लागतं. त्यांचे हे आश्वासक बोल ऐकून दिव्येशला खूप बरं वाटे. 

त्याने ठरवलं की आपणही दारु,सिगारेट या व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना यातून बाहेर पडण्यासाठी मदत करायची व त्यांचे संसार मार्गाला लावायचे त्यासाठी आठवड्यातून एखादा दिवस ऑफीस सुटलं की तो केंद्राला भेट देऊ लागला.

 फेबुवर आपले अनूभव 'दारु सोडताना' या मथळ्याखाली शेअर करु लागला.

मीना व सासूच्या कुरबुरी अधनंमधनं चालूच होत्या. पराग त्यांना म्हणायचा की तुम्ही दोघी म्हणजे सजातीय ध्रुव आहात. या जन्मात तरी तुमचं पटणं शक्य नाही.

सरलाताईंच्या साठीसाठी मयंकने त्यांना पैठणी घेतली. मीना व मयंक दोघेही जाईला घेऊन सरलाताईंच्या वाढदिवसाला गेले. 

मीनाच्या सासूसासऱ्यांनाही आमंत्रण होतं पण मीनाच्या सासऱ्यांना असं कोणत्या समारंभात वगैरे जायचं जीवावर येई म्हणून त्यांनी पोटात दुखतय असा बहाणा केला मग कुमुदताई अर्थात यजमानांसोबत थांबल्या.

(क्रमशः)

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now