Jan 19, 2022
कथामालिका

भातुकली(भाग अठरावा)

Read Later
भातुकली(भाग अठरावा)

भातुकली (भाग अठरावा)

आणि तुला रद्दी वगैरे मुळीच समजू नकोस गं. तू कितीही म्हातारी झालीस नं तरी हवीस आम्हाला. तुझे आशिर्वाद हवेत गं आम्हाला. तू आहेस म्हणून आम्हाला आमच्या लहानपणाची जाण आहे. मोठं नाही व्हायचं मला. तुझ्या कुशीतच बरं वाटतं बघ मला. आता पहिले वचन दे की परत अशी मरणाच्या वाटेची भाषा बोलणार नाहीस.'

'हो गं राजा. नाही बोलणार. आज तुझ्या आवडीच्या सांजोऱ्या करते चल. सगळं सामान काढ बघू.'

मयंक घरात शिरताच त्याला तो चिरपरिचित सुगंध आला. रवा,तुप,वेलची घालून केलेल्या खमंग सांजोरीचा. तो मीनाला म्हणाला,"मीनू समथिंग स्पेशल?"

जाई म्हणाली,"हो पप्पा,आज नं सरुआज्जीने माझ्यासाठी सांजोऱ्या बनवल्यात. डेलिशिअस."

"आणि माझ्यासाठी..तुझी आजी होण्याआधी ती माझी सासू आहे." तसं मीनू म्हणाली.."आणि त्याहीआधी ती माझी मम्मी आहे." यावर जाई फुरंगटून बसली तसं सरुआजीने तिचा गालगुच्चा घेतला व म्हणाली,"आजी तर सगळ्यांचीच असते राणू." यावर जाई खुदकन हसली. सर्वांनी मन भरून सांजोऱ्या खाल्ल्या.

सरलाताईलाही आज जरा बरं वाटलं. तिने ठरवलं..आता हळूहळू वास्तव स्विकारायचं..उरलेलं जगणं आनंद देत,घेत जगायचं. मग तिला आठवलं,"बरेच दिवस झाले,चैत्राला फोन नाही केला. तिने मीनाच्या मोबाईलवर चैत्राला कॉल केला व चैत्रा,नाना,पराग,यश साऱ्यांशी थोडं थोडं बोलली. नानांच्या तब्येतीची चौकशी केली. तिला खूप बरं वाटलं. 

*******

आशना आज लायब्ररीत गेली तर तिथल्या मिस तिला म्हणाल्या,"मिस आशना,तुम्हाला जे पुस्तक हवं होतं ते नुकतच आशिष यांनी रिटर्न केलंय. आशनाने पुस्तक बदली केलं व खुशीतच निघाली. नाहीतरी आज तिला सुट्टी होती. तिने हॉटेलला फोन केला व लंच मागवून घेतलं. मस्तपैकी बटर चिकन व नान वर ताव मारुन ती पुस्तक वाचायला बसली. 

कथानक फार भावस्पर्शी होतं. 
एका मुलीचं एका मुलाशी प्रेम जुळतं. दोघांचं चाटींग,कॉलिंग सुरु होतं. मग दोघं एकमेकांना कधी बागेत भेटतात तर कधी नदीकिनारी. तासनतास एकमेकांच्या बाहुपाशात भविष्याची सुंदर स्वप्न रंगवतात आणि एके दिवशी तिच्या भावाचा मित्र तिला व त्याला सीबीचवर बघतो. तो तिच्या भावाला सांगतो. भाऊ बिझनेसमन असतो आणि हा साध्याशा कंपनीत काम करणारा नोकर. साहजिकच तिच्या घरातून या लग्नाला विरोध होतो. ती भावाच्या नजरबंदीतून सुटते..पुढे दोघं मिळून लग्न करतात..तिच्या भावाचे चमचे त्या दोघांच जीणं नकोसं करतात व ती दोघं शेवटी एकत्र जीवनप्रवास संपवतात.

 आशू एकेक पान वाचत पुढे जात असते आणि तिला त्यात अडकवलेलं एक ह्रदयाच्या आकाराचं जाळीदार पिंपळपान दिसतं. त्यावर लिहिलेलं असतं. आय रिअली लव्ह यू आशना व खाली आशिष अशी सही असते. आशूला क्षणभर काही सुचत नाही. ती आरशासमोर जाते व स्वतःला निरखून पहाते.

 पस्तीसी सरली तरी तिच्या सौष्ठवात  तसूभरही फरक पडलेला नव्हता. अजुनही तिचे उरोज सुडौल असतात. आजपर्यंत तसं बऱ्याच जणांनी तिला प्रपोज केलेलं पण तिने ते या ना त्या कारणाने झिडकारलं होतं कारण त्यांच्या डोळ्यांत तिला फक्त शरीराची भूक जाणवायची. 

का कोण जाणे पण आशिष तिला या साऱ्यांतून वेगळा वाटला..एक हवाहवासा मित्र..दिसायला तर तो हँडसम होताच पण तितकच, अदबशीर होतं ते त्याचं वागणं..लहानांपासून मोठ्यांपर्यंत ..कोणत्याही वयाच्या माणसांत दुधात साखर विरघळावी तसं बेमालूमपणे मिसळून जाणं. हे सारं तिने आठवडाभरापुर्वीच्या मिनूने दिलेल्या पार्टीत हेरलं होतं. 

त्याचं ते एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई गाणं तिला मनापासून भावलं होतं व तिच्या मनातल्या प्रेमभावना चाणाक्ष मिनूने जाणल्या होत्या. मिनूने आशूला चाटींगमधे त्याच्याबद्दलची सारी माहिती पुरवली होती. तो एका नामांकित उद्योगपतीचा मुलगा पण स्वतःच काहीतरी करावं या जिद्दीवर एमबीए होऊन आशुच्या कंपनीत नोकरी करत होता. लवकरच स्वतःची फर्म काढणार होता. 

 आशूला परत तिचा भूतकाळ आठवला..तिच्या कौमार्यातल्या चुका,तिच्या शरीराचं अपंगत्व..हो अपंगत्वच कारण तिला गर्भाशय नव्हतं. 

आजही आपल्या समाजात प्रेमाची निष्पन्नता लग्न व लग्न कशासाठी तर मुलं जन्माला घालण्यासाठी असंच मानलं जातं. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुल दत्तक घेण्याचे सल्ले दिले जातात. मुल दत्तक घ्यावं की दोघांनी परस्परांसाठी जगावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो हेच मुळी लोक विसरुन जातात. 

लग्न झालं की गोड बातमी कधी देणार .. काय प्लेनिंग वगैरे.. अजून कसं नाही होत..मग हा डॉक्टर तो डॉक्टर..असे फुकटचे सल्ले देणारे,देणाऱ्या आपल्या आजुबाजुच्याच असतात. या साऱ्या विचारांनी आशू परत भानावर आली व तिने ठरवलं की आशिष परत भेटला तर त्याला स्पष्ट शब्दात नकार द्यायचा. उगाच झुरवायचं नाही.

आशूला समाजाची भिती वाटत होती का? छे,फाट्यावर मारते आशू अशा समाजाला पण आशिषचं काय..त्याला तर समाजात जगायचं होतं. त्याची आई तर नगरपालिका अध्यक्ष होती.. त्याच्या घरातल्यांना हे लग्न आर्थिक स्तरावर पटलं नसतं..ते एक वेळ जाऊदे..पण सामाजिक द्रुष्ट्या..कोणती सासू बलात्कार झालेली,गर्भाशय नसलेली सून स्विकारेल व आशिषला तरी कुठे माहिती होतं आशनाच्या पुर्वेतिहासाबद्दल! त्याच्यातला पुरुष स्विकारेल तिला? दर्जा देईल पत्नीचा? पुढे मानाने वागवेल? का पावलोपावली तिचा अपमान करेल? आशूने ठरवलं. तिने त्या पानाच्या मागे सॉरी आशिष,मला तुझ्याबद्दल प्रेम वाटत नाही असं लिहीलं व सुन्न मनाने बसून राहिली.

दुसऱ्या दिवशी आशूने ते पुस्तक परत केलं. आशिष ते घेण्यासाठी तिथेच घुटमळत होता. त्याने त्याचं पुस्तक देऊन ते आशनाने परत केलेलं 'ओ माय लव्ह' घेतलं व रिझल्ट बघण्यासाठी जी घाई असते तशा धडधडत्या ह्रदयाने पुस्तकातलं ते पान शोधू लागला. त्या पानाच्या मागे आशनाने लिहिलेला नकार वाचला मात्र आणि तो तिला कारण विचारण्यासाठी उठला पण आशना होती कुठे तिथे! ती केव्हाच निघून गेली होती.त्याच्या नजरेस नजर देणं जमलं नसतच तिला.

आशू कॉलेजला गेली. कॉलेजमधे एसवायच्या वर्गांना अकाऊंट्स शिकवायची ती. आज मुलांनाही जाणवलं मिसचं काहीतरी बिघढलं आहे. कॉलेज सुटलं तशी ती घरी आली. तिने टिव्ही लावला पण छे लक्षच लागत नव्हतं कशात. तिने स्वतःच्या मनालाच एक जोरदार शिवी हासडली. 

*******

कुमुदताई व नाना गावी जाऊन पंधरवडा उलटला होता. उद्याच्या सकाळच्या गाडीची तिकिटं रिझर्व केली होती. कुमुदने गावची भेट म्हणून तांदळाचे पीठ, कुळथाचं पीठ,जाईसाठी खोबऱ्याची कापं घेतली. सगळे कपडे  भरुन झाले. अंथरुण घातली व झोपायला जाणार इतक्यात मागीलदारी जोराचा आवाज आला. 

नाना आवाजाच्या दिशेने धावत गेले. म्हातारी चक्कर येऊन कोनात ठेवलेल्या पाट्यावर पडली होती. तिचं मुटकुळंच झालं होतं. नानांनी तिला लहान बाळासारखं उचलून आणून चटईवर निजवलं व डॉक्टरांना फोन लावला. आजुबाजूचीही जमा झाली. म्हातारी श्वास तर घेत होती. कुमुदताईने तिला पाणी पाजलं. डॉक्टर आले व त्यांनी म्हातारीला तपासलं. म्हातारीला सौम्य एटेक आला होता. तिला ताबडतोब हॉस्पिटलमधे एडमिट केलं. डॉक्टरांनी साऱ्या चाचण्या केल्या व एक दिवसासाठी अंडर ऑबजर्वेशन ठेवलं. डिस्चार्ज देताना मात्र नीट काळजी घ्या म्हणून सांगितलं.

नानांनी धाकट्या भावाला व दोन्ही बहिणींना फोन लावला. नली व लली दोघी नवऱ्यांना घेऊन आल्या. एक रात्र म्हातारीजवळ थांबल्या व परत आपल्या घरी गेल्या.

 धाकटा बंडू बायकोला घेऊन आला. तो आठवडाभर राहिला. म्हातारीने पडलेल्याचा धसका घेतला होता. घराबाहेर फिरायची बंद झाली. तिचं पातळही तिला नेसायला सुधरेना मग कुमुदताईने स्वतःचे गाऊन आटवून म्हातारीला घालायला दिले. म्हातारी बरी होती तेव्हा नानांना गावची,आबांची विशेष चिंता नव्हती पण आता पुढे काय हा मोठा पेच पडला.

कुमुदताई एरवी नानांशी लहानमोठ्या घरगुती कारणांवरुन हुज्जत घालायची पण म्हातारी आजारी पडल्यापासून म्हातारीचा नाश्ता,पथ्यपाणी, तिचं अंथरुण पांघरुण स्वच्छ धुणं,तिचे इवलेसे केस विंचरुन त्याचा लिंबाएवढा अंबाडा बांधणं हे सारं ती न वैतागता करत होती. जणू काही म्हातारी पडली त्यादिवशी कुमुदताईने वसरीला आलेल्या यमाला पाहिलं होतं व सासू कशी का असेना पण ती माझी आहे. तिच्यामुळेच तर आपलं लहानपण टिकून आहे हे जाणून ती म्हातारीला पुन्हा नव्या उमेदीने उभं रहाण्यास मदत करत होती.

 म्हातारीलाही जाणवत होतं,कुमुदवर तिने जरा हात राखूनच केलेलं प्रेम,धाकट्याच्या सर्विसवाल्या बायकोला सढळ हाताने लावलेला जीव,लेकींवर केलेली जास्तीची माया आणि आता तिला अपराधीपणाची जाणीव होत होती जी तिच्या नजरेतून कुमुदताईंना दिसायची.

कुमुदताईंच्या भावाचे एकदोनदा हक्कसोडपत्रावर सही करण्यासाठी फोन आले पण कुमुदताईने आपला नकार कायम ठेवला. भावाला कळलं कुमुदताईची सासू आजारी आहे पण तो तिला बघायला,तिच्या तब्येतीची विचारपूस करायला आली नाही. एवढच काय जवळच्या गावात राहूनही साधं रक्षाबंधनलाही आला नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी कुमुदताईने त्याची दुपारपर्यंत वाट पाहिली मग वहिनीला फोन लावून सांगितलं की ती येईल राखी बांधायला.
वहिनीने फोनवरच उत्तर दिलं,"आम्ही सर्वजणं माझ्या माहेरी आलो आहोत. चारेक दिवस इथेच रहाणार आहोत तेव्हा उगा येण्याची तसदी घेऊ नका."

वहिनीचं हे म्हणणं ऐकून कुमुदताईंना आतल्या आत तुटल्यासारखं झालं. लहानपणीची त्यांची भावाबहिणीची जोडी आठवली..लहानपणी कोणताही खाऊ असो दोघं वाटून वाटून खायचे. पण भावाचं लग्न झालं त्यानंतर एकदोन वर्षात कुमुदताईंचे वडील गेले,त्यांची आई एकाकी पडली. एकटीच रहायची गावातल्या घरात..पण भावाने,वहिनीने तिला कधी त्यांच्या शहरातल्या घरी बोलावलं नाही,कि कधी तिला सणासुदीला साडीचोळी,आजारपणासाठी पैसे पाठवले नाहीत.

 कुमुदताई तिलाआमच्यासोबत चल म्हणून विनवायची पण तिला जावयाच्या घरात रहाणं फारसं रुचत नव्हतं. डोळ्यांनी अगदीच अंधुक दिसू लागलं तेव्हा मात्र मयंक स्वतः तिला घेऊन गेला. औषधोपचार केले,डोळ्याच्या डॉक्टरांना दाखविले. थोडं बरं वाटताच ती आपल्या घरी परत गेली आणि एक दिवस मग शेजाऱ्यांनी ती गेल्याची बातमी दिली. 

कुमुदताईंचा भाऊ आपल्या बिराडाला त्या गावच्या घरात रहायला घेऊन गेला. त्याच्या दोन मुली ह्या त्याच्या सर्वस्व होत्या.

(क्रमशः)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now