Login

भारतीय

.
जगात भारतासारखा कोणता देश नाही आणि भारतीयांसारखे लोक कुठेच नाही. आज या व्हिडीओमध्ये आपण भारतीयांची काही गुणवैशिष्ट्ये जाणून घेऊ जी फक्त आणि फक्त भारतीयांमध्येच सापडतील.

पहिली गोष्ट स्मॉल टॉकस. बस , रेल्वेमध्ये प्रवास करताना लक्ष द्या की आपण भारतीय कधीही , कुठेही छोट्या छोट्या गोष्टींवरून गप्पा मारत असतो.

" रस्ते खूप खराब आहेत या देशातले. "

" महागाई खूप वाढलीय राव. "

इथून संभाषण सुरू होते आणि कधी युक्रेनरशिया युद्धावर गहन चर्चा होऊन संपते कळत नाही.

Divided by जात , धर्म , रंग , रूप , प्रांत , भाषा
United by खराब रस्ते अँड महागाई.

गप्पा तर भारतीय अस मारतात की जणू जुने मित्र आहेत. मध्यंतरी बातमी आली होती की भारतीयांचे आधार कार्ड वगैरे हॅक होऊ शकते. पण हॅकरची गरज नाही. तुम्ही थोडा वेळ गप्पा मारा तो आपली कुंडली पण तुम्हाला दाखवेल.

दुसरी गोष्ट , सल्ले देणे. भारतीयांना सल्ले द्यायला खूप आवडतं. नव्हे " सल्ला देणे त्यांना त्यांचा जन्मसिद्ध हक्कच वाटतो. "

लग्नात जा तिथे खूप काकू भेटतील.

" प्रिया , तुझं वजन खूप वाढलंय. रोज सकाळी xyz गरम करून खा. लगेच कमी होईल. "

स्वतःचा देह चहू बाजूनी कसा वाढत आहे यावर त्या कधीच टिप्पणी करणार नाहीत.

" तुझा रंग खूप काळवंटला. रात्री झोपताना xyz लावून झोप लगेच उजळेल चेहरा. "

जर कधी सल्ला उलटा पडला तर दोष ते समोरच्यांनाच देणार.

" हो मी म्हणलं होतं गुण येतो पण तूच तो लेप नीट लावला नसेल. "

" हो मी म्हणले होते इंजिनीरिंग करायला पण मला काय माहीत तुमचा मुलगा इतका ढ असेल म्हणून. "

मी लहान असताना एक अशी स्कीम निघाली होती की सामान्य माणूसपण धोनी , सचिनसारख्या क्रिकेटर्सला सल्ले देऊ शकतात. माझ्या बालमनाला भाबडा प्रश्न पडला की जर एवढे मोठे क्रिकेटर्स आपले सल्ले घेऊ लागले मग कोच लोकांनी काय करायचे ?"

कोच बी लाईक , " मै क्या करू जॉब छोड दु ?"

जर मुलीने नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार अरेंज मॅरेज केलं आणि नंतर काही कारणामुळे लग्न तुटलं तर त्या मुलीचे नशीब खराब. हीच गोष्ट लव्ह मॅरेजसोबत घडली तर मुलीलाच बाहेरची हवा लागली होती. आता भोग म्हणावं स्वतःच्या कर्माची फळे.

एकंदरीत सल्ला देणाऱ्यांचा काही दोष नसतो.

***

तिसरी गोष्ट फ्री सर्व्हिस ,

सहज रस्त्यावर गाडी चालवा ,

" दादा , तुझा स्टॅन्ड उघडा आहे. "

" ताई तुझी साडी उडत आहे. "

अश्या असंख्य फ्री सर्व्हिस कसलाच संकोच न बाळगता भारतीय एकमेकांना देतच असतात.

समोर पोलीस असतील तर आधीच डोळा मारून ,

" समोर पोलीस पकडतील. दुसऱ्या वाटेने जा. "

गोव्याहून पुण्याला येताना कुणीतरी गुगल मॅपवर नोटडाऊन केलंय.

" दारु चेक पोस्ट. "

म्हणजे किती उदार मनाचा दारुडा असेल तो. स्वतःची दारू पोलिसांनी पकडली म्हणून बाकी दारुड्या भावांची दारू जप्त होऊ नये म्हणून त्याने चक्क गूगल मॅपवर ही गुप्त माहिती पुरवली.

***

चौथी गोष्ट म्हणजे बार्गनिंग. बायका तर या गोष्टीत पटाईत असतात. त्यांना बार्गनिंग करायला खूप आवडते. म्हणजे ते जन्मापासूनच त्यांच्या डीएनएमध्ये फिट असते. सर्व दुकानदार त्यांचे शोषण करायलाच बसले आहेत असा त्यांचा ठाम समज असतो. तर बार्गनिंग करण्याचे काही नियम असतात. सर्वप्रथम दुकानदाराला अस वाटलं नाही पाहिजे की तुम्हाला त्या वस्तूंची गरज आहे. जर त्याला लक्षात आले की तुम्हाला वस्तू हवी आहे तर तो किंमत कमी नाही करणार. 500 ची वस्तू असेल तर बाजूच्याच दुकानात 100 म्हणत होता अस खूप जण खोट खोट बोलतात. वास्तविक हे बाजूचे दुकान काल्पनिक असते. तरीही ऐकत नसेल तर जाण्याची ऍक्टिनग करायची. अस करत भारतीय 500 ची वस्तू 300 ला विकत घेतात.

लहानपणी आम्ही सर्वजण पहिल्यांदाच पैठणमध्ये गेलो होतो. माझी आई रिक्षावाल्याला म्हणाली ,

" आम्ही काही ट्यूरिस्ट नाही. इथलेच आहोत. योग्य किंमत लावा. "

आईने खोटी गोष्ट पण इतक्या आत्मविश्वासाने बोलली की त्या रिक्षावाल्याने किंमत अर्ध्यावर आणली.

***

पाचवी गोष्ट म्हणजे काटकसर ,

काही रहस्य फक्त भारतीयांनाच माहीत असतात. जस पूर्वी पाच रुपयेची मॅगी भेटायची. माझी मैत्रीण मला म्हणाली होती की दहाची घेण्यापेक्षा पाचच्या दोन घ्यायच्या. म्हणजे जास्त मॅगी मिळते.

आम्ही भारतीय तर इतकी काटकसर करतो की समोर ईश्वर जरी येऊन आम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायला सांगत असेल तरी आम्ही घेणार नाही.

" मोडेल पण वाकणार नाही.
पाच मिनिटाची ऍड बघू पण सबस्क्रिप्शन घेणार नाही. "

आम्ही नेटफलिक्स , ऍमेझॉन , हॉट स्टार अश्या वेगवेगळ्या ओटीटीचे सबस्क्रिप्शन घेत नाही. आम्ही सरळ टेलिग्रामवरून डाऊनलोड करतो. उलट कुणी सबस्क्रिप्शन घेतलं तर बाकीचे हसतात.

" अरे हे तर टेलिग्रामवर होते. तू उगाच पैसे घालवले."

जरी कुणी बळी पडून सबस्क्रिप्शन घेतलेच तर आम्ही कसलाच संकोच न करता पासवर्ड आयडी मागून घेतो. मध्यंतरी एक मीम आले होते.

नेटफलिक्सचे भारतातले एकूण सबस्क्रिप्शन 1 मिलियन आणि एकूण वापरकर्ते 500 मिलियन.

" एकमेका सहाय्य करा. अवघे धरू सुपंथ "

भारतीयांनी जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय.

आधी अमेझॉनवर 1 महिना फ्री ट्रायल असायचे. आमच्या गल्लीच्या मुलाने आईवडिलांचे क्रेडिट कार्ड वापरून दोन महिने बघितले. मग शेजारच्या आजींना फूस लावून अजून एक महिना बघितला. अस करत करत त्याने पूर्ण अमेझॉन पालथ घातलं पण सबस्क्रिप्शन घेतलं नाही. कित्येक निष्पाप जीवांना माहिती नाही की त्यांच्या जीवावर फ्री ट्रायल बघूनही झालं आहे.

हे ओटीटी अँप कधी कधी काय करतात की 7 दिवस फ्री ठेवतात. त्यांना अस वाटत की 7 दिवसांत भारतीयांना व्यसन लागेल आणि मग लगेच सबस्क्रिप्शन घेऊ. पण आम्ही 7 दिवस एनजॉय करतो आणि मग दूर से ही नमस्ते.

तर भारतीयांकडून सबस्क्रिप्शन मिळवणे महाकठीण काम.

अश्या असंख्य विचित्र गोष्टी आम्हा भारतीयांमध्ये असूनही आम्ही कधीही प्रवास करताना आधी जेवण इतरांना ऑफर करतो मगच स्वतः जेवतो. काकूंनी अभ्यासाबद्दल विचारून कितीही हैराण केलं तरी जाताना त्यांच्या पाया पडतो. दूरवर छोटंसं मंदीर जरी दिसलं तरी त्याला नमन करतो. चुकून लाथ लागली की लगेच पाया पडतो. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतो पण जुनी संस्कृती विसरत नाही. धन्यवाद.