Login

भारतीय सिरियल्स

.
भारतीय सिरियल्सविषयी मी काय बोलू ? म्हणजे ते जगावेगळे असतात. अगदी नोबेल पारितोषिक भेटायला पाहिजे इतक्या क्रिएटिव्ह त्या असतात. एक उदाहरण देतो. साथीया सिरियलमध्ये गोपी बहु एहेमचा लॅपटॉप साफ करते. साफ करते म्हणजे पुसत नाही तर चक्क धुवून काढते आणि वाळायला पण ठेवते. नंतर याच सिरीयलचा दुसरा सिझन आला. नायक फोनवर म्हणतो की लॅपटॉपमध्ये व्हायरस आला आहे. तेव्हा तर नायिका चक्क लॅपटॉपवर फिनाईल टाकते आणि म्हणते याने 99 टक्के व्हायरस मरून जातील. जेव्हा माझ्या लग्नासाठी आई मुलगी शोधत होती तेव्हा आईने मला विचारले की " बाळा , कशी मुलगी हवी ?"

मी फक्त इतकं उत्तर दिले की मुलगी कुणाही जातीधर्माची असेल तरी चालेल फक्त लॅपटॉप धुवून काढणारी नको. त्या टिझरमुळे मनात इतकी धास्ती बसली होती की लग्नानंतर महिनाभर तर मी लॅपटॉपला एकट सोडत नव्हतो.

***

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मला मुलींचे स्थळ बघण्याआधी स्वतःवर खूप विश्वास होता की मला कुणी नकार देऊ शकणार नाही. पण पहिल्या स्थळानेच मला नकार दिला. आम्हाला एकांतात बोलायला वेळ दिला गेला होता. मी मुलीला तिच्या हॉबीज विचारल्या. तिला सिरियल्स बघायला खूप आवडायचं. विशेष करून " ये रिशता क्या केहलता है ?". तिने मलाही विचारले की तुला आवडतात का सिरियल्स म्हणून. मी सरळ सरळ बोलून गेलो , " मी रडक्या सीरियल्स पाहत नाही. " अँड शी वॉज लाईक , " निकल..पेहली फुरसत में निकल.."
माझा रिशता बनण्याआधीच तुटला. पहिलेच स्थळ पाहिल्यावर नकार आल्यामुळे मी डिप्रेसड झालो होतो. बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला.

" बाळा , या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघ. " बाबा म्हणाले.

" हो बाबा. म्हणजे मी सिरीयलप्रेमी स्त्रीपासून वाचलो असच ना ?" मी म्हणालो.

" नाही रे वेड्या. म्हणजे स्थळ बघण्याच्या बहाण्याने का होईना थोडे वेगळे चविष्ट पोहे खायला भेटले. जर तिचा होकार असता तर परत दुसऱ्या स्थळाचे पोहे खायला भेटले नसते. "

मी म्हणले , " काय बोलताय बाबा ?"

" अरे वेगेवगळ्या घरचे पोहे खाण्यासाठीच मी 30 स्थळे नाकारली होती. " बाबा म्हणाले.

मी पाच मिनिटे शॉकमध्ये होतो. मला माहीतच नव्हते की माझे बाबा " पोहेबहाद्दर " आहेत.

***

माझ्या आजीला " उतरन " सिरीयल खूप आवडायचं. सिरियलची कॉन्सेप्ट चांगली होती. एक गरीब मुलगी आणि एक श्रीमंत मुलगी यांच्या मैत्रीवर सिरीयल आधारित होती. पण नंतर दोन्ही मैत्रीणी मोठ्या होतात आणि दोघांचे प्रेम एकाच मुलावर होते. सिरीयलची नायिका इच्छा हिचे लग्न वीरसोबत होणार असते. पण सगळं चांगलं चांगलं झाले तर सिरीयल कस वाढणार ? लग्नात इच्छाच्या जागी तपस्या म्हणजे श्रीमंत मुलगी बसते. कारण लग्नाआधी तपस्या इच्छाला भडकवते की मला बसू दे म्हणून. मग इच्छा म्हणते ठिके तू लग्न कर. जस काही वीर एखादा ड्रेस आहे आणि जाऊदे तूच ड्रेस घाल हा म्हणून. लग्न झाल्यानंतर वीरला समजते की आपल्यासोबत तर फ्रॉड झाला आहे. या सीनची मी खूप धास्ती घेतली आणि लग्नाआधी मी अट घातली की हुंडा वगैरे नको फक्त ज्या मुलीसोबत माझे लग्न होणार आहे तिचा चेहरा लग्नात झाकलेला नको.

***

सिरीयलमध्ये कुंकूला खूप महत्त्व असते. म्हणजे नायक एकीला कुंकवाने भरवत असतो पण काहीतर होते आणि कुंकू हवेत उडून नायिकेच्या कपाळाला लागते. एका सीनमध्ये मी बघितले की नायक मंगळसूत्र घालत असतो पण मंदिराचा घंटा खाली पडतो आणि मंगळसूत्र उडून नायिकेच्या गळ्यात पडते. खरच भारतरत्न द्यायला पाहिजे लेखकाला.

***

99 टक्के सिरीयलमध्ये बऱ्याच गोष्टी समान असतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे लव्ह ट्रायनगल.
आपण भूगोलात शिकतो ना की मुली कमी आहेत. मुले जास्त आहेत. तेव्हा खूप काळजी वाटायची की आपल्याला पोरगी भेटणार की नाही. मी आणि माझ्या मित्राने तर पाचवीतच निर्णय घेतला की केरळात सेटल व्हायचे कारण तिथे मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे म्हणून. असो. सिरीयलमध्ये एकदम उलट दाखवतात. एक नायक आणि दोन मुली त्याच्याच प्रेमात पडतात. आणि भरीस भर म्हणून खूपदा दोघी एकमेकांच्या बहिणी असतात. अरे मुलांची कमतरता नाही देशात बाकीच्यांनाही संधी द्या.

***

लग्नानंतर सासू-सुनेचे भांडणे प्रत्येक घरात होतात. माझ्याही झाली. आई आणि बायकोमध्ये सर्वसामान्य पुरुषांप्रमाणे मीही सँडविच बनलो. एकदा घरात असेच भांडण चालू होते. माझे बाबा अंगणात पडले होते. मी त्यांना उचलले.

" बाबा , तुम्ही इथे कसकाय ?" मी विचारले.

" अरे तुझ्या आणि माझ्या बायकोमध्ये भांडण सुरू झाले. मारामारी होऊ नये म्हणून मी सोडवायला गेलो तर धक्का लागून मीच बाहेर फेकलो गेलो. यापुढे पडणारच नाही रशिया युक्रेन वादात. " बाबा मला त्रस्त होऊन म्हणाले.

मी आत गेलो. तर वातावरण शांत होते. कुणी भांडण करत नव्हते. मला क्षणभर स्वतःचा अभिमान वाटला. इतका धाक आहे का माझा घरात. मला माहितीच नव्हते. पण सासू सुनेची आवडती मालिका टीव्हीवर लागत होती म्हणून वातावरण पूर्ववत होते.

" divided by तू सासू मी सून, united by क्यूकी सास भी कभी बहु थी. "

***

या सिरीयलमध्ये जेव्हा मुले होतात ना तेव्हा ती कधीच त्यांची नसतात. हॉस्पिटलमध्ये एक्सचेंज झालेली असतात. नाहीतर नवरा बायकोचे भांडणे होऊन ताटातूट होते. मग ही मुले पालकांना एकत्र आणतात.कळत नाही की नॉर्मल फॅमिलीप्रमाणे का मोठी होत नाहीत ? या प्रकाराची मी इतकी धास्ती घेतली की आमचे जेव्हा पहिले बाळ झाले तेव्हा नर्सला पाचशे रुपये दिले आणि म्हणले लक्ष ठेव बाळावर. पुन्हा मुले मोठी झाल्यावर इमोशनल ड्रामा नको.

***

अजून एका सिरीयलमध्ये मी बघितले की नायिका स्वयंवरमध्ये मला चंद्र हवा असे म्हणते. नायक दोरी फेकून खराखुरा चंद्र आणूनही देतो. एकदा संक्रातीमध्ये पतंग खेळण्याचा सिन असतो. त्यात नायक नायिका पतंगावर बसून हवेत उडतात.

न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत , संपूर्ण विज्ञान याला भावपूर्ण श्रद्धांजली.

ऐतिहासिक मालिकांमध्ये तर इतिहासाची इतकी खिचडी बनवतात की शिक्षा देण्यासाठी ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्वर्गातून भूतलावर येतील अस वाटते. मी " जोधाअकबर " मध्ये महाराणी जोधाबाईला इंग्रजी बोलताना पाहिले आहे. ती अकबराला " आय लव्ह यु " म्हणते. तो पाहिल्यानंतर माणुसकीवरचा विश्वास उडाला.

" सुख म्हणजे नक्की काय असते " मधला नायक परदेशातून शिकून आलेला आहे. तरीही चोवीस तास बायकांची भांडणे सोडवत बसतो. एकेकाळी माझीही परदेशी शिकण्याची खूप इच्छा होती पण आता वाटतय बरे झाले गेलो नाही. " रंग माझा वेगळा " मध्ये डार्क स्किन असलेल्या नायिकेची गोष्ट आहे. संकल्पना सुंदर आहे. पण नायिकेचा रंग वेगळा नाही तर " वेगवेगळा " आहे. म्हणजे कधी खूप काळी , कधी थोडी काळी , कधी मिडीयम. मला वाटायचं पिंकचे शेड्स असतात. पण काळ्या रंगाचेही पेन्सिलप्रमाणे इतके शेड्स असतात जी नायिका सोयीनुसार बदलते हे पहिल्यांदाच कळले.

***

शेवटी मी राजकारण करायचे ठरवले. बाबांना पुढे करून त्यांना बाहेरून पाठिंबा देऊ. माझा मुलगा मोठा झाला होता आठ नऊ वर्षाचा. वाटलं तिघे मिळून सरकार बनवू. सासू सुनांना विरोधी पक्ष बनवू. सिरीयलपेक्षा मुलाचे कार्टून बघितलेले परवडले. मी बाबांना थोडी फूस लावली.

" बाबा , एक गोष्ट बोलायची आहे. " मी म्हणालो.

" लवकर बोल. मला अनुपमा बघायला जायचे आहे."
बाबा म्हणाले.

" बाबा , तुम्हाला खरोखरच या सिरीयल आवडतात का ?" मी म्हणालो.

" आवडत तर मला माझी बायकोही नाही. पण केलाच ना तीस वर्षे संसार ?" बाबा म्हणाले.

" बाबा , तुम्ही या घराचे प्रमुख सर्वात मोठे वयस्कर आहात. रिमोट तुमच्याच हाती हवा. बंद करा सिरियल्स. " मी म्हणालो.

" बाळा , मला शांततेत मरायचे आहे. या वयात रिस्क घेऊ शकत नाही. " बाबा म्हणाले.

" म्हणजे ?" मी विचारले.

" तुझी आई आजकाल रात्री क्राईम पेट्रोल बघत आहे. " बाबा म्हणाले.