Aug 18, 2022
कथामालिका

भातुकली (भाग बारावा)

Read Later
भातुकली (भाग बारावा)

भातुकली (भाग बारावा)
  
 (चौकीतून बाहेर पडल्यावर सारा तिच्या कॉलेजला गेली. प्रोफेसर नरेश म्हणाला,"आशना,मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे."

आशना म्हणाली,"काय राहिलंय बोलायचं सर..लेट मी गो ऑन माय वे. आय विल नॉट अटर अ सिंगल वर्ड विच विल कॉज कंन्फ्लिक्ट्स बिट्विन यु अँड युवर डॉटर."

"आशना प्लीज मला थोड बोलू देशील? प्लीज आशना."
आता पुढे..)

"ओके"

प्रोफेसर नरेश आहुजा आशनाला एका कॉफीशॉपमधे घेऊन गेला. 

"आशना,मला खरंच गिल्टी फील होतंय. मी फक्त तुलाच नाही तर अजुन तिघीचौघींना फसवलं होतं व पैशाच्या बळावर सुटलो देखील पण नियतीने जबरदस्त चपराक लगावली माझ्यावर. 

माझा तरणाताठा मुलगा माझ्या डोळ्यासमोर विव्हळत मेला. 

ते दु:ख भोगतच होतो तर बायकोला स्तनाचा कर्करोग उद्भवला. ती वर्षभर कर्करोगाशी झुंज देत होती अखेर ..अखेर तीही गेली मला सोडून. 

आता ही सारा तेवढी आहे पदरात माझ्या. सारा वयात आल्यापासून मला भिती वाटते नुसती. नियती माझ्या क्रुर क्रुत्यांचा बदला घेण्यासाठी साराला इजा पोहोचवेल याची. 

काल तू माझ्या पोरीला जीवदान दिलस..तुझे आभार मानायला शब्द अपुरे आहेत माझ्याकडे,"असं म्हणून प्रोफेसर आहुजा ढसाढसा रडू लागला. 

आशना म्हणाली,"प्रोफेसर तुम्ही मला फसवलात त्याबद्दल तुम्हाला माफ मी कदापि करु शकत नाही.

 भावनेच्या आवेगात मी वहावत गेले याबद्दल मी स्वत:लाही माफ करु इच्छित नाही.

 तुम्ही माझ्या वडिलांशी संगनमत करुन माझं एबोर्शन करुन घेतलत..ते करताना माझं गर्भाशय काढावं लागलं,मला कायमचं वंध्यत्व आलं. 

का म्हणून मी माफ करु तुम्हाला? तुम्ही माझं कौमार्य मला परत देऊ शकाल? माझं हरवलेलं मात्रुत्व मला परत देऊ शकाल?" असं म्हणून आशना तिथून बाहेर पडली.

पराग व चैत्राली सुट्टीचे दोन दिवस धरून तिच्या गावी, तात्यांना आणण्यासाठी गेले. आई गेल्यानंतर तिचं माहेराला जाणं तसं तुटक झालं होतं. 

तात्यांसाठी तिचा जीव तळमळायचा. बरेचदा तिला वाटायचं तात्यांना आपल्या घरी न्यावं पण घरात सासूबाई असल्याने,शिवाय घर लहान असल्याने ती तो विचार टाळायची. 

नाही म्हणायला उन्हाळ्याच्या सुट्टीत ती यशला घेऊन माहेरी यायची पण दोनचार दिवसासाठीच. त्यातही तिची वहिनी सुजाता तिच्यासमोर महागाईचा पाढा वाचून दाखवी. नवऱ्याचा कमी पगार,पदरातल्या दोन पोरी शिवाय हे सासऱ्याचं मुटकुळं याने तिचा जीव कसा मेटाकुटीला येतो ते सांगे. भाऊ तर आपल्याच रहाटगाडग्यात दंग असे.

गाडी फाट्यावरून गावच्या रस्त्याला लागली. श्रावण महिना असल्याने आजुबाजूला हिरवागार निसर्ग होता. नजर जाईल तिथवर पाचूचं रान वाऱ्यावर डुलत होतं.

 आकाशात इंद्रधनुची कमान अगदी कंपासपेटीतल्या कंपासाने अर्धवर्तुळ रेखाटावं व त्यात कुणी जाणत्या कलाकाराने अलवार रंग भरावेत तसं दिसत होतं. कितीतरी वेळ ती दोघंजणं माळरानावर बसून ते स्रुष्टीचं सौंदर्य डोळ्यात साठवत होती. 

यश रानफुलांवर भिरभिरणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांशी खेळत होता. डोंगरातून पांढरेशुभ्र धबधबे वहात होते. एकुणचं विलोभनीय नजारा होता. 

इतक्यात अगं नानू,तू कधी आलीस म्हणून आपुलकीची साद ऐकू आली. चैतूने मागं वळून पाहिलं. चैतूने आवाजावरून ओळखलं त्याला. तो भीका गवळी होता. त्याचा लेक गोपी व चैत्राली एकाच वर्गात होते. 

गोपीला चैत्राली आवडायची. चैतुला आठवलं ती नववीत होती. तात्यांनी तिच्या हट्टाखातर थोरल्या आंब्याला झोका बांधून  दिला होता. ती,साळू,माया,लली साऱ्या मिळून एकदा आळीपाळीने झोके घेत गाणी गात होत्या तेव्हा गोपीने पाठीमागून त्यांना जोरजोरात झोके देणं सुरु केलं. मुली बावचळल्या. त्याला शिव्या घालू लागल्या. 

गोपीला अधिकच चेव चढला. तो पाठल्या बाजूने झोक्यावर चढला तशा साळू,माया,लली भरभर उतरल्या पण चैतूला उतरता येईना व इतर मुली विनवण्या करुनही गोपी जोरात झोके घ्यायचा हट्ट सोडीना. 

चैतूला भोवळ आली व ती जमिनीवर पडली. तिच्या डोक्यात दगड लागून जखम झाली. रक्त येऊ लागलं. गोपी घाबरला. त्याने जवळची रुईची पानं तोडली व त्याचा डिंक त्या जखमेवर लावला. 

बाकीच्या मुली घाबरुन चैतूच्या घरी सांगायला गेल्या. नेमके चैतुचे घर बंद होते. गोपीने तिला मांडीवर घेतले व जवळच्याच एका पानाने तिला वारा घालू लागला.

 जरा थंड हवा लागताच चैतू उठली. गोपीच्या मांडीवर स्वतःला पाहून बावरली. गोपीने तिची माफी मागितली व घरी सांगू नकोस म्हणाला. एवढा मिसरुड फुटलेला तालमीत जाणारा गडी पण त्याची घाबरलेली अवस्था पाहून चैतूला हसूच आलं.

गोपीच्या मनात चैतूने घर केलं तर चैतुच्या मनात गोपीने. दोघांच्या एकमेकांकडे पहायच्या नजरा बदलल्या. चोरुन भेटीगाठी होऊ लागल्या, प्रेमाच्या आणाभाकाही घेऊन झाल्या. 

मांजर डोळे मिटून दूध पितं तेव्हा त्याला वाटतं आपल्याला कोणी पहात नाही तसंच या दोघांच चाललं होतं. ललीने चैतूच्या आईला चैतु व गोपीबद्दल सांगितलं.

 चैतूच्या आईने तिला चांगलाच दम भरला.
 त्याला भेटू नकोस अशी तंबी दिली तरी चैतू भेटत राहिली आणि एकदा चिवारणीमागे या दोघांना तात्यांनी पाहिलं मात्र त्यांनी चैतूला चाबकाने फोडून काडलं व तिला पुढच्या शिक्षणासाठी काकांकडे शहरात पाठवलं.

 सुट्टीत ती गावी यायचा प्रयत्न करायची पण तात्यांनी सक्त मनाई केली होती. चैतूच्या भावाच्या लग्नालाही तिला घरी यायला दिलं नव्हतं तात्यांनी. ती बी ए झाली तसं तिचं लग्न लावून दिलं होतं तेही काकांच्या घरी. 

लग्न झाल्यावर मात्र चैतू परागसोबत माहेरी जायची तेव्हा माळरानावर गोपी म्हसरं घेऊन बसलेला दिसायचा. तिच्या ह्रदयात कालवाकालव व्हायची,डोळे भरुन यायचे. 
आज भिकाने तिला साद घातल्यावर सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर तरळल्या. 

"भिकादादा,गोपी कुठे असतो हल्ली?"

"अगं पोरी,गोपीनं पांग फेडले बघ माझे. बी ए का काय झाला. कसली परीक्षा दिली. एकदोनदा नपासव झाला पण धीर नाय सोडला गड्यान. बँकेत हाफिसर झालाय गडी. 

आता गाडी,बंगला सगळ हाये. लगीन मातर केलं नाय गड्यान. 

बरं,आलीच ऐस तर तात्यांना चार दिस घिऊन जा. शाप जवळ आलैत बघ. तुझी आई लक्ष्मी होती गं बाय. खूप देवाच्या गुणाची. नेहमी हात वर असायचा तिचा. देवाला चांगली माणसंच आवडतात. असो. 

चैत्राली भिकादादाच्या पाया पडायला वाकली तसा परागही वाकला. भिक्याने त्यांना तोंड भरुन आशिर्वाद दिला. भिक्याच्या लालतांबूस पाड्याशी यश खेळत बसला होता. भिक्याचा निरोप घेऊन ती तिघं गाडीत बसली व घराकडे येऊन उतरली.

(क्रमशः)

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now