भारद्वाज.अलक

भारद्वाज अति लघु कथा.

भारद्वाज(अलक)

©®राधिका कुलकर्णी.

अंब्याच्या झाडात सळसळ ऐकु आली तसे चारूहासने कान टवकारले.नुकतीच सकाळ झालेली.तोंड धुवुन तो हातच पुसत होता तेवढ्यात झाडावरच्या पानांच्या हालचालीने तो सवयीने त्या डेरेदार वृक्षाखाली उभा ठाकला.ही त्याची रोजचीच सवय.तोंड धुतले की अंब्याजवळ घुटमळायचे आणि भारद्वाजाचे दर्शन करूनच दिवसाची सुरवात करायची.खूप बारकाईने निरीक्षण करूनही त्याला फक्त लाल डोळा चमकताना दिसला पण भारद्वाजाचे दर्शन काही झाले नाही.मन हिरमुसले आणि तो तसाच माघारी फिरला.त्याची पाठ वळताच प्रचंड फडफड जाणवली तसे तो गरकन वळला पण पून्हा सामसूम.पक्षीराजांचा मागमूसही दिसत नव्हता.

ऑफीसला जायची घाईही होतीच.तसाच नाद सोडून तो न्हाणीघरात गेला.घंगाळात बंबातील गरम पाणी सोडून तिथेच दगडी चौरंगावर बसुन स्नान उरकले.पूजाही आटोपली.दूपारच्या जेवणाचा डबा डिकीत ठेवुन त्याने गाडीला किक मारली.गाडी सुरू करून आता निघणार तोच कडूलिंबावर तोच लाल ठिपका पानातुन डोकावला.तो पून्हा सावरला.गाडीचा आवाजही न होऊ देता लिंबाखाली आला.सभोवार नजर फिरवली परंतु पून्हा तीच निराशा.भारद्वाज कुठे तरी दडी मारून लपंडाव खेळत होता चारूहास बरोबर.रोजचे दर्शन केल्याखेरिज दिवसाची सुरवात होत नसलेला चारूहास आज खट्टू होऊन काहिशा निराशेनेच ऑफीसला पोहोचला.

गाडी पार्क करून आत आला.आज ऑफीसमधे लगबग चाललेली.जो तो अपटूडेट अवस्थेत आपापल्या जागी अलर्ट पोझिशनमधे स्थानापन्न झालेला.चारूहासने नेहमीच्या ड्रॉवरमधे लंचबॉक्स आणि सॅक टेकवून आपल्या क्युबिकल मधे बसला.पासवर्ड टाकुन लॉग इन होतोय तोच वसंताने गरमा गरम चहा आणला.सगळ्यांना सर्व्ह करत शेवटी चारूहासच्या टेबलवर चहा टेकवतच तो मोठ्यांदा बोलला.

"भारद्वाज आया।"

चारूहासचे कान खडे झाले.

 "कहाँ है?" काहीशा आश्चर्यातच त्याने इकडे तिकडे नजर फिरवत वसंताला विचारले.

"वो देखो गेट के पास।" असे म्हणतच लगबगीने वसंता गेटकडे गेला.उत्सुकतेपोटी चारूहासही वसंताच्या मागोमाग गेला.सकाळी निसटलेले दर्शन आता होणार ह्या कल्पनेने हुरळलेला चारूहास गेटकडे येऊन सभोवार नजर फिरवला.परंतु भारद्वाज तर दिसतच नव्हता कुठेही.

गेटच्या दिशेने बघताच बॉस गाडीतुन उतरत असताना त्याला दिसले.बॉस बरोबर अजून एक तरूण तडफदार साधारण चारूहासच्याच वयाचा युवक वर चालत येताना दिसला.पण भारद्वाज…....???

तो कूठे होता??

अधिरतेने चारूहासने पून्हा बाजूलाच उभ्या असलेल्या वसंताला विचारले,"कहाँ दिखा तुम्हे भारद्वाज?मुझे तो नही दिखाई पड रहा!!"

काहीशा विचित्र नजरेने आपादमस्तक चारूहासला न्याहाळतच वसंता उत्तरला,"वो क्या पूराने ब़ॉस के साथ नया बॉस आ रहा है ।..वही तो है भारद्वाज…….!!

मनाशी हसत शकुनाची परडी उचलत चारूहास आपल्या क्युबिकलकडे वळला.

-----------------------(समाप्त)---------------------------

समाप्त

©®राधिका कुलकर्णी.

🎭 Series Post

View all