भरारी

कथा एका गृहिणीची

"आई माझा डब्बा दे लवकर" कॉलेजला उशीर होतोय गं." नितू आपल्या खोलीतून बाहेर येत म्हणाली.
"आले बाळा" असे म्हणत विदुला स्वयंपाक घरातून डबा घेऊन बाहेर आली.

"नितू..थोडा स्वयंपाक शिकून घे आता. कॉलेजचे हे शेवटचे वर्ष. हा.. हा म्हणता लग्न होईल तुझे. निदान पोटपुरता तरी स्वयंपाक यायला हवा आता."
"नाही हा आई.. मला काही तुझ्यासारखी गृहिणी नाही व्हायचं. काय ते नुसतं दिवसभर स्वयंपाकघरात राबायचं! रांधा वाढा, नी उष्टी काढा. लग्नानंतर म्हणशील तर, मी मस्तपैकी जॉब करेन. फार तर घरकामाला एखाद्या मावशी ठेवेन."
हे ऐकून विदुलाने कपाळावर हात मारून घेतला. 

"हे काय नवीनच आता?" आजी देवघरातून बाहेर येत म्हणाली. "गृहिणी होणे तितके सोपे नाही नितू. घरात अगदी बारीकसारीक गोष्टीतही लक्ष असावं लागत. जबाबदारीच काम असतं ते. ऑफिसमध्ये जाऊन दिलेलं काम करण्याइतपत नक्कीच सोपं नाही हा हे पद. तुझ्या आईकडेच बघ, घर किती छान सांभाळते ती! आणि आई म्हणते तर शिकून घे घरची चार कामं. अडत नाही मग कुठे."

हे ऐकून विदुलाने आश्चर्याने आपल्या सासुबाईंकडे पाहिले. इतक्या वर्षात त्यांच्या तोंडून कौतुकाचा एक शब्दही बाहेर पडला नव्हता तिच्यासाठी. पंचवीस वर्षापूर्वी विदुला लग्न करून सानेंच्या घरी आली. 'नव्याचे नऊ दिवस' याप्रमाणे सासूबाईंनी तिचे कोड कौतुक केले. नंतर मात्र सारा संसार तिच्या ताब्यात देऊन टाकला. ते ही सासरच्या रीतिभाती न शिकवता, न समजावता. 

मात्र विदुलाचे सासरे हौशी होते. त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या तिला. अगदी स्वयंपाकापासून ते आवश्यक असणारी छोट्या छोट्या उपकरणांच्या दुरुस्ती पर्यंत. त्यामुळे तिचं फारस अडलं नव्हत कधी. पण नवरा सतत फिरतीच्या कामावर. घरची कामे झाली की वेळ जाणे मुश्किल व्हायचे तिला.

बघता बघता मुले मोठी झाली. विदुलाच्या मोठया मुलाने, निरंजनने आपल्या आईकडून थोडा फार स्वयंपाक शिकून घेतला होता. काळाची गरज म्हणून. मग तो दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेला. आता नितूने संसार उपयोगी चार कामे शिकावीत अशी तिची अपेक्षा चुकीची नव्हती.

नितू कॉलेजला गेली, तशा सासुबाई विदुलाला म्हणाल्या, "माझं चुकलंच जरा. तुला न समजून घेता मी सारी जबाबदारी तुझ्यावर सोपवली अन् एक सासू म्हणून या घरच्या प्रथा, परंपरा शिकवल्या देखील नाहीत. जेमतेम विशीची होतीस गं तेव्हा.

तू मात्र निगुतीने, मनापासून सारं घर सांभाळलस!कधीही तक्रार न करता. गृहिणी होणं सोप नसतं बाई. मला आठवतय, तुझे सासरे एकदा म्हणाले होते, "आपल्या सुनबाईंना नोकरी करायची इच्छा आहे. घरचं सगळ आवरून जाईन म्हणते." पण मी काही परवानगी दिली नाही. माझी अटच होती की  'मला सून हवी ती घर सांभाळणारीच.' तेव्हा नाराज झालीस तू. तुझी होणारी तगमग पाहत होते मी. तरीही मी तुला नोकरी करू दिली नाही.

आता निरंजननेही आपल्या आजोबांसारख्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या, आत्मसात केल्या. ते एका अर्थी बरेच म्हणायचे. नितूने ही त्या शिकाव्यात हे नक्कीच बरोबर आहे. मी शिकवेन तिला सारं. तू अजिबात काळजी करू नको. आता तू..तुला हवं ते कर. नोकरी कर, शिकवण्या घे, आवडते छंद जोपास. हवं तर स्वयंपाकाला एखाद्या मावशी ठेऊ आपण."

विदुला हे सारं आश्चर्याने ऐकत होती. तरी मनावर दडपण होतेच. "या वयात कुठे काय करायचे आई!" झालं गेलं विसरून गेले मी केव्हाच. मला हेच आवडू लागल आहे सारं..आणि आता अंगवळणीही पडलं आहे."

"असं कसं? जबाबदारी पडली की तीच आवड बनते आपली. इतकी वर्षे माझे ऐकत आलीस. आता हे ही ऐक. माझी चूक सुधारण्याची संधी दे मला. पंखात बळ असे पर्यंत भरारी घ्यायला कसले आले वयाचे बंधन?"

विदुला मनातून सुखावली. मुले मोठी झाली आता. ती आपापल्या वाटेने जातीलच. या वयात नोकरी करायची इच्छा नव्हती तिची. कॅनव्हासवरचे आवडणारे रंग ही सुकून गेले होते कधीच. पण मनाच्या कप्प्यात बंद करून ठेवलेली 'लेखणी ' तिला खुणावू लागली. पुन्हा एकदा शब्दांची सोबत हवीहवीशी वाटू लागली तिला.

"इतक्या वर्षांनी..सुचेल का काही! प्रयत्न करायला हरकत काहीच नाही..असे म्हणत तिने आपलीच कथा लिहायला घेतली...भरारी नावाची.