भांडकुदळ

The story of a old mother who wants to get only love from her son and his family. She wants some respect from her daughter-in-law. She wants to play with her grandchildren because she feels very alone in the village. Nobody have been talking with her

भांडकुदळ

              “ आगं ये भटक भवान्यानु... तुमाला माजंच वावार दिसलं व्हय गं कुथमिर चोरून न्येला ? आं... आन म्या दोडा रोज माज्या मनाला म्हंतीया... बया... डुकरं बिकरं लागली का काय माज्या रानाला. रोजच्याला बया कशी कुथमिर गायीब व्हतीया इथनं...? आन आवदश्यानो... तुमी रोजच्याला यिवून... इथनं कुथमिर निवून... तोपलं घर भरतयासा व्हय गं छिनाल्यानो ? आं... परत जर इथं दिसलासा कनाय तर यकीयकीची साडीचं फेडून घिन म्या... हां... सांगून ठिवतीया... चोरट्या कुठल्या... निगा घरला गुमान... आता पुना हात तर लावून बगा की... मंग मी हाय आन तुमी हाय. माज्या इतकी वंगाळ बाय आख्ख्या गावात बी गावायची नाय तुमाला... हां...सांगून ठिवतीया.” बायजाबाय नाक फुगवून कमरंला पदर खोचता खोचता तिज्या रानातनं कुथमिर उपटून नेणाऱ्या बायकांना बगून म्हणली. तश्या समद्या बायका बायजाबायच्या रानातनं मागारी फिरल्या आन गुमान तोंड लपवत लपवत गावच्या रस्त्याला लागल्या.
              तेवढ्यात सुमी धुसफूसत वैजीला म्हणली,“ ही मातारी लईचं खाष्ट हाय बया... डुचकी मेली. खपंना बी झाली पाटदिशी. हिज्या तिरडीचा मोडला बांबू निवून म्हसणवाट्यात यकदाचा. आता कुथमिरीचं धा मॉड घ्येतलं तर काय हिज्या झुळीत धोंडा पडतुय व्हय गं ? आं... यकर बर हायकी म्हणावं उरावं न्येला तुला थेरडे... आन पाटलीण म्हणं पाटलीण... कशाची गांडीची आलीया पाटलीण... ही पासली हाय यक नंबरची... पासली. माणूस बगायचं न्हाई कानुस बगायचं न्हाई... तोंडाचा पट्टा यकदा चालू केला की तिला दमचं न्हाई कुतरीला. ” 
                “बया सुमे... काय पण काय बोलतीस गं. माहित्ये ना हेंगाड़ी बाय हाय ती. कशाला तिज्या नादाला लागायचं मंग उगाचं. फाटक्या तोंडाची हाय ती मातारी आन वरनं पाटलीण बी हाय गावची. तिनं जर आयकल ना तर चार चौघात उगाचं फजिती करंल तुजी." वैजी सुमीचं बोलणं सावरून घेत म्हणली. 
                 “हंम... मी कशाला काय बोलतीया बया तिला. कंच्या देवानं सांगितलंय आपल्याचं पायावं आपुन धोंडा मारून घ्येला. पर मगाशी माज डोक्सं लईचं तापल्यालं बग. म्हणून तोंडातनं गेलं पाटदिशी माज्या. पर मी काय म्हंते ?... काम्हून समद्या गावासंग भांडत आसलं ही बया. गावात यक घर ठिवलं न्हाई हिनं बिन भांडायचं. हिज त्वांड सारखंच का बरं हागाय गेल्यालं आसतं कुणास ठावं ? जलमाची भांडकुदळ हाय ही बया.” सुमी डोळं मोठं आन त्वांड बारीक करत वैजीला म्हणली.
               त्या दोघींचं खुसफासणं कमळीनं आयकल आन मंग कमळी त्या दोघींला म्हणली, “आगं तुमी समजताय तशी नव्हती बायजाबाय आधी. लय निर्माळं आन गॉड मनाची हुती. थोरल्या पाटलाची बायकू म्हणून समदा गावं त्येंला ‘ बडी ’ म्हणून हाक मारायचा. आन बायजाबाय वागायची बी तशीचं. आगदी सगळं जिथल्या तिथं. मापात बोलायची, खेळीमिळीनं ऱ्हायाची. कुणासंग म्हंजी कुणासंग बी भांडायची न्हायी. आपलं तर आपलं... पर कधी दुसऱ्या कुणाचं पॉर उंबऱ्याला आलं तर त्येज्या हातात खायाला ठिवल्याबगर त्येला मागारी जाऊन द्येची न्हायी. लेकरांबाळानला तर लय जीव लावायची. तिज्या घरातनं तर न्हाईचं गेलं कधी कुणी मोकळ्या हातानं पर रानातनं बी कधी कुणाला तिनं मोकळ्या हातानं जाऊन दिलं न्हाई. "
              “आन मंग आताचं का ही बया आंगात फेफरं भरल्यागत करतीया... आं ?” सुमीनं कमरंच्या डाव्या आंगाला घितल्यालं घम्यालं उचलून उजव्या आंगावं घितलं आन डोळं इस्फारून कमळीला इचारलं.
               “आगं पोटच्या पोरामुळं तिजी आशी आवस्था झाली बग." कमळी सुमीला उत्तर देत म्हणली.
               “ आं... आन ती गं कशी ? ” सुमीला नवल वाटल्यानं तिनं पुना कमळीला इचारलं.
               “आगं तिज्या पोरावं तिजा लय जीव हुता. यकुलत यक आसल्यामुळं त्येला ल्हानपणापास्नं काय बी कमी पडू दिलं न्हाई तिनं. जवा थोरलं पाटील वारलं तवाबी बायजाबाय खचली न्हाई. सोत्ता रानामाळात, उन्हातान्हात खपून तिनं इकाश्याचं शिक्षण पुर केलं. आगं इकास लग्नाला येईस्तोवर दुधाचा गलास घिवून त्येज्या मागं मागं पळायची ही बायजाबाय समद्या गावातनं. पर इकाश्याचं लग्न झालं आन त्यो त्येज्या आईला परका झाला. त्येजी बायली म्हंजी त्येज समदं जग झालं. आन त्येजी आय म्हंजी त्या जगात फुकाट ढवळाढवळ करणारी फकस्त यक बायी. आय न्हायी. लगीन हुन चार महिनं बी झालं न्हायती का तवरंच त्येनं ममय गाठली. आन गेल्यापास्नं आज पंधरा वरीस झाली पर त्यो यकदा बी मातारी जिती हाय का मेली त्ये बगायला बी आला न्हाई.
               तीन तीन पोरं झाली त्येला पर बायकूच्या सांगण्यामुळं फैल गेलेल्या त्या बैलानं यका बी नातवाचं त्वांड त्येज्या आजीला दाखिवलं न्हायी. त्या माताऱ्या जीवाला काय वाटंत आसलं बरं सांग तूच आता. या वयात तिला तरी दुसरं कशाचं सुख पायीजे सांग बरं मला. आगं वर वर लय राग करती मातारी पर आंतन पार खचून गेलीया गं ती. फकस्त मरणाची वाट बगतीया बग. कुणाच्या पोटाला आसा पोरगा दिव न्ये गं देवानं बाय माजे... कुणाच्याचं पोटाला दिव न्ये बग.” बोलता बोलता कमळीच्या डोळ्यांत पाणी उभं ऱ्हायलं.
              आन तेचं पाणी फिरून पुना सुमीच्या आन वैजीच्या बी डोळ्यांतनं तराळलं. ऐन म्हातारपणात बायीच्या हक्काचं ह्ये सुख कुण्या लांडग्यानं हिरावून घिवू न्ये भवतेक हेच त्या पाण्याला समद्या जगाला वरडून सांगायचं हुतं. तवापास्नं सुमीच्या डोळ्यांत बायजाबायबद्दल राग न्हायी...फकस्त मयाचं दिसली वैजीला. त्येंला बी कळून चुकलं का बायजाबाय भांडकुदळ बायी न्हायी...तर माणसांच्यावं डोळं झाकून इस्वास ठिवणारी, ह्या सॉर्थी दुनियेकडनं सोत्ताची फसवणूक करून घेणारी आन फकस्त खऱ्या पिरमासाठी आसुसल्याली यक कमनशिबी आय हाय त्ये.

----- विशाल घाडगे ©™✍️