भांडा सौख्य भरे.....

Short story of husband and wife's sweet & salty relationship..

# भांडा सौख्य भरे....

©® आर्या पाटील

*******************************************

" काय हो , काय झालं असेल ?.. कधी एवढे भांडत नाहीत हे दोघं.. मी जाऊन बघू का?" शांताताई दिलीपरावांना म्हणाल्या आणि पंच प्राण एकवटून त्यांच्या रुममधून येणाऱ्या आवाजाचा कानोसा घेऊ लागल्या..

" शांता, तु तिकडे लक्ष नको देऊस.. नवरा बायको आहेत ते..रात्री भांडतील सकाळी एक होतील... उगा त्यांच्यात कशाला पडतेस ?.. तु झोप जा जाऊन.." त्यांना समजवत दिलीपराव म्हणाले..

" खरं आहे.. पण ते कधी एवढ्या जोरात भांडत नाहीत.. नक्कीच काही तरी मोठ कारण असेल.. विनय आपला एकुलता एक लेक आहे.. त्याचा त्रास नाही बघवत.मी जाते..." वाढलेला आवाज त्यांना स्वस्थ बसू देईना.. शेवटी त्या उठल्याच... आणि रुमकडे निघाल्या.

" अगं ऐक तरी नको जाऊस... त्यांच्यात नको पडूस.." दिलीपराव मागून म्हणाले.. पण त्यांच्या एकाही शब्दाला आपल्या कानात थारा न देता त्या दरवाजाजवळ पोहचल्या.. थोडा वेळ थांबत निश्चयाने त्यांनी दरवाजा वाजवला..

आतला आवाज थोडा वेळ थांबला... त्यांनी पुन्हा दरवाजा वाजवला..

शेवटी विनयने दरवाजा उघडला.. आईला समोर पाहून तो आणखी भडकला..

" आई, बरं झालस आली.. हिची नाटकं असतात नेहमी... असं वाग, तसं वाग... माझ्या आईला मी कधी मदत केली नाही.. ती नाही भांडली माझ्याशी.. हिच्या अपेक्षा जरा जास्तच वाढल्या आहेत.. नुसती कटकट.. आज असं कर तर उद्या तसं.. सगळं हिच्या मनाने वागायचं का ?..." रागारागात विनय म्हणाला.. 

आता तिचा म्हणजेच प्रियाचाही राग अनावर झाला.. दोघांमध्ये ठिक होतं पण आज सासूच्या समोर आपल्याला बोललेलं तिला पटलं नाही..

तिनेही त्यांच्यासमोरच विनयला सुनावलं... दोघांची तु तु मैं मैं इतकी शिगेला पोहचली की त्यांना बाहेर उभ्या असलेल्या शांताताई आणि दिलीपरावांचाही भान राहिला नाही...

शेवटी शांताताई प्रियाकडे पाहत म्हणाल्या,

" तु तरी कमीपणा घे गं प्रिया... बाईच्या जातीला असं भांडणं शोभत नाही..."

त्यांचे हे वक्तव्य प्रियाच्या जिव्हारी लागले.. ती तशीच रुममध्ये गेली आणि पांघरुण ओढून रडू लागली..

" विनय, जा आत जा... समजाव सूनबाईला.. उगा भांडू नकोस.." दिलीपराव म्हणाले..

" काही गरज नाही.. उद्या होईल ती व्यवस्थित.. जाऊन झोप.. उद्या कामावर जावं लागेल ना..?" त्याच्या पाठीवर हात ठेवत शांताताई म्हणाल्या.

विनयही जाऊन झोपला.. काही वेळाने त्याचा घोरण्याचा आवाज प्रियाला बेजार करू लागला.. ती अजूनही तशीच पांघरुण ओढत रडत होती.. पहाटे पहाटे डोळा लागला असेल तिचा..

सकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे विनय कामावर निघून गेला.. प्रियाला उठायला थोडा उशीर झाला.. घाईघाईने आवरत ती ही ऑफिसला निघाली तोच शांताताई रूममध्ये आल्या.

" प्रिया काही खाऊन घे उपाशी नको जाऊस.. विनय गेला तसाच उपाशी.. त्याला डब्बापण दिला नाहीस आज.. आणि काय गं कशाला भांडतेस माझ्या लेकाशी..? किती टेन्शनमध्ये होता तो.. गाडी घेऊन कामावर जातो.. तुझ्या टेन्शनपायी माझ्या एकुलत्या एक लेकाला काही झालं तर?.. कोण आहे माझं दुसरं..?" डोळ्यांना पदर लावत शांताताई म्हणाल्या.

आता मात्र प्रिया मनातून पूर्णपणे खचली.. फक्त आपल्या लेकापुरती मर्यादित राहणाऱ्या शांताताईंना ती रागातच म्हणाली..

" तुमचा लेक एकुलता एक आहे आणि मी अशीच आहे का हो बेवारस.. माझ्या आईवडिलांना माझी काळजी नाही का.? विश्वासाने माझा हात विनयच्या हातात देणाऱ्या त्यांना मी जड नाही.. मुळात नवरा बायकोच्या भांडणात तिसरा व्यक्ती जेव्हा पडतो तेव्हा ती गोष्ट आत्मसन्मानावर येऊन पोहचते.. आमच्या भांडणांच कारण काहीही असो तुम्ही त्यात नव्हतं पडायला पाहिजे.. माझा आत्मसन्मान मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे.. मी आता एक क्षणभरही नाही थांबू शकत इथे.."

" ये बाई आधी तुझ्या नवऱ्याला येऊ दे.. मग तुमचं तुम्ही ठरवा.." त्या रुक्षपणे म्हणाल्या..

" शांता, तुला काहिच कसे वाटत नाही गं असे बोलतांना?.. आता एक शब्द जरी बोललीस तर याद राख.." रुममधून बाहेर येत दिलीपराव म्हणाले..

त्यांच्या आवाजाने शांताताई गप्प झाल्या आणि निमूटपणे रुममध्ये निघून गेल्या..

मघापासून स्वत: ला सावरलेल्या प्रियाचा ताबा मात्र सुटला.. ती रडू लागली..

तिला शांत करत दिलीपराव म्हणाले,

" प्रिया, विनयच्या आईचं बोलण नको घेऊस मनावर.. ती तशीच आहे.. कुठे काय बोलावे नाही कळत तिला.. तु उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस.. तुमच्यामध्ये काहीही वाद असो पण विनयने त्याचा तमाशा नको करायला होता.. मला माहित आहे तो खूप हट्टी आहे... स्वत: च्या मर्जीने वागणारा आहे, एकुलता एक असल्याने जास्तच लाडावलेला आहे.. पण एक गोष्ट सांगू.. त्याचं खूप प्रेम आहे गं तुझ्यावर.. सकाळपासून दोन वेळा फोन करून तुझी चौकशी केली त्याने.. आईचा स्वभाव माहित आहे त्याला म्हणून मलाच तुझ्याकडे लक्ष द्यायला सांगितल.. तो १००% चुकतो.. पण म्हणून चुकणाऱ्या व्यक्तीला सुधारण्याचा हक्क नाही का द्यायचा?.. हळूहळू सुधारेल तो... तु फक्त त्याच्यासोबत रहा.." प्रियाच्या डोक्यावर हात ठेवा दिलीपराव म्हणाले..

तशी ती एकदम शांत झाली..

" बाबा, विनय एवढाही वाईट नाही हो. खरच त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर.. कधीकधी माझचं चुकतं.. उगाचच मी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत बसते..." माघार घेत ती म्हणाली..

" खूप समजुतदार आहेस प्रिया...हाच समजुतदारपणा नात्याला टिकवतो गं पोरी.. सदा सुखी रहा .." म्हणत दिलीपराव घराबाहेर पडले..

अगदी तासाभरातच ते एका हॉटेलमध्ये पोहचले.. तिथे आधीच त्यांची वाट पाहत विनय बसला होता..

" बाबा, प्रिया ठिक आहे ना ? असे अचानक का आलात..?" विनय म्हणाला.

" सगळं ठिक आहे.. फक्त तुला समजुतदारपणा दाखवायची वेळ आली आहे बघ.. विनय, नवरा बायको भांडणारच.. भांडल्याशिवाय प्रेमही वाढत नाही.. रात्री भांडभांड भांडतात आणि दुसऱ्यादिवशी गोड होतात.. जणू काही झालच नाही... पण तेच भांडण जेव्हा तिसऱ्या व्यक्तीच्या समोर होतं तेव्हा मात्र आत्मसन्मान दुखावला जातो.. आणि ती व्यक्ती तुझी आई असेल तर विचार कर प्रियाची काय अवस्था झाली असेल..? तिने कधी तिच्या आईला सांगितलय का तुमच्यामधील भांडण..? मला तरी नाही वाटत... म्हणून सुखी संसाराचा कानमंत्र ऐक..नवरा बायकोचं भांडण तुमच्या रुमच्या चार भिंतीतच ठेवा... आणि आईचं काय सांगत होतास... तुझी आई तुला काहीच करू देत नाही... बरोबर ना.. मग प्रियाच्या बाबतीतही तिची आई नक्कीच तसच वागली असणार... ती पण एकुलती एक आहे.. तिला ही तिच्या आईवडिलांनी लाडात वाढवलं असणार... पण ती आता समायोजन करतेच ना.. आपल्या आईवडिलांना सोडून कायमची या घरी आली... बायको, सुन यांची जबाबदारी स्विकारली.. आपली नोकरी सांभाळत घर सांभाळण्याची कसरत करू लागली.. आपल्या सर्वांच्या आवडी निवडी जपू लागली.. तिला तरी कुठे होती घर संसाराची सवय.. पण तिने सवय लावली ... मग तिच्यासाठी तु स्वत: ला थोडही बदलू शकत नाहीस का ? संसार दोघांचा मग तडजोड का एकटीने करायची..? मी नाही का तुझ्या आईला मदत करायचो.. मग तु थोडासा हातभार लावलास तर काय हरकत आहे... बाकी तु हुशार आहे.. नात्याचं चांगल वाईट तुला खूप चांगलं कळतं.." दिलीपराव म्हणाले आणि परतीला लागले..

विनय मात्र बराच वेळ तिथेच बसून होता... आपल्या संसारासाठी चांगलं वाईट पडताळत.. शेवटी मनाशी निश्चय केला आणि तो ऑफिसला परतला..

इकडे घरी पोहचल्यावर दिलीपरावांनी आपला मोर्चा शांताताईंकडे वळवला...

त्या रागावून रुममध्ये निजल्या होत्या...

" शांता, अगं ऐकलस का..?" ते म्हणाले..

पण रागात असणाऱ्या शांताताईंनी त्यांना प्रतिउत्तर दिले नाही..

" आई गं.. खूप छातीत दुखतय.. पाणी...पाणी" ते मुद्दामहून ओरडले..

तश्या शांताताई उठल्या आणि बाटलीतील पाणी ग्लासात ओतू लागल्या.. तेवढ्यात दिलीपरावांनी हातातला गजरा त्यांच्या आंबाड्याला माळला..

" हे काय.. किती घाबरले मी! तुम्ही पण ना.." हाताने गजरा चाफत त्या म्हणाल्या..

" हा एकच उपाय आहे..नाही नाही रामबाण उपाय तुझा रुसवा घालवण्याचा.. अजूनही किती गोड दिसतेस..." त्यांना न्हाहाळत दिलीपराव म्हणाले..

" इश्श... तुमचं आपलं काहीतरीच... पण तुमच्या याच गोष्टीवर तर भाळले मी... खूप नशीबवान आहे मी जो तुमच्यासारख्या जोडीदार मला मिळाला.." त्यांचा हात हातात घेत शांताताई म्हणाल्या.

" आपला विनयही खूप नशीबवान आहे बघ जो त्याला प्रिया सारखी गुणी बायको मिळाली.. शांता, प्रिया खरचं गुणाची आहे गं.. तु उगा तिला एवढं सुनावलस.. खरं सांगु राग नको मानूस पण त्यांच्या भांडण्याला तुच जबाबदार आहेस.. प्रत्येक वेळेस काय गं विनयला आपल्या पंखाखाली झाकायचं... घेऊ दे ना त्याला त्याची जबाबदारी... आपल्या जावयाने लेकीला मदत केली की अभिमान वाटतो तुला... म्हणतेस लेक खूप नशिबवान आहे जो मदत करणारा नवरा मिळालाय.. आणि तिच गोष्ट मुलाने केलेली नाही पटत तुला.. आपली सुनही नोकरी करते.. तिलाही नवऱ्याची मदतीची गरज आहे.. आणि त्यांच्या भांडणात नाक घुपसणं तर अतिशय अयोग्य होत.. नवराबायकोच ते..आज भांडणार उद्या एक होणार.. त्यात आपण हस्तक्षेप करायचा नाही गं.. किती सहज तु तिला माझ्या मुलाला काय झालं तर..? असं सुनावलस.. पण तुझा मुलगा तिचाही कुणीतरी लागतो.. ती ही कुणाची तरी मुलगी आहे.. शांता तु मनाने चांगली आहेस पण शब्दाने तोडतेस गं आपल्या माणसांना ...प्रिया आपली सुन नाही मुलगीच आहे याची प्रचिती नाही आली का तुला..? अगं लग्नाआधी आपल्यासाठी काहीही न घेणारा मुलगा लग्नानंतर तुझ्यासाठी साडी, माझ्यासाठी कपडे घेऊ लागला... आपले वाढदिवस साजरे करू लागला... हे का त्याने त्याच्या डोक्याने केले? तर नाही ते प्रियाने त्याच्याकडून करून घेतले.. आपल्या आवडीनिवडी त्याच्या रुपात तिने जपल्या आणि आज तु तिलाच परकं केलस.. बघ अजून वेळ गेली नाही... आपल्या सुनेला लेक म्हणून स्विकार... तुला लेकीची उणीव भासू देणार नाही पोरं.." दिलीपराव म्हणाले..

आता मात्र शांताताई पूर्णपणे ओशाळल्या... आपल्याच वागण्याचा पश्चाताप अश्रू बनून नयनांतून ओघळू लागला... त्यांनी प्रियाची माफी मागितली.. 

तिनेही "तुम्ही मोठ्या आहात.. मला ओरडण्याचा तुम्हांला हक्क आहे"म्हणत त्यांना आलिंगन दिले..

संध्याकाळी विनयही लवकरच घरी परतला.. दिलीपरावांचाच मुलगा तो त्यांच्यावरच जाणार.. पांढऱ्या, सुवासिक मोगऱ्याचा ताजा गजरा प्रियाच्या मोकळ्या केसांत माळत त्यानेही तिची क्षमा मागितली.. तिनेही एक पाऊल पुढे येत कान धरले.. शेवटी रात्रीच्या भांडण्याचा शेवट एकमेकांच्या गोड मिठीत झाला...

इकडे बाहेरून शांताताई आणि दिलीपराव आशीर्वाद देत मनातच म्हणाले,

" भांडा.... सौख्य भरे.."

*******************************************

कथा आवडल्यास नक्की कळवा.