भाज्यांची मजा (विनोदी)

If vegetables could talk they may had this conversation.




(मंडईत भाज्यांची सकाळी सकाळी लगबग सुरु असते. त्यात ही प्रकाश टाकावा अश्या रुपात भेंडी आणि गवार दिमाखात बसल्या होत्या. बाजूलाच बटाटेराव आपली काळी वर्तुळं लपविण्याच्या धांदलीत होते. इतक्यात तिकडून ब्रोकोली येताना दिसते)

टोमॅटो : ओ फ्लॉवरदादा....ऐकलंत का?अहो तुमची बहीण आली बघा.

ब्रोकोली: ए टोमॅटो.. दादा ला पाहिलंस का? फक्त त्याला भेटायला म्हणून आले आहे मी. काल संध्याकाळी ती बाई मला चारी बाजूंनी फिरवून पाहत होती तेव्हा कसा चेहरा पडला होता त्याचा पाहिलास नां. मला तर अगदी कसंतरीच झालं बघ.आता कुठे गेलाय ते सांग की लवकर.

टोमॅटो: अगं हो हो.. थोडावेळ बस.. जरा आराम कर ..येईल इतक्यात तो.

(काहीच वेळात फ्लॉवर आपलं उपरणं सांभाळत लगबगीने येताना दिसतो)

टोमॅटो: तो बघ आला तुझा दादा... आता बोल किती मनसोक्त बोलायचं तेवढं.. कालपासुन बोलली नसशील ना. मी आलोच जरा.

फ्लॉवर: अगं ब्रोकोली.. बाळ कधी आलीस? कशी आहेस? प्रवासात काही त्रास वगैरे झाला नाही ना?

ब्रोकोली: अरे दादा.. मला बोलू तरी दे. मी अगदी मस्त आहे आणि प्रवास देखील मस्त झाला. मी आणि मिरचीताई दोघी सोबतच आलो. काल तुझा चेहरा पाहू वाटत नव्हता बघ म्हणून लगबगीने आले तुझ्याकडे.

फ्लॉवर: अगं मुलगी म्हणजे कधी ना कधी सोडून जाणं आलंच. त्यात तुला तर मोठ्या मोठ्या घरातून मागणी येते मग नाही कसं म्हणणार आम्ही. तुझं तरी आयुष्य छान छान नवनवीन पदार्थांसाठी कामी येतं. नाहीतर आम्ही बघ.. लहान लहान मुलं देखील आमच्याकडे पाहून नाकं मुरडतात.

ब्रोकोली: असुदेत रे दादा.. मी येत जाईन तुला भेटायला सारखी.. मग तर झालं.

(ब्रोकोली आल्याचं कळल्यामुळे तिची मेथी आणि शेपू ताई, बटाटा आणि पालक काका सोबत भेंडी आणि गवार काकू सगळे भेटायला येतात)

बटाटा: अगं ब्रोकोली.. काय म्हणतेस. काकाची काही आठवण आहे की नाही... की विसरलीस आम्हाला...? तसं तुझ्यासोबत यायचंय बाई एकदा.. नाहीतर आमचं आयुष्यच गेलय म्हणा सतत तडजोड करण्यात.. सगळ्यांसोबत adjust व्हावं लागतं मला.. तेवढं तुझ्या काकूसोबतच माझं कधी पटलं नाही बघ... हा हा हा हा...

ब्रोकोली: ए काय रे काका असं म्हणतोस.. ती बघ आली भेंडी काकू .. आता तिने ऐकलं नसेल म्हणजे मिळवलं.

भेंडी: बघा.. ऐकटया ब्रोकोली च्या येण्याने वातावरण कसं प्रसन्न झालंय ते.. आहेच माझी गुणाची लेक. मेथी ला मी किती सांगते तुझा कडूपणा जरा कमी कर पण ऐकेल तर शपथ. तुझे काका सतत फिरतीवर असतात .. पण तू आलीस ना बरं वाटलं बघ.

मेथी: ए काय गं आई सतत मला कडूपणावरुन बोलत असतेस. असुदेत की असला तर कडुपणा. सर्वसामान्य माणसाला मी भरपूर आवडते. त्यामुळे मी जशी आहे तशीच आनंदी आहे. काही बदलणार नाही मी. पण ताई तू आलीस खूपच बरं वाटलं बघ मला.

पालक: खरं आहे... मुलगी घराचं घरपण राखते असं म्हणतात ते उगीच नाही. नाहीतर आमचा कांदा बघ नुसती मस्ती लागते त्याला. त्याला सांभाळणं म्हणजे अगदी अवघड काम आहे बघ. ज्याच्या कड़े जाईल त्याला रडवतो.

ब्रोकोली: ऐकेल रे काका तो.. आणि रडवत असला तरी असला लळा लावलाय त्याने सगळ्यांना सांगूच नकोस. तो नसेल तर जेवणाची चवच निघून जाते बघ. त्यामुळे करूदेत त्याला मस्ती. चालायचंच..!

गवार: तरी मी यांना सांगते बघ.. लहान आहे लेकरु अजुन..
पण ऐकतील ते कसले. त्यांना फक्त त्या पनीरचीच सोबत आवडते. मग कसे चिड़ीचुप होऊन बसतात बघ.

(इतक्यात एक बाई गाडीतून उतरते आणि ब्रोकोली ची मागणी करते. नेहमीप्रमाणे सर्वगुणसंपन्न ब्रोकोली तिला आवडते आणि ती बाई क्षणांत तिला घेऊन जाते)

समाप्त.☺️

©श्वेता कुलकर्णी♥️