भैरवी १

जान्हवी आणि सौमित्र एका अद्वैतातलं समर्पण ..हळुवार उलगडत जाणारी कथा..भैरवी भाग नं -१
"माझा फोन का घेत नाहीयेस सौमित्र ...?"
सौमित्र च्या हातातला चहाचा मग काढून घेतला जान्हवीनं ..."अग,सांडेल चहा ..असं काय करतेस ..?"सांडू दे ,आधी मला उत्तर दे माझ्या प्रश्नाचं ...?"
"केंव्हा केला होतास फोन..?"

" ते ही माहीत नाही ?..तीन दिवस झाले रोज तिन्ही त्रिकाळ फोन करतीय .जेंव्हा बघावं स्विच आँफ,जेंव्हा बघावं स्विच आँफ..."
" आहेस कुठे तू ?" "मी इथेच आहे ..याच रुम मध्ये ...रियाज करत होतो ..स्विच आँफ केलेला फोन ..."
"हो का..?रियाज ,रियाज,रियाज दुसरं काही सुचत नाही का तुला ...?मी आहे हे ही विसरला आहेस का ..?कोणत्या विश्वात जगतोस तुझं तुलाच माहीत ,तिथून परत आणणं मला जमेना झालंय .." "पण मग आणतेस कशाला परत ?,राहू देत कि कायमचा तिथेच ,त्या अनोळखी जगात ."
"माझा विचार करणार आहेस का कधी..?
तुझ्या या वागण्याला कंटाळलेय मी ..किती वाट पहायचीय मी ..?तुझं,संगीत ,तुझा रियाज ,तुझ्या मैफीली या पलीकडे काहीच नाहीये ..स्वतः भोवती गूढ वलय निर्माण केलयंस ..ते भेदणं अशक्य करुन ठेवलंयस मला ..एका वेगळ्याच तंद्रीत वावरतोस न स्वतःचं भान न आसपासच्या लोकांचं..."
" आज मला फाडून खाणार आहेस का? चवताळलेली वाघीण शिरलीय तुझ्यात .."
"हसू नकोस .सिरीयस आहे मी ."
"हो,का सिरीयस आहात तुम्ही ..?बोला मग काय म्हणणं आहे तुमचं ..?सगळी कामं बाजूला टाकतो ...recording आहे परवा ..
जाऊ देतच सगळं ..."
" Recording ? कशाचं ,बोलला नाहीस मला ते ...?" " तुम्ही बोलून दिलंत का मला बाई साहेब ...?म्हणून तर स्विचआँफ होता फोन .."
"अरे पण इतरांनी पोहोचायचं कसं तुझ्या पर्यंत ? हे काय नवीन खूळ ? आधी होतासच संपर्क क्षेत्रा बाहेर ,आता फोन ही संपर्क क्षेत्रा बाहेर झालंच कल्याण ..."
"कल्याण व्हायचंय अजून आपलं ..विचार करतोय करुन घ्यावं कि नको ...?"
" मनातलं बोललास ना ...? मनात नाहीच आहे तुझ्या ... मीच मागे लागलेय ..कधी कधी वाटतंय कि तू ध्रुव तारा आहेस तुझं आकाश
वेगळंय ,एका अशा ठीकाणी पोहोचलायस माझ्या आवाक्या बाहेरचा झाला आहेस .माझं असणं नसणं काही फरक पाडत नाही तुला ..मीच माझी समजूत करुन घेतीय कि थांबशील माझ्या साठी दोन पावलं तरी मागं येशील ..तुझा वेग गाठणं कठीण होतंय मला ..स्वतः भोवती अदृश्य वलय निर्माण केलंयस माझा प्रवेश निषिद्ध करुन टाकला आहेस ...."
" नाटकातले डाँयलाँग का ...?"
"सौमित्र सगळी चेष्टा वाटते तुला ..?कधी सिरीयस होणार आहेस तुझ्या बाबतीत ,आपल्या बाबतीत ..?"
"काय करायचं म्हणजे मी ..?सिरीयस व्हायचं म्हणजे नेमकं करायचं काय ...?"
" तू काहीच करु नकोस .मी च कुणाशी तरी जुळवते आता ,तुला काही पडलेलं नाही माझं ...जाते निघून आयुष्यातून तुझ्या "
" खरंच जातीयस का ...? इरादा पक्का है ,है नं आपका ? मैं दूसरी ढूँढ लूँगा ... शोहरत हमारी इतनी है कि आतें है चाहने वाले खिंचकर ...?"
" हो येतील ...पण मी नसेन.." दाटलेला हुंदका कसा बसा परतवत जान्हवी रुम मधून बाहेर पडली ... "अग,थांब ...चेष्टाही समजत नाही का ..? वेडा बाई कुठली ...!"
तो मागे येणार नाही हे माहीत असूनही दोन मिनीटं रेंगाळली तिथेच जान्हवी पण आपलं अस्तित्व त्याच्या साठी एवढंच आहे ...त्याच्या असण्याचं गृहीतक मांडत बसायचं ..ते चुकेल की बरोबर असेल याची खातरजमा ही करायची नाही ...याच्यात ईतकं गुंतणं परवडेल आपल्याला ...? की मर्यादांचे बांध फुटतांना खरंच कोसळू आपण ..?
अनभिज्ञ वाटांवरचं हे पिसाटलेपण घात करेल आपला ...?ईतकी पराकोटीची संभ्रमावस्था आज पर्यंत अनुभवली नव्हती..कुठेतरी थांबवावं का हे ?की तो समजून घेईल या एकाच आशेवर तुडवत रहायचं हे भावनांचं रुक्ष वाळवंट ?....
क्रमाशः .....
©लीना राजीव .

#भैरवी भाग-२

ईतक्या अस्वस्थतेतलं जगणं असह्य व्हायला लागलंय आता ...नक्की करावं काय ,या विचारात जान्हवीनं जिवश्च कंठश्च मैत्रीण स्वरा ला फोन केला ..."येतेस थोडा वेळ घरी ...? बोलायचंय ..."
"तुमने पुकारा और हम चले आए ,जान हथेली पे ले आए रे....!" "तुझी जान नकोय मला तू ये म्हणजे झालं " "आले ,आलेच ."
"तो आपकी लव्ह स्टोरी में ट्वीस्ट आया है और आपको मेरी जरुरत है ..क्या देंगी आप मुझे ...?इसके बदले में ...?अरे टाइम निकालना पडेगा ,रोज आना पडेगा , सस्ते में नहीं निपटा पाएंगी ..."
"राहू देत तुझा सल्ला, मी बघते माझं मी.."जान्हवीच्या डोळ्यातलं तरारणारं पाणी पाहून स्वरा हळवी झाली ...जानू काय झालंय ..?"
"सरू , मला एक सांग ,हा असाच वागत रहाणार आहे का ...?आज प्रेयसीच आहे याची उद्या लग्न झाल्यावर असा ८/८दिवस स्वतःला कोंडून रियाजच करत बसला तर माझं कसं व्हायचं ..? भ्रमिस्त होतो तो ,त्याला समोर कोण आहे कोण नाहीये याचं ही भान नसतं ..तंद्रीत असतो एका ..."
"ही गाण्याची ,संगीताची नशा चढली एकदा की उतारा आहे की नाही याला असं वाटतं ..जो स्वतःतच नसतो ,माझा काय होणार ...?"
" मी मैत्रीण आहेच जानू ,पण हितचिंंतक जास्त आहे .खोटा सल्ला देणार नाही ...
"तू सौमित्रच्या या अशाच भारावण्यावर लुब्ध झालीस जान्हवी ....तासन् तास तो रियाज करायचा ,काय तो पहाटेचा अहीर भैरव,विभास, तिन्हीसांजेचा मारवा
त्याच्या लयीत मिसळून जायचीस ..त्याचे आरोह ,अवरोह तूच झालीस ... एका अतृप्त सहजीवनाचं स्वप्नही त्याच्या नादब्रम्हातच पाहीलंस ...त्याचं उमलणं ,बहरणं तुझं होतं
त्याच्या हृदयाची स्पदनं तू छेडलीस ...आणि आता तक्रार करतीयस ...?त्याचं तसं असणंचं त्या वेळेला भान हरपायला लावायचं
तुला ...?आता काय झालंय ...?"
"तू म्हणतेस ते खरंय ...भुलून जायचे मी ..त्यानं लावलेला मंद्रातला सूर असो की एकदम खर्जातला कसं सांभाळतो वाटायचं ...
स्वतःला विसरणं त्याचं बेभान करायचं मला ...अद्वैताला सामावून घेण्याची लय बद्धता हृदय भेदून जायची ...ती एकतानता ,मंत्रमुग्धता गारुड घालायची .. पण आता साशंक होतं मन ...वास्तव आणि सत्य यांचा ताळमेळ लागत नाहीये...पैसा सर्वस्व नसला तरी जगण्यासाठी तो मिळवणं आवश्यक आहे ..ही कल्पना त्याला शिवतही नाहीये ...व्यावहारिक वागणं जवळ जवळ सोडून दिलंय त्यानं...भविष्याचा विचार करतोय तरी का असं सतत वाटत रहातं ..."
"पण हा विचार तू आधी करायला हवा होतास जान्हवी ...प्रेमात पडायच्या आधी ...संगीत सर्वस्व आहे त्याचं ,आत्मा आहे त्याचा तो ...तू माझा हो पण जगणं सोडून दे असं सांगणार आहेस त्याला ...? की त्यानं तसं वागावं अशी अपेक्षा आहे तुझी ...?
This is not fair .. ,मला वाटतं तू नाद सोडावास त्याचा ...तुम्ही एकत्र असावं हे आम्हाला हवंय पण कोणती कींमत मोजणार आहात दोघं ...? तो ही जगू शकणार नाही ..तू निभावू शकणार नाहीस.....
क्रमशः ......
© लीना राजीव .

🎭 Series Post

View all