भैरव-एक वादळं (भाग -9)

एक थरार.

भैरव- एक वादळ(भाग-९ वा)
सारंग चव्हाण
कोल्हापूर
९९७५२८८८३५.

मंजुळाच्या आयुष्यातुन भैरव निघून जावा यासाठी सावकार काहीपण करायला तयार होता आणि त्यासाठी कोणतीही किम्मत मोजायला तयार होता. भैरव आता आपल्याला वरचढ ठरत आहे आणि त्याच्यामुळे गावातली आपली हुकुमत संपुष्टात येइल अशी भीतीपण त्याला वाटत होती.
त्या रात्री सावकारान जो डाव खेळला तो भैरवला या गावापासून दुर नेणारा होता.
सावकारान पाठवलेली माणस  आता वाड्यावर परत आली सावकाराला ज्या वस्तु हव्या होत्या त्या त्यांनी आणल्या होत्या.
इकड भैरव पोलिसांच्या ताब्यात होता, कारण मंजुळा जोपर्यंत पोलिसांना खर सांगत नाही तोपर्यंत त्याला सोडल जाणार नव्हत.
आणि त्याच रात्री सावकारान आपली माणस कामाला लावली आणि तो आता सकाळ कधी होते याची वाट बघु लागला आणि बसल्या जागी त्याचा डोळा लागला.
सकाळी कोंबडा आरवल्यावर सावकाराला जाग आली.
त्यान अंघोळपाणी घेतल आणि चहा पिवुन तो मळ्याकड निघुन गेला. 
आता मंजुळा आणि तिची आई यांनी ठरल्याप्रमाण पोलिसस्टेशन गाठल.
मंजुळा पोलिसांना म्हणाली," साहेब मी मंजुळा, दामु सावकारांची पोरगी,मी स्वतःच घरातन निघून गेलेलो यात भैरवचा कायबी संबंध नाही, त्याला सोडा."
पोलिस म्हणाले," ठीक आहे आम्ही तसा जबाब लिहुन घेतो आणि मग सोडतो त्याला."
मंजुळा म्हणाली," साहेब मला त्याला एकदा भेटायच आहे,इथून बाहेर गेल्यावर मला भेटु नाही देणार कोण."
तिला परवानगी मिळाली आणि तिला आत सोडण्यात आल.
तिला बघून भैरवला सुखद धक्का बसला.
तो म्हणाला," तु इथ कशी काय? कुठ गेलेली तु? कोणी नेलेल पळवून तुला?"
मंजुळा हसत बोलली," आर थांब किती प्रश्न विचारशील?"               
भैरव अधीरपणे म्हणाला," काय झाल मला सगळ सांग, तुझ्या बापान माझ्यावर आळ घातलाय."
मंजुळा म्हणाली," समजल मला सगळ म्हणून तर तुला सोडवायला आलोय मी आणि आई."
भैरव म्हणाला," ते ठीक हाय पण बाकीच सांग लवकर."
मंजुळा म्हणाली," त्यारात्री सर्जा, हरीभाऊ,मी आणि आई आम्ही चौघांनी मिळुनच ते काम केल होत, कारण मला ते लग्न करायच नव्हत, मला फक्त तुझ्याशीच लग्न करायच हाय."
भैरव म्हणाला," उगा खुळी आशा बाळगु नको मंजुळा, तुझा बाप हे नाही होवु देणार. उगाच सगळ्यांना ताप  होण्यापेक्षा आपण एकमेकाला विसरून जावुया."
हे ऐकताच मंजुळाच्या डोळ्यातुन पाणी वाहु लागल आणि ती म्हणाली," जीवात जीव हाय तोवर तुला विसरणार नाही तुझ तु ठरव."अस म्हणत ती तोंडाला पदर लावत पळत बाहेर गेली.
आणि आईला म्हणाली," आई चल घराकड जावुया, इथ एक मिनिट थांबायच नाही."
आई म्हणाली," आग व्हय खर रडतीयास का? ते तरी सांग."
मंजुळ म्हणाली," काय नाही चल आधी."
आणि दोघी घरी निघुन गेल्या.
पोलिसांनी भैरवला सांगितल की,"तुझी सुटका करतोय आम्ही पण सावकाराच्या नादाला लागु नको, खतरनाक माणूस आहे तो.लांब रहा त्याच्यापासून."
ते अस सांगत असतानाच सावकार तिथ आला. तेव्हा पोलिस म्हणाले," सावकार तुमच्या मुलगीन स्वता जबाब दिलाय की भैरव निर्दोष आहे,त्यामुळे आम्ही त्याला सोडुन देत आहोत."
हे ऐकताच सावकार जोरात हसु लागला," हाहाहाहाहाहाहा ते मला माहीतीच होत अस हुणार, खर मी काय सांगतोय ते तरी आयका आन मग बोला ओ सायेब."                   
पोलिस म्हणाले," बोला काय म्हणताय?"
सावकार म्हणाला," या भैऱ्याच्या घराची झडती घ्या,काय काय धंद करतोय ह्यो तुमास्नी समजल."
पोलिस म्हणाले," काय म्हणायच आहे ते स्पष्ट बोला तुम्ही."
सावकार म्हणाला," आमाला याच्यावर शंका हाय ह्यो त्या जंगलातल्या चोरास्नी सामील हाय, जे चोर जंगलातली जनावर मारून इकत्यात."
पोलिस म्हणाले," तुम्ही एवढ्या विश्वासान कस सांगताय? आताच्यासारख खोट आरोप तर नाही ना करत?"
सावकार म्हणाला," आव सायेब तुमी बगा तरी एकडाव, मग कळलच की काय हाय ते."
भैरव म्हणाला," साहेब हेच काय ऐकु नका अस कायबी नाही, उलट गावात माणसास्नी इचारा ह्या सावकाराचाच हात हाय त्या सगळयात चोऱ्या माऱ्यात."
सावकार रागान बघत म्हणाला," ए लेका भैऱ्या तुझ्याकड काय पुरावा हाय र आ..........."
भैरव म्हणाला," आर मग तुझ्याकड तरी काय पुरावा हाय माझ्याविरुदात."
सावकार हसत हसत म्हणाला," कळल कळल समद कळल, जरा दम काड."
पोलिस म्हणाले," चला बघु जावून किती खर बोलताय सावकार.",आणि ते भैरवला घेऊन त्याच्या घरी निघाले.
सावकाराच्या चेहऱ्यावर खलनायकी हसु होत आणि भैरवच्या चेहऱ्यावर  निश्चिंतपणा होता.
आता सगळे भैरवच्या दारात आले आणि घरात जावून झडती चालू केली आणि बघता बघता सारा गाव जमा झाला. भैरवच्या आई आबाला समजत नव्हत काय चाललय आणि जे भैरवच्या ध्यानीमनीपण नव्हत ते घडल.
त्याच्या घराच्या माळ्यावरती गावटी बनावटीच्या दोन बंदुका, काही जिवंत काडतुस  आणि शिकारीला लागणार साहित्य सापडल.(जे काल रात्री सावकाराच्या माणसानी कौल काढून भैरवच्या घरात टाकल होत.)
भैरव क्षणभर बघतच राहिला, त्याला कळेना काय चालू आहे.                        
तेवढ्यात सावकार म्हणाला," साहेब ह्योच त्यो  माणूस हाय ज्यो खरा म्होरक्या हाय त्या टोळीमागचा."
पोलिस विचारु लागले," भैरव हे तुझ्याकड कस? कोणाच आहे हे? कोणी दिल?"
भैरव गोंधळुन म्हणाला," हे माझ नाही, कुणी आणून ठेवलय मला माहीत नाही."
सावकार म्हणाला," आ माहीत नाही कस तुझ्या घरात काय मी आणून ठेवल का काय?" आणि तो हसु लागला.
भैरवला समजल हा कोणाचा डाव आहे," तो सावकाराच्या अंगावर धावून गेला आणि सावकाराला मारायला सुरुवात केली एवढ्यात पोलिसांनी भैरवला पकडल. भैरव ओरडतच म्हणालाल," सोडा मला आज ह्येला सोडणार नाही मी,हे सगळ ह्याचच कारस्थान हाय सोडा मला."
सावकार म्हणाला," धरा तेला सोडु नका, चोराच्या उलट्या बोंबा. चांगली चमडी लोळवा त्येची."
पोलिसांनी तो माल जप्त केला आणि भैरवला घेवून निघाले.
भैरव रागाने लाल झाला होता, तो म्हणाला," ए दाम्या सावकारा नाही तुझ खर रुप जगाम्होर आणल तर बाच नाव नाही लावणार."
सावकार म्हणाला," आर लेका तु  सुटशील तवा न्हव, आता तुझ आयुष्य लेका तुरुंगात जाणार हाय. बस सपन बघीत." आणि तो हसु लागला.
भैरवच आई आबा आज पुन्हा एकदा हतबलपणे पोलिसांना विनवण्या करु लागले पण त्यांचा त्याने काही होणार नव्हत.
पोलिस भैरवला घेवून गेले, सारा गाव हळहळ व्यक्त करत होता, इकड वाड्यावर मंजुळाला ही बातमी कळाली आणि तिन टाहो फोडला. कारण तिला वाटल होत की आज भैरवची सुटका होइल,पण हे जे झाल ते ध्यानीमनीसुद्धा नव्हत. फार मोठा डाव खेळला होता सावकारान.                  
दोन दिवसाच्या तपासानंतर भैरवला पुढील तपासणीसाठी आता तालुक्याच्या पोलिसस्टेशनात नेण्यात येणार होत.
तेव्हा पोलिस म्हणाले," भैरव गुन्हा कबूल कर आणि कधी कुठ किती जनावर मारली आणि त्यांच्या अवयवांची विक्री कुठ केली? याची माहिती दिलीस तर तुला होणारी शिक्षा कमी होइल."
भैरव म्हणाला,"  साहेब कायतरी काय बोलताय? आजवर एक मुंगीसुद्धा मारली नाही मी, त्या सावकारान मला यात अडकलाय."
पोलिस म्हणाले," भैरव पुरावे तुझ्या विरोधात आहेत, त्यामुळे तु निर्दोष आहेस हे कोणी मान्य नाही करणार."
भैरव हताशपणे फक्त शुन्यात नजर लावून बसला.
थोड्याच वेळात पोलिस भैरवला गाडीत घालून तालुक्याला निघाले. भैरवला पुढ काय होणार हे दिसत होत तो मनात विचार करु लागला,काही न करता आपल्या आयुष्याची धुळधाण होणार आणि सावकार मोकाटपणे त्याच्या आई आबावर आणि गावावर जुलूम करत राहणार, त्याला याचा धडा कोण शिकवणार? आई आबा माझ्याशिवाय म्हातारपणी कस जगणार?  जिच्यामुळ एवढ महाभारत झाल त्या मंजुळाच काय होणार? आपण एकदा तालुक्याला गेलो की कायमच अडकणार. तुरूंगातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात आयुष्यभर खितपत पडून रहायला लागणार. नाही अस होऊन चालायच नाही.जीव असापण जाणारच हाय, नाही कायतरी करायला पाहिजे, अस विचारचक्र त्याच्या डोक्यात चालु होत आणि भैरवने बिजली चमकावी तशी चालत्या गाडीतन खाली उडी मारली आणि जंगलाची वाट धरली. पोलिसांना क्षणभर विश्वास बसेना. गाडी थांबली आणि हत्यारधारी पोलिस भैरवचा पाठलाग करु लागले. भैरवच्या हातात बेडी असल्यामुळे त्याला म्हणाव्या तश्या वेगाने पळता येत नव्हत,पण तो या जंगलात थोडाफार वावरलेला होता. त्यामुळे त्याला कुठून कस जायच याचा थोडाफार अंदाज होता,पण पोलिसांना कळत नव्हत की नक्की कोणत्या दिशेला जायला हव. पण त्यानीसुद्धा पाठलाग चालूच ठेवला होता कारण हातात बेडी असल्यामुळे तो जास्त  पळु शकणार नव्हता  अशी त्यांची खात्री होती. पण दिवस मावळू लागला तरी पोलिसांना भैरवचा मागमूस लागला नाही. आता पोलीस माघारी परतले कारण पुढ जंगल आणखीनच घनदाट होत आणि अंधार पडत आला होता. भैरव इतक्यात कुठ गायब झाला असेल या विचारात पोलिस होते.
तर इकड गावात बातमी लागली की भैरव पोलिसांच्या हातातून निसटला, ही बातमी बघता बघता गावभर पसरली आणि सावकार चवथाळला. तो गड्यांना म्हणाला," नाय भैऱ्या परत गावात येता कामा नाय, घरदार पेटवा त्याच. आईबाला जित्यापणी जाळा,त्याच नामोनिशान मिटवा, बैल सोडून आणा इकड वाड्यावर.  जावा कामाला लागा जावा."
ही गोष्ट मंजुळान ऐकली आणि मागच्या दरवाजान बाहेर पडून धावत जावून भैरवच्या आई आबाला म्हणाली," आई आबा लवकर बाहेर पडा,आताच्या आता माझ्या पाठीमागन या."
त्यानी विचारल," अग पोरी झालय तरी काय?"
मंजुळा म्हणाली," घात होणार हाय घात, तुमी तुमचा जीव वाचवा."
आणि त्यांना घरातन बाहेर काढून ती शेतवडीत घेऊन गेली.
तोपर्यंत उंचच उंच आगीच्या ज्वाळा दिसु लागल्या आणि आई आबा तिकड जाण्यासाठी तळमळु लागलेत.
पण तोवर मंजुळा म्हणाली," आई आबा आता तुमी बाहेर नका पडु. जीव वाचवा, पुढ गेलासा तर जीवानिशी जाशीला."
आबा म्हणाला," माजी बैल आत हाईत त्यास्नी तरी सोडायला पायजेत, मी जाणार आत,माझी लेकर हाईत ती  त्यास्नी आगीत सोडून मी नाय जगु शकत."
मंजुळा म्हणाली," आबा बैलास्नी काय नाय होणार बैल वाड्यावर नेली असतील, तस ऐकल होत मी."
आई आबाचा आजवरचा सारा संसार कापरासारखा  डोळ्यादेखत पेटत होता, पै पै गाठीला बांधून कसाबसा पोट भरणाऱ्या त्या हतबल आई आबापुढ रडण्यावाचुन दुसरा पर्याय नव्हता. एखाद माणूस गेल्यावर जस दुख होत तस दुख त्याना होत होत आणि सहन न होवून दोघांनी जो हंबरडा फोडला तो काळजाला भोक पाडणारा होता.              
आता मंजुळाला आपल्या बापाची लेक असल्याची लाज वाटू लागली. 
ती म्हणाली," आई आबा तुमी थोड दिवस हे गाव सोडून जावा, सगळ शांत झाल की या परत, आता जावा तुम्ही इथ थांबु नका,मलासुद्धा वाड्यावर जायाला पायजे, काळजी घ्या."
तिन आईला घट्ट मीठी मारली आणि ती तिथून निघाली.
आई आबा पेटता संसार बघत जड अंतकरणाने गावापासून दुर जावु लागले,कुठ जायच हे ठरल नव्हत पण फक्त पावल पुढ पुढ टाकत ती दोघ चालत होती आणि इकड भैरव किर्र जंगलात चाचपडत होता. एक हसत खेळत कुटुंब काही चुक नसताना उध्वस्त झाल होत.ज्या घरात सुखाचे चार घास खावून भैरव आई आणि आबा सुखात रहात होते ते घर आज पोरक झाल होत आणि आगीत होरपळत होत.

क्रमशः

श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर
९९७५२८८८३५.

फोटो सौजन्य: गूगलबाबा.
(शेअर करताना कृपया लेखकाच्या नावासहीत शेअर करावे.) 

🎭 Series Post

View all