Login

भैरव-एक वादळं (भाग -8)

एक थरार.

भैरव- एक वादळ( भाग-८ वा)
सारंग चव्हाण
कोल्हापूर

मंजुळाच्या अशा अचानक पळून जाण्यान सावकार मोठ्या अडचणीत सापडला होता, तासाभरात पाहुण्यांच आगमन होणार होत मग आता करायच काय? या प्रश्नाच उत्तर सद्यातरी सापडत नव्हत.सावकाराच्या बायकोन रडायला चालू केल होत. या सगळ्यात भैरव आहे अस सावकाराच ठाम मत होत. त्यामुळ त्याच्या घरच्यांना धरुन आणल्याशिवाय तो सापडायचा नाही म्हणून सावकारान भैरवच्या आई आणि आबाला पकडून वाड्यावर आणायला सांगितल.
सावकाराचा आदेश मानत गडी भैरवच्या दारात येवून हाक मारु लागले, तसा भैरवच बाहेर आला, त्याला पाहून सगळेच हबकले,हा इथ तर मग मंजुळा कुठ असल? असा प्रश्न सगळ्यांना पडला.
त्यातला एकजण म्हणाला," ए मंजुळाताई कुठ हाय? कुठ नेवून ठेवलीयस तिला? मुकाट्यान सगळ बोल."
भैरव म्हणाला," मी कुठल्या मंजुळाला नाही पळवली, मी घरातच हाय, मी कशाला नेवु तिला?"
गडी म्हणाला," आस्स? धरा र ह्याला वाड्यावर नेवुया मग बोलल पोपटासारखा."
ही बाचाबाची ऐकून आई आबा बाहेर आलेत तस तो गडी म्हणाला," ए पोरगा पायजे असल तर वाड्यावर या लवकर."
सगळा गाव बघता बघता जमा होवु लागला. भैरवला घेवून गडी वाड्यावर आले. पाठोपाठ आई आबा धावतच  आले.                          (सारंग चव्हाण, कोल्हापूर)
सावकार इकडून तिकड फेऱ्या मारत होता. भैरवला बघून तोपण हबकला. तरी नेटान म्हणाला," ए भैऱ्या लय मस्ती आली का र ? एकदा हाणलाय ते कमी पडलय का? मंजुळा कुठ हाय?"
 भैरव म्हणाला," खरच मला यातल काय माहीत नाही, मला आताच समजल."
सावकार रागात," ए सुकाळीच्या नाटक बास कर, गुमान सांग मंजुळा कुठ हाय? नायतर जीवंत गाडील हित."
भैरव जरा रागातच म्हणाला," सावकार मी खर सांगतोय, तिचा नाद सोडलाय मी. मला खरच काय माहीत नाही."
आबा आणि आई सावकाराला गयावया करत होते की," आमच पोरग तस नाय करायच, रातभर त्यो घरातच हुता झोपल्याला."
 सावकार म्हणाला," खोट बोलताय सगळी, ह्योच हाय त्यो, हेला आज जीता नाही सोडत."
भैरव कडाडला," ए सावकार तु असशील लय मोठा खर मी अजुन सांगतोय मी नाही नेली तिला आणि तुझी पोरगी तुला सांभाळता येइना झालीया मग आम्हाला का विचारतोयस."
तसा सावकारान गड्यांना आदेश दिला," आर बघताय काय लेकाओ हाणा याला,आज  जीता सोडायचा नाय."
तस गडी भैरवच्या अंगावर धावून आल.
भैरवपण लेचापेचा नव्हता, त्याच्या अंगात हत्तीच बळ आणि चित्त्याची चपळाई होती. सात आठ गडी काठ्या घेवून अंगावर धावून आला, भैरवच्या हातात काही नव्हत. इतक्यात भैरव वाड्यात आत शिरला, त्याच्यापाठोपाठ हे सगळे धावु लागले,भैरव घाबरून पळतोय हे बघून त्याना जास्तच चेव चढला.
 इकड सावकार दातओठ खात म्हणाला," हाणा धरा साल्याला, पळतोय बघा सोडू नगा."
तसे आई , आबा सावकाराच्या हातापाया पडु लागले पण तो काही ऐकेना.                (सारंग चव्हाण, कोल्हापूर)
एवढ्यात कल्लोळ उठला," आई आई ग मेलो आ आआ आआआ वाचवा."
पण तो आवाज भैरवचा नव्हता.
आणि बघतात तो काय एक एक गडी जो भैरवच्या मागे गेला होता तो माघारी पळत येत होता.  एकजणाच तर डोक फुटल होत रकतान कपडे लाल झाले होते.
काय झालय सावकाराला कळेना.
इतक्यात भैरव बाहेर आला त्याच्या खांद्यावर मुसळ होत.
रागाने लालबुंद झालेला तो काळभैरवच भासत होता.
सगळे गडी माग माग सरु लागलेत.
तसा सावकार ओरडला," आर ए पळताय काय मारा ह्येला,
नायतर एकेकाची चामडी लोळवीन." 
सावकारान दिलेल्या धमकीवजा आदेश दिल्यावर पुन्हा ते भैरववर चाल करुन गेले. भैरवच्या ताकदीपुढे आणि चपळाईपुढे त्यांच काही चालेना. प्रत्येकजण जणु डोक फोडून घ्यायलाच धावून जात होता अस वाटू लागल.
भैरवचा अवतार पाहून सावकारान मागच्या वाटेन पोलिस स्टेशन गाठल आणि खोटी फिर्याद दिली की भैरवने वाड्यात चोरी करुन सगळ्या गड्यांना मारून मंजुळाला पळवून नेली आहे. 
इकड लग्नाच व्हराडी गावच्या वेशीवर येवून थांबल होत आणि त्यापैकी दोघजण वाड्यावर आले. तर इथली परिस्थिती बघून बावरून गेले, कारण माणस तर बरीच होती पण कोणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. तरीपण ते म्हणाले," सावकार कुठ दिसेनात,न्हव ते व्हराड वाजवीत आणायला वाजीवणारी माणस पाठवून द्या. वेशीवर थांबलय व्हराड."
कोणीच काही बोलेना हे बघुन पाहुणा म्हणाला," पावन सावकारास्नी बोलवा की, व्हराड ताटकळत उभा हाय."
एवढ्यात सावकार पोलिस स्टेशन मधून परत आला होता.                             (सारंग चव्हाण, कोल्हापूर)
त्याला पाहुण्यान वाजंत्री लवकर पाठवायची विनंती केली आणि ते परत गेले.
सावकार बायकोला म्हणाला,"आता व्हराड वेशीवर आलय आन पोरीन अब्रू त्याच वेशीला टांगलीया, कस सांगु आता पावन्यास्नी.",
बायको म्हणाली," तुमी जावा आन पावन्यास्नी सांगा खर खर काय हाय ते, कवा ना कवा सांगाव लागलच."

सावकार जड पाऊल टाकत गावच्या वेशीवर चालत निघाला, पुढ जायच मनात नव्हत पण इलाज नव्हता.
एक एक पाऊल पुढ टाकेल तशी त्याची छाती अधिकच धडधड करु लागली. पोरीन अब्रूच खोबर केल आता कस तोंड दाखवु आणि काय सांगु यास्नी.अस वाटत होत.
सावकार वेशीवर पोहोचला आणि नवऱ्या मुलग्याच्या बापाला बाजूला बोलावून घेतल आणि घडली हकीकत त्याना सांगितली.
हे ऐकताच त्याने आकांडतांडव करायला चालू केल, बघता बघता सगळ्या व्हराडाला ही बातमी समजली आणि एकच गोंधळ माजला.लोक नको नको ते बोलु लागले, सावकाराच्या कानात किडे पडल्यासारख झाल पण इलाज नव्हता. 
शेवटी सावकारान पाहुण्यांच पाय धरले आणि माफी मागीतली. तरी काहीजण ऐकायला तयार नव्हते, ते सावकाराला मारायला धावले. इतक्यात पोलिसांनी येउन प्रकरण समजून घेतल आणि एकमेकांची  समजूत घालून प्रकरण मिटवल. 
नुकसानभरपाई म्हणून सावकारान त्यांना ठराविक रक्कम दिली आणि यावर कसाबसा पडदा पाडला आणि भैरवला पकडण्यासाठी म्हणून पोलिस सावकाराला घेऊन भैरवच्या घराकडे चालले.
इकडे भैरव सावकाराच्या सगळ्या माणसांना लोळवून आई आबाबरोबर आपल्या घरी गेला होता,त्याला सावकार पोलिस घेवून येतोय हे माहीत नव्हत. तो घरी बसुन विचार करत होता की मंजुळाला कोण नेवु शकत?  त्याच्या डोक्यात अचानक प्रकाश पडतो आणि तो समजून  जातो हे कोणाच काम आहे. इतक्यात दारात पोलिस येवून भैरवच्या घरात शिरले आणि भैरवला ताब्यात घेतला.                    (सारंग चव्हाण, कोल्हापूर)
भैरव म्हणाला," साहेब काय झाल? मला का धरलाय? मी काय नाय केल."
पोलिस म्हणाले," तु ठाण्यावर चल तुला सगळ सांगतो तु काय केलस.'
आई आबा म्हणाले," साहेब आमच्या पोरान काय नाय केल ओ, का त्येला नेताय? सोडा त्येला तुमच्या पाया पडतो."
पोलिस भैरवला घेऊन गेले, सावकार भैरवच्या आई आबाला म्हणाला," दामु सावकार म्हणजे कोण वाटला तुम्हास्नी? आता हा भैऱ्या परत दिसायचा नाय तुम्हास्नी, आता बघा फक्सत काय हाल करतोय, माझ्या अब्रूबरोबर खेळायला जातोय काय? घरादारावरण नांगर फिरवतो."
 आई आबा हतबलपणे रडू लागले, भैरवची काडीमात्र चुक नसताना त्याला गुन्हेगार ठरवला होता. पण गरीबाच ऐकतो कोण?

पोलिस स्टेशन वर भैरवची चौकशी सुरु झाली,
पोलिस, "हे बघ भैरव आता जे झाल ते झाल मंजुळाच लग्न मोडल आता तिच लग्न नाही होत त्याच्याशी तेव्हा आता  सांग मंजुळा कुठ आहे?"
भैरव," अहो साहेब मी सांगायला मला माहीत पायजे का नको? मलासुद्धा प्रश्न पडलाय की मंजुळाला पळवल कुणी?"
पोलिस," हे बघ नाटक करु नको, तु तिच्या घरी गेलास घरात चोरी केलीस आणि सगळ्या माणसांना मारून मंजुळाला घेऊन गेलास असा आरोप आहे तुझ्यावर, तेव्हा आम्हाला सहकार्य कर, विनाकारण आम्हाला कठोर वागायला भाग पाडू नको."
भैरव," साहेब हे  सगळ खोट हाय, मला वाड्यावर धरून नेवून मारायला लागलीत म्हणून मी त्यास्नी मारलीत खर मी चोरीबी नाय केली आणि मंजुळालाबी नाय नेली, माझ्या आई आबाची शपथ.",
पोलिस," हे बघ संध्याकाळपर्यंत तुला वेळ देतो विचार कर आणि काय ते खर सांग."
भैरव ओरडून म्हणाला," मी खरच बोलतोय आता तुम्हाला कस सांगु? तुम्ही शोध घ्या मंजुळाचा माझ्या भरोश्यावर नका राहु,"
पण त्या खोलीला कुलूप लावून पोलिस आपल्या काम करण्यात व्यस्त झाले. आत भैरव तळमळत होता पण त्याच्याकडे इलाज नव्हता. 
                                       (सारंग चव्हाण, कोल्हापूर)
झालेली मानहानी सावकाराला स्वस्थ बसु देत नव्हती त्याच्या डोक्यात भलताच कट शिजत होता, भैरवचा कायमचा बंदोबस्त करायलाच हवा अस त्याला मनापासून वाटत होत आणि त्याने आपली विश्वासू माणस त्या कामासाठी पाठवली आणि स्वतः त्यादृष्टीन पाऊल टाकायला सुरुवात केली.भैरवलाच दोषी ठरवून आयुष्यातुन उठवायचा बेत आखला होता.
बघता बघता दिवस मावळतीला आला आणि ठरल्याप्रमाणे एक बैलगाडी गावाच्या वेशीबाहेर येवून थांबली बैलगाडीत तिघेजण होते आणि त्यातून एक व्यक्ती उतरली आणि झपझप पाऊल टाकत गावाकडे चालू लागली आणि बैलगाडी दुसऱ्या वाटेने गावात निघून गेली. ही व्यक्ती आता गावात पोहोचली होती,तिला पाहून सगळे चकित झाले होते कारण ती व्यक्ती म्हणजे मंजुळा होती. लोक तिच्या पाठोपाठ वाड्याकडे येवु लागले. तशी काही लोकांनी धावत जावून सावकाराला ही बातमी दिली. सावकार पोरगी परत आली म्हणून थोडासा सुखावला पण क्षणात त्याच्या रागाचा पारा चढला आणि मंजुळा वाड्यात येताच तिला सावकाराची एक अशी कानशिलात बसली की ती तोल जावून बाजुला पडली, तिच्या केसाना धरून सावकार आत घेवून गेला खोलीच दार बंद केल आणि तिला चाबुकान मारायला सुरुवात केली, बाहेर फक्त मंजुळाच्या ओरडण्याचा आवाज येत होता पण तिला सोडवायला जायची हिम्मत कोणाच्यात नव्हती. तिची आई फक्त बाहेरुन दारावर थापा मारत दार उघडायला सांगत होती पण त्याचा काही परीणाम झाला नाही.
थोड्या वेळात सावकार बाहेर आला आणि म्हणाला," ह्यात कोणकोण सामील हायत त्यास्नी सोडनार नाय हा दामु सावकार." आता तिची आई खोलीत शिरली आणि मंजुळाला मीठीत घेऊन दोघीही रडु लागल्या,मंजुळा थरथर कापत होती. 
तिला आई म्हणाली," पोरी लय लागल का ग, ह्यो तुझा बा नाही वैरी हाय वैरी .मी हाय तुझ्याबरोबर भिउ नग.
मंजुळा रडत रडत म्हणाली," आई मी जीव गेला तरी दुसऱ्याबरोबर लग्न नाही करणार."
तिची आई म्हणाली," पोरी भैरवला यातल कायबी माहीत नसतान त्येला यात लय ताप झालाय."
मंजुळान तळमळीने विचारल," काय झाल भैरवला? आत कुठ आहे तो? मला त्याला बघायच हाय."
आईन सगळा घडला प्रकार मंजुळाला सांगितला. मंजुळाला  जिव्हारी लागल ते सगळ कारण त्याच्या नकळत केलेल हे धाडस भैरवचा जीवावर बेतल होत.
मंजुळा काळजीने म्हणाली," आई चल सगळ खर सांगुया मी स्वतः गेलेलो पळून आणि यात माझ्याबरोबर कोण होत ते सांगुया, मग ते सोडतील भैरवला."
आई तिला म्हणाली," व्हय सकाळन  तुझ बाबा मळ्यात गेलत की जाउया दोघी.
इकड मंजुळा घरी आली होती पण सावकाराच्या मनात भैरवबद्दलची चीड कमी नव्हती झाली.
त्यान असा काही बेत केला होता की भैरव आयुष्यातन उठणार होता,आणि हा बेत आजच्या रात्रीच फत्ते करायचा होता, कारण भैरव पोलिसांच्या ताब्यात होता तोवरच तो करावा लागणार होता. आता भैरवच्या आयुष्यात एक वादळ येणार होत पण भैरवने किंवा आणखी कोणी त्याचा विचारसुद्धा केला नव्हता.

क्रमशः

श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर.
९९७५२८८८३५.

फोटो सौजन्य: गूगलबाबा.
( शेअर करताना लेखकाच्या नावासहीत शेअर करावे ही नम्र विनंती.)

🎭 Series Post

View all