Login

भैरव-एक वादळं (भाग -5)

एक थरार.

भैरव- एक वादळ.( भाग.५ वा)
सारंग चव्हाण
कोल्हापूर.

बैलगाडी भरधाव धावत होती आणि मंजुळा ती गाडी गाठण्यासाठी त्या दिशेने धावत होती पण आता मंजुळा दमली होती. रस्त्याच्या कडेलाच एका झाडाखाली ती धापा टाकत बसली.
इकड वाडयावर सावकाराला समजल तेव्हा त्याने सगळा वाडा डोक्यावर घेतला आणि मंजुळाच्या आई नको नको तसा बोलला. रागाने लालबुंद होऊन माणस घेऊन तालुक्याच्या रस्त्यान मंजुळाच्या शोधात निघाला.
इकड भैरवच्या बैलगाडीन सात आठ मैलाचा रस्ता कापत आता तालुक्याच्या गावात प्रवेश केला आणि दवाखाना गाठला,डॉक्टरनी भैरवला ताबडतोब आतमध्ये घेऊन तपासणी सुरु केली. 
डॉक्टर म्हणाले," रक्त खुप गेलय त्यामुळे तो बेशुद्ध झाला आहे, रक्त चढवाव लागेल."
आबा म्हणाला," माझ सगळ रगात काढून घ्या खर माझ्या पोराला जगवा."
डॉक्टर म्हणाले," तस नाही करता येणार, आधीच तुमच्या शरीरात रक्त कमी दिसत आहे."
सर्जा आणि हरीभाऊ म्हणाले," साहेब आमच रक्त घ्या खर आमच्या माणसाला वाचवा."
त्यांच रक्त तपासल तर एकाचापण रक्तगट भैरवशी जुळत नव्हता.
डॉक्टर म्हणाले," तुमचा रक्तगट जुळत नाही,आणखी कोणी येवु शकेल का? किंवा जिल्ह्याला जावून रक्त आणाव लागेल.तोपर्यंत मी सलाईन आणि इंजेक्शन देवुन जेवढी ताकत देता येइल तेवढी देतो,पण जरा घाई करा."
जिल्याच ठिकाण खुप दुर होत त्यापेक्षा गावातन जावून आणि माणस आणलेली बरी कोणाचातरी रक्तगट जुळलच की. असा विचार करुन सर्जा म्हणाला," मी गावाकड जावून सगळ पैलवान आणि बाकी माणस घेऊन येतो." आणि तो निघाला.
हरीभाऊ आबाच्या सोबतीला थांबला.
बैलांच अंग अजुन गार झाल नव्हत तोवरच त्याना परत गाव गाठून माणस घेवून परत यायच होत.दवाखान्यात भैरव मृत्यूशी झुंज देत होता तशीच बैलांचीसुद्धा अग्नीपरिक्षा होती. पण आज ती द्यावीच लागणार होती. सर्जाने चाबूक नुस्ता हवेत उगारला तसा बैलांनी बिजलीच्या चपळाईने झेप घेतली आणि वेग पकडला. वाटेतला खाचखळगा बघायची ही वेळ नव्हती. सर्जाचा फेटा जणु दांडपट्याच्या पात्यासारखा हवेत भिरभिरत होता. वाऱ्याची आणि बैलगाडीची जणू शर्यतच लागली होती.                                
इकड मंजुळा चालत चालत अर्ध्या वाटेत आली होती एवढ्यात सावकारान तिला गाठली आणि घरी नेउन एका खोलीत बंदी बनवून ठेवल.सगळ्यांना करडी ताकिद दिली की," जर हिला यातन बाहेर कोणी काढली तर त्याला जीवंत सोडणार नाही, हिला जेवण खाण आतच ध्यायच."
सगळ्यांनी माना हलवुन होकार दिला.
आत मंजुळाचा जीव टेकत नव्हता पण आता नाईलाज होता, इथून बाहेर पडण शक्य नव्हत. 
ती काळभैरवाला प्रार्थना करत होती," हे काळभैरवा हे सगळ माझ्यामुळ झालय, माझा जीव घे खर त्याला वाचव, तो घरी परत जा म्हणत होता मला,मीच ऐकल नाही आणि हे इपरीत घडल. देवा तुझा महिमा दाखव. वाचव त्याला वाचव." 
अस म्हणत तिला चक्कर आली.तिची गाडीमाग पळुन पळून दमछाक झाली होती. बसल्या ठिकाणीच ती बेशुद्ध झाली.
इकड दवाखान्यात डॉक्टर आपल्यापरीन सगळे प्रयत्न करत होते पण रकताची सोय लवकर होण गरजेच होत. आबाचा जीव काळजीन सैरभैर झाला होता पण हरीभाऊ आबाला धीर देत होता.सगळयांच डोळ सर्जाकड लागल होत.दवाखाना माग लागला की कधी काय परिस्थिती समोर येईल याचा काही अंदाज नसतो म्हणतात तेच खर याचा अनुभव इथ येत होता.

इकड सर्जा तुफानासारखा गावाच्या दिशेन गाडी पळवत होता. जणु वादळच आपल्या दिशेन येतय हा भास होवुन वाटेत जो कोणी असेल ते आपोआप त्याला वाट देत होते.
सर्जान बघता बघता गावची वेस गाठली आणि तो गावात आला. पाराजवळ बैलगाडी थांबवून त्याने गाडीतन चित्यासारखी खाली झेप घेतली. सगळ गाव तिथ जमलच होत. सर्जा येताच सगळ्यांनी त्याला गराडा घातला आणि त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार चालू केला. सर्जा रागान ओरडून म्हणाला," ये ऐका जरा गप्प व्हा, भैरवला रक्ताची गरज हाय,तालमीतली सगळी पोर आणि कोणाला येवु वाटल त्यानी बरोबर चला."
बघता बघता बैलगाडी भरली. इतक्यात भैरवची आई पळतच आली आणि म्हणाली," आर सर्जा माझ पोर कस हाय र? मला घेवून चल तिकड, माझा जीव टेकायचा नाय  इथ."आणि तीने हंबरडा फोडला.
सर्जा म्हणाला," आई भैरव बरा हाय काय नाही झाल त्याला,जरास रक्त कमी झालय यातल कोनाचा गट जुळल त्याच रक्त घ्यायच."
आई म्हणाली," आर माझ सगळ रगात घ्या म्हण त्यास्नी,मला तेवढी तिकड ने."
सर्जान दुर्लक्ष केल आणि बैलांना हाक दिला," चला र हाईक हाईक हाया चल."
आणि बैल पळु लागल, सकाळपासून बैलांनी एक घाससुद्धा खाल्ला नव्हता,उपाशीपोटीच पळत होती. पण त्यांच्या पळण्यातन अजिबात जाणवत नव्हत. अहो मुकाप्राणी असला तरी मालकासाठी जान कुर्बान करणारी जात होती ती.
                                       
त्यांना भुक कशी लागणार होती कारण त्यांचा धनी जीवन मरणाच्या फेऱ्यात अडकला होता. त्यांच पोटाकड लक्ष जाईलच कस?  त्यांना एकच गोष्ट माहित होती ती म्हणजे हाक दिली की नुस्त पळायच. 
बघता बघता तिन्हीसांज झाली, रस्ता अंधुक दिसु लागला.
गाडी खचाखच भरली होती,आणि अचानक एका बैलाचा पाय एका खड्यात गेला आणि मुरगळला. बैलाचा वेग मंदावला,बैल लंगडत लंगडत हळूहळू चालू लागला आणि अचानक खाली बसला. अकस्मात झालेल्या प्रकारामुळे काहीजण तोल जावून पडता पडता वाचले. 
सर्जाने खाली उडी घेतली बैलाजवळ जावून त्याला उठवण्यासाठी हाक देवु लागला पण काही केल्या बैल उठेना.
सर्जा गावाकऱ्याना म्हणाला," गड्यांओ तुम्ही आता चालत चला आता अर्ध्या तासाची वाट बाकी हाय,बैल काय आता पळणार नाही,पाय मुरगाळलाय त्याचा."
गावकरी म्हणाल," आर पण सर्जा एकटा काय करणार या अंधारात आणि कोणतरी थांबतो सोबतीला."
सर्जा म्हणाला," ए मला कोण खाईत नाही तुंव जावा पुढ, रक्ताची गरज हाय लवकर पळा तुम्ही, पळत जावा,मी बैल उठला की हळूहळू येतो घेवून."
आता गावकरी तालुक्याकड धावत होते आणि सर्जा बैलाचा पाय चोळत त्याला ताकद देत होता.
इकड दवाखान्यात सर्जा अजुन कसा आला नाही काय झाल असेल?  असा विचार करत डोळ्यात तेल घालून वाट बघत होते.
भैरवला आतापर्यंत रक्त चडवण गरजेच होत, त्याची अवस्था बिकट होत चालली होती याची जाणीव डॉक्टरांना होती.त्यामुळे ते व्हरांडयात इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. 
पण अचानक बैलाचा पाय मुरगळल्यामुळे सगळा घोळ झाला होता हे इकड कोणाला काहीच माहित नव्हत.
इकड भैरव हळूहळू मृत्यूच्या जवळजवळ जात होता आणि इकड गावकरी आपल्या भैरवला वाचवण्यासाठी  धावत होते. या खेळात जीत कोणाची होणार हे कोणालाच माहीत नव्हत. जणू यम दारात येवून उभा राहिला होता पण थोड्याच वेळात  कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज येवु लागला आणि हरीभाऊने ओळखल की आपली माणस जवळ आली आहेत.
तो धावतच बाहेर आला, खरोखर गावकरी आल होत. हरीभाऊ ओरडला," साहेब आमची माणस आलीत लवकर रक्त घ्या, आता वेळ नको."
डॉक्टर म्हणाले," एकापाठोपाठ एक या रक्तगट तपासून घेवु."
आणि दोघा तिघांचा रक्तगट जुळला.
ताबडतोब रक्त घेतल गेल आणि भैरवला रक्त चडवल जावु लागल. आता सगळे वाट बघत होते की कधी भैरव शुद्धीत येतोय रक्त चडवुन झाल होत पण भैरव अजुन काहीच हालचाल करत नव्हता. बराच वेळ झाला डॉक्टर प्रयत्न करत होते पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
डॉक्टर म्हणाले," येत्या दोन तासांत तो शुद्धीवर यायलाच हवा नाहीतर............"
हे ऐकून आबाचा धीर सुटला होता पण हरीभाऊ आबाला  समजावत होता.
हरीभाऊ म्हणाला," आबा घाबरू नको काय होणार नाही,भैरव म्हणजे साक्षात काळभैरवाचाच अवतार हाय,काय नाही होणार त्याला."
आबा त्याच्या गळ्यात पडून रडू लागला.
इकड गावात भैरवच्या आईन देव पाण्यात ठेवल होत.
तिच अश्रू थांबत नव्हत. तिचा जीव तळमळत होता पोरासाठी. गावातल्या बायका तिच्यासाठी जेवण घेवून आल्या होत्या पण तिला आज तहानभुक काही जाणवत नव्हत. जानवणार तरी कस? आईच काळीज होत ते,त्याची अवस्था एका आईलाच माहित.
सर्जा आता हळूहळू बैलगाडी घेवून दवाखान्याच्या दारात पोहोचला. त्याला सगळी परिस्थिती समजली त्यालासुद्धा हुंदका आला.स्वताला सावरून तो म्हणाला," आर काय नाही होत त्याला, ज्यान आजवर भल्याभल्या पैलवानाना लोळवलय तो आज थेट यमाशी कुस्ती करत असला म्हणून काय झाल.आरं काळभैरवच हाय तो यमालासुद्धा माती चारणारच." असा विश्वास  त्यान बोलण्यातून दाखवला आणि आबा बरोबर सगळयानांच या एका वाक्यान खुप मोठा आधार मिळाला,
वातावरण थोडस हलक झाल होत. तरी जीवावरच संकट अजुन टळल नव्हत हे डॉक्टर ओळखुन होते.

क्रमशः

श्री सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर.
९९७५२८८८३५.
फोटो सौजन्य: गूगलबाबा.
(शेअर करताना लेखकाच्या नावासह शेअर करणे
 आवश्यक आहे.)
 

🎭 Series Post

View all