भैरव-एक वादळं (भाग -4)

एक थरार.

भैरव- एक वादळ (भाग- ४ था)
सारंग चव्हाण.
कोल्हापूर.

पड्यालच डाकू म्हणजे या जंगलाच्या पलिकडची बाजु तिथवर पोहोचण सोप नव्हत. आजवर बऱ्याच लोकांनी तिथवर जायचा प्रयत्न केला पण त्यांचा वाटेतच खातमा केला गेला,त्या भागातले आदिवासी त्या डाकुंना सामील होते कारण ते डाकु त्यांना हव नको ते सगळ पुरवत असायचे.ते त्या भागात येणाऱ्या प्रत्येक अनोळखी माणसाला जीवंत सोडत नसत. खुप क्रूर जात होती त्या आदिवासींची, माणसाला मारून खायला मागे पडत नसत.त्यामुळे जे काही करायच ते नीट योजना करून करायला लागणार होत, खुप चर्चा आणि खलबते करून भैरव आणि नानाने एक योजना आखली होती.
भैरव ज्या कारणाने या जंगलात येवून रहात होता ते कामपण आता लवकरच पूर्ण करायची वेळ आलीच होती पण त्याआधी मंजुळाला सहीसलामत परत आणण महत्त्वाच होत. त्यामुळे भैरव आणि नाना यांची वेशभूषा बदलून जायची योजना ठरली होती,
पण ते एवढ सोप नव्हत कारण चुकून जरी सापडलो तर फक्त आपल्याच नाही तर मंजुळाच्या जीवालापण धोका होता आणि भैरवला ते परवडणार नव्हत. या कामात भैरवने काही निवडक साथीदार आपल्यासोबत न्यायचे ठरवले होते, पण ते आपल काम बजावून परत येणार होते आणि भैरव पुढ एकटाच जाणार होता.दुसरीकडे बाकी असणाऱ्या सहकाऱ्याना घेवून नाना आपली कामगिरी बजावणार होता,नानाच्या कामगिरीवरच भैरवची पुढची योजना होती त्यामुळे सगळी मदार अनुभवी नानावर होती. अशातच रात्र झाली पण भैरवला झोप येणार नव्हती कारण प्रश्न मंजुळाचा होता.
भैरव मंजुळाला मनापासून आवडायचा,का नाही आवडणार होताच तसा तो,उंच देखणा मजबूत आणि पिळदार शरीरयष्टी असणारा पैलवान. गल्लीतुन चालायला लागला की गल्ली भरुन दिसायची. पण हा गडी कोणाकड मान वर काढून बघायचा नाही. बाईमाणूसापासून तर तो दहा हात लांब असायचा,पण मंजुळावर त्याचा जीव जडला होता.त्याला कारण होत मंजुळाचा स्वभाव आणि मदत करायची तिची भावना. रंगान सावळी असली तरी दिसायला देखणी होती मंजुळा. तरी तिच्यापेक्षा भैरव उजवाच होता दिसण्यात. पण जोडा शोभून दिसण्यासारखाच होता. अंथरूणावर पडल्यावर भैरवला सगळ आठवु लागल जस काही काल परवाच सगळ घडल असाव.
भैरव आणि मंजुळा देवळाजवळ बोलत असताना सावकाराच्या माणसांनी बघितल आणि त्यांनी ही सगळी हकिकत 'ध' चा 'मा' करून सावकाराला सांगितली. सावकारान भैरवच्या आबाला म्हणजे बापु शिंदेला वाड्यावर बोलावून दम देत नको नको ते बोलला,आबा मुग गिळून सगळ ऐकत होता कारण सावकारापुढे बोलण भैरवच्या जीवावर बेतणार होत. सगळ ऐकून घेऊन आबा घरी आला. आता तो भैरव तालमीतन घरी यायचीच वाट बघत होता. थोड्या वेळात भैरव घरात आला, आबाला खुप राग आला होता पण भैरवच जेवुन झाल्यावरच बोलु असा विचार आबान केला. भैरव जेवुन बाहेर आला आणि आबान त्याला पुढ्यात बोलवुन घेतला. समोर आल्यावर आबान भैरवच्या कानशिलात लगावली,  अचानक झालेल्या या प्रकारामुळे भैरव बघतच राहीला.
आता आबा बोलु लागला," आर लेका तुला यासाठी लहानाचा मोठा केला व्हय र? लोकाच्या पोरीबरोबर नको ते करताना या आईबाचा इचार आला नाही व्हय र?
भैरवची आई पळतच बाहेर आली आणि म्हणाली," काय झाल काय बोलतायसा? झालय तरी काय?
आबा म्हणाला," इचार तुझ्या या लेकाला सावकाराच्या पोरीबरोबर काय शेण खात होतास."
भैरव म्हणाला," आबा तुम्ही म्हणताय तस काय नाही,तालमीतल्या मातीची शपथ आम्ही काही चुकीच नाही केल." आणि तो रडु लागला.
आई म्हणाली," रडू नको मला माहिती आहे तु खोट नाही बोलणार."
भैरव म्हणाला," ती देवळात आली होती मग आम्ही फक्त बोलत उभा होतो."
आबा म्हणाला," आर लेका बोलायला तरी का गेलता तु? आक्कल शेण खाती काय तुझी."
भैरव म्हणाला," तीच बोलायला लागली म्हणून मी बोललो."
आबा म्हणाला," ते कायबी असुदे तु तिच्या नादाला परत लागायच नाहीस, सावकार हाड जाग्यावर ठेवायचा नाही."
 भैरवने सगळ ऐकून घेतल आणि तालमीत झोपायला निघुन गेला.
ईकड सावकारान मंजुळालापण ताकीद दिली होती.पण तीने ऐकून सोडून दिल आणि ती भैरवची कुठ भेट होइल याची वाट बघत होती. अशातच गावच्या ग्रामदैवत श्री काळभैरवाची जत्रा आली आणि सगळा गावकरी आपआपल्या ऐपतीप्रमाणे जत्रा साजरी करण्यात गुंग होता.
यात्रेचा पहिला दिवस सगळा गाव काळभैरवाच्या पालखी सोबत होता.पण भैरव सहकाऱ्याबरोबर उद्याच्या कुस्ती मैदानची तयारी करत होता,मंदिरामागच्या शेतवडीत दरवर्षी कुस्ती मैदान व्हायच,भैरव आणि बाकीचे तिथल नियोजन करण्यात गुंग होते. ईकड मंजुळा बेचैन होती कारण तिला भैरवला भेटून काही बोलायच होत पण काय कराव या विचारात ती होती. मग तिने एका मैत्रीणीला बरोबर घेतली आणि भैरवला भेटायला निघाली, सगळा गाव इकड पालखीबरोबर होता याची संधी साधावी अस तिच्या मनात आल आणि ती भैरवजवळ पोहोचली. तिला बघून भैरव चलबिचल झाला, कारण आबान सांगितलेल सगळ त्याला आठवल.
मंजुळान त्याला बाजूला यायला सांगितल पण याच्या मनात नव्हत कारण त्याला आई आबाला त्रास होइल अस वागायच नव्हत. म्हणुन त्यान दुर्लक्ष केल तर ती स्वतःच त्याच्याजवळ आली आणि म्हणाली," काय चाललय तुझ? आजकाल कुठ दिसतसुद्धा नाहीस, काय चुकलय का माझ?"
भैरव खाली मान घालून आपल काम करत म्हणाला," तुम्ही जावा इथन कोणीतरी बघील आणि परत मला माझ्या आई आबाला त्रास नाही द्यायचा आणि तुमच काय चुकल नाही माझच चुकतय, तुम्ही जावा लवकर."
मंजुळा म्हणाली," मी जाणार नाही बोलल्याशिवाय, मी बाबांना सांगणार आहे तुमच्या माझ्याबद्दल."
भैरव म्हणाला," आता आणि काय सांगणारा? ज्यान सांगायच त्यान सांगितल की एकात दोन घालून, आता तुम्ही आणि सांगा म्हणजे माझ आबा मला घरातन बाहेर काढुदेत."
मंजुळा म्हणाली," मी आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहे बाबाजवळ."
भैरव म्हणाला," हे बघा आपण कधीतरी बोलत होतो तर एवढ झाल आणि तुम्ही अस कायतरी केलसा तर महाभारत होइल, तुम्ही जावा माघारी घराकड." ती निराश होवून परतली.
एवढ्यात ही बातमी सावकारापर्यंत पोहोचली होती, तो पालखी अर्ध्यावर सोडून वाड्यावर आला आणि आपल्या माणसांना जमवून भैरवला मारायला पाठवल.
भैरवला याची काडीमात्र कल्पना नसल्यामुळ तो बेसावध होता, पंधरा वीस गडी त्याच्या अंगावर अचानक तुटून पडले. हे बघु भैरवच जोडीदार वाट दिसल तिकड पळत सुटलेत,काय होतय हे कळायच्या आतच भैरवच्या अंगावर काठीपाठोपाठ काठी पडत होती, त्यातूनच एकजंणाची काठी त्याने हिसकावून घेतली आणि गरागरा काठी फिरवु लागला,इकड गावात काळभैरवाची पालखी चालली होती आणि तिकड रानात हा भैरव एकटा झुंज देत होता.
पण एवढया लोकांच्या पुढ त्याचा निभाव कितीवेळ लागणार होता? एकजणाची काठी पूर्ण ताकतीनिशी भैरवच्या डोक्यात  मधोमध बसली आणि भैरवच्या मस्तकातुन मरणवेदनेचा कल्लोळ झाला. भैरवची हालचाल मंदावली आणि तो निपचित खाली पडला. तो मेला अस समजुन सगळे त्याला तिथच टाकून सगळे वाड्यावर परतले.
एवढ्यात ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली,थोडी माणस पालखीबरोबर थांबून बाकीचे सगळे तिकड धावले.
आबा तर जीवाच्या आकांतान पळत सुटला.
देवळाच्या मागच्या शेतात भैरव निपचित पडलेला आबान  पाहिला, डोक्यातन भळाभळा रक्त येत होत. आबान डोक्यातला पटका काढला आणि भैरवच्या डोक्याला गुंडाळला, तरण्याबांड पोराची ही अवस्था बघुन आईच्या काळाजाच पाणी पाणी झाल आणितिन हंबरडा फोडला.
सर्जा आणि हरिभाऊ  बैलगाडी घेवून आलेत आणि भैरवला उचलून बैलगाडीत घालून तालुक्याच्या दवाखान्यात घेवून निघालेसगळा गाव हळहळत होता.
इकड मंजुळाला ही बातमी मिळाली आणि ती घरातून बाहेर धाव घेणार इतक्यात सावकारान तिला अडवली आणि एक कानशीलात लावून आत घालवली. तिला त्या कानाशीलीच भान नव्हतच. आपल्यामुळ हे सगळ झालय हे तिला माहीत होत.त्यामुळे तिला चैन पडत नव्हता. भैरवच काय बर वाईट झाल तर ? या विचारान तिला रडू आल. पण रडून चालणार नव्हत ती मागच्या दारातुन बाहेर पडली आणि तटबंदीच्या भिंतीला शिडी लावून बाहेर पडली. ईकड बैलगाडी वाऱ्याच्या वेगान पळत होती आणि मंजुळा त्या दिशेने धावत होती. हरीभाऊ आणि सर्जा जीवाच रान करून गाडी पळवत होते. आपला वाघासारखा जोडीदार असा मृत्यूच्या दारात आहे त्यामुळे त्याना लवकरात लवकर तालुका गाठायचा होता. माग जणू यमदेव लागलाय आणि त्याला भैरवपर्यंत पोहोचु ध्यायचा नाही अशा इराद्यान बैल पळत होती. वाऱ्यालाही क्षणभर लाज वाटावी अशी बेभान गती पकडली होती. गाडीबरोबर लालमातीचे लोट हवेत उडत होते. आबान भैरवला अगदी काळाजाबरोबर घट्ट धरून ठेवला होता, आबाच काळीज जणु भैरवला सांगत असाव, पोरा भिवु नको तुझा बाप अजुन जीवंत आहे तुला काही होवु देणार नाही. आता लवकरात लवकर तालुका गाठायचा होता.

क्रमशः

श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर.
९९७५२८८८३५.
 फोटो सौजन्य: गूगलबाबा.
(copyright act नुसार सर्व हक्क राखीव आहेत तरी शेअर करताना लेखकाच्या नावासहित करण बंधनकारक आहे तरी कृपया याची नोंद घ्यावी.)

🎭 Series Post

View all