भैरव-एक वादळं (भाग -2)

एक थरार.

भैरव- भाग २रा.
Sarang Chavan
Kolhapur.

ती रात्र तशीच निघुन गेली,पण सावकार आणि त्याची बायको यांच्या डोळ्यासमोर अजुन चांदण्या नाचत होत्या.
एकुलती एक पोर त्यांची त्या राक्षसांच्या ताब्यात होती, ना जाने ते तिच काय करतील या विचारानेच धस्स होत होतं.
सावकाराने सर्जा आणि हरीभाऊ यांना बोलावण धाडल,कारण ते दोघेच भैरवला भेटायला जाणार होते.
ते दोघे भैरवचे लहानपणापासूनचे तसेच विश्वासु जोडीदार होते. थोड्याच वेळात ते वाड्यावर आले, सावकाराने त्यांना विनंती केली की ," लवकरात लवकर त्याच्यापर्यंत जावा आणि त्याला माझ्याकडून हात जोडा पाया पडा पण माझ्या मंजुळाला सोडव म्हणा त्याला, बदल्यात तो जे काही मागील ते मी द्यायला तयार आहे आणि तुमच्यापण जमिनी मी तुम्हाला देवून टाकीन." जमीनी परत मिळणार ह्या आशेने दोघे हे दिव्य काम करायला तयार झाले,जाताना सावकाराने आपली बंदूक आणि थोडी काडतुस त्याना स्वरक्षणासाठी दिली.
ठरल तर मग हे दोघे आपल्याला घरी जावून बरोबर लागणारी शिदोरी,पाणी आणि बाकीचे साहित्य घेवुन भैरवच्या शोधात निघाले, वाट बिकट होती कारण जंगल एवढ घनदाट होत की खालून वर सुर्य दिसायचा नाही दिवसापण अंधार दिसायचा,त्यात भर म्हणजे वावरणारे हिंस्त्र पशु त्यामुळे जपून पाऊल टाकत सावध पवित्रा घेत वाट चालावी लागणार होती.एकदा माणूस भटकला की दिशा वगैरे काही समजायची नाही अस भयानक अरण्य पसरल होत.नवीन कोणी गेल तर भयभीत होवुनच मराव एवढ भयानक वातावरण असायच,पण यांना एकच गोष्ट माहीत होती की भैरव "तामजाई देवी" च्या मंदिराजवळच राहतोय. भैरव गावात रहायचा तेव्हा या दोघांना बरोबर घेवून त्या मंदिरात दोन ते तीन वेळा गेला होता. त्यामुळे या दोघांना थोडाफार अंदाज होता की कुठून कस जायच आहे,पण तरी पूर्ण खात्री नव्हती कारण झाडा झुडपातुन वाट काढत पुढे जायला लागायच. हरीभाऊ कोयत्याने झुडूप तोडत वाट करत होता तर सर्जा बंदूक घेवूनआजूबाजूचा अंदाज घेत होता.कुठून कोणता प्राणी हल्ला करील याची काही शाश्वती नव्हती. दोघेपण मनातल्या मनात ग्रामदैवत श्री कालभैरवाला प्रार्थना करत होते की आमच्यावर कोणतेही संकट येवु देवु नको.
सोबत दोन दिवट्या तयार करुन घेतल्या होत्या जर एखादा प्राणी चाल करुन आलाच तर त्या पेटवुन त्याला घाबरवता याव यासाठी. मागे पुढे मागे पुढे बघत यांच चालण चालु होत, एव्हाना भरपूर अंतर कापल होत दोघांनी त्यामुळे त्यांना भुक लागली होती पण सुरक्षित जागा येइपर्यंत थांबुन चालणार नव्हत.आणखी थोड पुढ गेल्यावर मोठमोठ्या दगडांचा भाग दिसु लागला आणि दोघांनाही हायस वाटल कारण ते योग्य मार्गाने जात होते. त्या आनंदात हरीभाऊला भलताच जोश आला त्याने सपासप कोयता चालवायला चालु केल थोड्या वेळात ते त्या दगडी टेकडीवर पोहोचले आणि एका दगडावर  बसले, कोयता चालवुन हरीभाऊची दमछाक झाली होती. त्याने सोबत आणलेल पाणी घटाघटा प्यायला चालु केल.
तोवर सर्जाने बंदुक बाजुला ठेवून दुरवर नजर टाकुन पाहिली की कुठुन कस जायला हव.अजुन बरच चालायच होत  त्यामुळे दोघांनी शिदोरी काढून खावून घेतली. हरीभाऊने त्या दगडावरच कोयत्याला धार लावली आणि थोडावेळ विश्रांती घेवून ते दोघे पुढ मार्गस्थ झाले.
आता कोयता सर्जान घेतला होता आणि बंदूक हरीभाऊकडे होती,पण हरीभाऊला बंदूक जास्त चालवता येत नव्हती पण तो कोयता चालवुन दमला होता म्हणून सर्जा कोयता चालवत होता. वाटेत साप वळवळत जात होते पण हे सावध पाऊल टाकत होते. पक्षांचे आवाज कानाला आनंद देत होते तर वानरांचा हुप्प असा आवाज भीतीच्या  वातावरणातभर घालत होता. कुठ काळवीट तर कुठ ससे दिसत होते. बरेच पशु पक्षी आता नजरेस पडत होते याचा अर्थ आसपास तो पाण्याचा ओढा असणार याचा अंदाज त्यांना आला ते तसेच पुढ सरकत सरकत ओढ्याजवळ आले आता या इथून पुढ सगळा मार्ग शोधावा लागणार नव्हता कारण हा ओढा तामजाई देवीच्या मंदिरापासूनच उगम पावला होता फक्त ओढ्याच्या किनाऱ्याबरोबर चालत जायच होत आणि तशीही इथून पुढची वाट मळलेली होती त्यामुळे कोयत्याच काम कमी झाल होत. पण पाण्याजवळ प्राण्यांचा वावर जास्त असतो हे दोघे जाणून होते आणि सावधच होते.एकमेकाला आधार देत कालभैरवाच नाव घेत दोघ पुढ चालत होते.आता बरच अंतर कापल होत अजुन किती चालयच असा प्रश्न दोघांना पडला होता.
एवढ्यात अचानक एक भल मोठ रानडुक्कर यांच्यावर चाल करुन आल, घाई गडबडीत कोणाला काही सुचेना, सर्जा पुढ असल्यान ते त्याच्या अंगावर धावून जावु लागल सर्जा ओरडला," हरी बार टाक." पण हरीभाऊ गळपटला होता आणि त्यात बंदुकीत कच्चा असल्यामुळे त्याने घाईघाईत बंदुकीचा बार काढला पण तो चुकला मात्र मोठा आवाज झाल्यामुळे डुक्कर पळून गेल. पक्षांचे थवे हवेत उडाले किलबिलाट झाला.
थोड्या वेळात अचानक झुडुपातुन काही लोकांनी यांच्यावर हल्ला केला आणि दोघांना पकडून दोरीने बांधून घेवून जावु लागले. हे दोघ ओरडत होते," सोडा सोडा आम्हाला,आम्हाला का पकडलय? आम्ही काय केलय तुमच? सोडा सोडा आम्हाला." पण त्यानी बंदुका यांच्या डोक्याला लावून गप्प चालायचा इशारा केला. सर्जा आणि हरीभाऊ दोघ एकमेकांकडे फक्त प्रश्नार्थक नजरेने बघत होते. पण हे लोक कोण आहेत? आपल्याला कुठ घेवून चालेत? आणि आपल आता काय होणार हे काहीच उमगायला मार्ग नव्हता.

क्रमशः
श्री सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर ९९७५२८८८३५,
 फोटो सौजन्य: गूगल.
(copyright act नुसार कथा शेअर करताना लेखकाच्या नावसह शेअर करणे बंधनकारक आहे, तरी नावासहित शेअर करावे)

🎭 Series Post

View all