"भैरव" भाग-१ (काल्पनिक)
Sarang Chavan
Kolhapur
सुगीचे दिवस असल्यामुळे दामु सावकार आपल्या गड्यांना बरोबर घेवून सगळ्या गावात फिरत कर्जाचे व्याज म्हणून धान्य गोळा करत होते.सगळ्यांची शेती त्याच्याकडेच गहाण होती. अगोदरच दुष्काळ आणि दरोडेखोरांचा त्रास त्यात या सावकराची हुकुमशाही यामुळे सगळा गाव हैराण झाला होता. पण हे सगळ सोसण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता.मीपण त्यापैकीच एक होतो,पण लहान असल्यामुळे आणि कायमच डाकुंच्या गोष्टी ऐकत आल्यामुळे माझ्या मनातसुद्धा भीतीने घर केल होत. काही तरुणांनी सावकाराविरुध्द आवाज उठवण्याचा खूपवेळा प्रयत्न केला पण सावकाराने दरोडेखोरांच्या मदतीने त्यांचा कायमचा बंदोबस्त करुन गावातून हाकलल होत.
लोकांना असच जगायची सवय लागली होती, सावकार म्हणेल ती पुर्व दिशा असच गावच सुत्र होत.
पण म्हणतात ना दुसऱ्यासाठी खड्डा काढणारा एकदिवस स्वतःच त्या खड्यात पडतो. अगदी तसच सावकाराबरोबर झाल,
त्या रात्री अमावस्या असल्यामुळे सगळीकडे अंधाराच साम्राज्य पसरल होत. गावकरी लवकरच झोपेच्या अधीन झाले होते.
एवढ्यात कुत्री जोरात भुंकु लागली आणि घोडयांच्या टापांचा आवाज येवु लागला, हळूहळू तो आवाज सावकाराच्या वाड्याच्या दारात जावून बंद झाला. गावकऱ्यांना वाटल नेहमीसारखेच दरोडेखोर डाकू सावकाराकडे आले असतील,म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केल आणि परत झोपी गेले. पण थोड्यावेळात वाड्यावर हलकल्लोळ उडाला,बायकांच्या किंचाळण्याच्या आवाजाने गावकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.
नक्की काय झालय हे बाहेर येवुन बघायची हिम्मत कोणाचीच नव्हती,त्यामूळे जे ते लोक जीव मुठीत घेवून घरात बसले होते.
काहीवेळाने घोड्यांच्या टापा पुन्हा ऐकु येवु लागल्या आणि त्याबरोबरच एका बाईचा आवाज येत होता," वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा."
मला काहीच कळेना काय चाललय कारण आजवर डाकुंनी कोणत्या बाईला पळवून नेल नव्हत. मग आजच कोणाला नेल असेल? सगळा गाव दहशतीखाली होता पण बाहेर जावुन काय चालु आहे हे बघायची हिम्मत कोणाच्यातच नव्हती. डाकु गाव सोडून बाहेर कधी जातात याची वाट सगळे बघत होते.
प्रत्येक गावकऱ्याच्या मनात तर्कवितर्क चालू होते.
मी जाम घाबरून गेलो आणि बाबांना बिलगुन बसलो.जरा कायतरी खट्ट वाजल की जीवाच पाणी होत होत. थोडा वेळ असाच गेला मग डाकू गेले असावेत याचा अंदाज आल्यावर एक एकजण बाहेर डोकावु लागलेत. इकड सावकाराच्या वाड्यावर दंगा चालू होता म्हणून आम्ही सगळे कंदील घेऊन तिकड धावलो, तर सावकार डोक्याला हात लाऊन बसला होता आणि त्याची बायको उर बडवून घेत होती. गावकऱ्यांची चर्चा चालू होती की, सावकाराने ठरलेली खंडणी दिली नाही म्हणून डाकुंनी सावकाराची पोरगी "मंजुळा" हिला उचलून नेली आहे आणि सावकाराकडे आता दुप्पट खंडणी मागितली आहे. खंडणी देउनसुद्धा पोरगी परत देतील का नाही याचा काही नेम नव्हता. म्हणून सावकार विचारात बुडाला होता कारण तो त्या डाकुंना चांगलच ओळखत होता.
सावकाराने त्यांच्या जीवावर आजवर गावाला खुप लुबाडल होत आणि फसवून जमीन काबीज केली होती. पण कमळ चिखलातउगवत तसच सावकाराच्या पोरीकडे बघून वाटायच.
बाप सगळ्या गावाला छळत आला होता पण त्याची पोरगी सगळ्या गावाला लळा लावुन होती,बापापेक्षा कितीतरी वेगळी,एकुलती एक असुन तिला मोठेपणाचा अजिबात गर्व नव्हता. म्हणून ती गावात लाडकी होती. त्यामुळे तिच्याबद्दल गावकऱ्यांचा जीव तुटत होता, आता काय कराव काय नको? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
सावकाराला लोक सांगत होते अस करुया तस करुया पण सावकाराला एक गोष्ट माहीत होती की या संकटातून त्याच्या पोरीला एकच माणूस सुखरुप परत आणु शकतो,पण त्याच नाव घ्यायची हिम्मत त्याच्यात नव्हती त्याला कारणही तसच होत,कोणत्या तोंडान तो त्याची मदत मागणार होता?कारण त्याने त्याच्यावर जो अन्याय केला होता तो माफीच्या योग्य नव्हता.
पण तरी मंजुळाच्या प्रेमापोटी एक म्हातारी बोलुन गेली,"त्या पोरीला बापु शिंदयाचा पोरगाच परत आणील बघा बाकी कुणाला नाही जमायच."
तशी सावकारान मान वर काढली आणि म्हणाला,"भैरव."
तस गावकऱ्यांनी चर्चा चालू केली," होय त्याला सांगावा धाडला पाहिजे, तोच वाचवु शकतोय मंजुळाला."
भैरव कुठ असल याचा अंदाज असणाऱ्यानी सकाळी त्याला सांगावा घेवून जायच ठरल.
पण सावकारांकडून झालेला अन्याय विसरुन भैरव त्याच्या पोरीला सोडवायला जाणार का?
अशी चर्चा करत गावकरी हळूहळू पांगु लागले.
पण सावकाराला माहीत होत की एक कारण अस होत ज्यामुळे भैरव मंजुळाला सोडवुन नक्की आणणार.
आता गरज होती फक्त भैरवपर्यंत सांगावा पोहोचायची.
क्रमशः
श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर.९९७५२८८८३५.
फोटो सौजन्य: गूगल.
(Copyright act नुसार सर्व हक्क राखीव आहेत,त्यामुळे शेअर करताना लेखकाच्या नावासहीत शेअर करण अनिर्वाय आहे)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा