भैरव- एक वादळ (भाग- १७ वा)
सारंग चव्हाण
कोल्हापूर
९९७५२८८८३५.
मंजुळाला घेऊन भैरव घोड्यावरुन बेभान चालला होता. काही झालं तरी जीवाची शर्थ करून मंजुळाला परत आपल्या गावी सुखरूप पोहोचवायची असा ठाम निश्चय भैरव ने केला होता.पुढे दोन साथीदार आणि पाठीमागे दोन साथीदार यांच्यामध्ये भैरव आणि मंजुळा चालले होते. कारण पुढून किंवा पाठीमागून जरी हल्ला झाला तरी मंजुळाला कोणतीही हानी पोहोचू नये याची खबरदारी घेतली होती. पुढे आदिवासी वस्ती आणि पाठीमागून येणारी डाकूंची फौज यांच्यामध्ये ही दौड चालली होती.
रातोरात मंजुळा गायब झाल्यामुळे सूर्या पुरता पिसाटला होता. वाटेत आडव येईल ते तोडत मोडत पुढे चालला होता.
त्याला कशाचीच फिकीर वाटत नव्हती त्याला फक्त आणि फक्त मंजुळा गाठायची होती, कारण तिला घेवून जाणारे नक्की कोण आहेत याचा सोक्षमोक्ष त्याला लावायचा होता. डाकु वस्तीवरुन आजवर असं पळून जायचं धाडस कोणत्याही बाईने केलं नव्हतं, पहिला प्रयत्न केला त्यावेळी मंजुळा अपयशी झाली परंतु दुसऱ्या वेळी तिने संधीचा फायदा घेत डाव साधला. पण आज मंजुळा गेली तशी उध्या आणखी कोणीतरी धाडस करु शकते म्हणून काही झाल तरी मंजुळाला परत आणायचच असा ठाम निश्चय सुर्यान केला होता. आणि तो तुफान याव तसा धावून पाठोपाठ येत होता.
आपला पाठलाग होणार याची भैरवला कल्पना होतीच म्हणून त्याला सुर्यास्तापुर्वी आदिवासी वस्ती गाठायची होती आणि रात्रीच्या अंधारात ती पार करायची होती. एकदा का ती वस्ती पार करुन आडवा येणारा ओढा ओलांडून पुढ गेल की भैरवचा इलाखा चालू होणार होता. जो त्याचा बालेकिल्ला होता. त्यामुळ तिथ पोहोचायला हव म्हणून तो सुसाट चालला होता.
इकड डाकुंनी आपली घोडी मधल्या आडवाटेन घातली जी वाट बरचस अंतर कमी करणारी होती. भैरवला या वाटेची अजिबात कल्पना नव्हती पण हिच वाट त्याचा घात करणार होती. अचानक आभाळ काळवंडुन आल आणि जोराचा वारा सुटला. झाडांची वाळलेली पान हवेत उडू लागली आणि समोरच दिसायच बंद झाल. नाईलाजाने भैरवला घोड्याना थांबवाव लागल कारण मार्ग भटकण्याचा धोका होता. पण डाकुंची घोडी सुसाट पळत होती कारण त्यांच्या पायाखालची वाट होती. त्यानां कुठे काय आहे माहीत असल्यामुळे रस्ता भटकण्याची भीती त्याना नव्हती.
आभाळात विजांचा लखलखाटसुरु झाला आणि मुसळधार पाऊसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे सगळेच भांबावून गेले आणि आसरा शोधु लागले. एक डौलदार झाड बघून भैरवसह सगळे तिथ आसऱ्यासाठी थांबले. पावसाने चांगलाच जोर धरला आणि सगळे झाडाखाली असुन सुद्धा चिंब भिजले.
इकड डाकू सुद्धा अचानक आलेल्या पावसात पूर्ण भिजले होते. पण ते थांबता धावताच होते. थोड्या वेळात पाऊस कमी झाला आणि भैरव आणि बाकीचे परत घोड्यावर बसुन पुढच्या मार्गाला लागले. सुर्या आता एकदम जवळ आला होता पण सुर्या एवढ्या लवकर येइल याचा अंदाज भैरवला नव्हता. भैरव ज्या वाटेन चालला होता त्या वाटेला ती आडवाट येवून मिसळत होती आणि भैरव तिथून थोडासाच पुढे गेला होता इतक्यात सुर्या त्या वाटेला येवून भिडला. तो खुप धुर्त आणि चतुर होता, त्यान घोड्यावरुन खाली उतरुन पाहिल तर त्या वाटेवर चिखलात घोड्यांची ताजी पाउल उमटलेली दिसली आणि त्याला समजल की मंजुळाला जे घेवुन गेले आहेत ते थोड्यावेळापुर्वीच इथुन गेले आहेत. मग त्यान जास्त वेळ न लावता घोड्यावर बसुन बाकीच्याना आवाज दिला," चला र हिकडच गेल्यात ती तिला घेवुन, सोडायची नाहीत त्यास्नी."
आणि त्यानी घोड्यांना टाच मारली. घोडी सुसाट पळत होती आणि सुर्या दातओठखात होता. बघताबघता त्यांनी भैरव आणि मंजुळाला गाठलच. सुर्यान नेम धरला आणि एक बार काढला तो पाठीमागे असणाऱ्या किसनाच्या खांद्याला घासून गेला. धाड...... असा आवाज घुमला म्हणून भैरवसह सगळ्यांनी माग वळून बघितल तर किसनाच्या खांद्यामधुन रक्त येत होत. भैरवन आजूबाजूला नजर टाकली तेव्हा त्याला पाठीमागून येणारे डाकू दिसले. किसनाला खाली घेवुन त्यान मंजुळाला त्याची जखम बघायला सांगितली आणि त्यान लगेच आवाज दिला, " होशियार पाठीमागन डाकू आल्यात बंदुका काडा."
प्रत्येकान सापडेल त्याठिकाणी लपुन गोळ्या झाडायला सुरुवात केली. दोन्हीबाजुनी गोळीबार चालु झाला.
धाड धाड असा आवाज घुमु लागला,सुमारे अर्धा तास झाला ही चकमक चालु होता. आता डाकुंनी हळूहळू पुढे येण्यास सुरुवात केली आणि सुर्याने सगळ्यांना सुचना केली," एकालासुदा हिथ मारायचा नाय,वस्तीवर नेउन मग मारायचीत सगळ्यास्नी,तिथल्यास्नी बी कळूदे अस केल्याव काय हुतय ते."
भैरवकडचे काडतुस संपत आली होते त्यामुळे जास्तवेळ त्यांचा निभाव लागणार नव्हता त्यात किसना जखमी होता, आता करायच काय? अशी परिस्थिती होती पण मनात लढायची जिद्द चिकार बाकी होती आणि त्याबळावरच त्यान लडायच ठरवल होत. डाकु आता खुपच जवळ आले होते आणि त्यांनी सभोवती वेढा टाकून याना चारीबाजुंनी घेरल होत. यातून सुटका म्हणावी तेवढी सोपी नव्हती. सुर्यान आपल्या माणसांना गोळीबार थांबवायचा आदेश दिला आणि बंदुका थांबल्या. भैरवसह सगळेजण विचार करु लागले की काय झाल असाव. इतक्यात बंदुक दुसऱ्याकडे देवून सुर्या एकटाच पुढे येवु लागला. तसा ईश्वर म्हणाला," भैरव घालु का गोळी याला."
भैरव म्हणाला," आर त्यो बंदुक ठेवुन आलाय आन असा मारायच व्हय? काय म्हंतोय ते तरी बघुया."
सुर्या मोठ्यान बोलु लागला," तुमाला चारीबाजुन येडा दिलाया,तवा गुमान बाहीर पडा आन त्या पोरीला आमच्या हावाली करा मग म्या बाकिच्यास्नी जीत सोडतो, नायतर वस्तीवर न्हेवून तुमच हालहाल करुन मारीन, या बाहीर गुमान."
भैरव बाहेर पडणार इतक्यात मंजुळान त्याचा हात पकडला आणि म्हणाली," बाहेर जावु नको, तो हैवान हाय हैवान, कायतर डाव असणार तेचा."
भैरव म्हणाला," फिकीर नगा करु मीपण तयार असतोय कायम."
मंजुळा म्हणाली," भैरव हे सगळ माज्यामुळ होतया, मीच जाते त्याच्याकड,निदान तुमचा जीव तरी वाचल, माझ होवुदे काय व्हायाच ते."
भैरव म्हणाला," ए गप्प बस्स, हे सगळ तुला वाचवायची म्हणूनशान करतोय आमी आन तुच नगो तस बोलतीस व्हय, मी जातो बाहीर आन त्यो कितिबी ताकतवान असला तरी मीसुद्धा शिवाजीमहाराजांचा मावळा हाय, हार मानणारी अवलाद नाही आमची, तुमी तुमची काळजी घ्या."
अस म्हणत भैरव बाहेर पडला. त्याला बघुन सुर्या म्हणाला," ये तु का आलायस? पोरगी कुठ हाय?"
भैरव म्हणाला," ती तुला कवा मिळणार नाही, ती फकस्त माजी हाय आन माजीच आसल."
सुर्या जोरजोरात हसत म्हणाला," आर हाड तुला जीता सोडला तर न्हव, हा हा हा हा....."
भैरव म्हणाला," आर तु तुजी काळजी कर र, तुला मी सोडला तर न्हव,हा हा हा हा."
सुर्या चिडून म्हणाला," लेका मरणाच्या दाडत हायस तरी बी एवडा माज? तुला माजी ताकत माहीती नाय अजुन, नायतर असा बोला नस्तास."
भैरव म्हणाला," तुला माजी ताकत दाखवु का? तुला मंजुळा पायजे न्हव? मग माझ्यासंग कुस्ती खेळ,जो झिकल त्यो तिला घेवून जाईल.बोल हाय का कबूल?"
सुर्या म्हणाला," हाय कबूल ये तु, तुला दाकिवतो ह्यो सुर्या काय चीज हाया."
दोघ एकमेकांच्या दिशेन धावलेत आणि सुरु झाली कुस्ती.
सुरवातीला दोघही एकेमेकाच्या ताकतीचा अंदाज घेउ लागले तेव्हा भैरवला कळून चुकल की सुर्या त्याला ताकतीन वरचढ आहे, याला शक्तीपेक्षा युक्तीन चीतपट करायला हव.
हा विचार करत असतानाच सुर्यान भैरवला खाली खेचला आणि कब्जा मिळवला.
भैरवच्या मानेवर पायाचा बोजा टाकत त्याच्या मानेतला जीव काढून टाकायचा प्रयत्न करु लागला, तोवर भैरवने पूर्ण ताकतीने त्याचा पाय पकडला आणि वरती येवुन त्याच्यावर कब्जा घेतला अशी ही कुस्ती सुमारे अर्धातास चालु होती आता पुन्हा समोरासमोर कुस्ती लागली आणि भैरवने आपला हुकमी असणारा कुंडी हा डाव टाकला आणि काय होतय हे कळायच्या आत सुर्याची पाठ जमीनीला लावून त्याला अस्मान दाखवल. आता भैरवचे साथीदार खुश झाले पण मंजुळाला माहीत होत की सुर्या रडीचा डाव खेळणार आणि झालदेखील तसच.
भैरव सुर्याला म्हणाला," झाल का नाही समाधान?आता ठरल्यापरमान मी मंजुळाला घेवून जाणार."
सुर्या खलनायकी हसत म्हणाला," हाहाहाहा आर आमी डाकू हाओत डाकू, आमास्नी वाटल तेच कर्तो आमी,तु कोण र ठरिवणारा? असल्या कुस्तीवर मी तिला नेवु दिल आस वाटल व्हय र तुला? तुमाला सगल्यास्नी अड्ड्यावरती घेवुन जाणार हाय आन हालहाल करुन मारणार."
आपण फसलोय हे भैरवला आणि बाकीच्यांना समजल आणि किसनान एक गोळी झाडली ती सुर्याच्या डाव्या पायात घुसली आणि तो कोसळला. सगळ्या डाकुंच लक्ष तिकड वेधल आणि या संधीचा फायदा घेत भैरव साथीदाराजवळ परत गेला.
ईश्वर म्हणाला," भैरव तु मंजुळाला घेवून पुढ जा आमी हाय इथ रोखतो त्यास्नी."
यावर भैरव म्हणाला," आर भैरव एवढा स्वार्थी नाय र तुमाला हित टाकुन मी पळून जावु व्हय र? आर जीव गेला तरीबी जाणार नाही मी, तुमी सगळी माझ्यासाठी हिथ आलायासा आन तुमाला सोडून मी जावु व्हय?"
किसना म्हणाला," भैरव आमचा इचार नग करु आमाला काय नाही हुनार, तुझ्यासाठन राहुदे मंजुळासाठन तुला जायाला लागल. ती त्यांच्या हाताला लागता कामा नाही."
बाकीचे दोघपण म्हणाले," भैरव आस तुज माज करु नग, आपुन काय येगळ हाओत का? ही जर त्यास्नी मिळाली तर त्यात आपली हार हाय गड्या, आन आशा जगन्याला कायबी किम्मत नसती बग."
किसना म्हणाला," भैरव तुला आमची शप्पत हाय गड्या, तु जा हिला घेऊन आन जगलो वाचलो तर भेट हुईलच."
भैरवला कोणी बोलुच देइना, आपल्या साथीदाराच हे प्रेम जिव्हाळा बघुन भैरवच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहु लागल्या. ही नाती रक्ताची नव्हती पण रक्ताची नातीसुद्धा फिकी पडतील असा जिव्हाळा होता या सगळ्यात आणि भैरवला त्याना सोडून जाण जड जात होत कारण त्याना साक्षात मृत्यूच्या जबड्यात टाकून गेल्यासारख होत.
पण ते ऐकायलाच तयार नव्हते.मग भैरवने त्याना सगळ्यांना एकदा मिठी मारली आणि म्हणाला," भावानो मी तुमच्या शब्दाखातीर जातोया पर मी परत येणार तुमच्यासाठी हा माजा शब्द हाय,माजी वाट बगा,सांभाळा सवताला."
आणि त्यान अश्रूपूर्ण डोळ्यांनी त्यांचा निरोप घेतला आणि घोड्यावर बसुन ते आदिवासी वस्तीच्या दिशेने निघाले.
क्रमशः
श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर
९९७५२८८८३५.
फोटो सौजन्य: गूगलबाबा.
(शेअर करताना लेखकाच्या नावासहीत शेअर करावी ही विनंती)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा