भैरव-एक वादळं (भाग -14)

एक थरार.

भैरव-एक वादळ.(भाग-१४ वा)
सारंग चव्हाण
कोल्हापूर
९९७५२८८८३५.

आज काही करुन मंजुळाला जिथ ठेवल आहे तिथ पोहचायला हव म्हणून भैरव साथीदारांना सुचना करत चालला होता.सगळा बेत ठरला होताच पण तरी त्याची उजळणी करायला चालू होती कारण ऐनवेळी गडबड नको.
घोड्यांचा वेग वाढला होता कारण खुप मोठ अंतर गाठायच होत आणि संध्याकाळ व्हायच्या आत तिथ पोहोचुन परिस्थितीच अंदाज घ्यायचा होता आणि रात्रीच्यावेळी तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा असा बेत भैरवने आखला होता. कारण दिवसा त्यांचा सामना करण खुप मुश्किल होत  आणि त्यांच्याच इलाख्यात ते वरचढ ठरणार यात काही शंका नव्हती. त्या गर्द झाडीतून वाट काढत काढत ते पुढे पुढे निघाले, परतीची खात्री नव्हती पण मनात भीतीच लवलेश नव्हता. ही मोहीम हाती घेतानाच जीवाची बाजी लागणार हे त्यांना माहीत होत. पण त्यांना कर्तव्यापेक्षा जीव कधीच प्यारा कधी नव्हता. म्हणून ते जीवाची बाजी लावत या मोहिमेत भैरवला सोबत करत होते.
इकडे मंजुळाला पळवून आणल्यापासुन तिला एका बांबुनी बनवलेल्या खोलीत ठेवल होत त्या खोलीच्या चारीबाजुंनी पाणी होत आणि त्यात जाण्यासाठी एक लाकडी सांकव होत जे दोरीच्या सहाय्याने उचलता येत होत. कोणाला आत जायच असेल तेव्हा ते सांकव खाली सोडल जायच आणि बाहेर आल्यावर ते सांकव पुन्हा उचलून घेतल जाई त्यामुळे मंजुळाचे हात पाय खुले असूनही तिला पळून जाता येत नव्हत. तिची फक्त तळमळ व्हायची पण तिला काही मार्ग दिसत नव्हता.
तिथ डाकुंनी एकप्रकारच गावच वसवल होत.
त्याठिकाणी तिच्यासारख्या पळवून आणलेल्या अजुन बऱ्याच बायका होत्या ज्यानी नाईलाजाने आता हेच आपल जग मानल होत आणि स्वतःचा संसार इथच थाटला होता. त्यांना मुलबाळं सुद्धा झाली होती, पण मंजुळाला इथून बाहेर पडायच होत. तिची घुसमट होत होती,तिने अन्नपाणी टाकल होत.त्यामुळे ती अशक्त दिसु लागली होती चेहऱ्यावरच तेज गायब झाल आणि डोळ्याभोवती काळी वर्तुळ तयार झाली होती. भितीच्या सावटात ती एक एक श्वास घेत होती,कारण तिला भिती होती की एखाद्या नराधमान जर अब्रूवर हात टाकला तर तीला आयुष्यभर नरकयातना भोगाव्या लागणार होत्या. नुसत्या कल्पनेनच तिच्या काळजात धस्स होत होत आणि ती इथून सुटकेसाठी देवाचा धावा करत होती.
बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तस इथ तिला त्या बाकी बायकांचा आधार होता,त्यांना मंजुळाबद्दल सहानुभूती होती कारण त्यांना वाटत होत की आपल आयुष्य जस या नरकात गेल तस आणखी कोणाच जावु नये. म्हणून त्या मंजुळाला धीर देत होत्या. त्यांच्या आधारावरच तीला थोडासा धीर मिळाला होता. त्यातली यशोदा नावाची एक बाई रात्रीच्यावेळी तिच्या सोबतीला असायची. ती तिची जीवाभावाची सखीच बनली होती जणू.              
मंजुळान तिला आपल्या आणि भैरवविषयी सगळ सांगितल होत आणि त्यामुळे यशोदाला तिच्याबद्दल जास्त सहानुभूती वाटत होती. तिला मनापासून अस वाटत होत की मंजुळाची इथून सुटका व्हावी पण तिलापण काही मार्ग दिसत नव्हता.
कुठून काहीतरी चमत्कार व्हावा आणि इथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडावा अस त्याना वाटत होत.
एक दिवस या दोघी त्या खोलीत बोलत असताना त्या डाकुंचा सरदार "सुरसेन" जो " सुर्या" नावाने परिचित होता तो अचानक तिथ आला आणि म्हणाला," ए पोरी तुझ्या बानं अजुनपातुर खंडणी नाय द्याला जरका परवादिशी परेंत नाय दिली तर तुला लगीन करून ऱ्हाव लागल हित, मग तेला सासरा करुन सगळ माझ्या नावावर करतो बग.हाहाहाहाहाहा." तो हिडीसपणे हसत हसत तिथून निघु गेला आणि सांकव वर उचलण्यात आल.
मंजुळा भीतीन थरथर कापु लागली आणि तिन रडायला चालु केल, ती यशोदाला म्हणाली," माझी सुटका नाही झाली तर मी या पाण्यात उडी मारून जीव देइन खर भैरवशिवाय कोणाला अंगाला हात नाही लावु देणार."
यशोदा धीर देत म्हणाली," म्या तुला कायबी नाय होवु देणार ,जे माज झाल ते तुज नाय होवु देणार,तु भिवु नगो."
मंजुळा म्हणाली,"माझा भैरव कुठ आसल? काय करत आसल? मला कायबी माहीत नाही,माझ्यामुळ त्याच्या आयुष्याची वाट लागली, आईआबा बेघर झाल." आणिती यशोदाच्या गळ्यात पडुन रडू लागली.
यशोदा म्हणाली," आग गप्प आशी रडू नगो,समद बर हुइल,माझ्यावर इश्वास ठेव."
मंजुळाची इथून सुटका करायचीच या जिद्दीला  यशोदा पेटली होती. कारण तिलासुद्धा अशीच उचलून आणली होती.तिच्या लग्नाच्या मंडपातुन तिच्या नवऱ्याला मारुन तिला दागिन्यासह पळवून आणली होती.तिला ते सगळ आठवल आणि तिने मंजुळाला सोडवण्यासाठी एक धाडसी बेत आखला. 
यासाठी तिला बाकी बायकांचीपण गरज भासणार होती. आणि त्यादिशेन तिन पाऊल टाकायला चालू केली.आजच्या रात्रीच ही योजना पार पाडायची असा निश्चय साऱ्यानी केला. सगळ्यां बायका तयार झाल्या कारण त्यांच्यावर असाच अन्याय झाला होता आणि अजुन होत होता.             
त्या रात्री मंजुळा आणि यशोदान जेवण करून झोपल्याच सोंग काढल. त्या नेहमीसारख्या झोपल्या आहेत याची खात्री झाल्यावर पहारेकरी झोपायला गेले. थोड्या वेळात ज्याना कामगिरी दिली होती त्या बायका घराबाहेर पडल्या आणि त्या सांकवाजवळ आल्या. इकड तिकड चा अंदाज घेवून त्यांनी सांकवाची रस्सी सोडून हळूहळू सांकव खाली सोडल आणि दोरी कापुन टाकली कारण दोरी तुटून सांकव खाली पडला अस वाटाव.
बायका चोरपावलांनीच परत आपापल्या घरात गेल्या. मग मंजुळान यशोदाला तिच्याच साडीन खांबाला बांधून घातल. कारण तिला बांधुन घालून पळुन गेली अस वाटाव. निघण्यापूर्वी तिन यशोदाला घट्ट मिठी मारली आणि दोघींच्याही डोळ्यातुन अश्रू ओघळु लागले. 
यशोदा म्हणाली," पोरी आता येळ नग लावु जा पळ लवकर ,वस्तीभाईर घोडा तयार हाय,पळ घाबरु नग जा पळ लवकर."
मंजुळा धावतच सुटली,वस्तीच्या बाहेर झाडाखाली घोडा तयारच होता.
एका तिच्या अंगात आई तुळजाभवानीच अवतरली होती जणु एका झेपेत तिन घोड्यावर कब्जा घेतला आणि घोड्याला टाच मारली. घोडा बघता बघता जंगलात शिरला. समोरच काही दिसत नव्हत पण घोडा जिकड जाईल त्या दिशेला जायच पण इथून दुर निघुन जायच एवढ तिन मनाशी पक्क केल होत.
पण ती घोड्यावर बसल्यावर वस्तीवरच्या कुत्र्यांनी जोरात भुंकायला सुरुवात केली आणि पहारेकरी जागे झाले कुत्री जंगलाच्या दिशेने भुकत होती. पहारेकरी धावत आले आणि बघतात तो काय सांकव खाली होता ते तसेच आत धावले तर आत यशोदाला बांधून ठेवल होत. त्यांनी तिला सोडवल आणि विचारल," ती पोर कुठ गेली बोल लवकर बोल."     
यशोदा घाबरत म्हणाली," म्या झोपले व्हते आन तिन माझ हातपाय बांधून घातल आन ती पळूनशान गेली."
पहारेकऱ्याची पाचावर धारण बसली कारण आता सरदार काय आपल्याला जीवंत ठेवत नाही. तबेल्यात घोडी आणायला गेले तर एक घोडा गायब असल्याच त्यांना समजल  ते लगेच घोडी घेवून जंगलात घुसले. सोबत शिकारी कुत्री होतीच.भूंकत भुंकत त्यांनी वायुचा वेग पकडला  आणि पाठलाग सुरु झाला.
इकड वस्तीवर बायका काळजीत पडल्या. त्या देवाचा धावा करु लागल्या," हे देवा त्या पोरीला वाचीव,तिला सुखरुप पार जावु दे."
इकडून मंजुळा डाकुंच्या तावडीतून जीव वाचवून जीवाच्या आकांताने घोडा हाकत होती आणि समोरून याच दिशेने भैरव आपल्या साथीदारासह येत होता. पण याची कल्पना त्या दोघांनाही नव्हती.

क्रमशः
श्री सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर.
९९७५२८८८३५.

फोटो सौजन्य:गूगलबाबा 
(कृपया शेअर करताना लेखकाच्या नावासहीत शेअर करावे,ही नम्र विनंती.)

🎭 Series Post

View all