भैरव-एक वादळं (भाग -10)

एक थरार

भैरव- एक वादळ(भाग-१० वा)
सारंग चव्हाण
कोल्हापूर
९९७५२८८८३५.

अंधार पडल्यामुळे भैरवला कुठे जायचं काही समजत नव्हत,मात्र पोलिस माघारी परतलेत एवढ त्याला समजल होत.
कारण आत जंगलात शिरण धोकादायक होत त्यामुळे ते परत गेले होते. भैरव एकटाच त्या जंगलात चाचपडत होता. सगळीकडे काळाकुट्ट अंधार, त्यात किरकिरणारे किडे,कोल्ह्यांची भीतीदायक कोल्हेकुही, उंचच उंच अजस्त्र झाडे जी अंधारात एखाद्या राक्षसासारखी भासत होती. झाडावरुन खाली  झुकलेल्या वेली अंधारामुळे चेटकीणीच्या जट्टा सारख्या भयानक दिसत होत्या.वातावरण अगदी भयावह होत. कुठेतरी खट्ट वाजल की भैरव आणखीन सावध व्हायचा. तसा तो प्रत्येक संकटाशी लडायला समर्थ होता पण त्याच्या हातातल्या बेड्या त्याला दुबळा ठरवत होत्या.
भैरवला आजची रात्र या परिस्थितीतच काढायची होती, दुसरा पर्याय नव्हता, कारण डोळ्यात बोट घातली तरी पायाखालच दिसत नव्हत. पण इथ थांबण खरोखर योग्य होत की नाही हे मात्र काही सांगता येत नव्हत. कुठून काय येईल याचा काही नेम नव्हता पण तरीही आजची रात्र कशीबशी इथ काढून सकाळ होताच जंगलातून बाहेर पडायच अस ठरवुन भैरव एका झाडाला टेकून बसला. सभोवताली नजर टाकली तर चित्रविचित्र आकृत्या दिसत होत्या,त्यापेक्षा त्यान सभोवती बघण टाळल. मध्येच एखादा काजवा चमकु लागला आणि भैरवला भास झाला  की कोणीतरी बॅटरी घेऊन आलय की काय? पण लगेच कळल की तो काजवा होता. जमिनीवर पडलेली वाळकी पान वाऱ्यान वाजायला लागली आणि कायतरी सरपटत आल्याचा भास झाला तसे भैरवने पाय आखडुन पोटाशी  घेतले. डोळ्यात झोप होती पण झोप लागत नव्हती,कारण सावध राहण गरजेच होत. भैरवला इकड गावात काय झालय याची काही कल्पना नव्हती.
इकड भैरवचे आई आबा आता गावाच्या हद्दीतून बाहेर पडले आणि  ओढ्याकाठी विश्रांतीसाठी थांबले, पण विश्रांती कशी मिळेल? एकुलता एक मुलग्याच आयुष्य पणाला लागल होत आणि सगळा संसार डोळ्यादेखत जळुन खाक झाला. आगीत फक्त संसार नाही जळाला, तर सगळी स्वप्नसुद्धा जळून खाक झाली. पण हातपाय गाळून भागणार नव्हत. भैरव एक दिवस नक्की परत येईल असा विश्वास त्यांना होता. तेव्हा नव्यान सुरुवात करु असा आशावाद होता त्यांच्या डोळ्यात. 
भैरवची आई म्हणाली," आव ऐकातायसा न्हव?"
आबा म्हणाला," हा बोल की काय म्हणतीस?"
आई म्हणाली," पोरग कुठ आसल ओ? काय करत आसल? पोलिसास्नी गावल तर ते काय करत्याल ओ तेला?" तिच्या बोलण्यात काळजी जाणवत होती.
आबा म्हणाला," आग काय नाय व्हनार त्येला,काळभैरवाच वरदान हाय त्यो, तेलाच आता तेची काळजी." आबा अस बोलला असला तरी त्यालापण भैरवची काळजी होतीच, पण त्याला आपण खंबीर बनण गरजेच होत नाहीतर भैरवची आई पुरती खचणार हे तो ओळखुन होता.            
आई म्हणाली," आव पोरग उपाशी आसल ओ सकाळपास्न, शेताकडन आला की आधी आई मला जेवायला दे म्हणायचा,भुक सोसत नाय तेला, माझ बाळ कस असल?"  अस म्हणत तीला हुंदका आला आणि ती रडू लागली.
आबा म्हणाला," आग ए काय म्हणूनशान रडती? आग वाघ हाय तो वाघ, जिथ जाईल तिथ वाघ म्हणूनच जगल आन आमच काय चुकल नाय मग देव आमाला पुन्यांदा बळ दिल बघ. जरा वाट बगु भैरव परत येणार म्हंजी येणार."
आता आबाचा कंठसुद्धा दाटून आला आणि आबा आणि आई एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. नंतर एकमेकांना सावरत त्यानी तिथच अंग टाकल आणि त्यांचा डोळा लागला.
 अशातच सकाळ झाली, पाखर किलबिलाट करु लागली.
त्यांच्या आवाजान दोघांना जाग आली. दोघांनी ओढ्यात हात पाय तोंड धुतल आणि ते पुढ चालू लागले.एक गाव ओलांडून गेल की पुढ आबाच्या मावशीच गाव होत,तिथ जाव म्हणुन ते त्या दिशेने चालु लागले.
इकड भैरवचा पहाटे पहाटे जरा डोळा लागला होता, सकाळ होताच रानपाखरं आपल्या आवाजान वातावरण कस अगदी प्रसन्न करु लागले होते वेगवेगळे आवाज,वेगवेगळे सुर. त्या आवाजान भैरवला जाग आली आणि त्याने मान वर काढली आणि बघतो तो काय ?
सभोवताली सगळीकड हत्यारधारी माणस त्याला वेढा टाकून उभा होती.
भैरव सटपटला कारण अस काही घडेल याची कल्पना त्याला नव्हती,तो ताडकन उठून उभा राहिला.
इतक्यात त्यातला एक माणूस म्हणाला," ए शानपणा नाय करायचा,गुमान उभा रहा."
भैरव म्हणाला," कोण हायसा तुमी? आणि मी काय केलय तुमास्नी?"               
तो माणूस म्हणाला," आर गप्प, तु कोण हायस ते सांग  आणि हिथ काय करतोयस? पोलिसाचा माणूस हायस का? गुमान खर खर बोल."
भैरव म्हणाला," मी भैरव जवळच्या गावातच राहतोय,पोलिसांच्या तावडीतन सुटून आलोय."
तो माणूस म्हणाला," खर बोलतोयस न्हव? नायतर तुझी धडगत नाय व्हायची."
भैरव म्हणाला," हातातली बेडी तर दिसतीया का नाही तुमास्नी?"
त्यांनी अजुन त्याच्या हाताकड निरखून पाहिलच नव्हत.
हातातली बेडी बघितल्यावर त्यांचा विश्वास बसला.
त्यांना भैरवने आपली सगळी कथा सांगितली. सगळ ऐकून झाल्यावर त्यांच्यातला माणूस म्हणाला," तुझ्यावर बी  अन्याय झालाय म्हणायचा तर,इथ जेवढी माणस हायत त्यांच्यावर बी असा ना तसा अन्याय झालाय."
भैरव म्हणाला," म्हणजे तुमीबी माझ्यासारखच हायसा, खर इथ राहुन काय करतायसा?"
तो माणूस म्हणाला,"ज्यान जसा अन्याय केलाय तेला तसाच धडा शिकवतोय आमी, जे सावकार,वतनदार गरिबास्नी छळत्यात त्यास्नी लुटून आम्ही गरिबास्नी मदत करतोय."
भैरव म्हणाला," वा आर लय भारी काम करतायसा गड्याओ, पुण्याचं काम हाय हे."
तो माणूस म्हणाला," तु आता काय करणार हायस? कुठ जाणार?"
भैरव म्हणाला," गावाततर लगीच नाही जावु शकत,बघुया जायाच कुठतर."
तो माणूस म्हणाला," तुला काय अडचण नसल तर आमच्यासंग चल, रहा थोडदिस मग तुझ कुठ जायच ठरल की जा निघून."
भैरवला त्याच बोलण पटल तो म्हणाला," कुठ ऱ्हातायसा तुमी."
तो माणूस म्हणाला," तु फकस्त संग ये,सगळ समजल तुला."   आणि त्याने भैरवची बेडी बंदुकीच्या गोळीन तोडली.              
भैरव त्यांच्या पाठोपाठ चालु लागला,थोड्या अंतर चालल्यावर तामजाईच मंदिर आल. भैरव आनंदात म्हणाला," आर ही तर तामजाईदेवी,मी आलोय इथ याआधी."
तो माणूस म्हणाला," व्हय तामजाईदेवीच हाय ती आणि हितच ऱ्हातोय आमी,आई हाय आमची ती."
 
असच दिवस निघून जात होते, भैरवला आता हेच आपल जग वाटू लागल. ती एकत्र राहुन एकमेकांना जीवावर उदार होवून मदत करणारी माणस त्याची आपली कधी झाली त्यालाच कळाल नाही. तोसुद्धा आता त्यांचाच भाग झाला होता, त्याच धाडस आणि ताकत यामुळे तो सगळ्यांचाच आवडता झाला होता. त्याने ठरवलेल्या योजनेनुसारच त्यांच सगळ कामकाज चालु लागल. या सगळ्यात राहूनच त्याचा बदला पुरा होणार होता. सावकारांकडून गावकऱ्यांचा होणारा छळ, आई आबा यांच्यावर झालेला अन्याय आणि जिच्या प्रेमामुळे सगळ आयुष्य पणाला लागल त्या मंजुळाशी लग्न आणि सगळ्यात आधी स्वताला निर्दोष सिद्ध करून खरा गुन्हेगार तो सावकार आहे हे सिद्ध करणे ही सारी ध्येय त्याला गाठायची होती. आणि त्यासाठीच तो इथ येवून राहिला होता.(एक दिवस सर्जा आणि हरीभाऊ भैरवकडे येवून मंजुळाला पड्यालच्या डाकुंनी पळवली असल्याची बातमी देतात आणि आता पुढे...................)

भैरव अंथरुणावर पडल्यापडल्या हे सगळ घडून गेलेल  आठवत होता.
उद्या त्याला मंजुळाला सोडवून आणायला जायच होत.
बेत ठरला होता,आता फक्त तो जसाच्या तसा अमलात येण गरजेच होत आणि भैरव आता तोच विचार करत होता.

क्रमशः

श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर.
९९७५२८८८३५.

फोटो सौजन्य: गूगलबाबा.
(शेअर करताना लेखकाच्या नावासहित शेअर करावे ही विनंती आहे)

🎭 Series Post

View all