Nov 30, 2021
सामाजिक

भागामावशी

Read Later
भागामावशी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भागामावशी

   सकाळी चहाचा कप घेऊन अंजु अंगणातल्या बागेत बसली होती. दुरूनच रखमा येताना दिसली. रखमा अंजूकडे घरकामाला यायची.
   "आज सकाळी सकाळी कस काय येणं केलं? सुट्टी घ्यायचा विचार आहे का?"
   "नाही बाई. तो आमचा महादू (रखमाचा भाऊ) गावाकडं गेलता बघा. भागाबाई शांत झाली . चार दिस झाले आज. मनलं तुमास्नी सांगाव. तुमच्याकड हुती न  व लई वर्षापासून."   
   "कस काय झालं ग?" 
   "आवं साखरेची बिमारी झालती म्हणे, डोळ्यानी नीट दिसायचं बी नाय. तेव्हापासून म्हातारीन हाय खाल्ली बघा. डोळ्यात फुल बी पडलं हुत. डाकटरनी आपरेशन बी सांगितल हुत. या साखरेच्या बिमारपायी ते बी नाही करता आलं. जुनी माती हुती म्हणून एवढी जगली बघा. बर झालं, लई हाल होण्यापेक्षा देवानं लवकर बोलवलं ते. चला येते मी. दुपारच्याला येते कामाला."
    रखमा आली , बोलली अन निघून गेली. अंजू मात्र स्तब्ध उभी. मन मात्र कधीच भूतकाळात पोहोचलं,  26वर्षांपूर्वी.
  

   परी चार महिन्यांची असेल तेव्हा. गावाकडून तार आली सासरेबुआ आजारी असल्याची, अन परीच्या जन्मापासून सोबत असणाऱ्या सासूबाई पुढच्याच बसने गावी जाण्यासाठी निघाल्या. अंजूच्या माहेरहूनही  इतक्या लवकर कोणी येणं शक्य नव्हतं. बाळाची अन सर्व घरकामाची जबाबदारी अंजूवर एकदम येऊन पडली. जाताना मात्र सासूबाई लेकाला सक्त ताकीत देऊन गेल्या, "सुजीत लवकरात लवकर कामासाठी बाई बघ. अंजूची तब्येत नाजूकच आहे हो, अन बाळ पण आत्ताच कुठे बाळसं धरतंय. अंजूची फजिती नको करुस".
   जाता जाता सासूबाई शेजारच्या बायकांना पण बोलून गेल्या, एखादी बाई पहा कामासाठी म्हणून.
  आता अंजूची तारेवरची कसरत व्हायची घरकाम , छोटी परी, सुजीतच ऑफिस. 
 
   एकदिवस दुपारी साठे वाहिनी भागाबाईला घेऊन आल्या. जुनंच पण स्वच्छ नवार पातळ नेसलेली, डोक्यावर पदर, कपाळावर गोंदण अन त्यावर ठसठशीत लाल कुंकू, त्याखाली हळद. कमरेला चंची खोचलेली, अन हातात एक पोत्याची शिवलेली पिशवी. साधारण पन्नाशीच्या आसपास किंवा जास्तच वय असेल. साठे वहिनींनी ओळख करून दिली. " या चंद्रभागा मावशी. पण सगळे यांना भागामावशी म्हणतात. आपल्या कॉलनीच्या बाजूने जी वस्ती आहे न तिथे राहतात. आधी बांधकामावर जायच्या कामाला पण आता झेपत नाही तिथलं काम. यांना पण गरज आहे कामाची. विश्वासु आहेत. अंजू तुम्ही दोघी बोलुन ठरवा काय ते कामाच. येते मी."

   "मावशी, अजून कुठं जात असता का कामाला? झाडू, फारशी पुसणे, अन भांडे या कामाचे किती घेता सांगा?" 
   
   तेवढ्यात परी उठली म्हणून अंजू तिला पण बाहेर घेऊन आली. परीला पाहून भागामावशी म्हणाली, " या ताईसाहेबास्नी सांभाळून होणार हायेत व्हय बाकी काम तुमच्याच्यानी? आताच गरज असते बगा लेकरायला, नंतर मोठे झाले न, की कुणी नाही ईचारत माय बापाला. म्या समद काम काराय तयार हाय. आणि पैशाच काय, तुम्ही द्याल ते बरोबरच देणार, बाकीच्या बायांना देता तेवढे द्या. मग यु का उद्यापासन?" 
   "हो चालेल की, सकाळी 9 वाजता आल्या तरी चालेल."
आज जुजबीच बोलणं झालं या बाईंशी. तश्या चेहऱ्यावरून तर चांगल्या वाटल्या. ठीक आहे आता येत आहेत कामाला तर कळेलच नेमक्या कशा आहेत ते.अंजू स्वतःशीच पुटपुटली.

    कामवाली बाई घर झाडून पुसून देणार म्हणजे अंगण तिच्या हिशोबात नसणार म्हणून सकाळीच अंजूने अंगण झाडून घेतलं. आल्या आल्या भागामावशीने अंगण झाडायला घेतलं, अंजू म्हणालीसुद्धा तुमच्या कामात नसेल बसत तर राहू द्या.
   "घराशिवाय अंगण, अंगणाशिवाय घर असतय का? घर अन अंगण अस येगळ करता येतंय व्हय? तुमि नगा झाडत जाऊ , म्या आली की झाडत जाईन."

    भागामावशीच काम सुरु झालं. आल्या आल्या आधी आंगण झाडायच्या तेही बरोबर चौकोनी आकारात. मग त्यावर सडा टाकायच्या. तोही एकसारखा सगळीकडे. त्यांनी एवढया देखण्या केलेल्या अंगणात रांगोळी काढायचा मोह आवरायचा नाही. अंजू पण मग छोटीशी सुबक रांगोळी काढायची. भागामावशीच काम अगदी टापटीप. भांडे घासून लख्ख चमकायचे, त्यांनी धुतलेले कपडेही पुन्हा नवीन वाटायचे. त्यांच्या हिशोबात नसलेले किती तरी काम त्या अंजूला करून द्यायच्या. भाज्या निवडणे, गहू तांदूळ निवडणे, कधी कधी कपड्यांच्या घड्या घालून देणे, कधी परीची मालिश करून देणे, कधी अंजुचा स्वयंपाक होईपर्यंत परीसोबत खेळणे, असे कितीतरी काम विना अपेक्षेने भागामावशी करून द्यायच्या. 
अंजूचच नाही तर कॉलोनीतल्या  कोणत्याही बाईच्या घरी म्हणेल ते काम करून द्यायच्या अगदी मिळेल त्या मोबदल्यात.

    एकदा अंजूने रात्रीच्या उरलेल्या पोळ्या गाईला लावायला भागामावशी जवळ दिल्या. 
"बाईसाहेब, तुम्हांसनी राग नसलं यत, तर यक विचारू का? या पोळ्या मी नेऊ का? माझ्या नातवांना लई आवडतात बगा अश्या तेलाच्या पोळ्या."
"अग मावशी पण त्या शिळ्या आहेत."
"गरिबाला कुठंच आलं ओ शिळ अन ताज, आज पोटाला अन्न मिळालं हेच लई हाय बगा."
   अंजूला पण नाही म्हणवलं नाही. भागामावशीन तिच्या पोत्याच्या पिशवीतून एक स्वच्छ कापड काढला अन त्यात पोळ्या बांधून ठेवल्या. तेव्हापासून अंजूनी ठरवलं रोज रात्री उरलेला स्वयंपाक भागाबाईला नेऊन द्यायचा. तिनी मुद्दामच चार पोळ्या जास्तीच्या केल्या. रात्रीची जेवणं झाल्यावर सुजीतला सांगितलं. त्यालाही तिचं म्हणणं पटलं. मग दोघे परीला घेऊन शतपावली करत वस्ती पर्यंत गेले. 

   भागामावशीची छोटीशी झोपडी होती. झोपडी ती काय, दोन पत्रे तिरपे ठोकेलेले अन तंबू सारखा आकार त्याचा, दार म्हणून एक पडदा गुंडाळलेला. दारातच तिचा नवरा बसला होता. भागामावशी बाहेरच चुलीवर भाकरी थापत होती. पोळ्या दिल्यावर तिनी खूप खुशीनी तिच्या नातवांना आवाज दिला. नातवांनी पण तेवढ्याच आनंदाने पोळ्या खाल्ल्या. रोज शतपावली करत अन्न नेऊन द्यायच काम अंजूने सुरू केलं ते कायमस्वरूपी. 
   दुसऱ्यादिवशी भागामावशी कामावर आल्या.
   
"मावशी एवढुश्या झोपडीत कसे राहता ग तुम्ही? तुझे मुलं-सुना कुठे राहतात?"
   "मला बगा तीन मुलं अन दोन मुली हायेत. मुलं अन सुना आमच्या झोपडीच्या मागच त्या पत्राच्या तीन खोल्या हायेता बगा तिथ राहतात. तिघीच्या तीन चुली बी झाल्या बगा. आता आमी म्हतारे झालो तर जड झालो बघा लेकरायला. म्हणून आमची सोय त्यांनी अंगणात केली बगा. पोरी माझ्या सासरी राहत्यात. जवाई भले हायेत. शेतात मजुरी करून चालतय बर त्यांच".
   भागामावशीच्या मुली आल्या म्हणजे येताना शेतातलं थोडंफार घेऊन यायच्या. त्यातलसुध्दा थोडं मावशी अंजूसाठी आणायच्या. कधी हरभरे, मुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, सीताफळ, भुईमुगाच्या शेंगा, तर कधी काकड्या, रान शेरण्या, हरभऱ्याची भाजी असा कितीतरी मेवा असायचा. अंजू सुरुवातीला संकोच करायची घ्यायला. पण  नंतर मग घ्यायची आनंदाने.

दिवाळीत अंजूने दोन नवीन लुगडी दिली मावशीला. ते पाहून मावशीला अगदी गलबलुन आलं. आतापर्यंत कोणीच तिला नवीन कपड्यांचा जोड दिला नव्हता. अंजूने दिलेले तेच कपडे  वर्षभर आनंदाने घालायच्या मावशी. विनाकारण मावशीची कामाला सुट्टी नसायची. कधी दुखलं खुपलं तरच. मावशी खूप कमी वेळा आजारी पडायची. मावशीची कोणत्याच कामाला कधी किरकिर नसायची, कितीही पाहुणे आले, कोणीही आले तरी. 
  मावशीला लिहिता वाचता येत नव्हते, पण पैशाचा हिशोब मात्र बरोबर यायचा. परी तर त्यांच्या नाती एवढी पण तिला सुध्दा "ताईसाहेब" शिवाय बोलायच्या नाही मावशी. अंजूसुद्धा त्यांच्या वयाचा मान ठेवायची, नोकर आहे म्हणून कसही बोललं अस काम नव्हतं तिचं. घरात आलेल्या सुख-दुःखात मावशीचा खूप मोठा आधार वाटायचा अंजूला.


   पाहता पाहता असेच वर्षं गेले. परी चोवीस वर्षांची झाली. लग्न ठरलं होत परीच,  तेव्हा मावशी आठ दिवस आधीच राहायलाच आल्या.
" बाईसाहेब लई काम असतात लग्नघरात. तुमी कशाची बी काळजी करू नका, म्या हाये ना, समद करू लागते बगा."
मावशींनी लग्नातले सगळे काम करू लागले. आलेल्या पाहुण्यांना मावशी मायेन विचारायची. एवढे वर्षं कामाला असल्याने बरेच पाहुणे तिच्या ओळखीचे होते. मावशींनी लग्नात अंजूला छान मऊ सुती साडी घेतली अन परीसाठी पाच भांडे घ्यायला पैसे दिले अंजूजवळ , अंजू नको नको म्हणत असतानाही. अंजूने दिलेलं जरी काठाचं लुगडं मावशीनं मोठ्या हौशीने घातलं लग्नात. 
   मावशींनी दिलेली साडी अंजूने घातली की मावशी खूप खुश व्हायच्या. अंजूने नंतर ती साडी तिच्या आजीच्या साडी सोबत अगदी जपून ठेवली कपाटात.

   काही महिन्यातच मावशीच्या नवऱ्याला देवाज्ञा झाली. तेव्हा पासून मावशीनं हाय खाल्ली. तिच्याच्यानी आता कामं उरकायची नाही. वय पण झालं होतं आता मावशीच. पण अंजूने कितीहि मदत म्हणून पैसे देऊ केले असते तर मावशींनी ते फुकट घेतले नसते. म्हणून जमेल तसं काम अंजू तिला करू द्यायची. जेवणही तिथेच द्यायची.
 
एक दिवस मावशीची लेक या रखमाला घेऊन आली.
" बाई, माईच्यानी आता काम व्हत नाही. तिला सोबत नेते आता गावाला, तसे बी माझे भाऊ बगत नाही तिला. ही रखमा, आमच्या वळखीतली आहे, ही येत जाईल तुमच्याकड कामाला."
" ठीक आहे. एवढी लेक बोलावतेय तर जा मावशी."
अस म्हणून अंजूने दोन लुगडी दिली मावशीला.
" दिवाळीला तर अजून टाईम हाये."
" आता गेल्यावर तुझं लगेच दिवाळीला येणं होईल का मावशी? म्हणून राहू दे आत्ताच. अन बरं का आपल्या परीच्या बाळांतपणाला तुला यायचं आहे मदतीला."
" तुमी फक्त निरोप धाडा, म्या लगोलग निघून येईल बगा. चला येते मी. सुखी ऱ्हावा."
 

  येते मी म्हणून वर्षभरापूर्वी गेलेली मावशी गेली ती कायमचीच, परत न येण्यासाठी.
     काही लोक असतातच असे
     नातं रक्ताचं नसत
     पण हृदयात खोलवर रुजलेलं असत.
                           
                             ©  डॉ. किमया मुळावकर

( कथा लिहिण्याची ही पहिलीच वेळ. कशी वाटली नक्की सांगा. तुमचा अभिप्राय ही एक ऊर्जा आहे. तेव्हा नक्की कळवा. Share करायची असल्यास नावासहीत share करु शकता)
फोटो- गुगलवरून साभार

   

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न