Login

भ भ भिशीचा भाग ३

The women gathered for the "Bhishi" party and their interactions with one another...

भ भ भिशीचा भाग ३

©® सौ. हेमा पाटील.


मागील भागात आपण पाहिले, हळूहळू एकेक करत सगळ्या भिशी सदस्या नीताच्या घरी जमा होत आहेत. वातावरण निर्मिती झालेली आहे. आता पुढे...

सगळ्या जमल्या की चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यातील चिठ्ठी उचलण्याचा मान नीताला मिळाला, कारण मागील महिन्यात तिला भिशी लागली होती. चिठ्ठी उघडली तर करुणाला या महिन्याची भिशी लागली होती, पण करुणा गावी गेल्यामुळे ती भिशी पार्टीला हजर नव्हती. ती भिशी मला देण्यात यावी अशी अनघाने मागणी केली; पण तसे करणे योग्य होणार नाही म्हणून परत एकदा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यावेळी नुपूरला भिशी लागली. ती भिशी मला देण्यात यावी अशी अनघाने नुपुरकडे मागणी केली. नुपूर आपला नंबर अनघाला द्यायला तयार नव्हती. दोघींमध्ये बाचाबाची सुरू झाली. ती इतकी वाढली की भिशीच्या इतर सदस्यांना त्यात हस्तक्षेप करावा लागला.

दरम्यान मधुने करुणाला फोन करून तिला भिशी लागल्याचे सांगितले. करुणाने मधुला सांगितले की,
" भिशीचे पैसे तिने स्वतःकडे घेऊन ठेवावेत. ती दोन दिवसांनी गावावरुन परत आल्यावर तिच्याकडून घेऊन जाईल."
मधुने याबाबत सगळ्यांना सांगितले.
" हा आगावूपणा तुला कोणी करायला सांगितला होता?" असे नुपूर म्हणाली.
" हा आगावूपणा आहे? खरे काय आहे तेवढेच मी तिला सांगितले. यात माझे काय चुकले? तुमच्यासारखीच करुणा पण भिशीचे पैसे भरते, आणि मी पण भरते. ती इथे नाही तर तुम्ही तिचा नंबर आलेला असताना पुन्हा चिठ्ठ्या टाकता? आणि वर मला आगावू म्हणता?" मधु म्हणाली.

आता आपल्याला काही भिशीचा नंबर मिळत नाही अशी अनघाची खात्री पटली, त्यामुळे ती शांत बसली. नुपूर मात्र चांगलीच खवळली.
तिचा नंबर लागला होता. मधुने सांगितले नसते तर करुणाला समजले नसते. एकदा पैसे घेऊन झाल्यावर कुणी पचकले असते तरी भीती नव्हती; पण या मधुने सगळा विचका केला. यामुळे नुपूरने तिच्याकडे मोर्चा वळवला.

आता प्रकरण चांगलेच तापलेय हे पाहून नीताने रेकॉर्ड प्लेअरचे बटन दाबले व "चला डान्स करुया" असे सगळ्यांना आवाहन केले. गाणे लागले होते,
कल्लोळाचं पाणी कशाला ढवळीलं, नागाच्या पिल्ल्याला तू कशाला खवळीलं.
नुपूर रागाच्या भरात नागीण डान्स करत मधुच्या दिशेने हात वळवत तोंडाने फुत्कार सोडू लागली. वाद वाढू नये म्हणून तिचे लक्ष आपल्याकडे वेधत रागिणी मधुच्याभोवती झिम्मा घालू लागली. आपली काहीच चूक नसताना नुपूरचे खडे बोल ऐकून चिडलेली मधु काली डान्स करु लागली. तिचा तो थयथयाट पाहून सगळ्यांना हसू आले.

एवढ्यात झिंगाट गाणे सुरु झाले आणि सगळ्यांच्याच मनोवृत्तीत बदल झाला. सगळ्याजणी उल्हासित होऊन गाण्यावर अगदी बेभान होऊन नाचू लागल्या.
"उपवासाच्या कचोऱ्या तळायला सुरवात करु का?" असे विचारायला मधल्या दाराशी आलेल्या मावशी हा डान्स बघत भुलून तिथेच उभ्या राहिल्या. झिंगून झाल्यावर सगळ्याजणी दमून जागा मिळेल तिथे शांतपणे बसल्या. मावशींना न विचारताच समजले की, आता कचोऱ्या तळायला हरकत नाही. त्या किचनकडे वळल्या.

तळलेल्या कचोऱ्या, चटणीसोबत खाऊन चहा घेऊन त्या साऱ्याजणी तृप्त झाल्या. आता पुढच्या भिशीला करुणाकडे भेटायचे यावर सर्वमताने शिक्कामोर्तब झाले व एकेकीने काढता पाय घेतला.
" झाली एकदाची पार पडली भिशी पार्टी." असे म्हणत नीताने पसारा तसाच ठेवून सोफ्यावर लोळण घेतली. घेतलेल्या कष्टांचे चीज झाले असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते.

रस्त्याने परत जाताना दोघीतिघींचे असे वेगवेगळे गट आपसूकच पडले होते.
" कचोरीचे सारण जरा जास्तच आंबट झाले होते ना? लिंबू जरा कमी पिळायला हवे होते." ही चर्चा एका गृपमध्ये सुरू होती.

" चहात थोडी वेलची पावडर टाकायला हवी होती. मला तर बाई तसा बिनवासाचा चहा घशाखाली उतरतच नाही." असे एका गृपमधील बोलणे कानावर पडले.

" तिच्या खिडकीचे पडदे तेच आहेत. गेल्या वर्षी आपण तिच्याकडे भिशी पार्टीला गेलो होतो तेव्हा पण तेच पडदे होते. जरा बदलले तर आपल्याला स्वतःला पण बरे वाटते. ही नीता अशीच आहे. तिची पर्स बघितली ना, कायम एकच असते. जरा वैविध्य असावे." हे एका गृप चे फारच व्यक्तीगत मत ऐकून मला वाईट वाटले. आता मात्र मी लेखणीला विराम देण्याचा विचार केला. एवढ्या वर्णनावरुन तुमच्या लक्षात आले असेलच की, साधारणपणे भिशी पार्टी कशी चालते ते!

समाप्त. ©® सौ. हेमा पाटील.

वाचकांनी हे उपहासात्मक वर्णन केवळ मनोरंजनासाठी लिहिले आहे हे जाणून घ्यावे. यात कुणाचाही अपमान करण्याचा अगर कुणाची खिल्ली उडविण्याचा लेखिकेचा हेतू नाही.

🎭 Series Post

View all