Login

भ भ भिशीचा भाग २

The women gathered for the "Bhishi" party and their interactions with one another...

भ भ भिशीचा भाग २

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, नीताची भिशी पार्टीची तयारी सुरू आहे. कामवाल्या मावशींची घराची स्वच्छता करुन झाली आहे. आता पुढे...

" हॅलो, नीता!"
" काय गं, मनाली? येणार आहेस ना संध्याकाळी?"
" हो गं...पण परपल कलरची साडी सापडत नाही गं. बहुतेक मम्मीकडे राहिली असेल. तोच कलर ठरलाय ना? मी ब्लॅक कलरची साडी नेसू?" मनालीने नीताला गहन प्रश्न विचारला.

" अगं गेल्या आठवड्यापासून काय झोपली होतीस का? गेल्या आठवड्यातच ठरले होते ना? अन् तू आज जागी झालीस? फोटोत तुझी एकटीचीच साडी वेगळी दिसेल. एखाद्या मैत्रिणीची नेस ना. This is not fair yaar. " नीता करवादली.
" बरं बरं, करते मॅनेज. टेन्शन नही लेने का. बघते, करते काहीतरी जुगाड." मनाली म्हणाली.

" हॅलो, मानसी. बरोबर चार वाजता ये बरं का. हो गं...काल तू केलेल्या O3 फेशियलचे रिझल्ट्स छान आहेत. चांगलाच फरक जाणवतोय.
परपल कलरची थीम आहे. लक्षात आहे ना? म्हणजे मेकअप बॉक्स आणताना तसा आणशील. आठवण करुन द्यायला फोन केला होता. हो..हो... तुझ्याकडे नोंद असते हे माहीत आहे, पण तरीही केला फोन. रिस्क नको ना! तुझ्यासमोर कस्टमर असेल ना? ठेवते आता. वेळेत ये." असे म्हणत नीताने फोन ठेवला.

आता पूर्वतयारी काय करायची राहिलेय याचा ती विचार करत होती. सकाळी बटाटे शिजवून ठेवलेत. साबुदाण्याचे पीठ आणून ठेवलेय. नारळ खवणून ठेवलेत. मिरची तेवढी आयत्या वेळी वाटायची. कोथिंबीर आहे, आले आहे. म्हणजे किचनमध्ये काही राहिले नाही.

बेडरुममध्ये जाऊन तिने सगळीकडे आलबेल आहे ना याची खात्री करून घेतली.
' या बायकांना सवय असतेच. हाॅल आणि किचनमध्येच या बसत नाहीत. घरभर फिरतात.' असा विचार तिच्या मनात आला आणि ती घाईघाईने टाॅयलेटकडे गेली. तिथला फ्रेशनर बदलायचा राहिला होता. तो बदलून ती परत आली तेव्हा दोन वाजले होते. तासभर विश्रांती घेतली पाहिजे असा विचार करून ती बेडरुमकडे वळली.

साडेतीन वाजता बेल वाजली तशी ती खडबडून जागी झाली. मदतीसाठी तिने मावशींना बोलावले होते त्या आल्या होत्या. दोघींनी मिळून किचनमधले काम उरकले तेवढ्यात मेकअप आर्टिस्ट आली. मावशींना आयत्यावेळी तळण्याच्या सगळ्या सूचना देऊन तिने स्वतःला मानसीच्या स्वाधीन केले.

मानसीने तिला तयार केले. आरशासमोर उभे राहिल्यावर नीताचे समाधान झाले. मानसीला एक पसंतीचा लूक देऊन तिने तिला निरोप दिला.

एकेक करुन भिशी पार्टीच्या सदस्या जमा होऊ लागल्या. ज्या अजून आल्या नाहीत त्यांच्याबद्दल चर्चा रंगत होती.
" अगं ती अनघा म्हणे आता वेगळं रहायचं म्हणते. सासूचे आणि तिचे अजिबात पटत नाही. नवरा वेगळं व्हायला तयार नाही म्हणे."

" एवढ्या आतल्या गोटातल्या बातम्या तुला कशा कळतात गं अनला?" मृदुलाने विचारले.

" मग गृपने माझे नाव उगाच सी.आय. डी. अनला ठेवलेय का? तेवढे काॅन्टॅक्टस् असावे लागतात. अनघाची नणंद आहे ना, तिच्या मावसजावेची बहिण माझी मैत्रीण आहे. तिच्याकडून समजले." अनलाने सांगितले.

" त्या नुपूरने काय पराक्रम केला माहीत आहे का?" सोनम म्हणाली.

" काय केले गं?"

" अगं, तिला स्मार्ट वाॅच घ्यायचे होते. ते ॲपलचेच हवे होते, कारण तिचा मोबाईल ॲपलचा आहे. नवऱ्याने सॅमसंगचे स्मार्टवाॅच आपल्या बहिणीसाठी मागवले होते. हिला वाटले, हिच्यासाठी मागवले, म्हणून ओपन करुन बघितल्यावर रागारागाने अकराव्या मजल्यावरुन खिडकीतून खाली फेकून दिले. नवरा बिचारा धावतपळत लिफ्टमधून खाली गेला, तर त्याच्या चिंधड्या उडाल्या होत्या."
" मग नवऱ्याने काय केले?" सोनमने विचारले.
" काय करणार? पुन्हा स्मार्टवाॅचची ऑर्डर टाकली, पण बहिणीच्या ॲड्रेसवर." यावर सगळ्याजणी खदखदून हसायला आणि नुपूर दारात हजर व्हायला एकच गाठ पडली.

" काय झाले? कुणी जोक मारला? मला पण सांगा." नुपूरने विचारले.
यावर एकमेकीकडे पहात डोळे मिचकावत त्यांनी सांगितले,
" पहिल्यांदा ऐकल्यावर हसायला येते. पुन्हा तो जोक सांगितला तर चुथडा होतो."

सीमाने सांगितले,
" अगं तुम्हांला माहीत आहे का, ती जया आहे ना, ती नवऱ्याला अजिबात एकटे सोडत नाही. ऑफीसमध्ये सुद्धा सारखे फोन करुन भंडावत असते. तिला भीती वाटते की, तिचा नवरा सुंदर आहे त्यामुळे त्याच्यामागे बायका लागतील."

" दगडाचा सुंदर! पुरुष सुंदर नाही तर सिक्स पॅकवाला असला पाहिजे. तसला गोरापान मिळमिळीत काय उपयोगाचा? कुणी भीक घालत नसणार त्याला. मी सांगते ना! " उर्मी म्हणाली.

" ए, पण तुझी साडी कमाल आहे यार नीता... ब्लाऊज कुठे शिवलास?" नुपूर म्हणाली.

" अगं, तो चांदणी चौकातला नाही का, उर्मी फॅशन्स वाला? त्याच्याकडे शिवला."
" आणि साडी नवीच दिसतेय. आजच्या पार्टीसाठी घेतलीस का?" सीमाने विचारले.
" हो गं. परफेक्ट परपल कलरची साडी नव्हती माझ्याकडे. मग घेतली. फोटोमध्ये उठून दिसली पाहिजे ना." नीता म्हणाली.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

मग कसे काय वाटले भिशी पार्टीचे वातावरण? आता प्रत्यक्ष पार्टी पुढच्या भागात सुरू होईल. वाट पहा पुढच्या भागाची.

🎭 Series Post

View all