इराण... भारत आणि इराणचे संबंध तसे चांगलेच आहेत. भारताने वेळोवेळी इराणला मदत केली आहे. त्यामुळे इराणचे पोस्टिंग न स्वीकारण्याला काहीच कारण नव्हते. निदान तन्वी आशिया मध्ये राहणार होती. घरी फोन करून तन्वीने आईला हे कळवलं. बाकीच्यांची चौकशी केली. बाबांचा राग अजूनही धुमसत होता. तन्वी रोज घरी फोन नाही करायची. आठवड्यातून एखाद दिवस आईला फोन करायची आणि बाकीच्यांचीही चौकशी करायची. घरून तिला कोणाचाही फोन येत नसे. अगदीच एखाद दिवशी कधीतरी आईचा फोन येत असे जर खूप दिवसात तन्वीशी कॉन्टॅक्ट झाला नाही तरच.
''कशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून इराणला पोस्टिंग घेतेस?'' आईने विचारलं.
''अगं आई इराण तसा धोकादायक नाहीये''. तन्वी.
''पण तुला यूरोपमध्ये पोस्टिंग मिळू शकता, नाहीतर दिल्लीमध्येच राहा ना'' आईने वाद घालायचा प्रयत्न केला.
''तुम्हीतर मला दिल्लीलाही पाठवायला तयार नव्हतात. दिल्लीही सेफ नव्हतं.'' तन्वी रागाने म्हणाली.
आई शांत झाली. भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेला.
तन्वीलाही वाटलं आपण आईच्या अंगावर उगाच ओरडलो. तिची चूक कधीच नव्हती.
''बरं, नीट राहा. जास्त आगाऊपणा करू नकोस. उगाच कुठेही एकटी फिरायला जाऊ नकोस आणि ड्रेसकोडकडे नीट लक्ष दे. आपण बऱ्याच घटना वाचतो ना." आईचं चालूच राहिलं.
''हो गं. या सगळ्या सूचना आम्हाला दिलेल्या असतात आणि ते पळावंच लागतं कारण आम्ही देशाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी एकटी नाहीये." तन्वी समाजावणीच्या सुरात म्हणाली.
इथे तिची आई चांगलीच काळजीत पडली होती. यांना कसं सांगायचं हिच्या पोस्टिंग बद्दल, ते पुन्हा त्रागा करतील. आधीच कामाचा एवढा मोठा व्याप!
सकाळी नाश्त्याच्या वेळेला तन्वीच्या आईने तिच्या इराणच्या पोस्टिंग बद्दल सांगितलं. बाबा काहीच म्हणाले नाहीत.
''ठीक आहे. जिथे पोस्टिंग मिळेल तिथे घ्यावंच लागेल तिला. दुसरा काही इलाज आहे का?'' बाबा म्हणाले आणि ऑफिसला गेले.
''ही मुलगी खरंच जीवाला घोर लावते.'' आईचे आपले नेहमीचे विचार.
इथे तन्वी चांगलीच खुश होती. नवीन देश, नवीन जबाबदारी आणि नवा उत्साह.
तन्वीबरोबर तिच्याच बॅचला पास झालेले सुमित्रा, शिखा आणि हसनपण होते. डिप्लोमॅटना या रुटीनची सवयच करून घ्यावी लागते आणि खरंतर त्यांची या सगळ्याला तयारी असतेच. तन्वीही अगदी तशीच होती. हुशार, धाडसी आणि काहीशी जिद्दी!
तेहरानमध्ये उन्हाळा चालू होता. एम्बसीच्या बाहेर पडल्यावर प्रचंड उन्हाच्या झळा बसत पण तो परिसर खूप छान होता. आजूबाजूला अजूनही एम्बसीज होत्या. घरही मस्त होतं. तन्वीला सगळ्यांचंच अप्रूप! ती, सुमित्रा आणि शिखा एकत्र राहत होते. काम संपवून घरी गेल्यावरही सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या कामाबद्दलच्याच गप्पा चालायच्या. सुषमा स्वराज ट्रेनिंग इन्स्टिटयूटमधून बाहेर पडल्यानंतर त्या पहिल्यांदाच भेटत होत्या. समविचारी लोक आजूबाजूला असले की आपल्यालाही काम करायला उत्साह येतो. आपण जे करतोय ते योग्य आहे याची खात्री पटते. या तिघींचीही ध्येयं काहीशी समानच होती.
जतिन सरांकडून जेवढा शिकता येतंय तेवढं शिकायचं प्रयत्न तन्वी करायची. तिने स्वतःहून फारसीही शिकायला सुरुवात केली. थोडंफार तरी बोलता यायला हवं. लोकल लोकांशी संवाद साधण्याइतका तरी.
नवीन डिप्लोमॅट्ससाठी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने काही कोर्स ठेवले होते आणि तन्वी आणि हसन नेमके एका बॅचला आले होते. या कोर्ससाठी पाकिस्तान, युके आणि श्रीलंकेचे डिप्लोमॅट्सही उपस्थित होते. असे कोर्सेस मधून मधून होत असतात. देशाची ओळख पटावी, त्या त्या देशाचे परराष्ट्र धोरण, महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय मुद्दे, डिप्लोमॅटिक स्किल्स,वित्तीय धोरण, तंत्रज्ञान वगैरे अनेक मुद्द्यांवर सविस्तर माहिती असते आणि त्याचा वापर दररोजच्या कामांमध्ये करावा लागतो. आपल्या देशाची धोरणं आणि इराणची धोरणं यांचा मेळ घालून प्रत्येक मुद्दा हाताळावा लागतो. इतर देशांचे डिप्लोमॅट्सही भेटतात. त्यामुळे खरंतर ज्ञानात अजूनच भर पडते.
पहिल्याच दिवशी हसन बरोबर जात असताना तिची एका मुलाशी नजरानजर झाली. कोणत्या देशाचा असेल हा?असं सहज आलं तिच्या मनात. तो बराच स्मार्ट होता. डिस्कशनच्या वेळेला त्याचे मुद्दे खूप विचारपूर्वक मांडलेले असायचे. एकदा तन्वी आणि त्याच्यामध्ये थोडासा वादही झाला. तन्वीही हेकेखोर होती. आणि तिला तिच्या हुषारीचीही जाणीव होती. ''कोण आहे हा? कोणत्या देशाला रेप्रेझेन्ट करतोय? खरंच हुशार आहे पण.'' तन्वीचे विचार चालू होते. त्यांच्या स्टडी टूरच्या वेळीही त्यांचं हीटेड डिस्कशन चालू होतं. पण कोणीही कोणाला नाव, गाव विचारलं नाही. कोण कशाला आपला इगो सोडेल.
नॅशनल म्युसिअम ऑफ इराणला गेल्यावर, ''जुनैद यहा पे आना, ये देखो''.. त्याच्याबरोबर असणारा मुलगा बस मधून उतरल्या उतरल्या म्हणाला.
"जुनैद??'' तन्वीने त्याच्याकडे आणि त्यानेही तन्वीकडे एकच वेळी बघितलं.
(क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा