सीमेपार.. त्या वळणावर.. (भाग १)

It's the story of an ambitious girl who passed UPSC and got selected as IFS. Her journey is not easy though. There is a lot to happen in the middle.

जवळ जवळ १५ दिवस होत आले तन्वीला या शहरात येऊन पण कामाच्या व्यापातून  बाहेर पडण्याचा योग अजूनही नीट आला नव्हता. आज शुक्रवार आणि उद्या मिळणाऱ्या सुट्टीमुळे ती जरा जास्तच खुश होती. आज जरा काम कमी होतं. साधारणतः ६ च्या सुमाराला ती फ्री झाली. आज आपण लवकर घरी जातोय त्यामुळे परत खाली उतरून जरा एक फेरफटका मारून यावा असा तिने प्लॅन केला. तितक्यात श्रेयाची हाक तिला ऐकू आली आणि त्या दोघी घरी जायला निघाल्या.

''केवढं काम केलाय गेल्या काही दिवसात! आता जरा कुठे २ दिवस शांतता आहे." श्रेया म्हणाली.

''हो ना! मी विचार करतेय आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायला पाहिजे'' तन्वी पटकन म्हणाली.

श्रेयाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि  दोघी गाडीत बसल्या.

''घरी गेल्यावर जरा फ्रेश होऊन मी परत खाली उतरणार आहे. तू येणार आहेस का?'' तन्वीने विचारले.

''मला वाटतं आपण घाई नको करायला. उद्या सगळेच बहुतेक काहीतरी प्लॅन करतील.''

पण कोणाचं ऐकलं तर ती तन्वी कसली.. माझ्या मनात आलंय म्हणजे मी ते करणारच..

घरी गेल्यावर तन्वीनेच छानपैकी आल्याचा चहा केला. चहा घेता घेता तिने परत श्रेयाला विचारलं, ''खरंच नाही येतेस तू?''

''तू कशाला जातेस उगाच? आपण सगळेच जाऊ ना  ठरवून.''

''अगं कामाच्या वेळेनंतर आपण कोणाला बांधील नाही आहोत आणि मी जवळच जाईन. अंधार पडायच्या आत घरी येईन. मग तर झालं?'' तन्वी हसून म्हणाली.

अत्यंत उत्साहात तन्वी बाहेर पडली. इथे आल्यापासून पहिल्यांदाच ती एकटी बाहेर जात होती.

मुंबईला काहीसं लाजवतील असे रस्ते आहेत इथे. जरा वेगळाच वाटतंय. आपलेपण आणि परकेपणा दोन्ही एकदम जाणवतंय. शांतता पण आहे आणि गोंधळपण. कधीतरी बाहेर पडायला हवंच ना तसाही. ती स्वतःलाच समजावत होती. रस्त्यावर एवढे लोक आहेत. ती स्वतःच्याच तंद्रीत विचार करत सावकाश चालत होती.

गेले काही महिने विचार करायलाही वेळ मिळाला नव्हता. जर्मनीमधून दिल्लीला आल्यानंतर नव्या गोष्टी शिकणं आणि जर्मनी मध्ये शिकलेलं कसा वापरता येतंय यातच वेळ जायचा. तन्वीने खूप मेहनत घेतली होती त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही ती बऱ्याचदा कामच करायची.

खरं तर तिला जर्मनीला जायची फार मनापासून इच्छा नव्हती. तिला जर्मन आधीपासूनच येत होतं. त्यापेक्षा दुसरी एखादी भाषा शिकायला मिळाली असती तर बरं झालं असतं असा विचार ती करायची पण तिला तिच्या सिनिअर्सनी खूप चांगला मार्गदर्शन केलं होतं. तुझा वेळ वाचेल आणि तो वेळ तू अनेक नव्या गोष्टी शिकायला वापरशील, पहिल्या पोस्टींगमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे आणि तसंच झालं. तन्वीच्या बरोबर पास आऊट झालेल्यांचा भाषा शिकण्यात वेळ जायचा तो वेळ तन्वी सिनिअर्स बरोबर काम शिकण्यात घालवायची. तिला जर्मन शिकण्यात तुलनेने कमी वेळ द्यावा लागायचा. तरीही भाषेची परीक्षा पास होणं खूप गरजेचं होतं. त्याशिवाय तिची नोकरी कन्फर्म होणार नव्हती आणि याची धाकधूक कुठेतरी तिच्या मनात सतत असायची. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही ती अभ्यास करायची. तिने खूप कमी वेळ जर्मनी बघण्यात आणि तिच्या मित्रमैत्रिणी व सिनिअर्स बरोबर फिरण्यात घालवला असेल. भाषेची परीक्षा पास झाल्यावर जेव्हा ती कन्फर्म झाली तेव्हाच तिने सुटकेचा निश्वास सोडला. अत्यंत जिद्दी तन्वीचे स्वप्न पुरे झाले होते. आता दिल्लीला जाऊन नंतर पुन्हा नवीन पोस्टींग! तिने आधीच ठरवलेलं तिला पोस्टींग कुठे हवं आहे हे. आत्तापर्यंत सगळं मनाप्रमाणे झालेलं. सोपं नव्हतं पण तिचा मेहेनतीवर विश्वास होता. 

IFS ची निवड प्रक्रिया सोपी नव्हती पण तन्वीच्या खडतर मेहनतीला यश मिळाला होतं. पहिल्याच प्रयत्नात तिची IFS ला निवड झाली होती. मसूरीला ट्रेनिंग झाल्यानंतर आणि सुषमा स्वराज फॉरेन सर्विस इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनिंग घेतल्यावर कंपलसरी भाषा शिकण्यासाठी पाहिलं पोस्टींग जर्मनीला मिळालं होतं. तन्वीला आशियाई देशांमध्ये रस होता पण आता या क्षेत्रात आलो आहोत त्यामुळे घाई करायची काही गरज नाही. सगळ्यांना युरोप मधल्या प्रगत देशांमध्ये पोस्टींग हवं असतं त्यामुळे तिला आशियाई देशात हसत हसत पोस्टींग मिळेल याची तिला कुठेतरी खात्री होती.

जर्मनीमध्ये मिळालेला अनुभव खरंच खूप मोलाचा ठरला. राजकारण, व्हिसा प्रक्रिया, अर्थशास्त्र, जर्मनीमध्ये राहणाऱ्या भारतीयांचे प्रश्न ई. विषयावर तिला काम बघायला मिळालं, अनुभव आला, थोडीशी कल्पनाही आली कि पुढे कसं काम करावं लागणार आहे. दिल्ली मध्ये तिला अजून शिकायला मिळालं. IFS च्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये शिकावंच लागतं आणि ते खरंतर कधीच पूर्ण होता नाही. साधारण २ वर्ष दिल्लीमध्ये काढल्यानंतर तिने पाकिस्तानला पोस्टींग साठी विनंती केली. तिचे सिनिअर्स तिला अडवू पाहत होते. सगळ्यांनी तिला समजावण्याचाही खूप प्रयत्न केलं पण तिने ऐकलं नाही. परंतु MEA तिचा अर्ज नाकारला. जरी तिचं उर्दूवर प्रभुत्व असलं आणि काम करण्याची हातोटीही असली तरीही पाकिस्तानात जाण्यासाठी पुरेसा अनुभव नव्हता.

तन्वी खूप नाराज झाली होती. या सगळ्यामध्ये तिला घरच्यांच्या आधाराची गरज होती पण ते असूनही नसल्यासारखेच होते. सुट्टी घेऊन मुंबईला जावं असा तिला सतत वाटे. पण तिथे गेल्यावर अजून मनस्ताप होणार हे माहित असल्याने तीने जायचे धाडस केले नाही. परंतु, पाकिस्तान ऐवजी तन्वीला इराणला पोस्टींग मिळाले. हे त्यातल्या त्यात बरे झाले. घरच्यांना फॉर्मॅलिटी म्हणून तिने कळवलं कि ती इराणला पोस्टींग घेतेय आणि तयारी करू लागली.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all