Dec 06, 2021
मनोरंजन

अकल्पित

Read Later
अकल्पित

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

रविवार ची सकाळ होती, सगळं कसं आरामात चाललेलं होतं. सचिन आणि रामभाऊ म्हणजे सचिन चे बाबा, पेपर वाचत होते. दोन्ही मुलं सायली वय वर्षे १० आणि शेखर वय वर्षे ६ आणि साधना बाई म्हणजे सचिन ची आई, ही मंडळी कार्टून नेटवर्क बघत होती. सचिन ची बायको, वर्षा स्वयंपाकघरात रविवारचा नाश्ता बनवत होती. बाहेर सोसायटी च्या छोट्या मैदानात पोरं क्रिकेट खेळत होती.
अशातच एक काही तरी जड वस्तु पडल्याचा धडाम असा आवाज आला. सचिन ने मान वर करून इकडे तिकडे पाहिलं. रामभाऊ नव्हते पण त्यात काही विशेष नाही असं समजून त्याने पुन्हा पेपर मध्ये डोक घातलं. आणि शेजारच्या सुतारकाकांची हाक आली.
सचिन खाली ये रामभाऊ गच्चीतून पडले. धाव रे
सचिनला क्षणभर काहीच कळेना पण तो लागलीच खाली धावला. चार चार पायऱ्या उतरून खाली पोचला. रामभाऊ खाली पडले होते आणि भोवती मुलांचा घोळका जमला होता. कोणीतरी त्यांना पाठीवर झोपवून पाणी मारत होतं. रामभाऊ बेशुद्ध होते आणि पाणी मारण्याचा काही उपयोग होत नव्हता. अरे अॅम्ब्युलेन्स बोलवा, कोणीतरी ओरडलं. सचिन जवळ मोबाइल नव्हता, त्यानी सभोवार नजर फिरवली, दीक्षितांच्याकडे मोबाइल होता. त्यांच्या पण लक्षात आलं त्यांनी झटकन फोन लावला. दहा मिनिटांत येतेय, ते बोलले.
सुतार काका म्हणाले सचिन वर जा आणि कपडे बदलून घे आणि पैसे, कार्ड पण बरोबर घे. अॅम्ब्युलेन्स यायला १० मिनिटे आहेत. तोवर आम्ही रामभाऊंकडे बघतो. सचिनने मान डोलावली आणि तो वरती गेला. सुतार काका त्यांच्या मुलाकडे वळून म्हणाले की शशी गाडी काढ आणि पाठोपाठ जा सचिनला तुझी जरूर लागेल. दीक्षितांचा मयंक पण म्हणाला की शशी मी पण येतो.
हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर डॉक्टर कपूरनी तपासलं. म्हणाले वरकरणी
पाहता काहीही डॅमेज नाहीये. हा एक चमत्कारच आहे दुसऱ्या मजल्यावरून पडले तरी काही झालेलं नाही साध खरचटलं सुद्धा नाही. मात्र internal injuries आहेत का ते पाहावं लागेल. त्यासाठी आम्ही त्यांना MRI करायला घेऊन जातो आहोत.
अर्ध्या तासांनी डॉक्टर पुन्हा आले म्हणाले की MRI मध्ये सगळं ठीक आहे. आता फक्त त्यांच्या शुद्धीवर येण्याची वाट आहे. येत्या २४ तासात ते शुद्धीवर येतील. नाही आले तर बघू काय करायचं ते. पण तुम्ही निश्चिंत रहा. त्यांना ICU मध्ये शिफ्ट करायची गरज वाटत नाहीये म्हणून त्यांना प्रायवेट रूम मध्ये हलवायला सांगितलं आहे. कोणी एक जण त्यांच्याबरोबर राहू शकता.
सचिनला राहवेना, तो म्हणाला डॉक्टर, कोमा ची शक्यता ....
नही नही We checked it. His reflexes are quite ok. He is only unconscious. Nothing to worry. Be relaxed.
संगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. आता काहीच करण्यासारख नव्हत. म्हणून सर्वजण संध्याकाळी येऊ अस म्हणून निघाले. सचिन थांबला. थोड्या वेळाने वर्षा आणि साधना बाई आल्या. मग सचिन घरी जायला निघाला. आंघोळ, जेवण आटोपून सचिन परत हॉस्पिटलला पोचला. साधना बाई घरी जायला तयार नव्हत्या त्या तिथेच थांबल्या आणि वर्षा एकटीच घरी गेली.
संध्याकाळी साताच्या सुमारास नर्स B.P.चेक करत होती तेंव्हाच रामभाऊंना शुद्ध आली. डोळे उघडल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते हॉस्पिटल मध्ये आहेत म्हणून, नर्स कडे बघून ते हसले. मान वळवल्यावर सचिन आणि साधनाबाई दिसल्या. ते दोघंही लगबगीने बेड जवळ आले. नर्स ने विचारलं
आजोबा कसं वाटतंय आता ?
एकदम छान.
Good , मी आता डॉक्टरांना सांगून येते.
ती अस बोलतच होती तेंव्हाच डॉक्टर कपूर, आणि दोन पोलिस आत आलेत. खोलीतले सगळेच प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिले. पोलिस कशाला आलेत हे कोणालाच समजेना.
नमस्कार मी PSI धनशेखर, आजोबा तुम्हालाच भेटायला आलो. तुम्ही बाल्कनी मधून पडलात अस कळलं. कसे काय पडलात तुम्ही ?
अहो खाली मुलं क्रिकेट खेळत होती, त्यांचा बॉल बाल्कनीत आला. तो त्यांच्याकडे फेकायला मी गेलो आणि माहीत नाही माझा कसा तोल गेला ते, आणि मी पडलो. नंतरचं काही आठवत नाही. तुम्ही यायच्या दोन मिनिट आधी शुद्धीवर आलो बघा.
तुम्ही बाल्कनीत कशाला गेला होता ?
गरम व्हायला लागलं म्हणून स्वेटर काढून खोलीत ठेवायला गेलो तर मुलांचा बॉल आला, म्हणून बाल्कनीत गेलो.
कोणी तुम्हाला ढकललं तर नाही न ?
छे छे अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही.
ठीक आहे. आता तुम्हीच म्हणताय तर आम्ही आता अपघात म्हणून शेरा मारून टाकतो. बरय लवकर बरे व्हा.
पोलिस गेल्यावर डॉक्टर कपूरनी तपासायला घेतलं.
वा: आजोबा तुम्ही तर एकदम फिट दिसताहात. घरी जायला हरकत नाही. पण तरी मला अस वाटत की आजची रात्र यांना इथे राहू द्या. उद्या सकाळी डिस्चार्ज देऊ.
ठीक आहे डॉक्टर.
दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तपासून डिस्चार्ज दिला. घरी यायला दुपारचा एक
वाजला. रामभाऊ एकदम फिट होते. जणू काही कालचा प्रसंग घडलाच नव्हता. रामभाऊंना काहीही झालेलं नाही हे बघून सर्वांनाच आनंद झाला होता. तरी
सचिन थोडा अस्वस्थच होता. चुळबुळत होता. रामभाऊंच्या ते लक्षात आलं.
काय रे काही तरी बोलायचय तुला खरं ना ?
हो बाबा, तुम्ही चार फूटी कठडयावरुन पडलेच कसे हे समजतच नाहीये. बाकी सगळ्यांनी माना डोलावल्या.
अरे माघाशीच नाही का सांगितलं की मला सुद्धा कळलं नाही. अजूनही नाही. आणि एवढ्या उंचावरून पडूनही काही लागलं नाही ही देवांचीच कृपा.
साधनाबाई म्हणाल्या, झालं गेलं गंगेला मिळालं. यावर आपण आता बोलूया नको. नुसतं आठवून सुद्धा जीवाचा थरकांप होतो.
संगळ्यांनीच मग तो विषय थांबवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन रामभाऊंना म्हणाला
बाबा ऑफिसला जाऊ ना ? का आजच्या दिवस घरी थांबू ?
नको नको जा तू ऑफिसला. अरे मला काहीही झालेलं नाहीये. तू निश्चिंत मनाने ऑफिसला जा. साधनाबाई पण म्हणाल्या जा तू. काळजी नको करू .
साधारण महिना झाला असेल, सचिन ऑफिस मधून घरी आला तेंव्हा त्याचा चेहरा जरा उतरला होता. साधनाबाईंनी त्यांच्याकडे बघून काळजीच्या सुरात विचारलं
काय रे काय झालं ? तुझा चेहरा असा का दिसतो आहे. ?त्यांचं बोलणं ऐकून वर्षा पण बाहेर आली तीही प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्या कडे बघत होती.
सांगतो, सर्व सांगतो पण आधी जरा वॉश घेऊन येतो. तो पर्यन्त चहाचं बघ. वर्षांनी मान डोलावली आणि ती किचन मध्ये गेली.
वॉश घेऊन आला तर चहा आणि बिस्किटं तयार होती आणि सर्वजण उत्सुकतेने त्याच्याकडेच बघत होते.
सचिनने सगळ्यांच्या कडे बघितलं आणि सांगायला सुरवात केली.
बाबा, शेजारच्या राजरंग सोसायटी मध्ये त्रिलोक मेहता राहतात माहीत आहे न ? त्यांचं सोन्या चांदीचं दुकान आहे.
हो, हो त्रिलोक चे वडील सोमनाथ भाई माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. पण त्यांचं काय ? परवाच तर भेटलो होतो ,चांगले धडधाकट होते की.
त्यांचं काही नाही ते बरे आहेत. त्यांचा नातू म्हणजे त्रिलोक चा मुलगा परेश, तो हरवला आहे. तीन दिवस झालेत. सुरवातीला त्यांना पळवा पळवी चा संशय आला. पण अजून पर्यन्त खंडणीचा कोणताही फोन आला नाही. त्यांनी तर पैश्यांची जुळवा जुळव पण सुरू केली होती. पण आता पोलिस म्हणतात की हा मानव तस्करीचा प्रकार असावा म्हणून. पोलिस शोध मोहीम राबवताहेत पण अजून यश आलं नाही.
तुला केंव्हा कळलं ?
आजच संध्याकाळी त्यांच्याच सोसायटी मध्ये पाचव्या मजल्यावर राहणारे सामंत भेटले होते ,त्यांनी सांगितलं. आपण त्यांच्या कडे जायला हवं अस मला वाटत.
अरे नक्कीच जायला हवं. आत्ता जावूया ?
चला, जावूया. पण अश्या वेळी काय बोलायचं ते कळत नाही हो. आत्ता पर्यन्त बरेच जण येऊन सांत्वनपर बोलून गेले असतील. आपणही तेच तेच बोलायचं ?
गोष्ट खरी आहे पण त्यांच्याकडची परिस्थितीच अशी असेल की आपण हास्य विनोद करू शकत नाही. गंभीर प्रसंग आहे आणि त्यानुरूपच बोलावं लागणार आहे.
ठीक आहे चला. आई आम्ही जाऊन येतो.
त्रिलोक च्या घरी शांतता होती. सोमनाथभाई, त्रिलोक, त्रिलोक ची आई, त्रिलोक ची बहीण कृतिका आणि तिचा नवरा रितेश सर्व बसले होते पण कोणीच कोणाशी बोलत नव्हते. टेबलावर परेश चा फोटो होता. त्रिलोक ची बायको नर्मदा फोटो वरुन हात फिरवत होती आणि तिला अश्रु अनावर होत होते. गेले तीन दिवस तिचे अश्रु थांबत नव्हते. साहजिकच होतं ते. कृतिका तिच्या शेजारी बसून तिला धीर देण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होती.
या दोघांकडे बघून त्रिलोकने आणि सोमनाथभाईनी मान हलवली. बोललं कोणीच नाही. रामभाऊ सोमनाथ भाईंच्या जवळ बसले. त्यांचा हात हातात घेऊन थोपटल्यांसारख केलं आणि गप्प बसले.
रामभाऊ इकडे तिकडे बघत होते आणि त्यांची परेश च्या फोटोवर नजर पडली. त्यांचं डोक गरम झालं, डोक्यात काहीतरी हालचाल सुरू झाली, मन सैरभैर झालं आणि पुन्हा सर्व शांत झालं. रामभाऊंच्या डोळ्यासमोर वीज चमकली आणि रामभाऊ बोलले
अरे मला माहीत आहे की परेश कुठे आहे ते.
काय ? कुठे आहे ? तुम्हाला कसं माहीत ? त्रिलोक आणि सोमनाथभाई एकदमच ओरडले .
माहीत नाही. पण मला हे माहीत आहे की तो कुठे आहे.
कुठे आहे ?
माहीत नाही.
सचिन वैतागला त्याला कळेना की बाबा असे का वागताहेत, म्हणाला. बाबा अहो तुम्ही काय बोलता आहात ते तुम्हाला तरी कळलय का ?
नाही, मलाही कळत नाहीये, पण थांब, माझ्या डोक्यात काहीतरी घडतंय. जरा थांब.
हॉल मध्ये विचित्र शांतता पसरली, नर्मदा रडायचं थांबली. सगळेच रामभाऊंकडे पाहू लागले.
पांच मिनिटांनी रामभाऊ त्रिलोकच्या मुलीकडे बघून म्हणाले
वैशाली बेटा मला एक कागद आणि पेन देशील
वैशालिने कागद आणि पेन आणून दिला. रामभाऊंनी त्यावर एक मोठा गोल आणि त्यांच्या आत एक छोटा गोल काढला. छोट्या गोलात त्यांनी लातूर अस लिहिलं. मोठ्या गोलात महाराष्ट्र आणि गोलाच्या बाहेर भारत अस लिहिलं. आणि त्यांच्या भोवती अजून एक गोल काढला सर्वजण त्यांच्याकडे कुतुहलाने बघत होते. रामभाऊंनी वैशालीला म्हंटलं की
मी डोळे मिटेन तेंव्हा हा कागद तू कसाही फिरवून ठेव. आणि मग त्यांनी डोळे मिटले डावा हाताचा तळवा फोटोवर ठेवला आणि पेन उंचावर धरला. नंतर पेन हळू हळू खाली आणत खाली टेकवला आणि डोळे उघडले. पेन दोन्ही गोलांच्या बाहेर टेकला होता.
त्रिलोक, रामभाऊ म्हणाले की पेन दोन्ही गोलांच्या बाहेर म्हणजे भारत अस लिहिलेल्या जागेत टेकला आहे यांचा अर्थ परेश महाराष्ट्राच्या बाहेर आहे. पण भारतातच आहे. भारताच्या बाहेर नाही. आता मला जर कोणी भारताचा नकाशा आणून दिला तर परेश नेमका कुठे आहे ते समजू शकेल.
सोमनाथभाई बोलले अरे रामभाऊ તમે શું કહો છો, બનતું નથી तुम्ही जे म्हणता आहात तसं काही घडत नाही. We are living in 21st century आम्ही याच्यावर कसा विश्वास ठेवायचा ?
रितेश मानसशास्त्राचा प्रोफेसर होता तो मध्येच बोलला. तो म्हणाला की
पापा आमच्या शास्त्रात अश्या अनेक घटना माझ्या वाचनात आल्या आहेत. या गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण परेश साठी जर आपण थोडावेळ आजोबांवर विश्वास ठेवला तर बघूया किती सत्य आहे ते.
त्रिलोक म्हणाला yes we are not going to lose anything. Let us give a try. आजोबा पांच मिनिट थांबा मी गूगल वरुन नकाशा काढून आणतो.
नकाशा आणल्यावर, रामभाऊंनी तीच प्रोसीजर पुन्हा केली आणि या वेळी पेन वापीहून सूरत ला जाणाऱ्या NH ४८ वर पडली. कोणालाच काही सांगण्याची गरज नव्हती. आता पर्यन्त सर्वांनाच नकाशावरून काय अर्थ काढायचा हे कळून चुकलं होतं. त्रिलोकने त्या पॉइंट च्या आसपासचा नकाशा मोठा करून आणला. या वेळी पेन बागवड टोल नाक्या च्या जवळ टेकली पण या वेळी पेनचा हात थरथरत होता. रामभाऊ म्हणाले की परेश एका गाडीत आहे आणि ती गाडी टोल नाक्याच्या जवळ आहे. हात थरथरतो आहे यांचा अर्थ गाडी प्रवास करते आहे. हा रास्ता सूरतला जातो आहे म्हणजे परेशला सूरतला घेऊन चालले आहेत.
हे सगळं जाणिवेच्या पालिकडलं होतं. सर्वजण अवाक् होऊन रामभाऊंकडे बघत राहिले. थोड्या वेळाने रीतेश बोलला आपण यांना घेऊन पोलिसांकडे जाऊ. आणि त्यांना सांगू की काही करा आणि परेशला सोडवा.
सोमनाथभाईना पण हा मुद्दा पटलेला दिसला, અમે કોઈ અન્ય રસ્તો નથી અમને આનો પ્રયાસ કરો आपल्या जवळ यांच्या शिवाय दूसरा पर्याय पण नाही. चला बघूया पोलिसांना हे पटतय का.
मग सोमनाथभाई, त्रिलोक, रीतेश, सचिन आणि रामभाऊ सगळे पोलिस स्टेशन ला जायला निघाले. नर्मदाला पण यायचं होतं पण त्रिलोक म्हणाला की पोलिसांनी ऐकलं नाही तर तुला त्रास होईल. पण थोड्या वाद विवादा नंतर तिला सुद्धा बरोबर घेतलं.
PSI धनशेखरांनी सर्व शांतपणे ऐकून घेतलं. आणि मग म्हणाले की
पोलिस डिपार्टमेंट असल्या भाकडकथांवर चालत नाही. तुमचा मुलगा हरवला आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवताहात पण आम्हाला अस वागता येणार नाही. आमचा, आमच्या पद्धतीने शोध सुरूच आहे, काही प्रगती झाली की लगेच तुम्हाला कळवू. आणि आम्हाला खात्री आहे की तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल.
साहेब, माझा मुलगा हरवला आहे जेमतेम १० वर्षांचा मुलगा त्या टोळीवाल्यांकडे कसा असेल यांचा तरी थोडा विचार करा. ही एक गोष्ट ट्राय करून बघाना. तुमच्या नियमांच्या जाळ्यामधे अडकून माझ्या मुलांचं काही बर वाईट झालं तर आम्ही काय करायचं ?
धनशेखरांनी नकारार्थी मान हलवली. शक्य नाही. म्हणाले. आणि मग शेजारी उभ्या असलेल्या शिपायांकडे वळून म्हणाले की काय वेळेकर, काय बरोबर आहे न ?
इतका वेळ मुक दर्शक असणाऱ्या वेळेकरांना कंठ फुटला.
साहेब माझ्या मेहुण्यांचा फोटो माझ्या जवळ आहे आणि तो आत्ता या क्षणी कुठे आहे ते पण मला माहीत आहे. त्यांचा फोटो यांना दाखवू, जर यांनी त्याचा ठाव ठिकाणा बरोबर सांगितला तर पुढचा विचार करू नाही तर हे लोक पण आग्रह धरणार नाहीत.
धनशेखर साहेब कुटुंबवत्सल होते, मनाने वाईट नव्हते त्यांना ही कल्पना पटली.
ओके मेहता साहेब आपण हे ट्राय करू पण हा प्रयोग फसला तर तुम्ही शांतपणे घरी जायचं कबूल ?
कबूल सगळे एकसुरात.
त्रिलोकने बरोबर कागद पेन आणि नकाशा आणलाच होता. तो रामभाऊंना
म्हणाला की हे एकदा वापरलेले साहित्य वापरता येईल का ? रामभाऊंनी मान डोलावली आणि त्यांनी धनशेखर साहेबांच्या टेबलावर मांडामांड करायला सुरवात केली.
पहिलाच कागद आणि पेन टेकली भारत या जागेवर. रामभाऊ म्हणाले की ज्या माणसाचा हा फोटो आहे तो माणूस आत्ता महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि म्हणून मला भारताचा नकाशा घ्यावा लागेल.
धनशेखर साहेबांनी शिपायांकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच विचारलं.
साहेब प्रयोग फेल गेला. माझा मेहुणा महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला नाहीये.
रामभाऊंनी लगेच उत्तर दिलं की जरा थांबा माझा प्रयोग पूर्ण होऊ द्या आणि मग आपण यावर बोलू. त्रिलोकने भारताचा नकाशा ठेवला. आणि या वेळेला पेन कोटीलिंगेश्वर मंदिर च्या बिंदु वर टेकली.
साहेब हा माणूस कोटीलिंगेश्वराच्या दर्शनाला गेला असावा बहुतेक आणि हे मंदिर कर्नाटकात आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. जरा फोन करून विचारता का?
धनशेखर साहेबांनी शिपाया कडे पाहून म्हंटलं वेळेकर फोन लावा. स्पीकर वर टाका.
वेळेकरांनी फोन लावला
अरे सुभाष कुठे आहेस तू ?
मी इथे कोटीलिंगेश्वराच्या दर्शनाला आलो आहे. का हो भाऊजी,? काय झालं. सर्व ठीक आहे ना ?
हो हो असाच फोन केला होता. बर ठेवतो.
सर्वांचे चेहरे एकदम उजळले. नर्मदाला तर अत्यानंद झालेला दिसतच होता. त्यांची आता खात्रीच पटली की त्यांचा परेश लवकरच त्यांच्या कुशीत असणार म्हणून.
साहेब, मी सकाळी घरून निघालो तेंव्हा मेहुणा आणि बहीण घरीच होती, आणि कुठे जाण्याचा काहीच प्रोग्राम नव्हता. सॉरी साहेब.
अरे ठीक आहे वेळेकर इतकं मनाला लावून घेऊ नका. धनशेखर साहेब म्हणाले पण ते आता विचारात पडले. सूरत च्या पोलिसांना काळवायचं म्हणजे साहेबांना सांगावं लागणार. आत्ता रात्रीचे आठ वाजले होते. साहेब घरी असणार त्यांना फोन करावा लागणार होता.
हॅलो साहेब मी PSI धनशेखर बोलतो आहे. एक मुलगा परेश मेहता, तीन दिवसांपूर्वी हरवला आहे तुम्हाला अपडेट दिलं होतं काल, त्यांचे where abouts मिळाले आहेत. सूरत च्या आसपास त्यांची लोकेशन मिळाली आहे. सूरत च्या पोलिसांना कळवून त्यांची मदत घ्यावी लागणार आहे साहेब.
खबर पक्की आहे ?
हो साहेब.
मग तातडीने हालचाल करा. सूरत पोलिसांशी बोला आणि तुम्ही पण लगेच सूरतला निघा.
होय साहेब. आज रात्रीच निघतो.
ओके. मला updates देत रहा.
ओके साहेब.
मेहता साहेब, मोठ्या साहेबांनी तर परवानगी दिली. आता जे काही करायचं ते आपणच. आता प्रथम रामभाऊंनी जर आताची लोकेशन दिली तर सूरतला कळवता येईल. कारण तुम्ही जेंव्हा प्रथम पाहिलं त्यानंतर दोन तास उलटून गेले आहेत. आणि आता तो सूरतला पोचला देखील असेल किंवा पुढे निघाला असेल. पण आपल्याला exact location समजली पाहिजे. अस म्हणून त्यांनी रांमभाऊं कडे पाहिले.
मला त्या साठी सूरत आणि त्याच्या आसपासचा नकाशा लागेल.
वेळेकरांनी त्यांना सूरत च्या नकाशाचं printout आणून दिलं.
रामभाऊंनी प्रोसीजर करायला घेतली. डाव्या हाताचा तळवा परेशच्या फोटोवर आणि उजव्या हातात पेन. या वेळी पेन सूरत शहरातल्या एका इंडस्ट्रियल इस्टेट वर टेकली. तो स्पॉट जरा झूम करून त्यांचे printout वेळेकरांनी काढून आणले.
या वेळेला पेन टेकली ती सिटि इंडस्ट्रियल इस्टेट मध्येच स्वामिनारायण मंदिराच्या पासून थोड दूर, एका शेड वर.
धनशेखरांनी त्या बिंदु भोवती लाल शाईने गोल काढला आणि त्याचा फोटो काढला. मग त्यांनी सूरत च्या SP साहेबांना फोन लावला, आणि त्यांना पूर्ण कल्पना दिली. मग त्यांना परेश चा फोटो आणि नकाशा चा फोटो पाठवून दिला. मग त्रिलोक कडे वळून म्हणाले की तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता. आम्ही आज रात्रीच सूरतला निघतो आहोत. उद्या दुपारी बारा वाजे पर्यन्त आपण पोहोचू सूरतला. तोपर्यन्त जर सूरत पोलिसांना यश मिळालं असेल तर परेश आपल्याला भेटेल सुद्धा.
त्रिलोक लगेच तयार झाला. साहेब तुम्ही सांगा केंव्हा आणि कुठे जमायचं ते, आम्ही पोचतो.
सचिन म्हणाला इंस्पेक्टर साहेब मी थोडं बोलू का?
बोला – धनशेखर
मला अस वाटत की मी आणि बाबा सुद्धा येतो कारण जर अपहरण करणाऱ्यांना काही शंका आली आणि त्यांनी परेशला कुठे दुसरीकडे हलवलं तर त्या वेळेस बाबा ते शोधून काढू शकतील.
धनशेखरांनी मान हलवली, पण म्हणाले की बरोबर आहे तुमचं म्हणण, पण जर ते इथे असतील तर त्यांना हवा तो नकाशा चटकन मिळू शकेल. आपण प्रवासात असतांना ही सोय असणार नाही. तेंव्हा त्यांनी इथेच असणं सोयीस्कर आहे. फक्त रात्री फोन चालू ठेवा म्हणजे झालं. सचिन साहेब तुमच्याकडे प्रिंटर आहे ना.
हो साहेब आहे. सचिन उत्तरला. आम्ही तयारीत राहू.
आणि मेहता साहेब फक्त तुम्हीच या. बाकी कोणी नको. कारण गांठ बादमाशांशी आहे वेळ प्रसंग कसा येईल ते सांगता येत नाही म्हणून ही खबरदारी घेणं आवश्यक आहे.
घरी आल्यावर सचिनने साधनाबाईंना आणि वर्षाला पूर्ण अपडेट दिलं. वर्षांनी एक नवीनच मुद्दा काढला म्हणाली
आपल्याकडे लॅपटॉप आहे इंटरनेटचं राऊटर पण आहे. आपलं प्रिंटर इनव्हरटर वर चालतं. लॅपटॉप पण चालतो. जर हे सगळं गाडीत घालून तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात तर माझ्यामते जास्त सय्युक्तिक होईल. बाकी तुम्ही ठरवा. प्रश्न परेशच्या जिवाच्या आहे. एवढा सगळं तुम्ही करता आहात तर अर्ध्यावर सोडू नये अस मला वाटत.
सचिन तिच्याकडे पहातच राहिला. वर्षांचा मुद्दा बरोबरच होता. सर्वांनाच तो पटला. त्रिलोक कडे इनोवा गाडी होती, त्यामुळे हे सामान न्यायालय काहीच अडचण येणार नव्हती. त्यांनी लगेच त्रिलोकला फोन लावला आणि त्याला वर्षांची कल्पना सांगितली. त्याला आनंदच झाला. तो म्हणाला अरे वा हे तर
बेस्टच होईल. तुम्ही तयार व्हा. मी गाडी घेऊन येतो.
रात्री साडे दहा वाजता सर्वजण पोलिस स्टेशन मध्ये पोचले. त्रिलोक,रितेश, सचिन आणि रामभाऊ या सर्वांना पाहून धनशेखर साहेब थोडे नाराज झाले, पण त्रिलोकने त्यांना नीट समजावून सांगितल्यावर त्यांनाही पटलं. पोलिसांची सुमो आणि यांची इनोवा लगेचच सूरत च्या दिशेने धावू लागली.
सकाळी साडे पांच वाजता धनशेखर साहेबांचा फोन वाजला. जवळ जवळ पंधरा मिनिटे बोलणं चालू होतं. फोन झाल्यावर साहेबांनी ड्रायवर ला सांगितलं की एखादी चहाची टपरी दिसली तर थांबव.
चहाच्या टपरीवर सगळे जण थांबले. सर्वांनाच ब्रेक हवाच होता. मग चहा पिता पिता धनशेखर साहेबांनी सांगितलं की परेश सापडला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे आणि त्याला हॉस्पितल्ला हलवलं आहे. त्यांची प्रकृती चांगली नाहीये पण डॉक्टर म्हणाले की काळजीच काही कारण नाही. उपचार चालू आहेत. बाकी डिटेल्स तिथे पोचल्यावरच कळतील.
केंव्हा कळलं तुम्हाला साहेब –त्रिलोक
आत्ताच पाच मिनिटांपूर्वी फोन आला, मग मी लगेच गाडी थांबवायला सांगितलं.
आपण जी लोकेशन दिली होती तिथेच सापडला ?
नाही त्याला तिथून दुसरीकडे नेत होते. पण पोलिसांनी तिथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक गाडीचं चेकिंग केलं. पहाटे साडे तीन ची विचित्र वेळ होती. आणि अश्या वेळी ही गाडी सुसाट वेगाने जात होती. पोलिसांनी पाठलाग करून गाडी थांबवली. एक छोटसं encounter झालं. एक बादमांश मारल्या गेला, बाकी तीन पकडल्या गेलेत. एकंदर तीन मूल सापडली. Human trafficking ची केस आहे. पण सगळी मुलं सुखरूप आहेत. मेहता साहेब तुमचं अभिनंदन. रामभाऊ, तुमच्यात अपघातानंतर दैवी शक्ति आली आहे, तुम्हाला नमस्कार करतो. आणि प्रथम जो अविश्वास दाखवला होता,
त्या बद्दल मी तुमची क्षमा मागतो. Sorry.
रामभाऊ म्हणाले धनशेखर साहेब, तुमचाच काय माझाच माझ्यावर विश्वास नव्हता. पण का कोण जाणे मनातून कसलीतरी जबरदस्त प्रेरणा होत होती. आणि परेशच्या जीवाचा प्रश्न होता, म्हणून मी हे धाडस केलं. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ.
त्रिलोकने आणि सचिनने आपापल्या घरी फोन करून updates दिले. आता सर्व रीलॅक्स होते.
हॉस्पिटल मध्ये परेश भेटला तेंव्हा पर्यन्त तो बराच सावरला होता. बाबांना बघून त्यानी जी घट्ट मिठी मारली ते पाहून इतरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. धनशेखरांनी सर्व फॉरमॅलिटीज पूर्ण करून परेशला ताब्यात घेतलं. बाकीच्या तीन मुलांच्या आई वडिलांचा शोध घ्यायला सूरत पोलिसांनी सुरवात केली होती.
दुपारचे चार वाजले होते कोणाच्याही पोटात अन्नाचा कां नव्हता. वेळेकर म्हणाले साहेब आधी कुठे तेरी जेवून घेऊ आणि मग नॉनस्टॉप लातूर ला जाऊ. एका धाब्यावर सगळे थांबले.
धनशेखर म्हणाले की रामभाऊ तुमच्या या ज्ञानाचा आमच्या डिपार्टमेंटला चांगला उपयोग होऊ शकतो. आता पळवलेली सगळी मुलं सापडतील. गुन्हेगारांचा सुद्धा पत्ता लागेल, तुम्ही सहकार्य करणार ना ?
नि:संशय साहेब, हे तर समाज कार्य आहे. जरूर सहकार्य करीन.
जेवण झाल्यावर धनशेखर,वेळेकर आणि रामभाऊ पान खायला टपरीवर गेले. आपसात बोलत बोलत वापस येतांना अचानक एक ट्रक धाब्यावर येता येता ड्रायव्हर चा कंट्रोल सुटला आणि त्या ट्रकनी सरळ रामभाऊं आणि वेळेकरांना उडवलं. क्षणभर कोणालाच काही कळलं नाही, आणि जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा सर्वांचाच थरकाप उडाला. सचिन जोरात ओरडला आणि धावला. धाब्यावर बरेच लोकही होते, ते ही जमा झाले. अॅम्ब्युलन्स बोलवायला वेळ
नव्हता. दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत गाडीत घातलं आणि जवळच्याच हॉस्पिटल मध्ये नेलं. धनशेखरांनी सूरत पोलिसांना फोन केला ते ही येऊन पोचले. दोघांचीही प्रकृती क्रिटिकल होती, त्यांच्यावर उपचार चालू होते.
त्रिलोक म्हणाला सचिन हे काय झालं रे, आत्ता पर्यन्त किती आनंदात होतो आपण आणि अचानक हे काय होऊन बसलं. सचिन काहीच बोलला नाही. शून्य मनाने तो बघत राहिला. त्रिलोकनिच मग त्यांच्या आणि सचिनच्या घरी फोन केला आणि अपघाताची बातमी दिली. दोघांचीही प्रकृती out of danger आहे असंही सांगितलं. या घटने मुळे इथेच दोन दिवस थांबाव लागेल असंही सांगितलं.
सकाळपर्यंत दोघंही शुद्धीवर आले होते आणि बरेच रिकव्हर पण झाले होते. डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितलं की आता काळजीचण काही कारण नाहीये. रामभाऊंचा हात तुटला होता आणि डोक्याला मार बसला होता. Internal injuries होत्या त्यांच्या वर ट्रीटमेंट करावी लागणार होती. आठवडा तरी राहावं लागेल अस डॉक्टरांनी सांगितलं. दोन दिवसांनी वेळेकरांची सुट्टी झाली. धनशेखर आणि वेळेकर लातूरला निघून गेले. त्यांनी परेशला बरोबर नेण्याची तयारी दाखवली पण त्रिलोक तयार झाला नाही. शेवटी रीतेश आणि परेश पोलिसांबरोबर लातूरला परतले. त्रिलोक आणि सचिन रामभाऊंसाठी थांबले. आठ दिवसांनंतर ते ही परतले.
महिन्यांभरा नंतर धनशेखर रामभाऊंकडे आले म्हणाले की आता कसं वाटतंय ? त्यांनी ठीक आहे म्हंटल्यांवर त्यांनी खिशातून दोन फोटो काढले म्हणाले ही दोन मुलं बेपत्ता आहेत. पंधरा दिवस झालेत पण काहीही सुगावा लागत नाहीये. तुम्ही मदत करता का ?
रामभाऊ बसले आणि त्यांनी प्रोसीजर सुरू केली.
दोन मिनिटा नंतर म्हणाले की मला काहीच प्रेरणा मिळत नाहीये. साहेब मला वाटत नाही की मी काही करू शकेन. अस दिसतंय की एका अपघाताने शक्ति दिली पण दुसऱ्या अपघाताने ती हिरावून घेतली. सॉरी.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired