तिन्हीसांजा ( भाग ३) अंतिम

आयुष्याच्या तिन्हीसांजा


तिन्हीसांजा (भाग ३) अंतिम

( ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.)


" वसुमती झोपतून जागी झाली तर तेव्हा ती एका आश्रमात होती. तिच्या कुपीत तिच्या बरोबर आणखी दोघीजणी होत्या. नवीन काळाप्रमाणे तिथे टिव्ही रेडीओ काहीच नव्हते. बसण्यासाठी तीन खुर्च्या, एक टेबल, प्रत्येकीला झोपायला एकेक पलंग, उशी पांघरूण. सामान ठेवण्यासाठी छोटे कपाट होते. आश्रमात एक वाचनालय होते. स्त्रियांप्रमाणे पुरुषांची वेगळी व्यवस्था होती. जेवणासाठी निराळा हाती होता. जेवणही चांगले चविष्ट होते. सकाळी दुपारी चहा काॅफी, सकाळी नाष्टा बरोबर एक कप दूध. सगळी व्यवस्था एकदम चोख होती. वसुमतीला खूप आनंद झाला. चला आता आपल्याला आपल्या मनासारखे जगता येईल या विचाराने ती आनंदी झाली. आता हवा तेवढा वेळ मी झोपू शकते, मी कितीही पडून राहिले तरी मला कोणी ओरडणार नाही. मी खूप वाचन करेन. कुठले काम राहिले आहे, आधी ते काम कर अस कुणी मला म्हणणार नाही. मला इथे कुणी राबवणारे नाही, कुणी कमी लेखणार नाही, कुणी सतत अपमान करणार नाही. मी इथे सगळ्यांशी छान मैत्री करेन, सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून राहीन आणि आनंदी राहीन. सगळ्या मिळून गाणी गाऊ, गप्पा मारू. आणि आयुष्याचे उरलेले दिवस आनंदाने समाधानाने जगू." सगळ्यां बरोबर गाणी म्हणता म्हणता " आई आई " हाका मारत मुलाने वसुमतीला उठवले. तेव्हा वसुमतीला समजले की आपण स्वप्न बघत होतो. " काय रे" तिने मुलाला विचारले.
"अग, बाबा फिरून येताना चक्कर येऊन पडले. आम्ही त्यांना घेऊन दवाखान्यात जातो. तुम्ही मागून या. " मुलगा म्हणाला.
" एकदम काय झाले? कशामुळे आली चक्कर? " वसुमतीने विचारले.
" काहीही माहिती नाही. बघू डॉ. काय म्हणतात. " मुलगा.

वसंताला ब्रेन हॅमरेज झाले होते. डॉ. म्हणाले त्यांनी आजारपण अंगावर काढले. बी.पी. खूप वाढले होते. आठ दिवस वसंत बेशुद्ध होता, त्याला औषध देऊन झोपवून ठेवले होते. तो शुद्धीवर आला तेव्हा त्याची डावी बाजू पॅरलाईज झाली होती. बोलताना ही त्रास होत होता. औषध गोळ्या कधीही घेऊन माहिती नसलेल्या वसंतावर औषधांचा मारा सुरू होता. त्याला हे आजारपण सहन होत नव्हते. तो सारखा रडत होता. डोळ्यातून पाणी थांबायचे नाव घेत नव्हते. सर्वकाही हंथरूणावरच होते. पंधरा दिवसानंतर त्याला घरी आणले. त्याची सर्व सेवा सुश्रुशा वसुमती करत होती. त्याला आता फक्त वसुमतीचाच आधार होता. तो वसुमतीला म्हणाला, " आयुष्याच्या सांजवेळी अशी वेळ येईल माझ्यावर अस कधी वाटलं नव्हतं. आयुष्यभर मी तुला छळले, काही सुख दिले नाही. आणि आता सुद्धा तुझ्याकडून सगळी सेवा करून घेतो आहे. माफ कर मला वसू. मी चुकलो फार चुकलो. "

" अहो, असू द्या. जे झाले ते झाले. आता त्याचा विचार करून त्रास करून घेऊ नका. तुमची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते करणारच. आता आयुष्याच्या संध्याकाळी आपण दोघेच एकमेकांसाठी आहोत. " वसुमतीने त्याला समजावले आणि डोळ्यातले अश्रू पुसले. सगळे आयुष्य कष्टात गेले. आता आयुष्याच्या उतरणीला ही तिच्या नशीबात कष्ट होते. पण वसंताच्या बोलण्याने परत ती गुरफटली आणि आश्रमाचे पाहिलेले स्वप्न विसरून संध्याकाळच्या तयारीला लागली.

समाप्त

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all