Aug 06, 2021
General

बेटीपेक्षा बाप सवाई

Read Later
बेटीपेक्षा बाप सवाई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

बेटीपेक्षा बाप सवाई

श्री.वडनेरे त्यांच्या कामात व्यस्त असताना परेश त्यांचा जावई केबिनमध्ये आला.
"परेशराव,या बसा. आज इकडे कसं काय येणं केलं?"

"पप्पा,तुमच्याशी बोलायचं आहे थोडं."

"बरं,भांडलात?"

"मी नाही,तुमची मुलगीच भांडते माझ्याशी."

"बरं. लंच टाईम झालाच आहे. आपण बाहेर लंच घेऊ चल. जरा निवांत बोलता येईल."

"नको तसंही मला भूक नाही."

"अहो,जावईबापू चला तर खरं. भांडणं तर काय होतच रहातात. त्यासाठी पोटाला उपाशी ठेवून कसं चालेल!"

दोघजणं ऑफिससमोरच असणाऱ्या मराठी भोजनालयात गेले. श्रीखंड, पुरी,सुकी बटाट्याची भाजी,पुलाव व सोबतीला मठ्ठा, सुग्रास जेवण होतं.

वडनेरेंनी ओळखलं,जावई नाश्ता न करताच आले आहेत. जसजसा परेशचा जठराग्नी थंड होऊ लागला तसतसा त्याच्या चेहऱ्यावरचा त्रस्तपणाही निवळू लागला.

"हं आता बोला काय केलं माझ्या लेकीने?"

"प्राचीला प्रमोशन मिळतय. ट्रेनिंगसाठी वर्षभर तिला अमेरिकेत रहावं लागणार आहे." 

"बरं मग.."

"आता प्राचीला एकतीसावं सुरु आहे. ती अमेरिकेला जाणार म्हणून सध्या मुल नको म्हणतेय. आई फोन करुन सारखी मला विचारत असते की नातवंडाचं तोंड केव्हा दाखवतोयस. आधीच आमचं लग्न उशिरा झालंय त्यात अजून उशीर केला न् नंतर काही गुंतागुंती झाल्या तर.. म्हणून मी तिला हरतर्हेने समजावलं की सध्या प्रमोशन घेणं आपल्याला परवडणार नाही. आपण जवळ असणं महत्त्वाचं आहे." 

"बरं मग.."

"मग काय, तुम्हाला माहित आहे नं तिचा स्वभाव,आपलं तेच खरं म्हणण्याची हेकेखोर व्रुत्ती. लागली भांडायला,आदळआपट करायला.  म्हणते कशी,"तुझ्या आईने तुझ्या मनात काहीबाही भरलय आणि तू अजुनही कुक्कुलं बाळ आहेस. तुला तिचा पदर सोडवत नाही. माझी प्रगती सलतेय तुम्हा लोकांना. माहेरी असते तर पप्पा किती खूष झाले असते! मला माझी मतं आहेत. तू तुझी मतं माझ्यावर लादू शकत नाहीस. माझे पाय तू नाही असे खेचू शकत. माझी स्वप्नं आता कुठे साकारत आहेत परेश. तू मला बंधनात अडकवू शकत नाहीस,कळलं! "

पोंक्षेंनी जरा विचार केला. लेकीचा आक्रस्ताळा स्वभाव ते जाणून होते. परेशच्या मनगटावर हात ठेवत ते म्हणाले,"जर प्रमोशन मिळालं नसतं तर तिला आई होण्याबद्दल हरकत नव्हती?"

एकदोन मिनटं अशीच गेली. वडनेरेंनी तिथला प्रसिद्ध गुळातला खरवस मागवला.

"तिला नं आई होणंच नकोय. म्हणून कदाचित ती परदेशी ट्रेनिंगसाठी जातेय. नाहीतर त्यांच्या या ब्रेंचमधेही ट्रेनिंग मिळू शकतं सहज. प्राचीला आई व्हायचंच नाही आहे."

"बरं,परेश काही काळजी करु नकोस.  तू आता निवांत घरी जा व अगदी नॉर्मल वाग तिच्याशी. जसं काही घडलच नाहीए असं. ते अमेरिकेचं वगैरे सगळं खूळ मी घालवतो बघ तिच्या डोक्यातून. अरे बाप आहे मी तिचा आणि आता तुझाही. कोणतीही अडचण आली तर मला फोन करत जा. अजिबात टेंशन घेऊ नकोस."

वडनेरेंनी रात्री लेकीला फोन लावला व म्हणाले,"प्राची,उद्या जरा घरी ये बाळा. मला थोडसं अस्वस्थ वाटतंय. तू जवळ असलीस की बरं वाटतं मला."

वडिलांच्या फोनने प्राची कासावीस झाली. तिची आई गेल्यापासून पप्पांबद्दल ती जरा जास्तच हळवी झाली होती. कधी एकदा माहेरी जातेय व पप्पांना डोळे भरुन पहाते,त्यांना बिलगते असं तिला झालं होतं. 

प्राची व परेश या दोघांमधला अबोला चालूच होता. ऑफिसमधून सुटल्यावर पप्पांकडे जाणार आहे असं तिने चिठ्ठीत लिहून चिठ्ठी त्याच्या डब्यात ठेवली. 

बागेतील झाडांना पाणी घालून झाल्यानंतर वडनेरे लेकीची वाट पहात होते. प्राचीने येताना नेहमीच्या स्वादिष्ट सेंटरमधून पप्पांसाठी गरमागरम इडलीसांबार आणले. वडनेरेंनी इडलीसांबार आवडीने खाल्ले. मग त्यांनी प्राचीकडे मोर्चा वळविला. 

"प्राची,तुझ्या बॉसशी बोलणं झालं माझं. तुला प्रमोशन मिळालं सांगत होता त्याबद्दल तुझं अभिनंदन बेटा."

"बोलली नाहीस मला बढतीबद्द्ल. असो.. पण ट्रेनिंगची सोय तुमच्या ब्रेंचला असतानादेखील तू अमेरिकेचा पर्याय का निवडलास बेटा?"

"पप्पा..आय कान्ट एक्स्प्लेन यू,पण तरीही प्रयत्न करते. . परेशशी मी तुमच्या पसंतीनुसार लग्न केलं. परेश खरंच चांगला जोडीदार आहे पण हल्ली नं तो सारखं बाळ हवं म्हणत असतो. त्याची आईही त्याचीच री ओढत असते. पप्पा,मी खरंच सांगते,मला मुल नकोय."

"मुल नकोय..की इतक्यात नकोय?"

"नको आहे मला मुल. मला असंच जगायचंय, मुल झालं की बंधनं येतात स्त्रीवर."

"मला एक सांग बाळा, तू लग्न करण्याआधी परेशला तुझ्या या निर्णयाबद्ल बोलली होतीस का?"

"नाही पप्पा. तेव्हा माझ्याही मनात हा विषय नव्हता पण नुकतच माझी कलिग सारिका मेटर्निटी लिव्हनंतर परत ऑफिसात येऊ लागली आहे. पप्पा तिच्या डोळ्याखालीना ही मोठाली काळी वर्तुळं आली आहेत. तिचे केस गळताहेत. रात्रीचं तिचं बाळ रडत रहातं ज्याने तिला फार जागरण होतं. दिवसभर अगदी म्लान दिसते सारिका. चार वाजले की तिची घरी जायची गडबड सुरु होते. कधी लेकीला बरं नसलं की हिची रजा ठरलेली.

 तिची ही तारेवरची कसरत पाहून मला नकोच वाटतय  बाळंतपण वगैरे. शिवाय ते सिझर झालं तर फारच त्रास होतो आणि पोट सुटणं वगैरे..माझ्या प्रोफेशनमधे माझ्या कामासोबतच माझा आऊटवर्ड एपिरिअन्सही महत्त्वाचा आहे पप्पा शिवाय घरी रहायचं म्हणजे फिनान्शिअल लॉसही आलाच."

"पोट्टे,पैशाचं कारण मला सांगू नकोस. तुझं जेवढं आर्थिक नुकसान होईल ते मी देतो तुला."

"बाकीच्या नुकसानाचं काय पप्पा..माझा आऊटवर्ड एपिअरन्स?"

"अगं पण प्राचे,तू परेशला लग्नाआधी या तुझ्या निर्णयाबाबत सांगायला हवं होतस. नसशील बोललीस तर तू त्याला व त्याच्या कुटुंबाला,पर्यायाने मलाही फसवते आहेस. कुठून दुर्बुद्धी सुचली न् तुला एवढं शिकवलं,तुझं लग्न लावून दिलं असं झालंय मला."

"हे बघा पप्पा,मी तुमच्यातल्या कोणालाही फसवत नाहीए. त्यावेळी म्हणजे लग्नाआधी मला तसं वाटत नव्हतं म्हणून मी काही बोलले नव्हते पण माणूस आहे न् मी. निर्णय बदलू शकते मी माझे अँड आय थिंक आय हेव फुल राइट ऑफ माय बॉडी. परेशला मी समजावलं की आपण एखादं मुल दत्तक घेऊ किंवा सरोगेट मदरचा ऑप्शन निवडू तर केवढा खवळला माझ्यावर! तुमच्या मनातही त्याने माझ्याविरुद्ध काहीतरी  किल्मिष पसरवलं असणार. मला एकटं पाडायला पहाताहेत,तो व त्याची आई."

"बरं चल जेवुया आता. पुढचं पुढे बघू."

प्राची घरी आली. अजुनही अबोला टिकून होता. रात्री ऑफिसातून येताना परेशने तिचं आवडतं चॉकलेट आईसक्रीम आणलं व स्वतःच सर्व्ह केलं. तिला सॉरीही म्हणाला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी फेवरेट शर्ट घालून,सेंट वगैरे फवारुन परेश एक छानसं गाणं गुणगुणत ऑफिसला निघाला. नेहमीसारखी धुसफुस वगैरे काही नाही. संध्याकाळी घरी आल्यावरही मोबाईलवर मेसेज टाइप करत राहू लागला. मधुनच गालातल्या गालात हसू लागला. प्राचीला मोबाईल पहावासा वाटावा अशातरँहेने एक्टींग करु लागला. 

प्राचीला त्याच्या मोबाईलमधले मेसेजेस वाचावेसं वाटू लागलं. तिने स्वतःला कसंबसं आवरलं.

 एके दिवशी तर कहर झाला. परेश प्राचीचा वाढदिवस विसरुन गेला. लग्न झाल्यापासून परेश नेहमी तिला सर्वात आधी विश करायचा,तेही तिच्या रुंद कपाळावर ओठ टेकवून,सोबत काहीतरी सरप्राइज गीफ्ट असायचं,खास असं. 

याचवर्षी त्याने तिच्या वाढदिवसाबाबत कसलीही उत्सुकता दाखवली नाही. प्राचीने स्वतःला समजावलं की तो फोन करेल, किंवा संध्याकाळी सरप्राईज देईल. तिने ऑफिसलाही दांडी मारली. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिच्या कलिग्जचे फोन,मेसेजेस येत होते. 

संध्याकाळी परेशचा फोन आला. प्राचीला वाटलं,तयार होऊन खाली थांबायला सांगतोय. कुठंतरी लाँग ड्राइव्हला जाण्याचा प्लान असावा.  

परेशने मात्र तिला आज जरा जास्त काम आहे तेव्हा रात्री ऑफिसातच रहावं लागेल असं सांगितलं. पप्पांचा शुभेच्छा देण्यासाठी फोन आला तेव्हा प्राची खूप रडली. शेवटी रात्री पप्पा तिच्यासोबत झोपायला आले. येताना तिच्या आवडीचा केकही घेऊन आले. मग बापलेकीने मिळून बर्थडे साजरा केला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परेश घरी आला. परत तो तसाच च्याटिंगमधे गर्क होता.

 आता प्राचीचा संशय बळावला. तो अंघोळीला गेला असता तिने त्याच्या मेसेंजरवरील मेसेजेस चेक केले. व्हाट्सअपला एका नवीन बाईचं अकाऊंट होतं,शोना म्हणून..बरंच काही लिहिलं होतं त्यात. दोघांनी एकमेकांशी घेतलेल्या प्रेमाच्या साक्षी..प्रत्येक वाक्यागणिक चार चार बदाम,ओठांचे चंबू केलेले साताठ किस. शेवटच्या ओळीत तिने टाईपलेलं,"हनि,आय कान्ट लिव्ह विदाऊट यू डार्लिंग. मिस यू टु मच. कालची रात्र माझ्या नसानसात भिनलेय. लवकरच आपण एकत्र येऊ. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू माझं ह्रदय चोरलंस परेश. लव्ह यू डिअर. आज पहाटे तू गेल्यावर मला तुझंच स्वप्न पडलं. स्वप्नात तू माझ्या बोटात  एंगेजमेंट रिंग घातलीस व माझ्या हाताचं चुंबन घेतलंस..पुढचं काहीएक प्राचीला धुरकट डोळ्यांमुळे दिसेना. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. नाकपुड्या फुलल्या होत्या. डोळ्यातून झरझर गंगायमुना वाहू लागल्या होत्या." 

परेश न्हाऊन बाहेर आला तसा प्राचीचा अवतार पाहून काय ते समजला. तो अंगाला पाऊडर लावत मस्त रोमँटिक गाण्याची शीळ घालत होता.

"परेश..परेश..ही शोना कोण? यु चीटेड मी परेश. यु आर अ बीग चीटर. यु बीट्रेड मी. आय वील नो लाँगर लीव्ह वीथ यू."

"प्राची,इट्स युवर चॉइस डिअर. इफ यू डोण्प वाँट टू लिव्ह विथ मी,यू आर फ्री फ्रॉम माय साईड." 

"पण ..पण का केलंस तू असं परेश. काय कमी आहे माझ्यात. मी तुला माझं सर्वस्व दिलं आणि तू..तू त्या शोनासोबत रात्र..शी! मला किळस येतेय तुझी परेश."

"मला मुल हवंय प्राची. तू ते देण्यास समर्थ आहेस पण तुला ते होऊ द्यायचं नाही. तुला तुझ्या फिगरची काळजी लागून राहिलेय. तुझं शरीर..तुझा अधिकार..यात माझी बाप बनण्याची इच्छा मी का दाबून ठेवू,तेही मी एक सक्षम पुरुष असताना. बरं तू म्हणतेस सरोगेट मदरचा पर्याय.. जे मुल तुझ्या रक्तामासाचं नाही,त्याला तू लळा लावू शकशील?..तू तर तुझं गर्भाशयही द्यायला तयार नाहीस मुलाच्या वाढीसाठी तर पालनपोषण ही फार लांबची गोष्ट. नऊ महिने मुल आईच्या पोटात वाढतं तेव्हा आईच्या ह्रदयाची स्पंदनं व बाळाच्या ह्रदयाची स्पंदनं आपापसात संवाद साधत असतात प्राची. तिथून तो बाँड तयार होत असतो. आई होणं एवढं सोप्पं नाही प्राची. 

 तू म्हणतेस दत्तक मुल घेऊ. अशी कोणालाही द्यायची म्हणून वाटत नाही दत्तक मुलं. कारणं द्यावी लागतात. आपलं कारण मुळीच पटणार नाही त्यांना हे फिगरचं,आर्थिक नुकसानीचं वगैरे..सो तुझा तुझ्या देहावर पुर्ण अधिकार आहे तसा माझा माझ्या. शोना एक ख्रिश्चन मुलगी आहे. काही कारणाने तिचं लग्न व्हायचं राहून गेलं. नुकतीच माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून जॉइंट झालेय ती. तिलाही मुलं खूप आवडतात व मलाही सो वी हेव डिसायडेड टू.." 

"थांब परेश. एक शब्द बोलू नकोस पुढे. मला माझी चूक उमगलेय. मी तयार आहे आई व्हायला. पण ही शोना..हिच्या तर ना मी झिंज्या उपटेन. कोण समजते कोण ही स्वतःला असं म्हणून प्राची परेशच्या गळ्यात पडून रडू लागली. तितक्यात परेशने एका हाताने मेसेज टाईपला,' डन सर,थँक्यू सर.' परत मेसेज आला..प्राचीने स्क्रीनवर पाहिलं.."मग जावईबापू कशी वाटली माझी ट्रीक! अहो मी बाप आहे प्राचीचा. तिच्यासाठी थोडाकाळ  शोना झालो इतकच. आता ठेवतो हं. यु बोथ एन्जॉय." 

प्राचीच्या आता सगळं नाटक लक्षात आलं व तिने फोमच्या उशीने परेशला बदडायला सुरुवात केली. पुढे एका वर्षात त्यांच्या घरात 'टँटँ' चे सूर वाजू लागले.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now