बेरोजगारी आणि त्यातून आजकाल येणाऱ्या समस्या...

Bekari


आज भारतात कोट्यवधी माणसे सुशिक्षित-अशिक्षित, कुशल-अकुशल कारागीर, स्त्री, पुरुष बेकार आहेत. उद्योग, नोकरी, कामधंदा करण्याची इच्छा असूनही त्यांच्या पदरी निराशा येते.

एके काळी असा समाज होता की, शिक्षण घेतले तर आपल्याला नोकरी मिळेल; पण आज काय दिसते? लक्षावधी सुशिक्षित, पदवीधर बेकार आहेत. असे का?

शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला नोकरी मिळावी अशी सर्वांची अपेक्षा असते. पण सुशिक्षितांच्या तुलनेत नोकऱ्यांची संख्या अल्प आहे. त्यामुळे बेकारांची संख्या सतत वाढत आहे.

अशा या भीषण अवस्थेत बेकार तरुण बेभान होतो. ‘रिकामे डोके सैतानाचे घर असते’, या उक्तीनुसार या बेकारांतून गुन्हेगार निर्माण होतात. अलीकडे तर असे लक्षात आले कि, सीमेवरच्या दहशतवाद्यांमध्ये आणि शहरातील टोळीयुद्धात हे बेकार तरुण सामील होतात, यालाही बेरोजगारीच कारणीभूत आहे.

या बेरोजगारीतून शहराचे होणारे मोठे नुकसान म्हणजे, आपल्या देशातील बुद्धिमान तरुण परदेशात शिक्षणासाठी जातात आणि तेथेच स्थायिक होतात. त्यामुळे आपल्या देशातील बुद्धिमत्ता आपल्या देशाच्या उपयोगी येत नाही.

सरकारी उपाययोजना

बेरोजगारी मिटवण्यासाठी शासनाची रोजगार हमी योजना, धान्य वितरण योजना किंवा झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांचा लाभ सध्या तरी सर्वच गरीब कुटुंबियांना पूर्णतः मिळतो असं दिसत नाही. अशा या शासकीय सुविधांचा लाभ जर गरीब कुटुंबियांना मिळाला तर नक्कीच परिस्थिती सुधारू शकेल. पण प्रत्यक्ष मात्र लाभार्थींऐवजी इतर लोकच या योजनांचा लाभ घेतात. तसेच काही वेळा या योजना गरिबांपर्यंत पोहचू न शकल्यामुळे त्यांना या सर्व सुविधांचा लाभ घेता येत नाही.

त्यामुळे याचाच फायदा कंत्राटदार, बिल्डर असे हे लोक घेतात. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे तसेच या वाढत्या शहरीकरणामुळे गरीब आणि बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी सरकारनेही नक्कीच काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत आणि या योजनांची माहिती गरिबांपर्यंत पोहचवली पाहिजे. तरच या वाढत्या बेरोजगारांच्या संख्येला आळा बसेल. तसेच या बेरोजगारांच्या आत्महत्येची संख्या कमी होईल..


नमस्कार.. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )