बेरीज वजाबाकी आयुष्याची (मुक्ता आगाशे) - भाग ३
अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी दुसरी
आपलं आणि आपल्या येणाऱ्या बाळाचं अधांतरी असलेल्ं भविष्य साथीला घेऊन विशाल आणि समिधा हे जोडपं नव्या प्रवासाच्या वाटेने निघाले होते.
समिधा माहेरी पोचली तेव्हा बाळंतपणासाठी लेक घरी आल्याचा आनंद सगळीकडे होता. एक तर ती त्या घरची मोठी लेक असल्याने नातवंडाच्या आगमनाची उत्सुकता ही होतीच. दोन दिवस असेच आनंदात गेले पण त्या दोघांच्या मनातली रुख रुख काही त्यांना स्वस्थ बसू देईना.
एक दिवस दुपारचा चहा आटोपला आणि मग दोघांनीही समिधा च्या बाबाजवळ आपली परिस्थिती कथन केली.
" बाबा आम्ही घरातून बाहेर पडून आलोत.माझ्याच अती मित्र वेडाने मी स्वतःचाच घात करुन घेतला आणि चांगला चाललेला व्यवसाय रसातळाला आला. सगळे सांगायचे मला,सूचना द्यायचे पण मी मात्र त्यांच्या खोट्या मैत्रीवर एवढा भाळलो होतो की ते सारे आपल्या फक्त पैशांवर भाळले आहेत हे समजायला मला फार उशीर लागला .समजले तेव्हा फार उशीर झाला होता. यावेळेस दादा सोबत वहिनी सुद्धा असल्याने त्यांनी अगदी निर्वाणीची भाषा सुरू केली. त्यामुळे घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता." विशालने वस्तुस्थिती सांगितली.
सगळे ऐकून त्यांनाही खूप धक्का बसला. लेकीची असलेली सध्याची नाजूक अवस्था, जावयाला झालेला पश्चात्ताप, मित्रांनी त्याला दिलेला धडा आणि पोरीचे भविष्य या सगळ्यांचा विचार करून त्यांनी काही रक्कम जावयाला द्यायची तयारी दाखवली.
समोर लेकीच्या डिलिव्हरीचा खर्च होताच तरी पोरीच्या भविष्याचा वेध घेत त्यांनी जावयांना पैसे देण्याचे कबूल केले. पुढच्या काही दिवसात विशालने व्यवसाय कुठे सुरू करायचा यासाठी जागेची चाचपणी करणे सुरू केले.
त्यांच्या एका स्नेह्या कडून कळले की भामरागड सारख्या आदिवासी बहुल भागात व्यवसाय लवकर तेजित येतो. त्यांना सध्या असलेली व्यवसायाची निकड लक्षात घेता त्यांनी याच भागात व्यवसाय सुरू करावा असे त्याने सुचवले.
यथावकाश योग्यवेळी समिधाची डिलिव्हरी झाली. पुत्ररत्न जन्माला आले. डिलिव्हरी नॉर्मल झाल्याने तसा फारसा खर्चाचा बोजा पडला नाही. बारावे दिवशी बाळाचे बारसे करून नाव ठेवले गेले. आणि नंतर मात्र विशालने त्याच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने भामरागड सारख्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भागात व्यवसाय थाटायचे ठरवले.
समिधाला आणि बाळाला माहेरी सोडून विशालने त्या नव्या जागी व्यवसायाची सुरुवात केली. इतर ठिकाणी व्यवसाय रुजायला आणि वाढायला वेळ लागतो त्यामानाने त्या भागात मात्र अपेक्षेपेक्षा व्यवसायाने जोर घेतला. कुटुंबाचे भागवण्यापुरती त्याची आवक आता झाली होती. बाळ आता जवळपास सहा महिन्यांचे झाले होते. त्यामुळे त्याने समीधाला आणि बाळाला सोबत न्यायचा निर्णय घेतला.
"बाबा आता मी समिधा आणि बाळाला घेऊन जायचा विचार करतोय. आता आमचं तिघांचं भागू शकेल एवढी आवक आहे सध्या माझी." त्याने सासऱ्यांजवळ विषय काढला.
समिधाला सुद्धा आता माहेरी राहवत नव्हते .पती बाहेरगावी आणि बऱ्याच महिन्यांपासून ती इथे असल्याने पाठीमागे लोक तिच्या सांसारिक जीवनाबद्दल संशयाने बघतात हे तिच्या लक्षात आले होते.
"हो बाबा ,मी पण जावं म्हणते आता .मी सोबतीला राहिली तर विशाल सुद्धा पूर्ण वेळ व्यवसायाला देऊ शकेल. आणि हळूहळू आम्हाला सुद्धा आमच्या जबाबदाऱ्या पेलायची सवय झाली पाहिजे ना!" ती बोलली.
"अगं लेक कुठं बापाला जड असते का कधी ?तुला वाटते तितके दिवस खुशाल राहू शकतेस तू पण जावयांच्या एकटे पणाचा विचार करता आणि ते तुला नेतो म्हणत आहेत तर अडवणारा मी कोण..!"आनंदाने त्यांनी समिधाला आणि बाळाला घेऊन जायची परवानगी दिली.
नव्याने पुन्हा एकदा संसाराची सुरुवात करत आहोत असे समिधाला वाटत होते. घरदार, भांडीकुंडी, परिस्थिती सारेच कसे अगदी नवे नवे होते. समिधाच्या जाण्याने संसाराला रूप रंग प्राप्त झाले होते. आणि या सर्वांचा साक्षीदार होता तिचा लहानगा बाळ तन्मय.
दिसा माजी बाळ वाढत होते आणि तसाच हळूहळू व्यवसाय वाढत होता. बाळाच्या बाळलीला अनुभवत वाढत्या व्यवसायाचा पसारा सांभाळणे सुरू होते.
व्यवसाय तसा बरा सुरू होता पण मुळातच हुशार असलेल्या विशालला आता नवीन क्षितीज खुणावू लागले होते. नक्षलग्रस्त भाग असल्याने त्याने तिथल्या काही जागांसाठी परीक्षा दिल्या.
त्या परीक्षांमधून नक्षलग्रस्त मधल्या ही अति दुर्गम भागातील आश्रम शाळेत त्याला लिपिकाची नोकरी लागली. हा भाग अतिशय दुर्गम होता. आणि या भागात नक्षल्यांचा हैदोस तर इतका होता की अगदी जीव मुठीत धरूनच राहावे लागे. अशा ठिकाणी नोकरी करणे म्हणजे एक शिक्षाच होती. पण पुढील भविष्याचा विचार करता ही नोकरी पत्करायची असे विशालने ठरवले.
काही दिवस समिधा तिथे जाऊन राहिली. पण लहानगे बाळ तिथलं दमट हवामान, जड पाणी पचवू शकत नव्हते. वारंवार त्याची तब्येत बिघडायची आणि तिथून दूर उपचाराला आणणे म्हणजे एक दिव्यच होते.
सुट्ट्यांमध्ये विशाल जेव्हा गावाला गेला तेव्हा सगळ्यांनी त्याला बाळ अन समिधा दोघांचीही अवस्था बघून बाळ जोवर लहान आहे तोपर्यंत समिधाला आणि बाळाला इकडेच ठेवावे असे सुचवले.
"समू, मला सुद्धा वाटते की तू बाळाला घेऊन इकडेच राहावे. तिथलं हवामान बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबात बरं नाही. बाळ थोडा मोठा झाला की मी तुम्हा दोघांनाही घेऊन जाईल."
विशालला सोडून राहायची समिधाची इच्छा नव्हती पण बाळाची शारीरिक अवस्था बघता तिने त्या निर्णयाला स्वीकृती दिली.
बाळाला घेऊन ती काही दिवस माहेरी अन् काही दिवस सासरी असे काढू लागली.
ती माहेरी जायचा विचार करायची पण
"थांब ना बेटा अजून काही दिवस, नातवाच्या सहवासात दिवस कसा जातो ते कळत सुद्धा नाही. या थकलेल्या जीवाला नातवंडाच्या रूपात एक विरंगुळा मिळतो बघ."असे सासरे बोलायचे
एकेकाळी घरातून निघून जा म्हणणारे सासरे आता आवर्जून तिला आणि बाळाला थांबवून घेऊ लागले. तिच्या सासरी असण्याने सासूबाईंना सुद्धा सासू पण गाजवायला हक्काची सुनबाई मिळायची.खरंतर विशाल शिवाय सासरी राहायचं तिच्या फार जीवा कडे यायचं पण मोठ्यांचे मन कसे मोडायचे म्हणून ती काही दिवस सासरी आणि काही दिवस माहेरी अशी राहू लागली.
समिधा शरीराने जरी इकडे असली तरी तिचं अर्ध मन विशालच्याच ख्याली खुशालीत लागलेले असायचे. नव्याने आयुष्यात आलेला मोबाईल त्याच्याकडे होता पण पुरेशी रेंज नसल्याने विशाल शी बलणे फार कमी व्हायचे आणि सतत त्याचीच चिंता तिला लागलेली असायची.
इकडे मात्र विशालने असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला अनेक स्पर्धा परीक्षांची पुस्तके घेऊन आणली . इथे फारसे काम आणि घराचा व्याप नसल्याने त्याने स्वतःला अगदी त्या पुस्तकांच्या ढिगार्यात झोकून दिले. काम आणि जेवण खावण याव्यतिरिक्त चा सारा वेळ तो फक्त अभ्यास आणि अभ्यासच करू लागला.
गेल्या वर्षभर तो अशी अवघड नोकरी करत होता. ही अवघड नोकरीच त्याला अजून पुढे जाण्याचे बळ देत होती . अभ्यास करणे आणि स्पर्धा परीक्षा देणे सुरूच होते. एक दिवस त्याच्या मेहनतीला फळ येऊन तो स्पर्धा परीक्षेत पास झाल्याची अन् तलाठी या पदासाठी मुलाखती चे पत्र त्याला प्राप्त झाले.
त्याची तपस्या आता फळाला आली होती, त्याचा वनवास संपला होता.
"हॅलो समू ,मी तलाठी ची परीक्षा पास झालो सोमवारी मुलाखत आहे. अखेर देवाने मार्ग दाखवला. संपले ग आपले ही कष्टाचे दिवस संपले."त्याच्या बोलण्यातला उत्साह ओलावा सगळं समुच्या मनाला भिडलं होतं.
एका सुरळीत मार्गावरून चालणारं आयुष्य अचानक कसं भरकटल्यासारखं झालं होतं. अगदी सगळीकडल्या वाटा बंद झाल्या आहेत असं वाटत असताना आयुष्याला फुटलेले दोन चार फाटे गोंधळात घालणारे होते. या वाटेवरून चालावं की अगदी इथेच ठिय्या देऊन बसून राहावं अशा मनाच्या द्विधा अवस्थेतूनही कितीदा जावं लागलं होतं. सध्या तर जिथे नोकरी सुरू होती तिथे तर जीवाची ही काही शाश्वती नव्हती.
सगळीकडे किर्र कळोख दाटलेला असताना हळूच एखादा प्रकाशाचा कवडसा गवसावा तसं काहीच झालं होतं.
विशालला आता तलाठी म्हणून नवीन नोकरी लागली होती. कर्म धर्म संयोगाने समूच्या माहेराच्या जवळच त्याला पोस्टिंग मिळाले होते. आता दुसऱ्याही लेकराची चाहूल लागली होती. आता कसे सगळे सुरळीत सुरू होते. दुसऱ्या मुलाचाही जन्म झाला होता.
मधल्या काळात समिधाच्या बहिणीचे लग्न झाले. लग्नाला बरेच वर्ष होऊनही मातृत्व सुख तिला लाभले नव्हते. सासरची उसवलेली नात्यांची वीण समिधा ने आपल्या समंजस स्वभावाने पुन्हा एकदा मजबूतीने विणली होती.
विशालला लागलेली चांगली नोकरी बघून मोठे दिर आणि जाऊ आता स्वतःहून संबंध जोडू बघत होते. मागचं झालं गेलं सगळं विसरून समिधा आणि विशाल दोघांनी पण नव्या दमाने आयुष्याला सुरुवात केली होती.
नवऱ्याची सुरळीत सुरू असलेली नोकरी, दोन गोंडस लेकरं, त्याचं तिच्यावरचं प्रेम आणि विश्वास एका स्त्रीला याहून अधिक आणखी काय हवं असतं बरं....!
मुलं मोठी होऊ लागली आपल्या हुशारीने शाळेत त्यांची एक वेगळी प्रतिमा होती. त्याचा सुद्धा समिधाला खूप अभिमान वाटायचा. ती फारशी शिकली नसली तरी तिची मुलं मात्र नाव काढतील याची तिला आता मनोमन खात्री पटू लागली होती.
माहेर जवळ असल्याने आणि संकटकाळी फक्त सासऱ्यांनीच भक्कम साथ दिल्याने विशाल त्यांचा नितांत आदर करायचा . पण दुर्दैवाने एका छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन समिधाचे बाबा गेले. भाऊ सगळ्यात लहान होता आणि अजून कामधंद्याला लागायचाच होता. अशावेळी विशालने मोठा जावई म्हणून संपूर्ण घराची धुरा एक हाती सांभाळली होती.
आता विशालच्या घरी आणि सासरी सुद्धा विशाल कडे एक आधारस्तंभ म्हणून पाहिलं जाऊ लागलं होतं.
"चला पालटले आता आपले एकदाचे दुःखाचे दिवस."असे आता वाटत असतानाच अचानक समूच्या मोठ्या दिरांची तब्येत खूप बिघडली. त्यांच्या दोन्ही किडन्या पूर्ण तया निकामी झाल्याचं उपचारादरम्यान कळलं. आता कुठे रुळावर आलेल्या आयुष्याच्या गाडीला अचानक ब्रेक लागावा तसं झालं.
"विशाल आता तुझ्याच हातात आहे रे, तुझ्याशिवाय मी आणखी कोणाकडे पदर पसरू?"जावेच्या सांगण्यावरून अन् पुत्र प्रेमापोटी आईने पुन्हा विशालला गळ घातली.
काय झाले असेल पुढे ? समिधा आणि विशालच्या आयुष्याला या घटनेने कुठले वळण मिळाले असेल हे बघण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.
© डॉ. मुक्ता बोरकर- आगाशे
मुक्तमैफल