बेरीज वजाबाकी आयुष्याची (मुक्ता आगाशे) - भाग १
अष्टपैलू लेखक महासंग्राम
दुसरी फेरी
बाजूलाच असलेल्या सासूच्या पर्थिवाच्या शेजारी समिधा बसून होती.
मन आता रडणं अन् काही वाटणं या भावनांच्या बाहेर पडलं होतं.
सासूला असणारा त्रास तिने पाहिलेला होता त्यामुळे हे मरण म्हणजे तिला त्यातून एक प्रकारची सुटकाच वाटत होती.
नणंद मधामधात भावूक होऊन अश्रू गाळत होती. साहजिकच आहे,आईच्या जाण्याचे दुःख लेकीला होणे स्वाभाविक होते. पण जाऊ सुद्धा हेल काढून जेव्हा सासूच्या जाण्याचे दुःख प्रदर्शित करू लागली तेव्हा ते मात्र तिला अगदीच असह्य होऊ लागलं....! पण जाणीवूर्वक त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता तिच्याकडे.
आपलं डोकं गुडघ्यात खुपसून ,पाठ भिंतीला टेकवत ती तशीच बसून राहिली. मन मग हळूच भूतकाळात पोचलं....
लग्न झालं अन् देशमुखांच्या घरची धाकटी सून म्हणून ती त्या घरात गृहप्रवेश करती झाली.
वासुदेवराव देशमुख हे गावातलं फार मोठं नाही पण तरी बरं प्रस्थ होतं. वडिलोपार्जित शेती आणि त्यांची जंगल खात्याची नोकरी यामुळे बऱ्यापैकी माया त्यांनी जमवली होती. पत्नी रमाबाई, मुलगी सरीता, मोठा मुलगा सागर अन् धाकटा विशाल अशी त्या कुटुंबाची व्याप्ती...!
लेक सगळ्यात मोठी असल्याने तिचं लग्न आधीच झालेलं. तिचं सासर गावात होतं पण ती पतीसोबत कामानिमित्ताने शहरात राहायची. दुसरा मुलगा सागर तो पण शहरात नोकरी करायचा त्यामुळे त्याचं पण कुटुंब तिकडेच असायचं. लहान विशाल शिकला सवरलेला पण त्याला नोकरी करायची नसल्याने त्याने जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी आपला ऑटो पार्टस चा व्यवसाय सुरू केलेला.
लेक आपल्या घरी खुश होती. सासर गावातीलच असल्याने ती जेव्हा सासरी यायची तेव्हा आपसूकच तिची भेट व्हायची अन् आपल्या लेकीचं सुख बघून त्यांचं मन आनंदाने भरून यायचं .
सागरला शहरात नोकरी होती पण त्याचं जेमतेमच भागवणारी. शिक्षक आई-बाबांची डीएड करणारी मुलगी त्याच्यासाठी मागितली. पण लग्नानंतर तिने ते कधी पूर्ण केलं नाही. सासू-सासऱ्यांजवळ राहणं म्हणजे तिला फार जाच वाटे त्यामुळे घरची मोठी सून असली तरी तिचं घरी येणं जाणं फार कमी असायचं. सासू-सासरे तिला चालत नसले तरी त्यांच्याकडून मिळणारा पैसा मात्र तिला हवा असायचा तिने सासरशी जे काही संबंध टिकवले होते ते फक्त त्या मिळणाऱ्या पैशांसाठीच! धाकटा विशाल ग्रॅज्युएट झालेला. मुळात तसा हुशार. दिसायला देखणा पण अतिशय मित्र वेडा. या अति मित्र वेडापायी च पुढे न शिकता त्याने जवळच्याच तालुक्याच्या गावी व्यवसाय घातला जेणेकरून मित्रांसोबत चे मैत्र कायम राहील.
त्याच्या बाबांना त्याचे हे मित्र प्रेम काही आवडायचे नाही. माणसाला मित्र असावेत पण ते चांगले. फैय्याशी मित्र काही कामाचे नसतात आणि अति मित्र वेड माणसाची प्रगती खुंटवते असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यासाठी पुष्कळदा त्यांचे आणि विशालचे मतभेद होत राहायचे. त्यांचा बराचसा कल मोठ्या मुलाकडे होता आणि विशाल धाकटा असल्याने आईच्या लाडाचा होता.
वडील रागवायला बसले की आई मग मध्येच मोडता घालायची आणि विशालला "असं नाही करायचं रे राजा , बाबांचं ऐकायचं." असं त्याला नेहमी समजून सांगायची
तो पण तेवढ्यापुरतं "हो ग आई ,आता यापुढे असं नाही करणार ."असं आश्वासन द्यायचा आणि तिथल्या तिथेच विसरून जायचा.
समिधा साठी जेव्हा हे स्थळ चालून आलं तेव्हा किती खुश होती ती.दिसायला सुंदर असली तरी अभ्यासात यथा तथाच असल्याने एवढा देखणा अन् शिकलेला विशाल तिला होकार देईल की नाही तिला शंकाच होती. पण विशालला सुद्धा समिधा पाहताच आवडली होती अन् शिकलेल्या ग्रज्युएट पोरींचा नकार त्याला माहित होताच त्यामुळे त्यानेही अगदी पहिल्या पाहण्यातच तिला पसंती दिली.
यथावकाश रितीनुसार लग्न लागले अन् समिधा धाकटी सून म्हणून देशमुखांच्या घरी प्रवेश करती झाली.
थोडे कडक सासरे, सासू नवऱ्यासाठी वत्सल आई पण तिच्यासाठी खाष्ट नसली तरी सासूच होती. वयाने मोठी असली तरी नणंद समजदार व वत्सल होती. मोठे दीर तसे स्वभावाने शांत. जाऊबाईंचा मात्र त्यांच्या प्रत्येकच वागण्या बोलण्यावर पगडा होता.एवढे कडक असलेले सासरे ,मात्र काहीच बोलायचे नाही तिला...!कर्तव्याच्या बाबतीत अगदी शून्य असलेली जाऊ आपल्या अधिकारांसाठी मात्र फारच सजग होती.
नवखी असलेली समिधा हळूहळू प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ट्य आपल्यापरीने समजून घेत होती. तिला सगळ्यात जास्त खटकायचे ते तिच्या जावेचे वागणे.वेळोवेळी ती मोठी आहे हे जाणवून द्यायची ती एकही संधी सोडत नसे. समिधाला त्या गोष्टीचा खूप राग यायचा पण तिच्यावरचे संस्कार मात्र तिला गप्प ठेवायचे. त्यातच विशाल साठी तिच्या बहिणीला मागावे अशी तिची फार इच्छा होती पण विशालने मात्र समिधाला पसंत करून तिच्या मनसुब्यांवर पाणी फेरले होते आणि त्याचाच एक प्रकारे वचपा काढण्यासाठी ती समिधाच्या प्रत्येक कामात चूक काढून तिला कसं खाली दाखवता येईल याचा प्रयत्न करत राहायची. समिधाला हे सगळे फार वेगळे वाटायचे पण आपण नवे आहोत हा विचार करून ती गप्प बसायची.
काही दिवसातच पाहुण्यांची पंगापांग झाली आणि खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली. ती विशालच्याच पसंतीची असल्याने त्याचे तिच्यावर प्रेम होतेच पण काही दिवसातच आपले सासरे आणि नवरा यांच्यात सततच खटके उडत असतात हे तिच्या लक्षात आले. जाऊ पुढे गरीब गाय बनून वागणारी सासू मात्र समिधावर आपला सासूपणा हक्काने गाजवीत असे.
नव्या च्या नवलाईचे दिवस संपले अन् तिच्या नवऱ्याचे मित्रांच्या मागे भरकटत जाणे तिला सुद्धा खटकू लागले. त्या अति मित्र प्रेमाबाई त्याचे आता व्यवसायाकडे सुद्धा दुर्लक्ष होऊ लागले. ह्या सगळ्यामुळे चांगले चालत असलेल्या व्यवसायाला लगाम लागल्यासारखा झाला. एकदा का व्यवसाय मंदावला की त्याला अजून वर आणणे फारच कठीण होते. त्याचीच प्रचिती तिच्या नवऱ्याला येऊ लागली.सुरुवातीला तिने नवऱ्याला यासाठी खूपदा समजवून सांगितले पण मित्र समोर आले की त्याला काही कळेनासे व्हायचे.
"बाबा थोडे पैसे हवेत दुकानात माल भरायचा आहे."जवळचे पैसे संपले म्हणून वडिलांना पैसे मागितले त्याने.
"कशाला हवेत तुला पैसे दुकानासाठी की मित्रांवर उडवायला? एक दमडीही देणार नाही मी तुला.."सासरे फारच तावात होते.
दोघाही बापलेकांमध्ये बरीच बाचाबाची झाली. आणि विशाल सुद्धा तावातवाने पायात चपला अडकवून घराबाहेर पडला.
सासुने सासऱ्यांना समजवून पाहिले पण सासरे आज काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. समिधाची अवस्था अगदीच कोंडीत पकडल्यासारखी झाली होती.
गर्भारपणाचे सात महिने पूर्ण झालेले अन वरून सकाळच्या भांडणामुळे घरून निघालेला नवरा रात्र होऊन गेली तरीही घरी परतला नव्हता. अनेक शंका कुशंकांनी तिच्या मनात गर्दी केली होती. तिची आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याची चिंता आता तिला सतावू लागली होती. काय वाढून ठेवलं असेल आपल्यापुढे? कुठे असेल आपला नवरा? जेवला असेल का? जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना त्यांनी..........? अशा अनेक शंका कुशंका तिच्या मनात फेर धरून नाचत होत्या.
दोन जीवांची असल्याने अतिशय भूक लागली होती पण घशाखाली मात्र अन्नाचा एक कण पण उतरत नव्हता...!
आता मात्र सासू मधली आई जागी झाली होती. सुनेच्या मनातली चलबिचल एक बाई म्हणून तिला कळली होती.
"पोरी कळते गं मला तुझ्या मनातली सल, पण दोन जीवांच्या बाईने असं उपाशी तापाशी झोपू नये बघ."
समिधाच्या पाठीवरुन हात फिरवत बळेच तिने समिधाला जेवू घातले.
घरात कोणीच काही बोलत नव्हते पण सगळ्यांच्याच मनावर ताण जाणवत होता. रात्र होऊनही विशाल अजून परतला नव्हता. पोराने जिवाचं काही बरे वाईट तर केले नसेल ना ही शंका आई-वडील दोघांनाही सतावत होती.
काय झालं असेल? विशाल सुखरूप तर असेल ना? त्याला काही झालं तर मी अन् माझं पोटातलं अभागी बाळ दोघांचं काय होईल? नावाप्रमाणेच या संसाराच्या हवन कुंडात माझी समिधा पडेल का?विचार करून करून ती शिणली होती.
काय झालं असेल? आला असेल का विशाल परत की काही बरं वाईट केलं असेल त्याने? जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.
© डॉक्टर मुक्ता बोरकर -आगाशे
मुक्तमैफल